संपादकीय
"प्रेम कोणावरही करावं……
कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश,
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि
भविष्यकालातील त्याच्या अभ्युदयाची आशा.....एकमेव!"
कवी कुसुमाग्रजांच्या या ओळी त्यांना उमगलेला प्रेमाचा अर्थ सांगतात.
प्रेम हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. आई, वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा ही झाली रक्ताची नाती. पण या पलीकडच्याही नात्यांमधून आपल्याला प्रेम मिळतंच असतं. कधीकधी तर प्रेमासाठी नात्याचीही गरज पडत नाही. किंबहुना ती नसावी. प्रेम ही अशी निरपेक्ष भावना आहे की जी फक्त द्यावी, दुसऱ्याकडून ते मिळण्याची अपेक्षा करू नये. अपेक्षेने प्रेम मिळतं की नाही माहित नाही पण अपेक्षाभंग मात्र बऱ्याचदा वाट्याला येतो. प्रेम देण्यासाठी नातीगोती, धर्म-जाती, प्रांत, भाषा, रंग-रुप, वय, सामाजिक आर्थिक स्थान, लिंग यापैकी कशाचीही गरज नसते. फक्त मनात भावना असावी. "हे विश्वचि माझे घर" असं म्हणत ज्ञानेश्वरांनी आपल्या सर्वांना प्रेमाच्या धाग्याने बांधलं आहे. संपूर्ण जगाला प्रेम देण्याचा संदेश दिला आहे.
म्हणूनच फेब्रुवारी या प्रेमाच्या महिन्यानिमित्त या अंकाचा विषय होता 'प्रेम म्हणजे प्रेम असतं.....पण तुमचं आमचं सेम नसतं'
सेम का नसतं तर प्रत्येकाची प्रेमाची परिभाषा वेगळी असते. प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत, प्रेम व्यक्त करण्याची पद्घत वेगळी असते. ही प्रेमाची परिभाषा समजून घेण्यासाठी, त्यावर चर्चा होण्यासाठी हा विषय निवडला. युद्ध, वाद, दहशतवादी हल्ले आणि द्वेष पसरवणाऱ्या सर्व गोष्टी कायमच्या संपवून टाकण्यासाठी आणि जगभरात फक्त आणि फक्त प्रेमच राहायला हवं, यासाठी प्रेमावर भरपूर चर्चा होणं, प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या समजून घेणं, अनोळखी लोकही प्रेम या एका ओळखीच्या धाग्याने जोडले जाणं महत्त्वाचं. जगभरात ठिकठिकाणी हे प्रयत्न सुरु आहेत. याच प्रयत्नात आपलाही हा खारीचा वाटा.
वाचकहो, आपण व्यक्त झालात याबद्दल आभार. असेच व्यक्त होत राहा. एकमेकांकडे व्यक्त व्हा, एकमेकांना प्रेम देत चला, सारं जग प्रेमाने भरुन टाकूया आणि द्वेषाला कायमचं हद्दपार करूया.
वैष्णवी कारंजकर