फणसाचे गरे
फणस ह्या फळाची तऱ्हाच न्यारी. हे फळ गणपतीच्या पोटा प्रमाणे भयंकर मोठे. बाहेरून पाहायला अतिशय काटेरी नि रुक्ष. पण हे काटे टोचत नाहीत आणि फणस कापला असता आंत बाळकृष्णाच्या तोंडप्रमाणे एक विश्वच जणू दिसते. आंबा फळांचा राजा इंद्र असला तर फणस हा इंद्राचे पद हस्तगत करण्यासाठी पाताळांतून प्लॅनिंग करणारा कुणी महा पराक्रमी दैत्य. आंबा सचिन असला तर फणस राहुल द्रविड. आंबा असेल सुंदर कविता तर फणस हा निबंध. फणसाचा वास मला विशेष पसंद नाही. सिंगापुर मध्ये डुरियन हे फळ मिळते जे फणसा प्रमाणेच असते. पण ह्या फळावर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेंत आणणे किंवा हॉटेल मध्ये आणणे ह्यावर बंदी आहे कारण ह्याचा भयंकर वास. डुरियन च्या वासाला सिंगापुर चे लोक किंवा गोरे लोक बरेच घाबरत असेल पण माझ्या मते ह्याचा वास खोबरेल तेल आणि आपला कोंकणातील फणस ह्यांचे मिश्रण आहे. खोबरेल तेल आणि फणस ह्यांचा संबंध आहे. कसे ते पुढे वाचा पण त्या आधी थोडा इतिहास.
फणसाला हिंदीत कठहल म्हणतात तर मल्याळी भाषेंत चक्का. भारताशिवाय इंडोनेशिया, थायलंड इत्यादी प्रदेशांत भरपूर वापरला जातो आणि दक्षिण अमेरिकेत सुद्धा खूप वापरला जातो. फणसाला इंग्रजीत जॅकफ्रुट म्हणतात पण त्यांतील जॅक हा शब्द आपल्या चक्का ह्या शब्दावरून आला आहे. कोंकणीत सुद्धा चाको हा शब्द आहे. हा शब्द कोवळ्या फणसा साठी वापरला जातो. फणस पूर्वेंत भारतातून गेला नाही (किमान आधुनिक काळांत) त्यामुळे फळ तेच असले तरी चव, आकार इत्यादी गोष्टींत हे फळ इंडोनेशिया सारखया देशांत खूप वेगळे आहे.
फणसाचा एक भाऊ आहे निरफणस[१]. ह्याला आमच्या घरांत मानाचे स्थान. निरफणसाचे झाड खरेच निर्लज्ज. हे कुठेही तग धरते. पणजीत एका मोठ्या रस्त्याच्या बाजूला एकही झाड नसताना हे झाड मात्र उभे आहे आणि भयंकर फळे देते. पण गावांत मात्र शेकडो झाडे असली तरी काहीच लोकांच्या दारातील झाड फळे देते. मग ह्या माणसाला गावांत असाधारण महत्व. माझ्या आजीच्या मते निरफणसाचे पापड सुद्धा बनवले जायचे पण मी फक्त एकदाच खाल्ले आहेत. झाड मोठे झाले म्हणून फळ देईलच असे नाही आणि नाही दिले म्हणून कधीच देणार नाही असेही नाही त्यामुळे झाड मारण्यास सुद्धा भीती वाटते. गावांत श्रद्धा होती कि हिथे भूमिगत जल आहे तिथेच ह्या झाडाला फळे होतात. खरे खोटे देव जाणे.
निरफणस ला इंग्रजीत ब्रेडफ्रुट म्हणतात. कारण कदाचित असे असावे कि कापले तर आतील भाग थोडा ब्रेड प्रमाणे वाटतो. फणसा सारखे ह्याला 'गरे' नसतात, हे फळ भरीव (सॉलिड) असते. ह्याची असंख्य व्यंजने सर्व जगांत बनवली जातात. आंग्लप्रदेशांत हे फळ सध्या सुपरफूड म्हणून ओळखले जाते. ह्या फळाचा इतिहास सुद्धा नक्की ठाऊक नाही. हे फळ आधीपासून हवाई बेटांवर उपलब्ध होते पण हवाई त्याला बाहेर जाऊ देत नाही. इतिहासांत किमान एकदा ह्या फळाच्या स्मगलिंग ला घेऊन भले मोठे युद्ध झाले आहे (हवाई प्रदेशांत). वाचकांनी निरफणस खाल्ला नसेल तर मुद्दाम ह्याची भाजी किंवा "फोडी" तळून खाव्यात. योग्य सुगरणीच्या हातांत ह्याला दुसरी सर नाही.
फणस सर्वानीच खाल्ला आहे. फणसाचे दोन प्रकार असतात. रसाळ आणि कापा किंवा कोंकणीत ह्याला "बरकय" म्हटले जाते. गांवांत काही लोक ह्याला पुरुष आणि स्त्री असा लिंगभेद सुद्धा मानायचे. त्याशिवाय प्रत्येक फणस १००% ह्या दोन्ही गटांत निर्विवाद पाणे मोडतो असेही नाही. रसाळ फणस जितका रसाळ तितकाच ओला, चीक असलेला आणि भयंकर गोड असतो. कापा फणस ह्याच्या उलट हा थोडा घट्ट, चीक कमी पण गोड पणा सुद्धा कमी. कधी कधी कुणाच्या घरांतील कापा फणस अत्यंत गोड निर्माण व्हायचा मग ह्याला भयंकर मागणी असायची.
मला मात्र कापा कधीही आवडला नाही. माझ्यासाठी रसाळ फणस अत्यंत प्रिय. त्यांत सुद्धा सर्वांत ओला असणारा आमच्या घरांतील रसाळ फणस विशेष प्रिय. हा इतका गॉड असायचा की ह्याच्या गोडपणाने जिभेला मीरमिरी यायची. आणि काही तास जास्त बाहेर हवेंत ठेवला तर ह्यातील साखरेची अल्कोहोल बनून चव बिघडण्याची. मग आम्ही झाडावरून फणस आणला कि आधी जमिनीवर काही वर्तमानपत्रे वगैरे टाकून त्याला ठेवायचो, बाहेरून साफ करायचो. जेवण वगैरे झाल्यानंतर काही तासांनी शानू आपल्या धारधार कोयत्याने त्याला एका विशिष्ट पद्धतीने कापायचा. आजी मग आपली खोबरेल तेलाची डबी घेऊन यायची. मग त्यांत आम्ही मुले आधी हात बुडवायचो आणि जसे नरसिंहाने हिरण्यकश्यपूच्या पोटांत हात घालून त्याची आतडी बाहेर काढली तसे "गरे" काढायचो. आईसाहेबानी कितीही ओरड केली तरी गरे प्लेट वगैरेंत घेऊन खाणे म्हणजे त्यांचा अपमान आहे अशी माझी ठाम समजूत होती. त्यामुळे गरे थेट तोंडात. मग त्यातील कोय एक दिवस गळ्यांत अडकून मी मरेन अशी शाप वजा भीती आजी व्यक्त करायची. कोय आम्ही बाहेर फेकून द्यायचो. उष्टी असल्याने त्याची भाजी करायला आजी नकार देत. हाताला खोबरे का ? तर फणसाला खूप चीक असतो. खाताना लागत नाही पण खाऊन झाल्यांनतर तो चीक हातावरून काढता काढता भयंकर त्रास व्हायचे. फणसाचा मध्यभाग म्हणजे जी "माव" असायायची ती दिसायला रामानंद सागराच्या सिरीयल मधील राक्षसाच्या हातातील मेस (गदे ) प्रमाणे असायायची. हिला खूपच चीक असायचा.
फणस आमच्या पोटापेक्षा मोठे असायचे पण आम्ही हा हा म्हणता २-३ फणस आम्हा ४-५ मुलांत सहज फस्त करायचो. फणस खाल्यानंतर पाणी प्यायचे नसते त्यामुळे पोटदुखी वाढते. महिलांना विशेष त्रास होऊ शकतो आणि गरोदर स्त्रियांना फणस अजिबात खाऊ दिला जात नसे.
फणस खाल्ल्यानंतर त्यातील धागे, त्याचा मध्यवर्ती भाग "माव' आणि कात हि फेकून न देता बाहेर सूर्यप्रकाशात सुखावली जाते. नंतर आगीत थोडी भाजून हि गुरांना दिली जाते. न सुखावत दिली तर गुरांना त्रास होतो असे लोक म्हणत पण मी कधी पहिले नाही. फणसाच्या गऱ्यांना कधी कधी बाहेर जे धागे असतात ते पूर्णपणे बेचव असतात. ते कधी कधी घशांत अडकू शकतात म्हणून खाताना आपण थोडी सावधानी दाखवणे आवश्यक आहे.
जेंव्हा अन्नाचा तुटवडा असेल तेंव्हा फणस हे फळ एक वरदान प्रमाणे असेल. कारण झाड मोठे पण एकदा वाढल्यानंतर विशेष कष्ट लागत नाहीत. पानाची पत्रावळी केल्या जातात, लाकूड हे अत्यंत उच्च दर्जाचे आणि टिकावू मानले जाते. फणस हे फळ लहान असताना त्याची भाजी केली जाते. थोडा मोठा झाल्यावर सुद्धा तेलांत तळून "गरे" म्हणून एक चविष्ट पदार्थ निर्माण होतो तो कुठल्याही चिप्स पेक्षा श्रेष्ठ पण बनविण्यास सोपा. पिकल्यानंतर खाल्ला जाऊ शकतो. पण ह्याचा रस सुखवून त्याची jerky सुद्धा बनवली जाते. आणि माणसाने वापरल्यानंतर जे काही बाकी आहे ते आपण गुरांना देऊ शकतो. फणसाचे एक चांगले झाड उन्हाळ्यांत १०-२० फणस सुद्धा देऊ शकते. आमचे एक झाड वर्षाला साधारण ७० फणस देत असे. फणस इतके व्हायचे कि आपण खाऊन, सर्वानाफुकट न्या म्हणून सांगून सुद्धा शेकडो फणस बागेंत शेवटी जमिनीवर पडून कुजायचे. मग त्याच्या वासाने माशा यायच्या. त्यामुळे चांगले फणसाचे झाड घरी असणे हे थोडक्यांत लॉटरी प्रमाणे असायायचे. आमच्या इथे आता काही डॉलर मध्ये फणसाचे गरे कॅन मध्ये येतात. ह्यांत साधारण १० गरे असतात. ते खाताना हसू येते. फणसाची व्यंजने मला विशेष ठाऊक नाहीत. पण एक पसंद आहे ते म्हणजे "ढोणास". फणसाप्रमाणेच दिसायला वाईट पण चवींत उत्तम असा हा पदार्थ. हा बेकिंग क्षेत्रांत मोडतो.[२]
आंबा, काजू नारळ इत्यादी फळे चोरणे हा गांवातील रिकामटेकड्या पोरांचा प्रमुख धंदा त्याशिवाय बायका मंडळी ह्या चोरींत तरबेज. पण फणसाला चोरायला कुणीच जात नसे कारण एकट्याने पिशवींत टाकून न्यावा अशी हो गोष्ट नव्हती. त्याशिवाय प्रत्येक फणसाची विशेषतः कापा फणसाची चव हि वेगळी त्यामुळे खाताना हा फणस दामू भटजींच्या बागेतील आहे कि कोसतानीच्या बागेतील आहे हे बहुतेक लोक सांगू शकत.
पण नाही म्हणायला एका ठराविक बागेतून फणसाची चोरी होत असे. गावाच्या वेशीवर पांडुरंग ह्यांची बाग होती. ह्याच्या बागेंत ६ बरकय होत्या ज्याला डझन वारी फणस लागायचे आणि भयंकर गोड. ज्या काळी साधारण फणस ७०-८० रुपये देऊन लोक नेत असत तिथे ह्याच्या फणसाला ३०० रुपयांचा दर होता. आणि दैव पहा, ह्याच्या फणसाची बी पासून दुसरे झाड होत नसे त्यामुळे कलमे करणे हा एकमेव उपाय होता पण हा कुणालाही कलमे करायला देत नसे. शेतकी विभागातल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा ह्याला कलमे करून विकण्याचा सल्ला दिला होता आणि ह्या फणसाच्या जातीला त्याचे नाव देऊ असे सुद्धा सांगितले होते पण हा माणूस बधला नाही. तर ह्याच्या फणसावर चक्क दरोडा पडायचा. लोक रिक्षा घेऊन येऊन रातोरात सर्व फणस चोरायचे. मग ह्याने रखवालदार सुद्धा ठेवला. पण रखवालदारच रात्री एकदा दुसरा फणस चोरायचा मग हा दररोज फणस मोजून ठेवायचा. मग कुणीतरी ह्याला युक्ती दिली. दर वर्षी ग्रामदेवतेच्या देवळांत लिलाव व्हायचा. ज्या गोष्टी सार्वजनिक संपत्ती आहेत उदाहरणार्थ काही देवालयाच्या बागी, गावांतील नापीक जमीन, नदी, ओहोळ, समुद्रकिनारा (मासे पकडण्यासाठी) इत्यादी, त्यांचा लिलाव करून लोकांना देत असत. पण तुम्हाला तुमच्या खाजगी मालमत्तेचा सुद्धा लिलाव करायचा असेल तर मुभा होती. ह्या लिलावांत जात पात धर्म वगैरे काहीही न पहिला जाता लिलाव केला जाते असे. काही जमिनी अत्यंत नापीक होत्या त्या कवडीमोलात २० वर्षांच्या लीज वर दिल्या जात. आंब्याची झाडे वगैरे वार्षिक लिलावांत. काही गोष्टींचा लिलाव पैश्यांची न होता सेवेने होत असे म्हणजे अमुक सार्वजनिक मालमत्तेची डागडुजी करायची आणि त्या बदल्यांत अमुक एक शेत २ वर्षांसाठी ठेवायचे. ह्याने मग फणसाच्या झाडाचा लिलाव केला. अट फक्त एक, कलमे करायची नाहीत. मग एका गरीब तरुणाने जबाबदारी घेतली. ह्याने खत वगैरे आणून झाडांची उत्कृष्ट काळजी घेतली. रात्रभग जागून पहारा दिला आणि ह्याच्या साईडला पांडुरंगाच्या मधल्या मुलीशी सूत जुळवले. मग फणस राखता राखता पोरगी गायब झाली. सुदैवाने ह्या प्रेमकथेचा शेवट सुंदर झाला आणि लिलाव न करता सर्व फणस पोराला फुकट मिळू लागले.