श्रीदेवीचा नागीन
थिएटर हा प्रकार लहानपणी खूप पॉप्युलर होता. कष्टकरी समाज आठवड्याला एक तरी चित्रपट पाहायचा. आमच्या घरी टीव्ही असल्याने आम्हाला मनोरंजनाची साधने होती पण थेटर मध्ये जाऊन चित्रपट मी लहानपणी असा पहिलाच नव्हता. पहिले कारण म्हणजे थेटर दूर होते आणि तिथे जाण्यासाठी वाहन वगैरे करून जावे लागत असे. त्याशिवाय तो भाग शहराचा एकट्या दुकटीने किंवा इतर मुलांबरोबर जावा असाही नव्हता. आणि चित्रपटासाठी गर्दी असायची आणि हि गर्दी बहुतेक करून कष्टकरी लोकांची असायची. आठवडाभर कुठेतरी शारीरिक कष्टाची कामे करून आता मनोरंजनासाठी आलेली हि मंडळी. त्यांच्या घोळक्यांत मिक्स होणे आमच्या घराच्या लोकांना विशेष प्रिय नव्हते. एकूण ४ थेटर्स होती आणि सर्वत्र प्रचंड गर्दी, धक्काबुक्की इत्यादी गोष्टी असायच्या. (पुण्यातील अलका थेटर त्यामानाने अगदी आलिशान वाटले).
डिमांड जास्त पण सप्लाय कमी अशी ह्या थेटर ची अवस्था असायायची. कदाचित तिकीट किमती सरकाने निर्धारित केल्या असल्या मुळे असेल. पण ह्याचा फायदा गावांतील काही चतुर मंडळींनी घेतला. कुठून तरी एक प्रोजेक्टर मिळवला आणि मग दर गुरुवारी रात्री शाळेच्या मैदानात आपले टेम्पररी थेटर सुरु होत असे. इथे नवीन चित्रपट नाही लागायचे. फारच जुने. नुरी हा चित्रपट सर्वप्रथम दाखवला गेला होता. तिकीट किंमत फारच कमी आणि त्यात सुद्धा २-३ टियर्स. लहान मुलांना अगदी पुढे स्क्रीनच्या खाली आणि विनामूल्य प्रवेश. त्यानंतर १० प्लास्टिक च्या खुर्च्या; ह्या सर्वांग महाग. मग सुमारे २० एक लोखंडाच्या खुर्च्या ह्या थोड्या स्वस्त. आणि त्यानंतर जागा मिळेल तिथे उभे आणि बसावी अशी व्यवस्था(!) आणि हाच पर्याय बहुसंख्य जनता घ्यायची. गांवातील काही मंडळी मग इथे चहा विकावा, बटाटावडा इत्यादी सेवा देत असे.
आमच्या परिवाराला इथे सुद्धा जाणे विशेष पसंद नव्हते.
गावांतील काही झेष्ट मंडळी मग, ह्या चित्रपट सृष्टीने कशी जनतेची वाट लावली आहे आणि आताची पिढी कशी कंबरतोड मेहनत करत नाही ह्याच्या गप्पा कट्ट्यावर करायची आणि त्याच वेळी पुढच्या गुरुवारी परवीन बाबी चं काही आणा ना अशी विनंतीही त्याच दमांत करायची.
हा सर्व धंदा बेकायदेशीर होता. सार्वजनिक रित्या चित्रपट दाखविण्यासाठी लायसेन्स वगैरे जरुरीचे होते. पण थेटर्स सर्व दूर असल्याने ह्या प्रकाराकडे कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी कानाडोळा करून होते. सरपंच, तलाठी इत्यादी मंडळींना प्लॅस्टिकच्या खुर्च्या विनामूल्य मिळत होत्याच. शाळेने मैदान दिले असले तरी वीज देण्यास नकार दिला होता त्यामुळे गावांतील लाईनमन आकडा टाकून वीज देत असे. मग बदल्यांत त्याला प्लास्टिक ची खुर्ची हवी होती, पण सरपंच साहेबानी त्याला आक्षेप घेतला. मग त्याला प्लॅस्टिकची खुर्ची पण रो दोन मध्ये दिली गेली.
जी व्यक्ती हा धंदा चालवत होती तिला सर्वजण अमोल पालेकर म्हणायचे कारण तो दिसायलाही तसाच होता पण त्याची वागणूक हि अतिशय साधी भोळी आणि विनम्रपणाची होती. एके काळी ह्याला कोणाचं ओळखत नव्हते. राहतो कुठे, करतो काय कुणालाच माहिती नव्हती. पण काही महिन्यातच हा गावांतील संजय लीला भन्साळी झाला. हा चित्रपटांची रीळ आणतो म्हटल्याबरोबर ह्याचे चित्रपट सृष्टींत धागेदोरे आहेत असे बोलले जाऊ लागले. लक्ष्मीकांत बेर्डेबरोबर मुंबईत कुठेतरी हा डोसा खात होता अशी अफवा सुद्धा कुणी तरी पेटवून दिली. मग काय. गावांतील यच्चयावत "हिरो" मंडळी केस वगैरे वाढवून ह्याच्या मागे पुढे करू लागली.
अनेक सामान्य महिला सुद्धा चित्रपट पाहायला जायच्या. पण अजून उचभ्रु घरांतील स्त्रियांनी जाणे सुरु केले नव्हते. आमच्या वडिलांना चित्रपटात शून्य रस होता. त्यामुळे ते कधी गेले नाहीत. गेले असतील तरी १५ मिनिटांत घरी. मला घेऊन जावे म्हणून मी खूप हट्ट केला तरी त्यांनी घेऊन जाण्यास नकार दिला.
वर्षभरांत गरिबांच्या पालेकरचा हुरूप वाढला. आता त्याने बुधवारी दुसऱ्या गावांत बस्तान बसवले होते. एक M८० घेतली होती आणि कामाला एक छोटू सुद्धा. कदाचित सधन मंडळींच्या बायकांनी बराच जोर लावला म्हणून कि काय मग "स्त्री पेशल" शो शनिवारी सुरु झाला. गावांतील एका शाळेच्या मुख्याध्यापिका महिला होत्या त्यांनी ह्यासाठी शाळेचा हॉल देऊ केला. हा प्रयोग सुद्धा चांगलाच यशस्वी ठरला पण काही कारणास्तव मी इथेही कधी गेले नाही.
स्त्री पेशल च्या यशाने गुरुवारच्या शो ला स्त्रियांची गर्दी घटली आणि हा पुरुष पेशल बनला. त्यामुळे हुल्लडबाजी वाढली. आपल्या घरांतील आया बहिणी नसल्याने मग मंडळी थोडी जास्तच गोधळ घालू लागली आणि ह्याचा परिणाम लहान मुलांवर पडू लागला. शाळेने मैदान देण्यास नकार दिला. मग सरपंचानी मध्ये पडून स्त्री पेशल बंद केले आणि गुरुवारी दोन शो ठेवले. पहिला शो फॅमिली शो जिथे सर्व लोक चित्रपट पाहायचे. मग म्हणे कर्फ्यू. सर्व महिला आणि मुले घरी गेल्यानंतर एक अर्ध्या तासाने पुरुष पेशल चित्रपट. दारू आणि सिगारेटवर सर्वत्र बंदी. पुरुष स्पेशल चित्रपटाची विशेष जाहिरात होत नसे. पण हे चित्रपट बहुतेक करून किमी काटकरचा टारझन, पुरानी हवेली छाप भयपट असे असायचे असे ऐकून आहे.
हा सर्व धंदा सुरु होऊन दोन वर्षे झाली तरी मी मात्र अजून काहीही चित्रपट ह्या संस्थेत पहिला नव्हता पण इच्छा प्रचंड होती. मला चित्रपटांत रस नसला तरी तो अनुभव घ्यायचा होता त्यामुळे चित्रपट काहीही असला तरी मला फरक पडत नव्हता.
गरिबांच्या पालेकरची लोकप्रियता इतकी वाढू लागली होती कि तो पंचायतीची निवडणूक लढवेल अश्या गोष्टी लोक बोलायला लागले होते. त्याशिवाय त्याचे यश पाहून इतर मंडळी हा धंदा सुरु करण्यास उत्सुक होत्या. प्रोजेक्टर मिळणे हि सोपी गोष्ट नव्हती पण VCR उपलब्ध असल्याने काही मंडळींनी छोट्या प्रमाणात मध्यरात्रीनंतर, एखाद्या हॉटेल वगैरेचे दरवाजे बंद करून प्राईव्हेट शो करायला सुरुवात केली. इथे मग दारू चकणा वगैरे यायचे. इकडे "फॉरीन" चा माल दाखवला जातो असे काही लोक बोलत असत. मग व्यवसायिक तत्वावर जिव्हाळा दाखवणाऱ्या काही महिला सुद्धा (म्हणे) चित्रपट सोबतीने पाहायला जाऊ लागल्या. हा मामला नक्की कुठे चालत होता ह्याची कल्पना त्या काळी मला मिळणे अशक्य होते. पण यशाच्या मागे दुष्मन निर्माण होतात. सरपंचानी ह्या गरिबांच्या पालेकरचा धसका घेतला आणि गांवातील काही प्रतिष्ठित मंडळींच्या आवाजांत आवाज मिळवून शाळेच्या प्रांगणावर हे धंदे चालणे बरोबर नाही म्हणून गुपचूप शिक्षण खात्यांत तक्रार वगैरे करून हा धंदा बंद केला.
त्याकाळी उन्हाळा होता आणि अनेक शेते रिकामी होती. पालेकर ने एक मोट्ठे शेत भाड्याने घेतले. आणि भूतो ना भविष्यती अशी जाहिरातबाजी केली, लोकांच्या दळणवळणासाठी२ टेम्पो भाड्याने घेतले आणि तंबू घातला आणि चित्रपट ठेवला. कदाचित सरपंचांच्या नाकावर टिच्चून त्याला हे करायचे होते. पण आता लक्षांत येते कि हा गरिबांचा पालेकर खरेतर आमच्या गावचा एलोन मस्क होता.
शो साडेसात चा होता पण ह्याने जे टेम्पो ठेवले होते ते ओतप्रोत भरून माणसे साडेचार लाच आणत होते. ह्यावेळी ह्याने फेरीवाल्यांवर बंदी घालून स्वतःच एका माणसाला काँट्रॅक्त्त दिले होते आणि गोबी मन्चुरिअन ठेवले होते. आमच्या वडिलांची एक इमारत जवळपास होती ती सुद्धा त्याने सामान ठेवण्यासाठी भाड्याने घेतली होती आणि त्या निमित्ताने आम्हाला VIP आमंत्रण सुद्धा होते. तंबूला बॅरिकेड होती, तिकीट विक्री आणि चेक करण्यासाठी माणसे होती. किमान १००० लोक तरी येतील असे वाटत होते. आणि गर्दी झाली सुद्धा प्रचंड.
पण चित्रपट कुठला ? तर श्रीदेवीचा नागीन. चित्रपट येऊन गेल्यास अनेक वर्षे झाली असली तरी ह्या धंद्याच्या तुलनेत तो अत्यंत नवीन चित्रपट होता.
हे शेत आमच्या घराच्या जवळ होते आणि मला इथे जायला कुणाची परमिशन वगैरे नव्हती त्यामुळे मी तिथे जाणारच हे वडिलांनी ओळखले आणि चाणाक्ष पणे मी घेऊन जातो तुला असे आश्वासन दिले. आम्ही गेलो तर तिथे जाम गर्दी. गोबी मन्चुरिअन वगैरे खाल्ले तेंव्हा चित्रपट सुरु झाला होता. आम्हाला VIP एन्ट्री पुढून होती. पण इतक्यांत सरपंचाची गाडी येऊन थांबली. सरपंच वडिलांकडे बोलत होते. गावांत असे बदल घडणे वाईट आहे वगैरे वगैरे. आधी ह्यांना प्लास्टिक ची खुर्ची होती आता इथे आमंत्रण सुद्धा नव्हते. सरपंच "मी व्यवस्था पाहून येतो" म्हणून आंत घुसायचा प्रयत्न करत होते तर रखवालदाराने "तिकीट आहे का ? नाही तर तिथून विकत घेऊन या" असे सरपंचांना सांगतानाच त्यांचा चेहरा पडला. सरपंचानी मग धमक्या वगैरे दिल्या आणि पालेकर धावत आले. मग रखवालदाराला थोडे खडसावून "अरे सरपंच आहेत. ह्यांना तिकीट विचारतोस ? ते थोडेच बसायला आले आहेत इथे त्यांना फक्त पाहणी करायची आहे" असा दम दिला आणि त्यांत त्यांचा अपमान सुद्धा केला. मी आणि वडील सरपंचासोबत होतो आणि सरपंच आंत जात आहेत म्हटल्याबरोबर त्यांचाच सोबत आम्ही आंत जायचा प्रयत्न केला. पण गरिबांच्या पालेकरला अमीरषपुरीचा रंग सुद्धा होता. त्याने आधी सरपंचांना आंत घेतले आणि आमच्या पिताश्रीनां "तुम्ही कशाला इथून येताय ? तुम्ही VIP एंट्रन्स मधून या कि, इथे अगदी गर्दी आहे. चालायला सुद्धा जागा नाही. हे एन्ट्रन्स सध्या लोकांचं" असे सांगितले. मला सुद्धा हा टोमणा कळला. सरपंच भयंकर रागावले असावेत.
चित्रपट सुरु होऊन काही वेळ झाला असेल. पण ती गर्दी वगैरे पाहून मला आंत जाऊन बसावेसे वाटत नव्हते. त्यामुळे आम्ही इथूनच थोडा वेळ पाहू असे वडिलांना सांगितले. मला सुद्धा ३ तास बसण्यात इंटरेस्ट नाही हे पाहून त्यांनाही आनंद झाला असावा. मग आम्ही तंबूच्या बाहेर राहूनच पाहू लागलो. मग काही वेळाने श्रीदेवी नृत्य करू लागली. त्याकाळी ११ स्पिकर्स ची सिस्टम असायची म्हणजे ११ + ११ एकूण २२ स्पिकर्स. ह्यांचा आवाज पंचक्रोशींत ऐकू जायचा. आम्ही पाहत होतो. इथे श्रीदेवी नाचते म्हटल्यावर तंबूत हल्लकल्लोळ सुरु झाला. मुले धिंगाणा घालू लागली. वडील थोडे अस्वस्थ झाले पण मला भयंकर आनंद. इकडे श्रीदेवी नाचतेय तर तंबूत जनता. पोरांपासून सुरु झालेलं हे वेड मग इतर मंडळीत गेलं. तंबूतील सगळेच लोक बेभान होऊन थिरकत होऊ लागले, म्हणजे मी नंतर पाहिलेल्या रेव्ह पार्टी सुद्धा इथे काहीही नव्हत्या. मी अत्यंत उत्सुकतेने सर्व पाहत होते. तंबूतील लोक नाचत आहेत म्हटल्यावर आजूबाजूचे पोर सुद्धा "डान्स डान्स" करू लागले. आता मात्र मलाही थोडे अस्वस्थ वाटू लागले. मग तंबूतील वातावरण इतके प्रमाणाबाहेर गेले कि लोक तंबूतून बाहेर उड्या मारू लागले. हे नृत्य नसून आणखीन काही तरी आहे हे आता पक्के झाले असले तरी ते कन्फर्म मात्र तेंव्हा झाले जेंव्हा शांताराम मास्तरांच्या पत्नी सरला वाहिनी ह्यांनी आपली साडी वर काढून तंबूच्या कुंपणाच्या वरून मारलेली हाय जम्प. ते चित्र असे मनावर कोरले गेले आहे कि जाता जात नाही. तंबूतून बाहेर पडण्याची धडपड शेकडो लोकांनी केली असली तरी सरला वहिनी ह्या एकमेव महिला होत्या ज्यांनी इतकी मोठी उडी घेतली होती.
पळत येणारे लोक मग साप साप, अहो तंबूत साप घुसलेत असे ओरडत बाहेर येऊ लागले. पण काही लोकांना हे अजून नृत्य वाटत असल्याने त्याचे थिरकणे थांबत नव्हते. तिकडे श्रीदेवी ठुमकतेय तर इथे नारायण शिंपी आणि लक्षुमन गडी ठेका धरून बेभान झाले होते. सापाचा त्यांना काहीच भय नव्हता.
क्रिकेट मध्ये फलंदाजाने एक मोठा शॉट मारला तसा बॉल एकदम हवेंत जातो आणि समर्थक षटकार समजून ओरडतात पण हळू हळू बॉल खाली येऊन सीमे जवळील क्षेत्ररक्षकाच्या हातांत अलग विसावतो आणि एक सामूहिक निराशा पसरून स्टेडियम थंड होतो. तसाच प्रकार इथे घडत होता फक्त निराशेच्या जागी आकांताचे भय होते.
मग आम्ही सुद्धा पळ काढला. बाहेर वाहनाकडे मग काही व्यक्ती किमान १२ साप होते हो. किंवा ६ फुटांचा नाग होता. अहो नाग पुंगीचा आवाज ऐकून आला असेल अश्या अनेक अफवा पसरवत होते. गांगूळ नावाची बाई तर आपल्या बाजूला एक सुंदर पोरगी बसली होती आणि इकडे पुंगीचा आवाज आला आणि मी वळून पहिले तर तिच्या जागी फक्त नाग होता असे सुद्धा सांगत फिरत होती.
शेवट पर्यंत साप खरेच कुणाला दिसला नाही आणि पुढील २-३ आठवडे अनेक सर्पमित्रांनी प्रयत्न करून सुद्धा एकही साप आला नाही. (पुंगीचे संगीत सुद्धा लावून पाहिले). गर्दींत चेंगरा चेंगरी होऊन जखमी झालो म्हणून काही लोकांनी पोलीस तक्रार केली (ह्याला सरपंचांची फूस असावी) आणि त्यामुळे गरिबांच्या पालेकराने आपला धंदा कायमचा बंद केला. काहींच्या मते ह्यामागे सरपंचाचा हात होता आणि त्यांनीच सापाची अफवा पसरवली.
गावाच्या इतिहासांत नागांनी केलेला हल्ला हा मैलाचा दगड ठरला. त्याच्याआधी X हे थोर मराठी पुरुष गावांतून जात असताना त्यांना लघवी झाली म्हणून ते भाबड्या महादेवाच्या देवळा कडे थांबले होते आणि त्याच्या मागे असलेल्या एका जांभळाच्या झाडाखाली त्यांनी आपली नैसर्गिक प्रक्रिया उरकली होती हीच काय ती एक ऐतिहासिक आठवण गावच्या लोकांची होती.