भाग सहावा
कोविड19 पॉझिटिव्ह टू पॉझिटिव्ह अॅटीट्यूड
पाचव्या भागात माझ्या माणसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा मी अयशस्वी प्रयत्न केला....
आज मी या शारीरिक (आणि मानसिकही) आजारामध्ये सकारात्मक विचार कसे फायदेशीर ठरले याबद्दल लिहायचं ठरवलंय...बघू कितपत जमतंय ते...
हाॅस्पिटलमधले पहिले तीन दिवस केवळ जगण्यासाठी धडपड सुरू होती...
हजारदा वाटत होतं..आपण यातून बाहेर पडणं केवळ अशक्यच...मग केलेल्या चुका, कधी कुणालातरी कळत नकळत दुखावलं असल्याची सल, केलेल्या गोष्टी..करायच्या राहून गेलेल्या गोष्टी ..असं सगळं निरवानिरवीचं दळण सुरू होतं...
दि.सत्तावीस ऑगस्ट उजाडला तो आशेचा लख्ख प्रकाश घेऊनच... तुलनेत खूपच उत्साही वाटत होतं...
सर्वात आधी मला डाॅ संग्राम देशमुख भेटले..ते राऊंडला आले होते...आज आपला हा पेशंट( म्हणजे मी) फ्रेश असणारै याची त्यांना कल्पना असावी...खरंतर अशा परिस्थितीत सभोवताली महामारीने ग्रस्त असलेले पेशंटस्..जीवाला धोका आहे हे माहीत असूनही पीपीई कीटच्या आत स्वतःला कोंबून घेणं...आणि तरीही प्रत्येक पेशंटला आधार देणं..हे केवळ देवदूतच करू जाणे!
आणि डाॅ संग्राम देशमुख सर ते काम अगदी मनापासून करत होते...
माझ्या ओंजळीत आशा आणि उत्साहाचं दान टाकून काही क्षणातच डाॅ पुढे निघून गेले...
माझी विचारांची दिशाच बदलली...परत एकदा...
मला यातून लवकर बाहेर पडायचं...
मला जगायचंय...आणि मला चांगलंच जगायचंय
अशी पक्की खूणगाठ बांधली मनाशी...
ओंकारजपाने सुरुवात करू या नव्याने जगायला असं ठरवून ओंकार म्हणू लागले...छे..जमेना..जोरात खोकल्याची उबळ आली..
हा खोकला परत एकदा निराशा घेऊन आला...पण काही काळच...
त्यातून सावरले लगेचच...
दीर्घ श्वास घेतला...
पाठ्यपुस्तकातल्या काही कविता आठवत राहिले..अगदी प्राथमिक शाळेतील कविताही आठवू लागल्या...अनेक कवितांची पारायणं झाली
कितीतरी कविता तोंडपाठ असल्याचं लक्षात आलं..
कधी नाश्ता केला, कधी ते वेदनादायी इंजेक्शन नर्सने शिरेत सोडलं, कधी जेवले...कसा वेळ गेला..कळलंच नाही..
सर्व सारस्वतांचे मनापासून आभार मानत दिवस संपवला..
आता अलीबाबाची गुहा मला गवसली होती ...
आनंदी राहून शत्रूशी लढण्याचं बळ मिळालं होतं..
हातात मोबाईल होताच..यूट्यूबवर कवितावाचनाचे विडीओज् बघत राहणं खूप आनंददायी होतं...
वेदना कमी होत होत्या...फ्रेश वाटू लागलेलं...कृष्णा सतत डोळ्यासमोर होता...
एकोणतीस ऑगस्टला घरी आले..
आता निम्म्याहून अधिक लढाई जिंकली होती...
शारीरिक आणि मानसिक थकवा प्रचंड होता..बोलताना धाप लागत होती..चार पाच पावलं चालले तरी गळून गेल्यासारखं होत होतं...घरच्या वातावरणात बरंच सुसह्य झालं सगळं...
चार सप्टेंबरला कृष्णा म्हणाला...आई , कितीही बिघडू दे पदार्थ...मी हवी ती मदत करतो..पण मला तुझ्याच हातचं खायचंय...
परत उचल घेतली मनानं...
किचनचा ताबा घेतला...
अहो आणि कृष्णा..दोघं मदतीला...हे दे..ते दे..पंखा लाव..दार उघड..चमचा दे..गॅस बंद करा...तिघेही एकत्र कामं करू लागलो...
कृष्णाला घरकामाची बरीच सवय लावली आहे मी...पण अहोंनी स्वतः कधी पेलाभर पाणी घेतलं नव्हतं..पण तेही मनापासून कांदा चिर, लसूण सोल, पाणी गरम कर.. कधीमधी झाडलोटही...
हम चलेंगे साथ साथ म्हणत मदत करू लागले...
मिळून काम केल्यानं माझा भार हलका झालाच झाला..पण खूप आनंद मिळाला तिघांनाही...एकमेकांचा सहवास जास्त मिळाला..हसणं गप्पा मारणं...दिवस आनंदात जाऊ लागला...
आठवडाभरात मला ओंकारजप , पूरक हालचाली करणं जमू लागलं...
योगशिक्षक असल्याने प्राणायाम सुरू केला..
आहारतक्ता तयार केलाच होता...त्याचं पालन सुरू होतंच..अजूनही आहेच...
आता थकवा कमी झाला..मन आनंदानं भरून गेलं..
पोस्ट कोविड काही तपासण्या करायला डाॅनी सांगितलं ..हो- नाही करत त्याही करून घेतल्या.. सगळं आलबेल असल्याचा शिक्का डाॅनी मारला
आणि जमेल तितकं चालायची परवानगी दिली.
अनेक दिवसांनी मोकळ्या हवेत फिरायला सुरुवात केली तिघांनी..
एकमेकांना प्रोत्साहन देत एक किमी वरून साडेतीन किमी अंतर पार करणं सहज शक्य व्हायला लागलंय...
या आजारात मन आनंदी असेल तर शरीर लवकर साथ देतं..
कुटुंबियांची साथ अत्यंत महत्वाची..जी मला नेहमीच मिळाली आणि मिळत राहील..
झेपेल तितकं चालणं..जमेल तितका योगाभ्यास..एकमेकांना आनंदी ठेवण्याचा मनापासून केलेला प्रयत्न..सकस आहार औषधोपचार आणि भरपूर विश्रांतीबरोबरच सकारात्मक विचार...असं सगळं जुळून आलं...
आता पूर्वीसारखंच रूटीन सुरू झालंय..
दुर्दैवाने काही स्नेही पॉझिटिव्ह असल्याचं समजतंय..काहीजण मानसिक आधारासाठी
फोन करतायत त्यांना दिलासा देण्यात मोठा आनंद मिळतोय...याच स्वार्थापोटी परिवर्तन संस्थेत कोविड रूग्णांसाठी समुपदेशक म्हणून नाव नोंदवलंय...आणखी सजग फाऊंडेशन सारख्या संस्थेने स्वतःहून उपक्रमात सहभागी करून घेतलेय...
आपल्याला जो त्रास झाला तो इतरांना होऊ नये अशी मनापासून इच्छा आहेच...पण परिस्थिती बदलणं फारसं आपल्या हातात नाहीए पण होणारा त्रास नक्कीच सुसह्य करू शकतो हा या लेखनामागचा उद्देश...
अगदी एखाददुस-या पेशंटला जरी फायदा झाला तरी लिहल्याचं सार्थक होईल...
लवकरच कोविड19मुक्त पेशंटस् साठी खास तयार केला गेलेला आणि मोफत योग अभ्यासवर्ग योगविद्याधाम संस्थेच्या माध्यमातून सुरू करतेय याविषयी सविस्तर माहिती देईनच ...
आता मिळालेला प्रत्येक क्षण जगन्नियंत्याने दिलेला बोनस आहे असं समजून त्याचा सोहळा साजरा करणं..हाच उद्देश..
आज या लेखमालेचा शेवट करताना मन आनंदाने भरून गेलंय..
माझ्या संकटकाळी मला वैद्यकीय मदत करणा-या , मानसिक आधार देणा-या, हरप्रकारे मला प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष मदत करणा-या प्रत्येक व्यक्तीचे मी मनापासून आभार मानते.
लवकरच या जागतिक संकटातून आपल्या सर्वांची मुक्तता होवो .
मला जशी मदत मिळाली तशी प्रत्येकाला मिळो या सदिच्छेसह थांबते!
सर्वे सन्तु निरामयः
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया,
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुख भागभवेत।
ऊँ शांतिः शांतिः शांतिः
समाप्त.
सविता कारंजकर