भाग २
१५ ऑगस्ट उजाडला...जरा उशीराच...रात्रभर उलटसुलट विचार करत ..कधी डोळा लागला ते समजलंच नव्हतं..नेहमीचा उत्साह नाही..अंगणाची साफसफाई , सडारांगोळी, सगळ्यांना क्रमानं उठवणं.. तयारी करणं..कडक इस्त्रीचे शुभ्र कपडे..जिलेबीसाठी डबा रिकामा करणं...यातलं काहीच नाही...वातावरण भेसूर वाटत होतं..आता श्रीयुतपण घाबरून गेले होते..काहीच समजत नव्हतं...
"आपण प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करायचे आहे" - इति श्रीयुत.
मग सगळ्यात आधी आपल्या ग्रामपंचायतीत कळवलं पाहिजे. मग मला आठवलं ..लाॅकडाऊन काळात सर्वे करणा-या आशाताईने आपला नंबर देऊन ठेवलाय..ताबडतोब आशाताईला कळवलं...ह्यांनी ग्रामसेवकाला कळवलं. आशाताई आणि ग्रामसेवकाला नवल वाटलं...लोक लपवतायत लक्षणंसुद्धा..तुम्ही स्वतःहून आमच्या पर्यंत पोचलात...
मग मी ऑफिसमध्ये कळवलं..कारण माझी टेस्ट झाली नसली आणि लक्षणंही नसली तरी मी पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात होते...आणि आदल्या दिवशी मी ऑफिसमध्ये गेले होते.
घरच्या लोकांना कळवलं...पुढची दिशा ठरत नव्हती..काय करायचं ते कळत नव्हतं...
साधारण साडे दहा वा आरोग्य विभागाची टीम अंगणात आली...त्यांना वाॅटसअपवर आलेला रिपोर्ट दाखवला...लक्षणं नसल्याने त्यांनी होमायसोलेशन चा पर्याय चालेल का असं विचारलं...मला तर तेच हवं होतं...घरात सगळी सोय आहे..जीवनावश्यक वस्तू नातेवाईक आणून देऊ शकतात..ह्याची खात्री झाल्यावर त्यांनी होमायसोलेशनचा फाॅर्म भरला...माझं नाव नंबर विचारलं आणि मला म्हणाले...तुम्ही पेशंटच्या केअरटेकर आहात..तुम्ही ही जबाबदारी पेलू शकाल ना?
अर्थातच...मी म्हणाले...
मग कृष्णाबद्दल विचारलं..घरातल्या घरात त्याला बाबांपासून दूर ठेवणं हे आव्हान होतं..सतत उड्या मारत घरभर फिरणारा सतत आईबाबांच्या गळ्यात पडणारा मुलगा हा...त्याला हाॅलशिवाय इतर कुठे प्रवेश नाही...मला कठीण वाटलं..पण त्याने लगेचच स्वीकारलं आणि मुकाट्याने हाॅलमधे येऊन बसला..
मी माझी केअरटेकर म्हणून काय जबाबदारी राहील याची विचारणा केली.
* पेशंटच्या ऑक्सिजनलेवलवर लक्ष ठेवणं पल्साॅक्सिमीटरची रिडींग्जची दिवसातून तीन वेळा नोंद ठेवणं
* थर्मामीटरवर तापाची नोंद ठेवणं.
ताजा चौरस आहार, गरम पाणी , हळदीचं दूध वाफारा..हे सगळं..सहज शक्य होतं मला...
केअरटेकर हा शब्द सतत कानात घुमत राहिला..याआधीही मी केअरटेकरच्याच भूमिकेत होतेच..प्रत्येक स्त्री रोजच केअरटेकर असते पण या संदर्भात केअरटेकर ...खूप मोठी जबाबदारी होती...बारीकसारीक शंका विचारून घेतल्या..होमायसोलेशनच्या फाॅर्मवर आमच्या सह्या घेतल्या...सगळे लोक गेले..परत घरात भेसूर वातावरण तयार झालं...ह्यांचा मुक्काम बेडरूममध्ये ..आमचं आवश्यक सामान बाहेर घेतलं..मनात वादळ उठलं होतं..अनेक प्रश्न..त्या प्रश्नांचे उपप्रश्न...अनेक शंकाकुशंकांनी थैमान घातलं होतं..
त्याचवेळी खात्रीही वाटत होती..मी नक्कीच एक चांगली केअरटेकर आहे..मी या संकटातून लवकरच मुक्त होऊ शकते..
मनात आलेला दुसरा विचार....
होमायसोलेशनचा कालावधी त्यात आलेले अनुभव , घेतलेली काळजी, उपचारांची पद्धत..तब्येतीत होत जाणारी सुधारणा.. या सगळ्याची नोंद ठेवायची...अर्थात केअरटेकर्स डायरी..जी पुढे अनेक केअरटेकर्सना उपयोगी पडेल...
पण खरं सांगू? नाहीच वेळ मिळाला...एकामागून एक असे उपाय..त्यांच्या मागण्या...कृष्णाला आणि स्वतःला ही जपणं..घराची स्वच्छता ..आणि असंख्य गोष्टी..
मंगळवार दि अठराला आमच्या घराशेजारी असलेल्या कोविड19 टेस्ट सेंटरमधे मला आणि कृष्णाला तपासणीची बोलावलं होतं...आजच म्हणजे पंधरा ऑगस्टलाच आमची तपासणी का करू नये असं विचारताच आरोग्य विभागाचे लोक म्हणाले की या कालावधीत तुमची तपासणी फाॅल्स निगेटिव्ह येऊ शकते ..
ते मधले दिवस अत्यंत तणावपूर्ण वातावरणात गेले... .मी सतत कृष्णाचे टेस्ट रिपोर्ट निगेटीव येऊ दे अशी प्रार्थना करत होते..
दि.सतराला संबंधितांना फोन केला..उद्या तपासणीसाठी किती वा येऊ?
त्यांच्या उत्तराने धक्का बसला...उद्या होणारा तपासणी कॅम्प रद्द झालाय..तुमचं तुम्ही बघा..नाहीतर सिवीलला जाऊन टेस्ट करून घ्या...बापरे...मग मी असा प्रयत्न केला की घरी येऊन तपासणीसाठी सॅम्पल घेऊन जाणारे टेक्निशियन आहेत का?
होते तसे टेक्निशियन..पण जर त्यांना जमलं नाही तर तपासणी बुधवारवर जाणार होती..मग मी स्वतः सिवीलला जायचा निर्णय घेतला...माझी गाडी उपलब्ध नव्हतीच...चालत जाणं शक्य नव्हतं..रिक्षा उपलब्ध होणं अशक्यच होतं..कारण तोवर परिसरात ही बातमी पसरली होतीच...
मग माझ्या बहिणीने गाडी उपलब्ध करून दिली...दोघे (मी आणि कृष्णा) सिवीलला गेलो.. तिथले सोपस्कार पूर्ण करून टेस्ट सेंटरच्या लाईनमधे जाऊन उभे राहिलो..तो एक भयाण थरारक अनुभव होता...कृष्णाने त्याने कधीच पाहू नयेत अशी काही दृश्यं पाहिली ...मला माझा हा निर्णय अत्यंत चुकीचा झाला असं वाटत राहिलं..पण आता परत फिरणं म्हणजे केवळ टाईमपास झाला असता...लवकरच नंबर आला...अगदी नवल वाटावं इतक्या संयमाने कृष्णाने सगळं काही करून घेतलं...तिथून बाहेर पडलो..घरी गेल्यावर लगेचच अंघोळ सॅनिटायझेशन वगैरे उरलं..आमचे रिपोर्टस् चार वा येणार होते... वेळ पुढे सरकतच नव्हती..
अजून दोन तास होते..केअरटेकर्स डायरी सतत खुणावत होती..हे बारीकसारीक चढ उतार पुन्हा लक्षात राहणार नाहीत..आत्ताच नोंद ठेवायला हवीय असं सतत मनात येत होतं..पण अंतःप्रेरणा कमी पडत होती की कोण जाणे..काही लिहूच वाटेना..मनात भीतीने घर केलं होतं..विचार करता करता चार वाजले आणि फोन खणखणला...तुम्ही पॉझिटिव्ह आहात आणि कृष्णा निगेटिव्ह आहे...
आता मात्र पायाखालची जमीनच सरकली...आता दोघांपासून कृष्णाला दूर ठेवणं अत्यंत अवघड आणि जवळपास अशक्यच होतं...
केअरटेकर टू पॉझिटिव्ह हा माझा प्रवास फक्त भीती , शंका, अनुत्तरित प्रश्न यांनीच व्यापलेला होता...
क्रमशः
सविता कारंजकर