भाग-५
क्रुझवरचा तिसरा दिवस उगवला तो एड-फु मध्ये. क्रूझने रात्रीच कोमोम्बो सोडून एडफू गाठले होते. सकाळी सातलाच आम्ही बाहेर पडण्यास तयार झालो होतो. क्रूझमधून बाहेर आलो तर रस्त्याकडेला भरपूर टांगे उभे होते. आमची एड-फु टेम्पलची सफर याच घोडागाड्यांमधून होणार होती. इथल्या प्रशासनाने ट्रॅडिशनल म्हणून हे टांगे अजून टिकवून ठेवलेत. 'एडफू' हे एक नाईलच्या किनाऱ्यावरील छोटेसे शहर. इथल्या पुराणकालीन मंदिरामुळे याला महत्व. ग्रीक देव 'होरस' याचे हे मंदिर ख्रिस्तपूर्व काळात बांधले गेले. पेंटॉलेमेक साम्राज्याच्या त्याकाळच्या राजांनी हे मंदिर बांधले. अलेक्झांडर आणि शेवटची राणी क्लीओपात्रा हे याच पेंटॉलेमेक साम्राज्याशी संबंधित होते. नंतरच्या काळातील इजिप्त मधील काही मंदिरांच्या उभारणीत अलेक्झांडर चाही हातभार होता. या एडफू टेम्पलचा परिसर अतिशय भव्य आहे. आणि हे मंदिर बऱ्यापैकी टिकूनही आहे. शेकडो वर्षांपूर्वीच्या नाईल च्या पुरामुळे हे मंदिर ९०% मातीत गाडले गेले होते. १७९८ सालापर्यंत इथे फक्त वरचे काही भाग जमिनीवर दिसत होते. या मंदिराच्या वरच अनेक लोकांनी घरे बांधली होती. १८६० साली 'ऑगस्ट मॅरिएट' या फ्रेंच इतिहासकाराने या मंदिराचा शोध घेतला आणि इथे खोदाई सुरु केली. आणि आता अस्तित्त्वात असलेले हे भव्य मंदिर पुन्हा दृश्यमान झाले. या मंदिरामध्ये छतासह आतला मुख्य हॉल टिकून आहे. आतमध्ये 'होरस' देवाची पालखी किंवा बोट ठेवलेली आहे. इथल्या भिंतींवर अनेक देवांच्या आणि राज्यांच्या जीवनातील प्रसंग कोरून ठेवलेले आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे एका भिंतीवर नैसर्गिक वनस्पतीपासून सेंट (सुगंधी द्रव्य) तयार करण्याचे अनेक फॉर्मुले लिहून ठेवलेले आहेत. अर्थात हे कळले ते गाईडने सांगितले म्हणून नाहीतर ग्रीक चित्रलिपीची ती भाषा आम्हाला काय कळणार?
मंदिर बघून बाहेर पडलो तर सगळे पार्किंग घोडागाड्यांनी फुल्ल भरलेले होते. त्या गर्दीत आपली घोडागाडी शोधून आम्ही गाडीत येऊन बसलो. घोडागाडीत उपेन-केतकी मी आणि वंदना होतो. बहुतांशी वेळ आळीपाळीने घोडागाडी आम्हीच चालवत होतो. कोचवान सारखा इंडिया इंडिया, अमिताबच्चन असे बडबडत होता. खाली उतरताच त्याने हात पसरून टीप मागितली. खरेतर त्याचे पैसे अगोदरच दिलेले होते. पण संपूर्ण इजिप्त टूर मध्ये ड्रायव्हर, वेटर, गाईड, एअरपोर्ट वर उतरून घेणारे या सर्वांना टीप देणे बंधनकारकच आहे. हे लोक जबरदस्तीच करतात. घोडागाडीवाल्याने ४० पौंड म्हणजे जवळ जवळ दोनशे रुपये घेतले. सगळ्या टूरच्या गाईडने सुद्धा परहेड, पर डे दोन डॉलर (१५० रुपये) टीप द्यायची असते म्हणून सांगितले. कसेतरी करत एकूण १०० डॉलर टीप म्हणून त्याला एक्सट्रा द्यावे लागले.
एडफू टेम्पलची व्हिजिट संपवून आम्ही क्रूझवर आलो आणि क्रूझचा पुढचा प्रवास सुरु झाला. टूर प्रोग्रॅम मध्ये 'सेलिंग टू लक्झर' व्हाया 'इस्ना लॉक' असे लिहिलेले होते. गाईडकडे विचारणा केल्यावर हा प्रकार कळला. आमची बोट नाईल नदीचा लेव्हल डिफरंन्स पार करणार होती.
'सुएझ कॅनाल' आणि पनामा कॅनाल आपण इतिहासात वाचला असेल. सुएझ कालवा दोन समुद्रांना जोडतो पण या समुद्रातील पाण्याच्या पातळीत ३०फूट लेव्हल डिफरंन्स आहे. अगदी हाच प्रकार आम्हाला नाईल नदीच्या इस्ना लॉक इथे दिसला. दुपारी १२.३० वाजता आमचे क्रूझ या इस्ना लॉक जवळ पोहोचले. या नाईल नदीमध्ये २५ ते ३० फुटांचा लेव्हल डिफरंन्स आहे. पूर्वी कदाचित उंचावरून पडणारा धबधबा असेल. इथे जहाज आल्यानंतर ते एका हौदासारख्या भागात उभे केले जाते. पुढचा दरवाजा बंद असतो. आत गेल्यानंतर मागचाही दरवाजा बंद होतो, आणि जहाज एका बंदिस्त जागेत उभे असते. नंतर हळूहळू त्या हौदातील पाणी सोडून दिले जाते आणि जसजसे पाणी कमी होत जाते तसतसे जहाज खाली खाली जात राहते. आम्ही पोहोचलो तेंव्हा ऑलरेडी दोन क्रूझ त्या लॉक मध्ये गेलेल्या होत्या आणि बघता बघता त्या खाली उतरल्या. त्या गेल्यानंतर पुन्हा दरवाजे बंद करत पाणी लेव्हल झाले आणि आमचे क्रूझ त्यात शिरले. काही वेळाने आमचेही क्रूझ हळू हळू जवळ जवळ २५ फूट खाली उतरले. किमान अर्धा तास या प्रकारात गेला असेल. पण पाण्याची ताकद आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंगची कमाल यातुन मानवाने शोधलेला हा पर्याय नक्कीच बघण्यासारखा आणि आठवणीत राहण्यासारखा आहे. खाली उतरल्यानंतर क्रूझचा प्रवास पुन्हा सुरु झाला आणि दिवसभराच्या प्रवासानंतर आम्ही 'लक्झर' या तिसऱ्या मोठ्या शहराजवळ येऊन पोहोचलो. क्रूझ थांबल्यानंतर लगेचच आम्ही जवळच असलेल्या लक्झर टेम्पल कडे निघालो. अंतर जवळ असले तरीही बाहेर गाडी उभी होती. त्या गाडीने आम्ही मुख्य प्रवेश द्वारावर पोहोचलो. आतापर्यंत पाहिलेल्या मंदिरासारखेच हेही एक भव्य मंदिर. ख्रिस्तपूर्व काळात बांधकाम झालेल्या या भव्य मंदिराची नंतरच्या काळात आलेल्या ख्रिश्चन लोकांनी खूप तोड फोड केलीय. अगदी प्रवेशद्वारावरील सहा भव्य पुतळ्यांपैकी दोन व्यवस्थित आहेत, तीन चे तोडफोड करून विद्रुपीकरण केलंय आणि एक मात्र पूर्ण भुईसपाट केलाय. इजिप्त प्रशासन रेस्टोरेशन करून हे पुतळे आणि मंदिर उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत. पण काम अतिशय कठीण आहे. आतल्या मंदिरातील भव्य खांब उभे आहेत, पण छत गायब आहे. काही भागावर मात्र हे छत टिकून आहे. याच मंदिरात आतल्या गाभाऱ्याच्या आत अजून एक खोली अलेक्झांडरने आपल्यासाठी बांधून घेतलेली आहे असे गाईडने सांगितले. लक्झर टेम्पल हे काही देवाचे मंदिर नव्हे. पूर्वीच्या काळच्या राज्यांनी आपल्यासाठी बांधलेले ही वास्तू आहे. नंतरच्या काळात राजा रामसेस यानेही काही भागात बांधकाम केलेले आहे. त्यामुळे याला मंदिर म्हणण्याऐवजी राजवाडा म्हणणे समर्पक ठरेल. या लक्झर टेम्पल पासून तीन किलोमीटर अंतरावरील कर्नाक टेम्पल पर्यंत एक भव्य राजमार्ग होता. या राजमार्गाच्या दोनीही बाजूला 'स्पिंक्स' म्हणजे सिंहाच्या शेकडो मूर्ती होत्या. कालांतराने या सगळ्या मातीत गाडल्या गेल्या. त्यावर अनेक इमारती बांधल्या गेल्या. पण आता त्यातील काहींचा शोध लागल्यापासून इजिप्त सरकारने इथलीही घरे पाडून, उत्खनन करून हे स्पिंक्स आणि हा भव्य राजमार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
ही सफर संपवत बाहेर आलो, वेळ होता म्हणून गाईडने आम्हाला एका परफ्युम शॉप मध्ये नेले. पण आम्ही सर्वानी मार्केट मध्ये फिरणे पसंत केले. एक तासात सर्वांनी परत यायचे असे ठरलेले होते, पण एकदा मार्केट मध्ये शिरल्यानंतर दोन तास कसे गेले कळले नाही. मार्केट अतिशय छान होते आणि त्यामानाने स्वस्तही होते. आणि इंडियन म्हणून आम्हाला आदराची वागणूकही मिळत होती. आमचा गाईड शोनूदा वैतागून गेला होता. बस निघून जाईल म्हणून ओरडत होता, मग गेली तर जाऊदे आम्ही येऊ चालत असे म्हणत आम्ही फिरत राहिलो. आणि मनसोक्त खरेदी झाल्यानंतर क्रूझ वर पोहोचलो.
जेवण करून आम्ही एंटरटेनमेंट हॉल गाठला. तिथे आज लोकल ईजिप्शियन कलाकार आणि रशियन बेली डान्स शो होता. त्याचा आनंद घेत चांगला वेळ गेला. त्या ईजिप्शियन कलाकाराने हातात एक मोठा गोल झगा घेऊन केलेला कलाविष्कार अप्रतिम होता. त्यामानाने बेली डान्स काही भावला नाही. प्रोग्रॅम संपल्यानंतर काहीजण पुन्हा मार्केट मध्ये गेले. इथले मार्केट रात्री १२ पर्यंत चालू असते. पण तरीही मुलीना मात्र आम्ही रात्री जायला परवानगी दिली नाही. त्याऐवजी तिथेच क्रूझ जवळील मिनी मार्केट मध्ये चक्कर टाकत आम्ही क्रूझ गाठले आणि हाही दिवस आनंदात संपला.
(क्रमश:)
...........
अनिल दातीर. ९४२०४८७४१०.