भाग-१
अखेर २३ नोव्हेम्बरचा दिवस उगवला आणि आम्ही इजिप्तला जाण्यासाठी मुंबईकडे प्रस्थान ठेवले. मी, वंदना, उपेंद्र-केतकी, क्षितिजा, लीना, निकिता, लौकिक आणि आकाश असे आम्ही नऊ जण 'अँसीएंट इजिप्तच्या' सफरीवर निघालो होतो. सर्वांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. मुंबईचे 'छत्रपती शिवाजी एअरपोर्ट बघून पहिल्यांदाच आलेले अचंभित झाले होते. आणि खरंच आपले मुंबईचे एअरपोर्ट हे नक्कीच कौतुकाने बघण्यासारखे आणि अभिमान बाळगण्यासारखे आहेच. फोटोसेशनची सुरुवात तिथूनच झाली. एअरपोर्टवरचे नेहमीचे सोपस्कार पार पाडत आम्ही आत गेलो. जे पहिल्यांदाच विमान प्रवास करणार होते त्यांना मी अनेक बारीक-सारीक गोष्टी, जसे प्रवासात घ्यायची काळजी, एअरपोर्टवरचे बॅगेज चेकिंग, पर्सनल चेकिंग, इमिग्रेशन बद्दल माहिती दिलेली होतीच. त्यामुळे कसलाही अडथळा न येता आणि गडबड न होता आम्ही बोर्डिंग गेट पर्यंत पोहोचलो होतो. मुंबई एअरपोर्टवरचे बॅगेज स्कॅनिंग मात्र बंद केलंय, का ते कळले नाही.
आमची फ्लाईट रात्री ४.४० होती. त्यामुळे एअरपोर्ट, तिथले ड्युटी फ्री शॉप बघायला निवांत वेळ होता. मी सकाळीच 'ऑनलाईन चेकिन' करून ठेवले होते. पहिला टप्पा मुंबई-कुवेत हा रात्रीच्या अंधारातच प्रवास होणार होता त्यामुळे बाहेर काही फार दिसणार नव्हतेच. पण पुढच्या कुवेत-कैरो प्रवासासाठी मात्र सर्वांनाच विंडो सीट मिळतील अशी व्यवस्था करून ठेवली होती. बोर्डिंग सुरु झाल्यानंतर सर्वजण विमानात जाऊन बसलो. पहिल्यांदाच प्रवास करणारांची चेहऱ्यावरची हुरहूर स्पष्ट दिसून येत होती. आणि अखेर तो क्षण आला. विमानाच्या पंखांची घर घर सुरु झाली. टॅक्सिइंग करत विमान रनवेवर पोहोचले आणि अचानक स्पीड वाढवत विमानाने टेक ऑफ घेतला. पोटात येणारा खड्डा आणि कानात बसलेले दडे यासह आकाशात भरारी घेण्याचा थरार अनुभवत आमचे विमान मार्गस्थ झाले. पुढचा प्रवास बराचसा समुद्रावरून होत होता. तीन-सव्वातीन तासांच्या प्रवासानंतर विमान कुवेत च्या विमानतळावर उतरले. प्रवास जरी तीन तासाचा झाला असला तरी दीड तासाच्या टाइम लॅप्स मुळे कुवेतला ६.१५ वाजले होते. तिथून पुढची कुवेत ते कैरो फ्लाईट ९ वाजता होती. त्यामुळे तिथे भरपूर वेळ होता. पण कुवेत एअरपोर्टचा अनुभव चांगला नव्हता. कोणी कुठे थांबूनच देत नव्हते. नुसते चला, चला चालले होते. आम्ही तिकिटावर लिहिलेले 'गेट-टीबीएन' शोधत होतो, पण तसा काही बोर्ड दिसत नव्हता. शेवटी एकाने आम्हाला सांगितले कि १० नंबर गेट ला जा तिथून बस तुम्हाला नवीन टर्मिनस झालाय तिथे नेऊन सोडेल.
या 'गेट-टीबीएन' चा अर्थ मला परतीच्या प्रवासात कळला. याचा अर्थ एअरपोर्टवर जे इलेकट्रोनिक डिस्प्लेचे बोर्ड दिसतात ते बघा, त्यावर तुमची फ्लाईट शोधा आणि तिथे गेट नंबर डिस्प्ले होईल त्या टर्मिनलला जा. तिथे पोहोचल्यावर सर्वानीच थोडेफार आवरून घेत बरोबर आणलेल्या पदार्थांवर ताव मारला. काही वेळानंतर तिथले बोर्डिंग सुरु झाले आणि एका बसने आम्हाला विमानाजवळ नेऊन पोहोचवले. पुन्हा एकदा टेक-ऑफचा थरार अनुभवत आम्ही इजिप्तची राजधानी कैरो कडे निघालो.
बाहेर लक्ख प्रकाश असल्याने सर्वकाही स्पष्ट दिसत होते पण खरेतर बघण्यासारखे फार काही नव्हते. सगळीकडे वैराण, भकास वाळूच्या टेकड्या, सर्वदूर पसरलेले बेजान वाळवंट. पण हे वाळवंट विमानातून फार सुंदर दिसते. विशेशतः वाऱ्यामुळे वाळूच्या थरांच्या ज्या लांबच लांब नक्षीकाम केल्यासारख्या रांगा किंवा पुळणी दिसतात त्या खरंच विलोभनीय दिसतात. कुठल्याही लँडस्केप चित्रकाराला नक्कीच या वाळवंटाची भुरळ पडावी इतके सुंदर दृश्य दिसते. अनेक भागावर ढगांचे पुंजके दिसत होते. ते ढग आणि त्याखाली जमिनीवर पडलेल्या त्यांच्या सावल्या एकदम मस्त दिसत होत्या. थोड्या वेळात कैरो शहराचे विलोभनीय दृश्य दिसू लागले. आखीव रेखीव रस्ते, वेल प्लॅनेड टीपीकल इमारतींच्या रांगा सुंदर दिसत होत्या. कुवेत ते कैरो हाही प्रवास साडेतीन तासांचा होता. पण कुवेत ते कैरो मधील टाइम लॅप्स दोन तासाचा त्यामुळे आम्ही कैरोत उतरलो तेंव्हा ११.३० वाजले होते. बॅगेज कलेक्ट करून बाहेर आलो तेंव्हा सिंड्रेला टुरचा इब्राहिम नावाचा हसतमुख व्यक्ती आमच्या नावाचा बोर्ड घेऊन उभा होता. त्याच्याबरोबर बाहेर आलो. बाहेर एक १८ सीटर बस आमच्यासाठी उभी होती. 'रामसेस हिल्टन' या पंचतारांकित हॉटेल मध्ये आमचे रिझर्व्हेशन केलेले होते. पण चेकिन टाइम दुपारी दोनचा असल्याने आम्ही तसेच साईट सिईंग साठी बाहेर पडलो.
एरपोर्टवरून येणारा रस्ता आणि त्याच्या कडेच्या इमारती सुंदर होत्या. गाईड आम्हाला आजूबाजूच्या भागाची धावती ओळख करून देत होता. एका ठिकाणी एक आपल्यासारखे मंदिर दिसले. तो एक राजवाडा होता. कोना एका इंग्रज अधिकाऱ्याने आपल्यासाठी निवांत जागी हा राजवाडा बांधला होता. त्याचे डिझाईन नक्कीच आपल्या भारतीय वास्तुकलेशी साम्य दर्शवणारे होते. कधीकाळी निवांत असलेल्या या राजवाड्याभोवतीच आता अनेक सरकारी टोलेजंग इमारती उभ्या आहेत. सरकारी कार्यालये आणि सरकारी निवासस्थाने असल्याने तसा हा भाग महत्वपूर्ण होता.
प्रत्यक्ष जुन्या कैरो मध्ये एंटर झाल्यानंतर मात्र दुरून डोंगर साजरे असे म्हणायची वेळ आली. कैरोचा बाहेरचा नवीन डेव्हलप झालेला भाग विमानातून सुंदर आणि वेल प्लॅन दिसला असला तरी मूळचे कैरो शहर मात्र फारच बकाल निघाले. वाहनांची गर्दी, कचऱ्याचे ढीग, धुळीने बरबटलेल्या इमारती असे कैरोचे दर्शन नक्कीच अनपेक्षित होते. बस जात होती त्याच्या डाव्या बाजूला खूप लांबपर्यंत झोपड्पट्टीसारख्या कशाही बांधलेल्या इमारती दिसत होत्या. हे काय आहे, असे विचारल्यावर गाईडने सांगितले कि या भागाला 'सिटी ऑफ डेथ' म्हणतात. हा जो भाग आहे तो हजारो वर्षांपासून ग्रेव्हयार्ड किंवा दफन भूमी म्हणून वापरला जात होता. तिथे हजारो सैनिकांची थडगी होती, पण कालांतराने माणसांनी तिथेही घरे बांधली आणि दफन भूमी वापरात आली. पण जसे इजिप्तच्या राज्यकर्त्यांना कळले कि आपल्या बंजर जमिनीखाली जे गाडलं गेलंय तेच अनमोल खजिना ठरतंय, तेंव्हापासून सरकारने सगळीकडेच उत्खनन सुरु केलंय. हा भागही सरकारला खोदायचा आहे, त्यासाठी इथे राहणाऱ्या लोकांना शहराबाहेर घरे बांधून दिलीत पण इथले लोक जागा सोडायला तयार नाहीत. सरकारने त्यांच्या सगळ्या फॅसिलिटी बंद करून टाकल्यात पण तरीही हे लोक जागा न सोडता आहे तसेच गलिच्छ अवस्थेत राहात आहेत. त्यामुळे जुनी दफनभूमी म्हणूनही आणि आता लोक मुर्द्यांपेक्षा बदतर जीवन जगत तिथेच चिकटून राहिलेत म्हणूनही या भागाला 'सिटी ऑफ डेथ' म्हटलं जातंय. 'हॉरिबल'
गाईड आम्हाला काय काळजी घ्यायची याचीही माहिती देत होता. कैरो मध्ये कोणीही ट्राफिक नियम पाळत नाही. गाड्या कशाही आडव्या तिडव्या घुसत असतात. कोणीही कोणासाठी थांबत नाही. पायी चालणारेही कुठूनही मधूनच रस्ता क्रॉस करताने पाहून आम्हाला धडकी भरत होती. चौकांमध्ये सिग्नल होते पण कोणीही त्याकडे लक्ष देत नव्हते. अनेक लहान मुलंही त्या गर्दीत गाड्या चालवत होते. एकही चकाचक गाडी रस्त्यावर दिसत नव्हती. सगळ्या गाड्या धुळीने माखलेल्या. गाडी पुसायची असते हे कदाचित कैरोवासीयांना माहीतच नसावे. बहुतांशी गाड्या पुढून मागून कुठूनतरी ठोकलेल्या दिसत होत्या. असंख्य जुन्या गाड्या रस्त्यावर धावत होत्या. त्या गाड्या बघून 'काबुल एक्सप्रेस' किंवा तापसी तनुचा 'द रियल जॅकपॉट' सारख्या सिनेमातील गाड्यांची हटकून आठवण येत होती. पुढे आम्हाला त्या गाईडने एका चांगल्या हॉटेलला जेवण्यासाठी नेले आणि तिथेच अमेरिकेतून आलेलं 'नितीन-अभया हे कुलकर्णी दाम्पत्य' आम्हाला जॉईन झालं. इतक्या दिवसानंतर भेटल्यामुळे झालेला आनंद, मनसोक्त गप्पा करत आमचे जेवण झाले. आणि आम्ही कैरोच्या सिटी टूरवर निघालो.
(बाकी पुढील भागात - क्रमश:)
....................
अनिल दातीर (९४२०४८७४१०)