Get it on Google Play
Download on the App Store

खुनाची वेळ प्रकरण-13

 

प्रकरण १३

 

 

 

पाणिनी पटवर्धन ने ऑफिस मध्ये प्रवेश केला आणि सौम्या सोहनी ला म्हणाला, स्वागत कक्षात जाऊन गतीला सांग मी आलोय पण आज कोणालाच भेटणार नाहीये.”

सौम्या बाहेर जाऊन आत आली आणि आपल्या ओठावर बोट ठेऊन गप्प बसण्याची खून करत पाणिनी ला म्हणाली,” आधीच एक माणूस येऊन बसलाय पण तो आपले नाव सांगायला तयार नाहीये.”

“ कोण आहे तो ? “
“गती ने खूप आग्रह धरला पण तो तिला बाजूला सारून तुमच्या लायब्ररी मध्ये बसला जाऊन.”

“ तो राजेंद्र पळशीकर असणार.” पाणिनी ने अंदाज व्यक्त केला.आणि उठून लायब्ररीत त्याला भेटायला गेला.त्याला बघून पळशीकर उभा राहिला. “ पटवर्धन काय घडलंय हे? माझा कोट रक्तबंबाळ अवस्थेत माझ्याच गाडीत.....”

“ तुझी भेट घेणे आवश्यकच होते मला.प्रयत्न करूनही तू प्रतिसाद दिला नाहीस , शेवटी मला हा आड मार्ग पत्करावा लागला.”

“ म्हणजे तुम्ही हे सर्व ...?...”

अचानक तो बोलायचा थांबला.

“ ही माझी सेक्रेटरी सौम्या सोहनी आहे, हिच्या समोर बोलू शकतोस तू. मला तुझ्याशी बोलायची संधी का देत नव्हतास तू?”

“ ते शहाणपणाचे नव्हते.”

“ पहिल्यांदा त्या रात्री ऑफिस मध्ये आलात तेव्हा असे गूढ पणे का वागलात? तुमची ती बुराखावली, माझे अशील कोण असणार आहे या बद्दल ची लपवा छपवी, मेल्याचे का नाही सांगितले मला?”

“ मला माहित नव्हते तेव्हा “

“ मला मिसेस टोपेची वकिली घ्यायची आहे हे तेव्हाच का नाही सांगितले? मी इकडे तिकडे भरकटत बसण्यापेक्षा जास्त नेमके पणाने काम करू शकलो असतो.”

“ तुम्ही मनापासून काम केलंय पटवर्धन.”

“आता मी सांगतो अगदी तस च्या तस करा , तुम्ही मेला आहात. “

“ का sss य ! “टोपे ओरडला.

“ होय, तुमचा खून झालाय.”

“ तुमच्या लक्षात येत नाहीये का पटवर्धन, मिसेस टोपेची वकीली करायला तुम्हाला सांगितलंय मी “

“ तिचेच प्रतिनिधित्व करतोय मी “ पाणिनी म्हणाला. “ आता ”

“ म्हणजे या आधी करत नव्हतात का? “

“ मला कुठे तुम्ही स्पष्ट सांगितलं होत तुम्ही की नेमके कोण माझे अशील राहणार आहे? मी आपला नोटेचा तुकडा कुठल्या बाई कडे मिळेल याचा अंदाज घेत भरकटत बसलो.  बाब्रस चे वकील पत्र घेतले तरी ठीक आहे अस का म्हणालात तुम्ही?”

“ कारण ती ज्या ट्रस्ट मधे लाभार्थी आहे तो ट्रस्ट टोपे हाताळत होता आणि त्या फंडाच्या रकमेत मोठी तूट आली होती.”

“ हे तुम्हाला कसं माहीत सर्व?”

“ टेंबे बाई मुळे. ती तिची एक प्रकारे परमेश्वरच आहे.”

“ आणि तुम्हाला वाटत की मिसेस टोपे आणि गेयता बाब्रस दोघींचे हित एकमेकांच्या आड येणार नाही?” पाणिनी ने शंका व्यक्त केली.

“ हो , आड नाही येणार , खात्री देतो मी.”  - पळशीकर

“ तुम्ही गेयता ला वैयक्तिक ओळखता?”

“ नाही.त्या टेंबे बाई मुळे माहिती झाल्ये तेवढेच.”

“ म्हणजे तुम्हाला हे माहिती नसेल की आदिती ज्याच्यावर प्रेम करत्ये त्याच व्यक्ती बरोबर गेयता बाब्रस चे ही घनिष्ट संबंध आहेत आणि भेटी गाठी चालू असतात.”

“ काय?  गेयता बाब्रस च्या ! “ पळशीकर उद्गारला.” ही अशक्यच गोष्ट वाटत्ये मला.या बद्दल आदिती मला कधीच बोलली नाही.” – पळशीकर

“ मिसेस टोपे तुमच्या साठी कोण आहेत?”

“ तुम्हाला काय वाटतंय?” – पळशीकर

“ मी तुम्हाला विचारतोय.” पाणिनी म्हणाला.

“ माझं सर्वस्व आहे ती.” – पळशीकर

“ आणि आदिती हुबळीकर कोण आहे तुमच्या लेखी?”  - पाणिनी

“ एक मैत्रीण. ती खूप छान मुलगी आहे. आणि मला आवडते, पण बस इतकंच.”

“ तुमच्या मिसेस टोपेबद्दल ज्या भावना आहेत त्या तिला माहिती आहेत?”  - पाणिनी

“ छे छे , मुळीचं नाहीत.” पळशीकर म्हणाला.” आणि तिलाच काय तर कोणालाच नाही माहिती , मी फार काळजी घेतली आहे ते न कळण्यासाठी.”

“ का बरं?”

“ अहो पटवर्धन,.टोपे आणि मी एकच ट्रस्ट मधे ट्रस्टी होतो, ज्यात अफरातफर झाली आहे, त्याने बोभाटाच केलं असता की माझ्या बायकोबरोबर संबध ठेवता यावेत म्हणून  मला तुरुंगात पाठवण्यासाठी पळशीकर ने आरोप आणून चौकशी सुरु केली.”

“ तुमच्या माहिती साठी सांगतो, मेसेस टोपेला पोलिसांनी तिच्या नवऱ्याच्या खुनाच्या आरोपाखाली  ताब्यात घेतलंय.” पाणिनी ने त्याला कल्पना दिली.

“ ते तिच्या पर्यंत कसे पोचू शकतात मला नाही कळलं. ती त्या वेळी दुसरीकडे होती हे सिध्द करू शकते.”

“  ज्यांच्या वर आरोप येऊ शकतो त्या  सर्वानीच काय चूक केल्ये लक्षात घ्या., प्रत्येकाला जेव्हा प्रेत सापडलं तेव्हा तो केव्हा मेला असेल याचा अंदाज घेऊन त्या वेळेच्या आसपास  आपण तिथे नव्हतोच, लांब कुठेतरी होतो असे सिध्द करायचा प्रयत्न केलाय. पोलिसांकडे अशा सर्वांचा तपशील आहे. त्यांनी एवढंच केलं की  कोणाच्या प्रयत्नातून टोपेच्या मृत्यूची  वेळ सर्वात लौकर दाखवली गेली आहे ते शोधून काढल, त्यात मिसेस टोपेचे नाव समोर आलं,कारण सोमवार दुपार ही मृत्यूची वेळ गृहित धरून तिने आपल्या ठाव ठिकाण्याचा हिशोब मांडला होता.”

“ सरकारी वकील कोर्टात काय सांगतील लक्षात घ्या पळशीकर, “ पाणिनी  पटवर्धन पुढे म्हणाला.” तू मिसेस टोपेवर प्रेम केलंस. सर्वांपासून लपून छपून केलंस. तू स्वतःला आणि तिला मिसेस हसबनीस अशी ओळख दिलीस.”

“ बाप रे ! अरे देवा ! कोणाला माहिती झालाय हे?” पळशीकर उद्गारला.

“ तुम्हाला काय वाटलं, सरकारी वकील मूर्ख असतील?” पाणिनी म्हणाला.” ते हेच सिध्द करण्याचा प्रयत्न करतील की टोपेला तुमची भानगड कळली होती.त्याने तुला रंगे हात पकडले होते म्हणून तुम्ही दोघांनी त्याचा काटा  काढला.”
“ मी असा काहीही केलेले नाही खरंच, माझ्यावर विश्वास ठेवा.”

“ हे बघा मिसेस टोपे निर्दोष आहे अशी आशा करतो मी .आणि आता खरंच दोषी असेल तरी मी तिची वकीली घ्यायला बांधील झालोय.त्या रात्री त्या मोठा नोटेच्या अमिषाला मला तुम्ही बळी पाडलेत, आणि सापळ्यात अडकवलेत तेव्हा कदाचित तो सापळा आहे याची तुम्हाला कल्पना नसेल पण आता फक्त मीच नाही तर आपण सर्व जण त्यात अडकलोय आपल्याला त्यातून बाहेर यायचं आहे तर सरकारी वकील आणि खुनी दोघांनाही असेच वाटू दे की तुमचा खरंच खून झालाय.”

 नंतर सौम्या कडे बघून तो म्हणाला, “ सौम्या यांना बाहेर घेऊन जा ताबडतोब, मृत माणसे दिसतात का आपल्याला कधी?”

सौम्या काय समजायचे ते समजली. तेवढ्यात फोन वाजला. “ गती, अजिबात त्रास देऊ नको आम्हाला.” ती म्हणाली. “ ...ओह. ठीक ठीक. सर, कनक ओजस  चा फोन आहे अत्यंत तातडीने बोलायचे आहे म्हणतोय.”

पाणिनीने फोन उचलला. “ पाणिनी, तुला फार मोठी बातमी देतोय, तुझं अशीलच  तुला  धोका देतंय, सरकारी वकील आपल्या सर्वांनाच अटक करणार..... अरे बापरे ते आलेच इकडे.” पलीकडून फोन ठेवल्याचा आवाज आला. “ सौम्या आणि पळशीकर मागच्या बाजूने लगेच बाहेर पडा.” पाणिनी म्हणाला. ते बाहेर पडले  आणि काही क्षणातच गती शी कोणीतरी जोरजोरात बोलत असल्याचा आवाज आला. आणि आरडा ओरडा करत आत घुसला.

“ हे सर्व काय चाललंय इन्स्पे.होळकर ? “ पाणिनी ओरडला.

“ स्वतला माहिती नसल्या सारखे दाखवू नको.मला जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश आहेत की एक तर चौकशीसाठी तुला तिकडे यावे लागेल किंवा सरळ सरळ तुला तुरुंगात टाकावे लागेल“

पाणिनी ने आता जास्तीत जास्त वेळ काढू पणा करून सौम्या आणि पळशीकर ला जास्तीत जास्त लांब जाऊ देण्याची संधी मिळावी असा प्रयत्न करण्याचे ठरवले.

“ हा ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न आहे इन्स्पे.होळकर” पाणिनी म्हणाला.

“ मला तर अत्ताच तुला आत टाकायला आवडलं असतं पण वरच्यांचे म्हणणे पडले की तू वकील आहेस तेव्हा तुला खुलासा करायची संधी दयावी.”

अटकेचे वॉरण्ट आहे तुमच्या कडे? ” संवाद वाढावेत आणि जास्त वेळ जावा म्हणून पाणिनी ने  विचारले.

“ मला अगदी हीच अपेक्षा होती तुझ्या कडून हा प्रश्न विचारला जाईल म्हणून. आत्ता नाहीये  वॉरण्ट पण अर्ध्या मिनिटात मिळेल अशी व्यवस्था करतो. “ – इन्स्पे.होळकर म्हणाला आणि सरकारी वकिलांना फोन करण्यासाठी फोन हातात धरला. सौम्या आणि पळशीकर किती लांब गेले असतील याचा मनात अंदाज बांधत पाणिनी म्हणाला, “ ठीक आहे चला जाऊ या , मी येतो. “

“ आता त्याला फार उशीर झालाय “  इन्स्पे.होळकर म्हणाला.

“ मला नाही वाटत उशीर झालाय , मी तुझ्या बरोबर यायला नाही म्हंटल नव्हतं, फक्त वॉरण्ट आहे का एवढचं विचारलं  होत.” पाणिनी म्हणाला.

“ बरं , मग निघूया.” इन्स्पे.होळकर म्हणाला.

“ मला माझ्या स्वागतिकेला सांगू दे  की मी बाहेर जातोय, आणि दिवस भराच्या काही सूचना देऊन ठेवू दे “

“ पटकन आवर काय करायचे ते. “इन्स्पे.होळकर म्हणाला.

“ गती, मला इन्स्पे.होळकर सरकारी वकिलांकडे चौकशी साठी घेऊन जात आहेत , दिवसभरात आज वेगवेगळ्या अशिलांच्या संदर्भात महत्वाच्या सूचना देऊन ठेवतो तुला त्या नुसार कारवाई व्हायला हवी.”

सौम्या सोहनी नसली की गती ला आनंद होत असे. स्वतः ला तिच्या जागी आहोत अशी कल्पना करत असे आणि तेवढीच चाणाक्ष असल्याचे दाखवत असे.

पाणिनी ने पुढची काही मिनिटे काल्पनिक अशिलांची नावे घेवून मनाला येतील त्या सूचना देण्यात वेळ काढला. सुदैवाने तिला ते लक्षात आले. तिने ही काही शंका विचारून हे सगळे खरेच आहे असे भासवले.

“ पटवर्धन , बस झाले तुझे आता “  इन्स्पे.होळकर म्हणाला. आणि पाणिनी  पटवर्धन  ला घेऊन बाहेर पडला.

 ( प्रकरण १३ समाप्त)