दुर्लक्षित लैंगिक शिक्षण!!
Instruction in sex is as important as instruction in food- जॉर्ज बर्नार्ड शॉ.
आपण मुलांना मातृभाषा, राष्ट्रभाषा, इंग्लिश, विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल असे अनेक विषय शिकवतो. कसं जेवायचं इथपासून ते चारचौघात कसं वागायचं हे सांगतो. पण एक शिक्षण दिलं जात नाही.. आणि ते म्हणजे लैंगिक शिक्षण!!
मुलांना लैंगिक शिक्षण का द्यायचं? कारण चुकीचं ज्ञान अज्ञानापेक्षा घातक असतं. योग्य लैंगिक शिक्षण दिलं तर मुलांकडून त्याचा योग्य स्वीकार होईल. मुलांना जेव्हा शरीरात आणि मनात प्रचंड बदल जाणवत असतो, तेव्हा त्यांना 'प्युबर्टी' ही अवस्था नैसर्गिक असून इतरांसारखी ती माझ्यात आली आहे हे समजेल. मुले आपल्यापरीने लैंगिकता जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. एरवी ती मित्र, इंटरनेट या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीत सीमारेषा सांगितली जात नाही.
सीमारेषा ओलांडल्यावर काय होऊ शकेल? लैंगिकतेसंबंधी काही विकृती जन्माला येतील. त्यातील एक भयंकर विकृती आहे, बलात्कार! कायदा बलात्कार झाल्यावर न्यायनिवाडय़ाचं काम करतो. पण बलात्कार थांबवणं कायद्याच्या कक्षेबाहेरचं आहे. बलात्कार किंवा इतर विकृती थांबवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक पालक आणि मुलांना लैंगिकतेची मूलभूत माहिती असायला हवी. लैंगिक साक्षरतेचं प्रमाण वाढायला हवं.
सिग्मंड फ्रॉईड म्हणतो, बाळ जन्माला येत तेव्हा त्याच्यासोबत कामभावना, लैंगिक इच्छा जन्माला येते. बाळ एखाद्या वस्तूत रमून शारीरिक आनंद मिळवत असतं. या अवस्थेला फ्रॉईडने पॉलिमॉर्फिक पव्र्हर्स (polymorphic perverse) असं नाव दिलं. बाळ मल-मूत्र विसर्जन करतं, शी-सू करतं तेव्हा त्याला शारीरिक आनंद मिळतो. ही अवस्था वयाच्या पाचव्या वर्षांपर्यंत टिकते. त्यानंतर बाळ (मुलगा आणि मुलगी) ओडिपस कॉम्प्लेक्सपर्यंत (Oedipus complex) येतं. फ्रॉईडने ओडिपस (Oedipus) नाव कसं दिलं याचा संदर्भ असा : ग्रीक पौराणिक कथांमध्ये ओडिपस हा असा नायक होता, ज्याने सख्ख्या आईशी लग्न केलं. सोप्या भाषेत सांगायचं तर मुलाला किंवा मुलीला भिन्निलिंगी पालकाबद्दल किंवा संपर्कात येणाऱ्या भिन्निलगी व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होतं. लैंगिकतेच्या एकूण चार अवस्था असतात. स्व-कामक्रीडा (auto sexual), समलिंगी काम क्रीडा (homosexual), भिन्न लिंगी काम क्रीडा (bisexual) आणि वार्धक्यातील काम क्रीडा नसलेलं जीवन (asexual).
बाळ जन्माला आल्यानंतर ते या चार अवस्थांमधून जातं. आता विचार करू, बलात्कार करण्याची जास्त शक्यता केव्हा असते? निसर्गाला लैंगिक संबंधांमधून पुढची पिढी अपेक्षित असते. त्यामुळे निसर्गाने लैंगिकतेची भावना खूप लहान वयात निर्माण केलेली असते. मेंदूमधून रासायनिक संदेश पाठवला जातो आणि पुरुषाला (लहान मुलाला) लैंगिक इच्छा (इरेक्शन) होते. ही क्रिया शिकवावी लागत नाही. आपोआप घडते. स्वप्नामध्ये लैंगिक दृश्ये दिसू लागतात. त्यामुळे वीर्यस्खलन होते. मुलगा मोठा होत जातो तेव्हा अनेक माध्यमांतून त्याला लैंगिकतेची माहिती मिळत जाते. मित्रांकडून मिळणारी (साधारणपणे अपुरी/ चुकीची) माहिती त्याच्या मेंदूत साठवली जाते. हल्ली प्रसार माध्यमे सगळ्यांच्या हातात आहेत. त्यावर काय दाखवलं जातं? नायक-नायिका नृत्य करताना कामक्रीडेचं प्रतिनिधित्व करतात. त्यात नायिकांचे शरीर उत्तान रूपात दाखवलं जातं.
हे झालं सार्वजनिक माध्यमांमधील वर्णन. इंटरनेटवर यासंबंधांमध्ये जे व्हिडीओ किंवा क्लिप्स आहेत त्यांचं वर्णन हे 'अवर्णनीय'आहे. ज्या नात्यांमध्ये आपण लैंगिक संबंधांची कल्पनाही करू शकत नाही, ज्या संबंधांवरून आपल्याकडे शिव्या तयार झाल्या आहेत ते संबंध इंटरनेटवर दाखवले जातात. शिवाय त्यापलीकडे जाऊन अनैसर्गिक, अमानवी शरीरसंबंध दाखवतात. इंटरनेटवर असे व्हिडीओ कोणी पाहावेत यासाठी वयाचं बंधन नाही. घरातील दहा वर्षांचा मुलगा कॉम्प्युटरवर एकटा खेळत असतो. त्याच्या हाताला असे व्हिडीओ सहज लागू शकतात. तरुण मुले-मुली स्वत: अशा साइट्स पाहत असल्यास आश्चर्य नाही. ही दृश्ये पाहताच पेनाइल नव्र्ह्ज (penile nerves) मधून नायट्रिक ऑक्साइड (nitric oxide) हे संदेशवाहक रसायन कॉर्पस कॅव्हेर्नोसा (corpus cavernosa) मध्ये जातं आणि इरेक्शनची क्रिया होते.
सिनेमांमधून तोकडे कपडे घातलेल्या नायिका दिसतात. त्यांचं अर्धनग्न शरीर मुलांना आवाहन देतं. दिसलेली प्रतिमा त्यांचे डोळे मेंदूला कळवतात. मेंदू रासायनिक संदेश देतो. नातीगोती, नीतीनियम त्या क्षणी मेंदूला कळत नाहीत. मेंदू पुरुषाच्या अवयवांना संदेश पोहोचवण्याचं काम करतो. मग सदर मुलीशी संबंध ठेवावा अशी इच्छा मुलाच्या मनात जागी होते. ते त्याला शक्य नसतं. तोकडे कपडे घातलेल्या टीव्हीवरील सिनेनायिका मिळणं शक्य नसतं. या नायिका अर्धनग्न शरीर दाखवून रग्गड पैसा आणि प्रसिद्धी मिळवतात, त्यांना मोठे पुरस्कार मिळतात. पण त्या पुरुषांचा मेंदू कार्यरत करतात. आता प्रश्न येईल, अशा गोष्टींपासून आपल्या मुलाला कसं वाचवायचं?
यावर निसर्गाने पहिला उपाय दिला आहे...स्वकामक्रीडा! स्वकामक्रीडेला प्रोत्साहन देणं हा हुकमी उपाय आहे. त्यासोबत स्त्रीचा सन्मान राखणं, बलात्कार का होतात आणि त्यापासून दूर राहणं हे मुलांना समजावणं इत्यादी उपाय आहेत. कमी वयाच्या मुलांना लैंगिकतेची योग्य माहिती देणारी हेल्पलाइन तयार करावी लागेल. नाव न विचारता, विचारलेल्या प्रश्नावर योग्य उत्तर देणारी एक हेल्पलाइन अनेक तरुणांच्या इच्छेचं शमन करू शकते.. दमन नाही!!. दमन म्हणजे ऊर्जा दाबणे... भौतिकशास्त्र सांगतं की ऊर्जा दाबली की तिचा स्फोट होतो. सध्या तेच होत आहे.
लग्नाचं वय किती असावं हा पुन्हा एकदा विचार करायचा प्रश्न आहे. लैंगिक इच्छा बालपणी जागृत होते आणि लग्न सरासरी २५ व्या वर्षी होतं. तोपर्यंत जे स्वत:ला थांबवू शकत नाहीत, ते बलात्काराचा मार्ग शोधण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मीडियामधून लैंगिकतेची इच्छा तीव्र केली जाते. पुरुषांनी रचलेले कपडे स्त्रिया वापरतात. कपडे रचणारे स्वत:ला फॅशन डिझायनर म्हणतात. पण ते बलात्काराचं डिझायनिंग करत असतात… तरुण मुली तोकडे कपडे घालतात ते सुंदर दिसण्यासाठी! (इथे हा उल्लेख करताना मुलींच्या पेहरावाच्या स्वातंत्र्याला आडकाठी आणणं हा हेतू नाही. तर पुरुषाच्या मनात त्यासंबंधाने होणारी प्रक्रिया समजावून सांगण्याचा प्रयत्न आहे.) ही संकल्पना पश्चिमेकडून आली आहे. भारत बाह्य सौंदर्य नव्हे तर अंतर्गत सौंदर्याची पूजा करायला सांगतो. प्रत्येक स्त्री सुंदर आहे. कारण तिच्यासारखी दुसरी स्त्री जन्माला आली नाही. पुन्हा कधीही येणार नाही. बोटांचे ठसे घेणारे तज्ज्ञ सांगतात की एका अंगठय़ासारखा दुसरा समान अंगठा कधीही दिसून येत नाही. प्रत्येक स्त्री एकमेवाद्वितीय आहे. दुसरी दीपिका बनणार नाही, दुसरी प्रियांका होणार नाही. तुम्हाला परमात्म्याने एकदाच बनवलं.. तुम्ही खास आहात.. व्हेरी स्पेशल आहात…व्हीआयपी आहात..
शरीरप्रदर्शन करणारी तरुणी तिच्या कारमध्ये सुरक्षित असते. जी एका पुरुषाची वासना चाळवून जाते. तो पुरुष दुसऱ्या मुलीला शोधतो. आणि एक दुष्टचक्र सुरू होतं. कार नसलेली तरुणी रात्री-अपरात्री सार्वजनिक वाहनातून जाताना बलात्काराला बळी पडते आणि कारमधील स्त्री कॅण्डल मार्च काढून निषेध व्यक्त करते!!
एकीची फॅशन.. दुसरीला शासन! एक बनते सौंदर्याचा आविष्कार आणि दुसरीच्या वाट्याला बलात्कार!!
तरुण मुले बलात्काराकडे वळू नयेत म्हणून फ्राइडचा सिद्धांत कामाला येऊ शकतो. लहान मुलं शारीरिक आनंद लुटतात.. मल-मूत्र विसर्जन करूनसुद्धा!! मग शारीरिक आनंद लुटण्यासाठी खेळाचं मैदान हा आणखी एक हुकमी उपाय आहे. फुटबॉलला लाथ मारल्यावर सगळी ऊर्जा बाहेर निघते. पोहणं, सायकलिंग, ट्रेकिंग असे खेळ मोठा परिणाम करू शकतात. पण मैदाने संपली, मुलं कॉम्प्युटर गेम खेळायला लागली. शारीरिक आनंद लुटण्याचे मार्ग बंद झाले आणि बलात्कार वाढत गेले.
दुर्दैवाने लैंगिकता हा विषय अश्लील समजला जातो. लैंगिकतेचं शिक्षण स्पष्ट, रोखठोक स्वरूपात दिलं जात नाही. डूज आणि डोन्ट्स डू सांगणारी अनेक उत्पादने विकली जातात, पण लैंगिकतेबद्दल डूज आणि डोन्ट डू सांगायची वेळ आली आहे.
लैंगिकतेचं योग्य ज्ञान देण्यासाठी र. धों. कर्वे यांनी 'समाजस्वास्थ्य' नावाचं मासिक सुरू केलं होतं. जुलै १९२७ ते १९५३ पर्यंत ते चालवलं. अनेक अश्लीलतेच्या कोर्ट खटल्यांमध्ये त्यांना दंड झाला. एकदा त्यांची केस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लढवली होती. रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे ऊर्फ रँग्लर परांजपे यांनी कर्वेना साथ दिली. स्त्रियांनादेखील लैंगिक भावना असतात असा विचार कर्वेनी मांडला, जो अनेकांना पचला नाही. कर्वेची हेटाळणी होत राहिली. ते विल्सन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते. लैंगिक विषय जाहीरपणे मांडणे विल्सन महाविद्यालयाला पटलं नाही. त्यांनी प्राध्यापक कर्वेना राजीनामा द्यायला लावला. कर्वेचा राजीनामा मागणे ही ऐतिहासिक चूक होती. जिचे परिणाम समाजाला आजही भोगावे लागत आहेत. आता अशा चुका टाळल्या तर बलात्कार, लैंगिक अत्याचार रोखता येतील.
म्हणूनच बलात्कार की लैंगिकतेच्या वस्तुस्थितीचा स्वीकार?
कठोर कायद्याची मागणी करणार की 'आणि लैंगिक' शिक्षणाचाही विचार करणार?
निवड आपल्या हातात आहे.
लेखक: निरेन आपटे
सौजन्य – लोकप्रभा
https://www.facebook.com/niren.apte