लेडी सुलतान,साक्षी मलिक
साल २०१६, स्थळ होते ब्राझिलचे रिओ शहर आणि निमित्त होते ऑलिम्पिक स्पर्धांचे. लंडन २०१२ मध्ये भारताने दोन रजत आणि चार कांस्यपदक जिंकत पदकांची चांगली कमाई केली होती. यामुळेच रिओ ऑलिम्पिक मध्ये देशाला आपल्या खेळाडूंकडून अपेक्षा वाढलेल्या होत्या. मात्र ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होऊन ११ दिवस उलटले होते आणि भारताची पदकतालिकेत पाटी कोरीच होती. भारतीय गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते आणि पदकाविना परतण्याची नामुष्की भारतीय पथकावर येते की काय अशी चिन्हे दिसत होती. अशातच एक चमत्कार झाला. वयाच्या 'बाराव्या' वर्षापासून नियमितपणे 'बारा वर्षे' कुस्तीच्या आखाड्यात घाम गाळणाऱ्या हरयाणवी मुलीने ऑलिम्पिकच्या 'बाराव्या' दिवशी किर्गिस्तानच्या आयसुलू तायनाबेकोव्हला धोबीपछाड देत भारतासाठी कांस्यपदक जिंकले आणि रिओमध्ये पदकाची बोहनी करुन दिली. अशी कामगिरी करणारी "हरियाणा की छोरी" अर्थातच भारताची "लेडी सुलतान" म्हणून ओळखल्या जाणारी मुलगी, साक्षी मलिक होती.
वास्तविकत: हरियाणा सारख्या राज्यात, जिथे मुलींचा जन्मदर सर्वात कमी आहे तिथे मुलीच्या जन्माचे फारसे स्वागत होत नाही. मात्र सध्या हरियाणाच्या मुलींनी क्रिडाक्षेत्रात जी झेप घेतली आहे ते पाहता परिस्थिती नक्कीच बदलेल अशी अपेक्षा आहे. ३ सप्टेंबर १९९२ ला एका सामान्य कुटुंबात साक्षीचा जन्म झाला. या छोट्या परीचे आगमन मलिक कुटुंबासाठी लक्ष्मीची पाऊले ठरली. साक्षीच्या जन्मानंतर लगेच तिच्या वडीलांना बस वाहकाची तर आईला अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून नोकरी लागली. यामुळे साक्षीला सांभाळण्याकरीता तिला तिच्या आजोबांकडे ठेवण्यात आले आणि इथेच एका कुस्तीपटूने आकार घेण्यास सुरुवात केली होती. साक्षीचे आजोबा बदलूराम आपल्या काळातले नावाजलेले मल्ल होते आणि त्यांना पहेलवान म्हणून मिळणारा मानसन्मान पाहून साक्षीला सुद्धा कुस्तीपटू व्हायची स्वप्ने पडू लागली होती.
सात वर्षांची असताना ती आई-वडिलांकडे परतली मात्र तोपर्यंत मनोमन ती कुस्तीसाठी तयार झाली होती किंबहुना कुस्तीचा आखाडा तिला वारंवार खुणावत होता. मात्र आपल्या मुलीने कुस्ती खेळावे असे तिच्या पालकांना अजिबात वाटत नव्हते. अखेर आपल्या लाडक्या कन्येच्या हट्टापुढे आई-वडील नरमले आणि साक्षीच्या कुस्तीप्रवासाला सुरुवात झाली. वयाच्या बाराव्या वर्षापासून ईश्र्वर दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षीने कुस्तीचे धडे गिरवणे सुरू केले. मात्र तिला सरावासाठी मुलांसोबत कुस्ती खेळावी लागत असे आणि मुख्य म्हणजे अशा खेळातही ती सामने जिंकून दाखवायची. अर्थातच साक्षी आणि तिचे प्रशिक्षक यांच्यावर याबाबत बरीच टिका झाली परंतु या दोघांनीही टिकेला भिक न घालता आपल्या निर्णयावर ठाम राहिले होते.
हरियाणाची ओळख असलेल्या फोगाट भगिनींशी साक्षीचे चांगलीच जवळीक होती आणि गिता फोगाट तिची आदर्श खेळाडू होती. बरेचदा सरावादरम्यान फोगाट भगिनी तिला 'पुरा छोरा लगे हैं' आणि "ग्रीको रोमन पहेलवान" म्हणून गमतीने चिडवायच्या परंतु तेवढ्याच आत्मियतेने तिला उपयुक्त मार्गदर्शन करायच्या. दररोज सहा सात कठोर मेहनत घेत साक्षी ऑलिम्पिकचे स्वप्न उराशी बाळगून होती आणि यादृष्टीने तिला पहिले यश मिळाले होते २०१० च्या वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप मध्ये. जिथे साक्षीने ५८ किलो गटात कांस्यपदक मिळविले होते. यानंतर २०१४ ला डेव्ह शुल्त्झ इथल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ६० किलो गटात सुवर्णपदक जिंकत जागतिक पातळीवर आपला दरारा कायम केला. त्याच वर्षी ग्लासगोच्या राष्ट्रकुल स्पर्धेत ५८ किलो गटात रौप्यपदक पटकावले. तर २०१५ च्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक मिळवत कुस्तीतली आपली घोडदौड सुरू ठेवली होती.
२०१६ साल उजाडले आणि तिचे बालपणीचे स्वप्न साकार करण्यासाठी ती आतूर झाली होती. याकरिता तिने प्रचंड मेहनत घेतली होती. शिवाय वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तिला विशेष आहारावर अवलंबून राहावे लागले होते. तिच्या खेळात लेग अटॅक आणि काऊंटर अटॅक ही तिची प्रमुख आयुधे होती तर तिचा बचाव मात्र सामान्य होता. मात्र कुस्तीचे वेड असलेल्या साक्षीने खेळात आक्रमकतेशी अजिबात तडजोड केली नाही आणि हेच तिच्या यशाचे गमक ठरले होते. खरेतर कुस्ती मध्ये यापुर्वीही खाशाबा जाधव १९५२ कांस्यपदक (हेलसिंकी), सुशिलकुमार २००८ कांस्यपदक (बिजिंग), रजतपदक २०१२ (लंडन) आणि योगेश्वर दत्त कांस्यपदक २०१२ (लंडन) यांनीच चमक दाखवली होती. शिवाय भारतातर्फे केवळ तिन महिलांनीच (कर्णम मल्लेश्वरी, मेरी कोम, साईना नेहवाल) ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविले होते. यामुळे साक्षीकडून देशवासीयांना प्रचंड आशा होत्या.
आपल्या धडाकेबाज खेळीने साक्षीने रिओ चा आखाडा गाजवत पदकाच्या शर्यतीत उतरली होती आणि तिची गाठ पडली आशियाई चॅम्पियन असलेल्या किर्गिस्तानच्या बलाढ्य आयसुलू सोबत. सामन्याच्या सुरवातीलाच आयसुलूने साक्षीवर ५/० अशी आघाडी घेत साक्षीवर दबाब टाकला होता आणि साक्षीला सामन्यात परतण्यासाठी आकाशपाताळ एक करावे लागणार होते. मात्र एवढ्या लवकर हार मानेल तर ती साक्षी कसली. मुकाबला संपायला पाच सहा मिनिटे उरली असतांनाच आपल्या जिगरबाज खेळीने साक्षीने ५ गुण घेत सामना बरोबरीत आणला. शेवटचे काही क्षण उरले असताना साक्षीने आपला अनुभव आणि ताकद पणाला लावत बाजी प्रतिस्पर्ध्यावर उलटवत ही प्रतिष्ठेची लढत ८/५ अंतराने आपल्या नावे केली. अशाप्रकारे ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होती.
साक्षीच्या या भिमपराक्रमामागे तिची वर्षानुवर्षेची कठोर मेहनत, प्रचंड आत्मविश्वास आणि दुर्दम्य इच्छाशक्ती कारणीभूत होती. एक मुलगी असल्याने कधी घरच्यांचा तर कधी समाजाचा विरोध झुगारून ती आपल्या ध्येयाप्रती एकनिष्ठ राहिली. अपुऱ्या सोयीसुविधा, जागतिक स्तराच्या प्रशिक्षकांची उणीव, सरावाकरीता मुली उपलब्ध नसणे इत्यादी कारणांमुळे ती आपल्या स्वप्नांपासून अजिबात विचलित झाली नाही. अर्थातच साक्षीच्या या कामगिरीची योग्य दखल घेत तिला २०१६ ला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि २०१७ ला पद्मश्रीने सम्मानित करण्यात आले होते. अत्यंत कठीण परिस्थितीतून "हरयाणवी छोरी ते ऑलिम्पिक गर्ल" पर्यंतचा साक्षीचा खडतर प्रवास नवोदितांसाठी प्रेरणादायी तर आहेच शिवाय तिचे कर्तृत्व तमाम भारतीयांसाठी अभिमानाची बाब सुद्धा आहे.
दि. २३ मे २०२०
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com