बॅडमिंटनचे प्रकाशपर्व : प्रकाश पदुकोण
जगातील सर्वात जास्त लोकप्रिय खेळांत फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल, हॉकी आणि टेनिस या खेळांचा समावेश होतो. मात्र असे असले तरी मुख्यतः आशिया खंडात बॅटमिंटनचा खेळ प्रचंड लोकप्रिय आहे आणि जगाभरातील २२ करोड जनता या खेळाची दिवानी असून नियमितपणे बॅडमिंटनचे सामने खेळले जातात. खरेतर कोणत्याही खेळाला एक मसिहा लागतोच, ज्याच्यामुळे जगात किंबहुना त्याच्या स्वत:च्या देशात त्या खेळाडूला त्या खेळाचा पर्यायवाची शब्द अथवा त्या खेळात अभुतपूर्व क्रांती आणण्याचे श्रेय मिळते. जसे भारतीय क्रिकेट म्हटले की १९८३ चा विश्र्वचषक भारतीय क्रिकेटसाठी एक मैलाचा दगड ठरला आहे तसेच बॅडमिंटनसाठी प्रकाश पदुकोण यांचे १९८० ला ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपचे विजेतेपद भारतीय बॅडमिंटनसाठी एक परिवर्तन म्हणून पाहिले जाते. खरेतर १९६० च्या दशकांत तुरळक अपवाद वगळता बॅडमिंटन कोणाच्याही खिजगणतीतही नव्हते परंतु प्रकाश पदुकोण यांनी एकहाती बॅडमिंटनचा गोवर्धन पर्वत उचलण्याची किमया करताच पुलेला गोपीचंद, साईना नेहवाल, पी सिंधू, ज्वाला गुट्टा आणि यासारख्या कित्येक गुणी खेळाडूंच्या रूपात आपण भारतीय बॅडमिंटनचा वेलू गगणावरी चढलेला बघू शकतो.
'सायलेंट टायगर' व 'अनडिसप्युटेड लिडर' या टोपणनावाने प्रसिद्ध प्रकाश पदुकोण यांचा जन्म १० जुन १९५५ ला पदुकोण, कुंदापुरा, जिल्हा उडीपी, म्हैसूर इथे झाला होता. त्यांचे वडील रमेश पदुकोण यांनी म्हैसूर बॅडमिंटन असोसिएशनची स्थापना केली होती आणि त्याचे ते सचिव असल्याने सहाजिकच प्रकाश पदुकोण यांचा ओढा लहानपणापासून बॅडमिंटनकडे लागला होता. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी त्यांनी रॅकेट हातात घेत बॅडमिंटनला सुरुवात केली आणि १९६४ ला राष्ट्रीय ज्युनिअर चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली होती. याशिवाय १९७१ ते १९७९ पर्यंत लागोपाठ ९ वर्षे राष्ट्रीय सिनियर चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकण्याची करामत दाखवली होती. ६ फुट १ इंच उंची असलेल्या या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव कोरले ते १९७८ ला कॅनडात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून. यानंतर १९७९ ला रॉयल अल्बर्ट हॉल, लंडनला झालेल्या *इव्हनिंग ऑफ चॅम्पियन्स* चे जेतेपद पटकावत जगाला आपली चुणूक दाखवून दिली होती मात्र अजुनही आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाश पदुकोण यांची फारशी कुणी दखल घेतलेली नव्हती. १९८० ला डॅनिश, स्विडीश सोबतच *ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप* जिंकताच बॅडमिंटन जगताने प्रकाश पदुकोणला सलाम ठोकला आणि इथेच भारतातील बॅडमिंटनचे प्रकाशपर्व सुरू झाले होते. लगेचच १९८१ ला क्वाललंपूर, मलेशियात झालेल्या जागतिक स्पर्धेचे विजेतेपद मिळवत प्रकाश पदुकोणने जगावर आपली छाप सोडली होती.
अर्थातच प्रकाश पदुकोण यांची दैदिप्यमान कामगिरी आणि त्यामागची कहानी खुपच रंजक आहे. ६० च्या दशकांत उत्तर, पुर्व आणि पश्र्चिम भारत वगळता दक्षिणेकत बॅडमिंटन ऐवजी बॉल बॅडमिंटन खेळले जायचे. यामुळेच तिकडे बॅडमिंटनची ना कुणाला ओळख होती ना कुणाला बॅडमिंटन खेळाडूंचे नाव तोंडपाठ होते. तसेच उमलत्या खेळाडूंसाठी ना सोयीसुविधा उपलब्ध होत्या, ना आर्थिक सहाय्य, ना आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख. प्रकाश पदुकोण यांना त्यांच्या वडीलांनी प्रशिक्षण दिले ते सुद्धा एका मंगल कार्यालयात, जे कमितकमी सहा महिने लग्नसमारंभासाठी व्यस्त असायचे. मात्र वडीलांनी त्याला एक गुरूमंत्र दिला होता आणि याचेच पालन करत प्रकाश पदुकोण यांनी सुवर्णकामगिरी केली आणि तो गुरुमंत्र म्हणजे *फोकस ऑन थिंग्ज व्हिच आर अंडर युवर कंट्रोल*.
क्रिकेटमध्ये विश्र्वचषकाचे, फुटबॉल मध्ये फिफा विश्वचषकाचे आणि टेनिस मध्ये विम्बल्डनचे जे महत्त्व आहे, तेच महत्त्व बॅडमिंटन मध्ये ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपचे आहे किंबहुना प्रत्येक बॅडमिंटनपटू ही स्पर्धा जिंकण्याची मनिषा उराशी बाळगून असतो. प्रकाश पदुकोण सुद्धा याला अपवाद नव्हते आणि तब्बल चार वेळा अपयशी ठरल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही कारण *अपयशासारखा दुसरा कोणता गुरु नाही* यावर त्यांचा ठाम विश्वास होता. अखेर कसेही करून ही स्पर्धा जिंकण्याची दुर्दम्य इच्छा बाळगत त्यांनी बॅडमिंटनचे पॉवर हाऊस असलेल्या डेन्मार्कची वाट धरली आणि तिथेच त्यांच्ये सोनेरी स्वप्न आकारण्यास सुरूवात झाली होती. १९८० साल उजाडले आणि त्यांचा झंझावाताने डॅनिश आणि स्विडीश स्पर्धा आरामात जिंकल्या होत्या. मुख्य म्हणजे पदुकोण यांचे आयकॉन असलेल्या रुबी हर्टोनो यांना त्यांनी *गुरुची विद्या गुरूला देत* पराभूत केले होते. निश्चितच या दोन विजयाचे टॉनिक मिळताच पदुकोण यांचा आत्मविश्वास दुणावला आणि आता त्यांच्यासमोर अर्जुनासारखे एकमेव लक्ष होते ते म्हणजे ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपचे.
आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा लिलया धुव्वा उडवत पदुकोण यांनी ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आणि तिथे त्यांची गाठ पडली ती गत दोन वेळच्या चॅम्पियन इंडोनेशियाच्या लिम स्वि किंग याच्याशी आणि हा खेळाडू खरोखरच बॅडमिंटनचा किंग होता. आपल्या ताकदवान, चपळ हालचालींनी आणि दमदार वेगवान स्मॅशने तो विरोधकांचा सहज फडशा पाडत होता, शिवाय या स्पर्धेसाठी त्याने इतर मोठ्या स्पर्धांना तिलांजली दिली होती. याउलट पदुकोण आपल्या सहजसुंदर टच प्ले साठी नावाजलेले होते तसेच ड्रिफ्टवर त्यांचे उत्तम नियंत्रण होते. खरेतर ही *ससा आणि कासवाची शर्यत होती* आणि पदुकोण यांनी चतुरपणे *शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ* ठरवत किंग याच्याशी निर्णायक लढतीला सज्ज झाले होते.
पदुकोण यांनी किंगच्या मानसिकतेचा चांगला अभ्यास केला होता आणि जाणुनबुजून खेळ कसा संथ होईल याकडे लक्ष केंद्रित केले होते. आपली चाल चालतांना चाणाक्षपणे किंग टॉस साठी तयार असला तर ड्रॉप आणि ड्रॉपसाठी तयार असला तर टॉस करत किंगला चांगलेच दमवून सोडलेले होते. तसेच हाफ स्मॅश आणि शटलला बेसलाईनजवळ ठेवत किंगला अक्षरशः बेजार करुन सोडले होते आणि अवघ्या ८ मिनिटात १५/८ अशा गुणांनी पहिला सेट जिंकला होता. किंग पदुकोण यांच्यापेक्षा दोन वर्षे लहान असला तरी यापूर्वी या दोघांत झालेल्या ४ लढतीत किंगनेच बाजी मारलेली होती. यामुळेच किंग पहिला सेट हरताच चांगलाच खवळला आणि इथेच तो सामना गमावून बसला. दुसऱ्या सेटमध्ये संतापलेल्या किंगने जोरदार स्मॅश करत पदुकोण वर दबाव आणण्याचा प्रयत्न केला परंतु नेटजवळ ड्रिबल, हाय सर्व्ह आणि मनगटाच्या हळुवार फटक्यांनी किंगला बॅडमिंटन कोर्टच्या चारही कोपऱ्यात पळवून त्याची चांगलीच दमछाक करून टाकली. अखेर ताकद, वेग, स्टॅमीना आणि शांत डोक्याने किंगची शिकार करत आपले *सायलेंट टायगर* हे नामाभिधान कसे योग्य आहे ते जगताला दाखवून दिले.
जग नेहमीच उगवत्या सुर्याला नमस्कार घालते आणि याचीच प्रचिती पदुकोण यांना ही स्पर्धा जिंकल्यानंतर झाली. एरवी लंडनला वायएमसीए ते बॅटमिंटन कोर्टपर्यंतचा २५ मिनिटांचा प्रवास मेट्रोने करणाऱ्या पदुकोण यांना ही स्पर्धा जिंकताच कारने भारतीय राजदुतावासापर्यंत नेण्यात आले होते. या विजयामुळे पदुकोण जागतिक क्रमवारीत अव्वल ठरले आणि अशी कामगिरी करणारे ते पहिले भारतीय खेळाडू ठरले. या दिग्विजयाने जगासोबतच आपल्या देशातही त्यांची चांगली दखल घेतली गेली आणि सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या कामगिरीमुळे त्यांनी स्वर्णपदकासोबतच १००० पौंड बक्षिसादाखल मिळाले होते. पदुकोण यांच्या ऐतिहासिक विजयाने भारतीय बॅटमिंटनचे ८० पुर्व आणि ८० नंतर अशी विभागणी होऊन भारतीय बॅटमिंटनने कात टाकून नवी उभारी घेतली होती. पदुकोण यांच्यानंतर केवळ पुलेला गोपीचंद यांनी २००१ ला ही स्पर्धा जिंकत भारतीयांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. तसेच इतरही खेळाडूंनी जागतिक विजेतेपदासह दोन आॉलिम्पिक पदके आणि कित्येक स्पर्धात बाजी मारली असली तरीही पदुकोण नेत्रदीपक कामगिरी आजही सर्वोच्च स्थानी मानली जाते. पदुकोण यांच्या विजयानंतर भारतीय बॅटमिंटन भरभराटीला आले आणि जागतिक दर्जाचे खेळाडूंनी बॅडमिंटन जगतात आपला दबदबा निर्माण केला.
पदुकोण यांनी आपल्या धडाकेबाज खेळाने १९८० ते ८५ पर्यंत आणखी १५ टायटल्स पदरात पाडत आपला धडाडा कायम ठेवला होता. मात्र १९९१ ला त्यांनी निवृत्ती घेत बॅडमिंटन साठी आपले आयुष्य वाहून घेतले. काही काळ त्यांनी बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडीयाचा चेअरमन म्हणून पदभार सांभाळला तर १९९३ ते १९९६ पर्यंत भारतीय राष्ट्रीय बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक होते. १९९४ ला त्यांनी प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकॅडमी स्थापन केली होती तसेच २००१ ला भारतात ऑलिम्पिक खेळ रूजविण्यासाठी *ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट* संघटनेची उभारणी केली होती. अर्थातच बॅटमिंटन मध्ये इतकी भरगच्च कामगिरी केल्याने त्यांना १९७२ ला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर १९८२ ला भारताच्या तिसऱ्या सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्रीने गौरविण्यात आले होते. २०१४ ला आऊटस्टॅंडींग पुरस्कार तर २०१८ ला बॅटमिंटन असोसिएशन ऑफ इंडीयाचा लाईफस्टाईल अचिव्हमेंट पुरस्कार मिळालेला आहे.
खरेतर आजच्या पिढीला प्रकाश पदुकोण यांची ओळख असण्याची शक्यता कमीच आहे फारतर बॉलीवूडची अग्रणी नटी दिपीका पदुकोणचे वडील एवढी ओळख असू शकते. मात्र प्रतिकूल परिस्थितीतही, फारसे पाठबळ नसतांना, पुरेसा मिडीया कव्हरेज अथवा पैशांची खैरात नसतांना प्रकाश पदुकोण यांनी बॅडमिंटन मध्ये जी हिमालयाची उंची गाठली त्याला तोड नाही. सोबतच निवृत्ती नंतरही खेळाशी आपली नाळ तुटू दिली नाही. एकांड्या शिलेदाराप्रमाणे त्यांनी बॅडमिंटनला प्रसिद्धीच्या झोतात आणून भारतात खऱ्या अर्थाने बॅटमिंटनचे प्रकाशपर्व सुरू केले. एवढेच नव्हे तर दिपस्तंभाप्रमाणे हा प्रकाशस्तंभ कधी चेअरमन, कधी प्रशिक्षक तर कधी विविध संघटनांच्या माध्यमातून नवनवीन खेळाडूंची मशागत करत राहीला. पदुकोण यांच्या मते एखाद्या देशात कोणताही खेळ लोकप्रिय होण्यासाठी त्या देशातल्या एखाद्या खेळाडूला त्या खेळात शिखरावर पोहचणे गरजेचे असते. पदुकोण यांनी बॅडमिंटन बाबत हेच वाक्य खऱ्यात उतरून दाखवत भारतात बॅटमिंटनला लोकप्रियता मिळवून दिली. नवोदित खेळाडूंसाठी प्रकाश पदुकोण हे रोल मॉडेल असून देव एस कुमार यांनी त्यांच्या जिवावर आधारित *टच प्ले* नावाची बायोग्राफी लिहिलेली आहे.