छे ! फारच चमत्कारिक !
" तला जे काही पुढं करायचं असेल त्याचा एव्हांपासून काय तो विचार कर. रमाबाई आपली लहान बहीण नलिनी हिला उद्देशन म्हणाल्या, “कारण इकडून व मी ह्या जागेत थोडा फरक करायचं मनांत आणलं आहे."
" तो कसा काय ? " शिवत असतांनाच वर पाहत नलिनीने विचारले.
ज्या खोलीत रमाबाई व नलिनी त्या दोघी शिवणकाम करीत बसल्या होत्या ती चांगल्या प्रकारे शगारली होती. सफेत दिवाणखान्याच्या एका बाजूची ती खोली असून तिच्या दरवाजावरून व सर्व खिडक्यांवर मौल्यवान झालरींचे पडदे सोडलेले होते व भिंतींना, तसेंच खिडक्यांना व दरवाज्यांना चांगला तेलिया रंग oil paint दिलेला होता. खोलीच्या मध्यभागी एक छोटेसे व सूचक नक्षीकाम केलेले एक वर्तुळाकार मेज असून त्यासभोंवतीं वेटवुडच्या चार खा ठेवलेल्या होत्या. कांहीं कपाटांत निरनिराळ्या विषयांवर मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांतील पुस्तकें नीट रचून ठेवलेली असून एका कपाटांत कपडे वगैरे सामान दिसत होते. खोली अशा रीतीने व्यवस्थित व स्वच्छ ठेवलेली होती, तसेच आंतील सामानही इतके चकचकीत व स्वच्छ दिसत होते की, एखाद्या नवख्या इसमाला त्या खोलीतील एकंदर रचना नुक्तीच झाली असावी असे वाटल्यावांचून राहिले नसते. वर वर्णन केलेल्या खोलीतील एका कोचावर रमाबाई विणकाम करीत वसल्या असून त्याच्याजवळील दुसऱ्या कोचावर नलिनी काही शिवत बसली होती. रमाबाई व नलिनी या दोघी बहिणी जरी एकाच मातेच्या उदरांतून आलेल्या होत्या, तरी त्यांच्या चेहऱ्यांत, त्यांच्या बोलण्यांत, स्वभावांत व त्यांच्या वर्तणुकीत बराच फरक दिसून येत असे. रमाबाई दिसण्यांत उंच असून त्यांच्या अंगची ठेवण जेथल्या तेथें व प्रमाणांत होती. त्यांचा चेहरा सुंदर दिसत असे, त्यावर मनाचा बेफिकीरपणा व दृढनिश्चयाची झांक सहज आढळन येई. तसेंच तिचे डोळेही पाणीदार असून ते एखाद्यावर आपली सहज छाप पाडीत असत. रमाबाईना फार अघळपघळ बोलणे मळीच आवडत नसे. इत.. कंच नव्हे, तर त्या फार करून कुणाशीच विशेष बोलत नसत. या वेळी ती प्रकरणाच्या आरंभीच दिल्याप्रमाणे विणकाम करीत असतां जरी नलिनीशी बोलत होती, तरी तिचे लक्ष आपल्या कामाकडे पूर्णपणे होते व त्यामुळे तिचे टांके मारण्याचे काम सारखेच चालू राहून त्यांत थोडासुद्धा खंड पडत नव्हता. तिचा स्वभाव जितका करारी आणि निश्चयी होता, त्याच्या उलट स्वभाव गजाननरावांचा होता. ते मुखदुर्बल होते असे मागे एका प्रकरणांत आलेच आहे. दोघांच्या अगदी परस्पर विरोधी स्वभावामुळे गजाननराव रमाबाईच्या अगदी मुठीत असत. __ प्रकरणाच्या आरंभी दिल्याप्रमाणे त्या दोघी आपापल्यापरी उद्यो गांत गर्क होऊन गेल्या होत्या. रमाबाई बसल्या होत्या त्या बाजूच्या खिडकीमधून सायंकाळच्या सूर्याचे कोमल किरण तिच्या अंगावर पडले होते. थोड्याच दिवसांपूर्वी त्या बंगल्यांत घडलेल्या हृदयद्रावक प्रसं गाची आठवण त्यांना नसावी असे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येत होते. मयत स्त्रीचे दहन केव्हांच होऊन वृत्तपत्रांतही त्याविषयीं आतां कांहींच येईनासे झाले होते; इतक्या लवकर सर्वजण ती गोष्ट विसरत चालले होते. इतरांप्रमाणे रमाबाईंच्याही आठवणींतून तो प्रसंग नाहीसा होत होता.
“ त्यांत न समजण्याएवढं काय आहे ? तुला माहितच आहे की, भागीदारी घेण्यास जे पैसे धंद्यांत घालावे लागतात ते त्यांनी न घालतां मीच घातले आहेत. कारण त्यांच्याजवळ होते नव्हते तेवढे सर्व पैसे त्यांनी माझ्यासाठी हा बंगला रचण्यांतच खर्च केले आहेत.”
“ पण तुमच्या लग्नापूर्वीच तर त्यांनी हा बंगला बांधलेला आहे."
“ ते सर्व खरं आहे. हे जेव्हां कधी कधों चावांकडे येत असत तेव्हांच त्यांनी मला ' मी एक तझ्यासाठी बंगला बांधीत आहे व लवकरच मी तुला मागणी घालणार आहे ' असं सांगितलेलं होतं. त्यानंतर थोड्याच दिवसांनी आमचं लग्नाचं ठरलं. त्यांतूनही मला business करायची फार आवड आहे. परंतु एकटी बायकोमाणूस कोणता 'विझिनेस' करणार हा विचार मनांत आल्यामुळं त्यांच्या माग णीला बाबांकरवी मी रुकार देवविला व लग्न झाल्यानंतर तिकडच्याच नांवानं दादाच्या कंपनीची भागीदारी घेवून भागीदाराची पत्नी म्हणून त्यांचं काम पाहते.”
“ पण तुला हे सर्व, लग्न न करतांसुद्धा करतां आलं असतं."
" नाही," रमावाई नकारार्थी आपली मान हालवून म्हणाली, " बाबांनी तुला वार्षिक सहा हजारांचं उत्पन्न ठेवलं आहे. पण मला तुझ्यापेक्षा अधीक रक्कम ठेवलेली होती. ते पैसे माझ्याजवळ येणार म्हणून मी दादाला तुझ्या कंपनीची भागीदार होऊं काय म्हणून विचारलं; पण माझं म्हणणं त्यानं साफ नाकारलं. त्यानंतर माझं लग्न झालं व शेवटी त्यांच्या नांवानं मी दादाच्या धंद्यांत पैसे घालून मी ह्यांना त्या कंपनीचे भागीदार बनविले. इकडे ह्या business बद्दल काहीच कळत नसल्यामुळं 'फसवायला ठीक' म्हणून दादांनी त्यांना भागीदार केलं व याच कारणामुळं मी त्यांच्याबरोबर लग्न करायचं कबूल केलं हे तला कळलंच. कारण तिकडच्या नांवावर मला ह्या धंद्यांत वाटेल तशा घडामोडी करता येतात."
" ते असो, पण आता तूं काय ठरवते आहेस ?"
“ मला तुम्ही बरोबर नेणार नाही वाटतं ?"
"तुझी जर इच्छा असेल तर नेऊ. पण आतां तूं मोठी होत चाललीस. शिवाय बाबांनीही तुला भरपूर उत्पन्न ठेवलं आहे. तेव्हां तूं जर आतां संसार थाटशील तर बरं, असं मला वाटतं." __" अस्सं ? " नलिनी खोंचून रमाबाईकडे पाहत म्हणाली, " एकूण तुला माझा कंटाळा येऊ लागला तर ! " ___“ छे ! असं काही मी म्हटलं नव्हतं.” रमाबाई म्हणाली, “ तूं आहेस म्हणून आमचा वेळ तरी जातो व ह्यांनाही तुझा स्वभाव फार आवडतो. तुझाही काही आम्हांला कसलाच त्रास होत नाही. तला आमच्याबरोवर न्यावं अशी माझीसुद्धा इच्छा आहे; पण मला आपलं वाटतं ते सांगितलं."
" तुझ्याबरोबर ! आणि इतक्या दूर-?"
" नाही तर लग्न कर" रमाबाई शांतपणे म्हणाली, " लग्न करशील तर बरं.” __ " पण मी दोन्हीही केली नाहीत तर ? बाबांनी मला भरपर पैसे ठेवले आहेत, तेव्हा मी आपली शरयूच्या घरी जाऊन राहीन.” ___ " तुला त्या मेंढवाडयांत सरोजिनीवाईबरोबर जाऊन राहायचं असेल
तर खुशाल राहा. माझं काही म्हणणं नाही.” रमाबाई जरा रागाने म्हणाली.
" पण ती काही मला त्रास देत नाही." नलिनी जोराने म्हणाली.
" पण ती तुला त्रास देते असं मी तरी कुठं म्हणतं आहे ? मला मात्र कांही तिच्या घरी राहणं आवडणार नाही. शरय तर नसती उल्लूच आहे. ती हल्ली त्या कमलाकराच्या नादी लागली आहे म्हणे !"
" कमलाकर काही वाईट नाहींत. सुस्वभावी आहेत ते." "होय, पण भामटे;-आणि शरयू ?" " तिच्यासारखी मुलगी कुठं आढळायची नाही."
“ उनाड ना? पण मला अशा त-हेचे लोक मुळीच आवडत नाहीत." रमाबाई भिवया आकुंचित करून म्हणाली.
"तुला तझ्याशिवाय दुसरं कुणी आवडतं का?'' नलिनीने रागाने विचारले, "स्वतःखेरीज तुला दुसऱ्याची पर्वाच वाटत नाही."
__" कां बरं नाहीं ? मला मिनीची तसंच इकडचीही थोडीशी काळजी आहेच. तूं आतां बयांत आलीस, आतां तुझी काळजी का करावी ? आणि इतर लोकांची पर्वा बाळगण्याचं मला कारण नाही. पर्वा करून घ्यायला तसे गुण अंगी असावे लागतात."
" दुसऱ्याचे गुणावगुण निरखून पाहण्याचा जसा कांहीं कुणी तुला अधिकारच दिला आहे. तुझा स्वभाव अगदी बाबांसारखाच आहे."
" बरोबर आहे. आणि म्हणूनच तर त्यांनी तुझ्यापेक्षा जास्त पैसे माझ्या नांवं करून ठेवले. तुझा आणि इकडचा, दोघांचेही स्वभाव कसे थेट माझ्या आईप्रमाणं आहेत अगदी मिळमिळीत. तुमच्यांत कांहींच पाणी नाही. मळीच नाही."
ह्या भाषणाने नलिनीला अगदी चीड आली. तिला, त्याच क्षणी खोलीच्या बाहेर निघून जावे असे वाटले व ती उठून जाणारही होती; परंत थोडयाशा विचारांती तेथेच बसणे योग्य असे तिला वाटले. ती उठून गेली असती तरी रमाबाईने रागाचे काहींच चिन्ह दाखविले नसते व पुन्हा मात्र त्यांनी तिला किती तरी जेरीस आणले असते. त्याखेरीज नलिनीला रमाबाईपाशी आपल्या पुढील सुखदुःखाची व भावि आशेची एक गोष्ट काढावयाची होती, म्हणूनच तिला बसणे भाग होते व या साठींच तिला चालू वादविवादाचे रूपांतर करणे इष्ट वाटले. . ___ "तुला त्या दोघांशिवाय इतर कोणीच आवडत नाही, याचा अर्थ मधुकररावांबरोबर माझा विवाह होणं तुला योग्य वाटत नाही, असा मी समजू की काय ? " तिने विचारले.
" होय, असंच. कारण मला तुमचा जोडाच आवडत नाही. पण तु झा जर अगदी हट्टच असेल तर त्याला माझा नाइलाज आहे. मी चौपाटीवर असतांनाच त्या गोष्टीचा पूर्ण विचार केलेला असून इथं आल्यानंतर तो तुला सांगण्याचा माझा मानस होता. पण या खुनानं सर्व घोटाळा केल्यामुळं ती गोष्ट तशीच राहिली. तूं आता काही तरी एक ठरवून टाक. आमच्याबरोबर बाहेरगांवीं चल, नाही तर मधुकरा. बरोबर लग्न करून सर्व जन्म दु:खांत काढ."
" त्याचं पुढं पाहूं; पण तुम्ही इथून जाणार केव्हां ?" ___तीन चार महिन्यांत जाऊं, कारण जाण्यापूर्वी हा बंगला विकून टाकायचा आहे. तसंच इतर गोष्टींचाही पूर्ण बंदोबस्त केला पाहिजे. पण तूं मधुकरालाच माळ घालायचा अगदी निश्चय केला आहेस का?"
" हे आणखी निराळं सांगायला पाहिजे का ? ” रमाबाईंनी सखे. दाश्चर्य व्यक्त केले. ती म्हणाली,
"नटाबरोबर लग्न लावल्यानं पुढं काय परिणाम होईल याचा तूं विचार कर. तुला सुखांत ठेवण्याइतका तो श्रीमंत आहे का ? "
“ नसला तरी काही हरकत नाही. आम्हां दोघांना सुखानं आणि चेनीनं राहता येईल इतके पैसे मजपाशी आहेत. " __“ अस्सं ! तर मग त्याला शेवटी तुजवरच अवलंबून राहावं लाग णार आहे. पण काय ग, तो हल्ली बरेच दिवस या बाजूला कुठं फिरकला नाही ?"
“ कारण मी त्यांना येऊ नको म्हणून सांगितलं.” नलिनी एकदम उसळून म्हणाली, “कारण तूं त्यांच्याबरोबर इतक्या चमत्कारिक तन्हेनं वागतेस, की तसं सांगणं मला भागच पडलं." ___ " तूं शरयूकडे राहत होतीस तेव्हां तुमच्या भेटीगांठी झाल्या
असतील, नाही ?"
" हो, पुष्कळ वेळा त्यांची-आमची भेट झाली होती."
“ अस्सं का?" रमाबाईने तुसड्या स्वरांत विचारले, “ मग तुमच्या लग्नाचं केव्हां ठरलं ?
"जेव्हां आमची इच्छा होईल तेव्हां. मधुकरराव नट आहेत-"
" आहेतच ते तसे. ” रमाबाई म्हणाल्या.
" आणि ते किती उत्तम प्रतीचे नट आहेत हे प्रत्येकाला माहित आहेच व लौकरच ते नटवर्य म्हणन प्रसिद्धीला येतील अशी माझी खात्री आहे." ___ " पण सध्या तरी काही तशी चिन्हं दिसत नाहीत व ज्या कंप नींत तो आहे त्या कंपनीच्या नव्या खेळांत त्याला दुय्यम प्रतीचं काम आहे." ___ " छट ! मुळीच नाही. उलट मुख्य कॉमिक पार्ट ' त्यांना संभाळावा लागतो.” नलिनी रागाने म्हणाली, " तूं मला उगाच चिडवून कां बरं त्रास देतेस ?"
“तूंच चिडत आहेस. मी काही तुला चिडवीत नाही. जे जे काही मला खरं दिसतं तेंच सर्व मी तुझ्या नजरेला आणून देत आहे. पण त्याची तुला चीड येते, तेव्हां माझा काय बरं अपराध ?” ___ " मी काही तुझ्याबरोबर वाहेरगांवीं येणार नाही. कारण तिथं आमचा सर्व काळ भांडणांतच जाईल. शांतता म्हणून राहणार नाही.'
“भलतंच काही तरी ! नले, मी कधी तरी भांडते का? तरी पण तुझी इच्छाच असली तर तसं का होईना. मग काय, तूं येणार नाही हे अगदी ठरलंच तर ?”
"होय. मी शरयूबरोबर राहीन आपली." _ " तुला कुठूनही सुख होवो म्हणजे झालं. पण ध्यानात ठेव की, जर तूं त्या नटवर्याबरोवर लग्न केलंस तर मी काही तुझ्या लग्नाला येणार नाही हो.” ___ " मी तुला मुळी अशानं बोलावीन तर की नाही ?" असे म्हणून नलिनी रागाने उठली व खोलीबाहेर निघून गेली. आपल्या तोंडून यापेक्षा अधिक काही तरी बाहेर पडेल अशी तिला भीति वाटू लागली. रमाबाई जे काही शेवटी बोलली त्या वाक्याने तिच्या अंगाची नुसती लाही झाली. ती खोलीबाहेर पडून एकदम आपल्याच खोलीत जाणार होती. परंतु सफेत दिवाणखान्यांत कोणी बोलत आहे असा तिला
भास झाल्यावरून तिने आंत सहज डोकावून पाहिले तो तिला मधुकर व गजाननराव बोलत बसलेले आहेत असे आढळून येतांच अत्यंत आश्चर्य वाटले. नलिनीला पाहतांच उठून पुढे येऊन मधुकर म्हणाला,
" या बाईसाहेब ! तूं कुठं दिसतेस का पाहातच होतो. " " मग मला बोलावणं कां पाठवलं नाही?” नलिनीने विचारले.
" मीच त्यांना तसं न करण्याबद्दल सांगितलं.” गजाननराव मध्येच उतावीळपणे म्हणाले, " तुझ्याबरोबर रमा होती ना ? मग तुला बोलावतांच तीही तुझ्याबरोबर आली असती व तिचं तें पुढं होणारं 'लेक्चर' माझ्यानं काही ऐकवलं नसतं आणि ह्या खुनापासून तर माझं मन अगदी चमत्कारिक वनलं आहे." ते आपल्या कपाळावरील धर्मबिंदु पुसत पुढे म्हणाले. ___ " आपल्याला त्याविषयी पुढं कांहीं कळलं आहे का?" मधुकरा कडे चौकस दृष्टीने पाहत तिने विचारले. _ " होय.” त्याने ताबडतोब उत्तर दिले, “ मी ह्याचपूर्वी तुला भेटण्यासाठी आलो असतो; पण तूं नको म्हणन सांगितल्यामुळं अर्थातच माझा नाइलाज होता." __ "तुम्ही इथं बरेच दिवस आला नाही. " गजाननराव मधुकराकडे 'पाहून म्हणाले.
" होय, तुम्ही चौपाटीवर गेल्यापासून मी इथं आलो नाही. पण नलीला मात्र मी भवान्याच्या घरी भेटत असे. पण नलिनी, तूं जात
आहेस का ग?" ___ आतापर्यत नलिनीची दृष्टि एकसारखी मधुकराच्या चेहऱ्यावर खिळून राहिली होती. तो बोलत होता त्या वेळी तिचे मुखकमल आरक्त झालेले होते. त्यावर पूर्ण फुललेल्या गुलाबाप्रमाणे गुलाबी छटा चढ लेली होती. मधुकराने तिला हा प्रश्न विचारला तेव्हां ती तेथून जाण्या. च्याच विचारांत होती. ती म्हणाली, __ " माझं थोडं काम असल्यामुळं मला गेलंच पाहिजे. मी आपणास पुन्हा भेटेन."
" केव्हां ? " तिला दरवाजांत थांबवून मधुकराने विचारले.
" मी आपल्याला केव्हां ते कळवीन,” असें म्हणून नलिनी तेथून निघून गेली व तिच्या घाईचा हेतु न समजल्यामुळे मधुकर आश्चर्ययुक्त
मुद्रा धारण करून गजाननरावांजवळ पुन्हा येऊन बसला. ___ " नलिनी असं काय बरं म्हणाली ? तिचं झालं आहे तरी काय ?" त्याने विचारले. हा प्रश्न विचारते वेळी मधुकराचा चेहरा थोडा भीतिग्रस्त
आलेला दिसत होता. ___ गजाननरावांची मुद्रासुद्धा कावरीबावरी झालेली दिसत होती. परंतु त्यांच्या बंगल्यांत घडलेल्या खुनाच्या कल्पनेने तसे होणे साह जिक होते.
" मला वाटतं, रमा तुमच्याविरुद्ध काही तरी तिच्याजवळ बोलली असावी.” ते म्हणाले, " मधुकर, तुम्ही नलिनीशी लौकर लग्न करून तिला आमच्या कुटुंबाच्या त्रासापासून लवकर मुक्त कराल तर बरं होईल असं मला वाटतं. गरीब विचारी नलिनी ! तिचं सध्या दैव फिरलं असावं."
" मी तमच्या म्हणण्याप्रमाणं ताबडतोब केलं असतं; पण सध्या मला तसं करतां येणं शक्य नाही." मधुकर अगदी गळन गेल्याप्रमाणे होऊन म्हणाला, “कारण ह्या नव्या खेळावर व्हावं तसं उत्पन्न होत नाही व कंपनीही यथातथाच चालली असल्यामुळं लौकरच ती मला मोडावी लागेल असं वाटतं.”
“पण नलिनीजवळ पैसा आहे की-" "पण माझ्या पत्नीच्या धनावर उपजीविका करणं मला मुळीच आवडत नाही. ज्या वेळी मला माझ्या स्वतःच्या पैशानं तिला सुखांत टेवता येईल त्याच वेळी मी तिच्याशी लग्न करणार आहे."
गजाननरावांनाही थोडीशी शरम वाटली; ते थोडे स्मित करीत म्हणाले,
" पण तुम्ही सांगतां त्यावरून तुमची स्थिति लवकरच सुधारेल असं दिसत नाही."
" तसंही काही म्हणता येणार नाही; अशा गोष्टी पूर्वी अजमा वता येत नाहीत. कदाचित मी लवकर श्रीमंतही होईन." ___“खरं की काय ! congratulations !" गजाननराव आनंदित होऊन म्हणाले, "कुणा नातलगाकडून लग्गा साधणार वाटतं?" ___ “बहुतेक तसंच;" मधुकर होकारार्थी मान हालवन म्हणाला, " माझा एक मावसभाऊ आहे; त्याचं नांव किनखापे असं आहे."
हे नांव ऐकताच मोठ्या आनंदाने ऐकत असलेले गजाननराव आपल्या जागेवरून दचकून उठून म्हणाले, " काय म्हणतां !" __ " किनखाधे या आडनांवाचे एक सद्गहस्थ आहेत. ते माझे मावसबंधु असून नागपरास राहतात. ते फार श्रीमंत आहेत असं ऐकतों. त्यांची संपत्ति मला मिळेल, नाही तर दुसरी एक चलतबहीण आहे तिला मिळेल."
गजाननरावांनी आपली मुद्रा पूर्ववत् धारण करून म्हटले, " होय; ह्या नांवाच्या एका गृहस्थाला मी ओळखतो. तो पक्का बदमाष असून त्यानं मला बरेच वेळां गंडा घातला आहे. त्या वेळी तो नरुण असून त्याची विशेष खूण म्हणजे त्याचे डोळे घारे होते." ___" हा कुणी तरी दुसरा माणूस असेल,” मधुकर म्हणाला, "त्याला मी अद्यापि जरी पाहिलेलं नाही, तरी त्याच्या फोटोवरून तो अशा प्रकारचा मनुष्य असेल असं कांहीं मला वाटत नाही. व तुम्ही म्हणतां त्याचे डोळे घारे आहेत हे तर मुळींच संभवनीय दिसत नाही. सरले विषयी म्हणाल तर तिचे डोळे काळेच आहेत."
“सरला !” गजाननराव उद्गारले, " ही सरला कोण?"
"माझी चुलत बहिण म्हणून आतांच तुम्हाला सांगितलं ना, ती ती. किनखाप्यांची संपत्ति कदाचित तिलासुद्धा मिळेल. ती लोणावळ्याला राहते. पण माझी-तिची काही फारशी ओळखही नाही."
" म्हणजे ! हे तर फार चमत्कारिक !"
"तिचं अस्तित्वसुद्धा मला माहित नव्हतं. थोड्याच दिवसापूर्वी मला हे कळलं." मधुकर म्हणाला, “ आमची एकदा अकस्मात् गांठ पडली
आणि-पण ते सर्व सांगायचं म्हणजे एक मोठं थोरलं बाडच होईल.”
"बरं, ते असो' विषय बदलण्यासाठी गजाननरावांनी विचारले, "त्या खुनाबद्दल तुमचं काय मत आहे ?"
" त्याविषयी मला कांहीसुद्धा विचारूं नका." मधुकर त्या गोष्टीचा अगदीच वीट आल्याचे दाखवून म्हणाला, " मी जेवढं वाचलं व ऐकलं तेवढंच मला माहित आहे व आतां तर मी त्या गोष्टीला अगदी कंटाळून गेलो आहे; पण तमचं तरी मत ऐकू द्या !" __ “तें कांहींच मला सांगता येणार नाही. सर्वच कांहीं मला गट वाटतं. या बंगल्यांत झालेल्या खुनामुळं ह्या बंगल्याला मी तर इतका कंटाळून गेलों आहे की, हा बंगला सोडून मी लवकरच कुठं तरी बाहेर गांवी जाऊन राहायचं योजिलं आहे."
" बाहेरगांवी जाणार ! मग तुमच्या ऑफिसचं काम ?'
ह्या प्रश्नाचे उत्तर गजाननराव देण्यापूर्वीच त्या दिवाणखान्याचा दरवाजा उघडून रमाबाई एकदम आंत आल्या. त्यांच्या हातांत एक वर्तमानपत्र होते. दिवाणखान्यांत मधुकराला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर तिरस्कार दिसू लागला; परंतु ताबडतोब त्यांनी आपला चेहरा बदलून मधुकराकडे स्मित करीत म्हटले, ___ " ओ हो! तुम्हांला इतक्या दिवसांनी पाहून खरोखरच मला फारच आनंद झाला. नलिनी तुम्हांला भेटली का ? मी तिला पाहिजे तर पाठवन देते. तुम्हांला भेटण्यासाठी तिची अगदी धडपड चालली आहे.” ___ " नको, मी तिला भेटलों व आतां इथन निघण्याच्याच विचारांत
मी आहे." __ " अरेच्या !” रमाबाई पूर्वीच्याच वृत्तीने म्हणाली, "असं का?" __ "उं: ! हा विषय पुरे." गजाननराव मध्येच म्हणाले, " पण रमे, एवढथा घाईनं कां आलीस ? झालं काय ते तरी सांगशील
की नाही ? " __ परंतु त्यांच्या भाषणाकडे लक्षच न देता त्यांच्या कपाळास हात लावून ती म्हणाली, " किती गरम लागतं आहे तमचं कपाळ हे! त्या खुनामुळं तुम्हांला बराच त्रास झालेला दिसतो."
" त्याची पुन्हा आठवण काढू नको म्हणून मी तुला सांगितलं होतं ना? " आपल्या कपाळावरील तिचा हात काढीत गजाननराव म्हणाले.
"पण आतां तरी आठवण काढल्याखेरीज गत्यंतरच नाही.” रमा बाई एका खर्चीवर बसून म्हणाली, “ मधुकरराव, जाऊ नका. आमचं कांहीं गुप्त भाषण नव्हे. वर्तमानपत्रांतला हा एक 'पॅरिग्राफ' आहे." ___“ त्यांना काही शोध लागला आहे की काय ?” मधुकराने शांत.
पणे विचारले. ___ " नाही; पण त्यांतल्या गुंतागंतींतला हा एक धागा आहे, असं म्हणायलास हरकत नाही. ही खोली तुम्हाला माहित आहेच की.."
" ही खोली !" दोघांनीही एकदा त्या सफेत दिवाणखान्यासभोवार पाहिले व नंतर त्यांनी आपले डोळे रमाबाईकडे रोखले.
" होय." रमाबाई शांतपणे म्हणाली, “ मी तुम्हाला काही सबंध ‘पॅरा' वाचून दाखवीत नाही; पण त्याचा थोडक्यांत सारांश सांगते. पोलिसखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला नक्तंच एक पत्र आलं असून त्यांत, लोणावळ्याला असलेल्या एका बंगल्यांत या सफेत दिवाण खान्यासारखाच, अगदी असाच, एक सफेत दिवाणखाना आहे, असं कमिशनरला कळविलेलं आहे."
“ लोणावळ्याला !” मधुकराने आश्चर्यचकित होऊन एकदम विचारलें.
" होय, किनखापे या नांवाचा एक गृहस्थ त्यांत राहतो."
" किनखापे !” गजाननराव साश्चर्य मुद्रेने मधुकराकडे पाहत म्हणाले, " तुम्ही नुक्तंच सांगितलं तेच हे नांव."
" होय." मधुकर म्हणाला, " सरला किनखापे या नांवाची माझी एक मावसबहीण आहे.” ___ असं !” रमाबाई म्हणाल्या, “ मग जिचा ह्या दिवाणखान्यांत खन झाला तीच तर ती नसेल ? गरीब बिचारी !" __ " रमे," गजाननराव एकदम उटून म्हणाले, " तूं म्हणतेस तरी काय?"
" इतकं कांहीं उतावीळ होऊ नये." रमाबाई पूर्वीचीच शांत मुद्रा ठेवून म्हणाल्या, “ह्या घराची-लोणावळं येथील घरांतील-भाडोत्री मिसेस किनखापे कुठं नाहींशी झाली आहे. पोलिसाला आलेल्या पत्रांत त्याचा काही उल्लेख केलेला नाही. पण चौकशीअंती तसा शोध लागला आहे. कदाचित खन झालेली स्त्री तीसुद्धा असू शकेल. तिचा ह्याच बंगल्यांत खून व्हावा हुँच चमत्कारिक दिसतं. पण काय हो," ती गजाननरावांकडे वळून म्हणाली, " हा असा दिवाणखाना तयार करण्याची कल्पना अगदीं तुमची स्वतःचीच आहे का ?”
" होय.” गजाननराव थोडे घोटाळून म्हणाले, “ ही माझी स्वतःचीच कल्पना असून ही किनखापे कोण हे मला मुळीच ठाऊक नाही व तिनं ह्या दिवाखाणन्यासारखाच दिवाणखाना कां तयार केला तेंही मला माहित नाही."
" पण मी ते शोधून काढीन.'' जातां जातां मधुकर म्हणाला व असें म्हणून तो निघून गेला. गेल्यानंतर रमाबाई व गजाननराव एकमे कांच्या तोंडाकडे पाहतच राहिली.