अध्याय पहिला
अध्याय पहिला
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ श्रीपांडुरंगाय नमः ॥
ॐ नमोजी गणराजा ॥ एकदंता चतुर्भुजा ॥ फरशपाणि अधोक्षजा ॥ उभवीं ध्वजा यशाची ॥ १ ॥
ऐसा तूं विघ्नहरुं ॥ ग्रंथारंभीं नमस्कारू ॥ देऊनियां अभयवरुं ॥ नेई परपारु ग्रंथ हा ॥ २ ॥
नमूं आदीजननी ॥ चराचर जियेपासुनी ॥ ते शारदा हंसवाहिनी ॥ ग्रंथारंभीं नमियेली ॥ ३ ॥
नमूं श्रीगुरुरामदास ॥ जो सर्वीसर्वस्व उदास ॥ तयाची धरूनियां कास ॥ ग्रंथ शेवटास जावो हा ॥ ४ ॥
प्रार्थनेचे एक कारण ॥ आयुष्य नसे आपुल्या आधीन ॥ ग्रंथारंभीं लोभ धरून ॥ वदेन म्हणे तो मूर्खंहो ॥ ५ ॥
येथें कर्ता आणि करविता ॥ वक्ता अणि वदविता ॥ सर्वही रघुनाथसत्ता ॥ वृथा अहंता प्राणियाची ॥ ६ ॥
असो आतां हे वार्तां ॥ ग्रंथ तरि हा कोणता ॥ तरी अधिक माहात्म्य ग्रंथा ॥ वंदू आता निर्धारें ॥ ७ ॥
संस्कृत वाणी व्यासोक्त ॥ पद्मपुराणींचें संमत ॥ तयाचा असे हा मतितार्थ ॥ तो असो अवगता श्रोतिया ॥ ८ ॥
एकदा मुनय: सर्वे नैमिषारण्यमागता: ॥ परब्रह्मरतायेच हरिद्वारनिवासिनः ॥ १ ॥
कवण एक अवसराचे संधीं ॥ मिळोनियां ऋषींची मांदी ॥ नेमिषारण्याचिये अवधी ॥ येते झाले सत्वर ॥ ९ ॥
जे महा तपस्वी योगिराज ॥ महानुभाव तेज:पुंज ॥ हरिद्वार-कुरुक्षेत्रज ॥ समुदायेंसीं पातले ॥ १० ॥
शशीसमान शीतळता ॥ भानुसमान तेजाळता ॥ तयाचिया आशीर्वादे तत्वता ॥ रंक तो प्रभुत्वता पावे पै ॥ ११ ॥
ऐसे सर्वही ऋषीश्वर ॥ गालव आणि शुकेंद्र ॥ नामें सांगतां अपार ॥ होईल प्रसर ग्रंथातें ॥ १२ ॥
समग्र ऋषी मिळोन ॥ सूताप्रती करिती प्रश्न ॥ कलियुगीं अन्नगतप्राण ॥ परमार्थसाधन केवि घडे ॥ १३ ॥
त्याहीवरी दरिद्र व्यथा ॥ शरीरीं जडे रोग अवस्था ॥ नित्य नामस्मरण करितां ॥ अवकाश कदा नसे पै ॥१ ४ ॥
जरी कीजे तीर्थाटण ॥ व्याधिग्रस्त शरीर क्षीण ॥ संसार धंदा करितां जाण ॥ अवकाश कदां नसे पै ॥ १५ ॥
शक्तीविण सर्वथा ॥ न जाववे तीर्थपंथा ॥ द्रव्यें जावें जरि तत्वता ॥ तरि दरिद्रव्यथा अपार ॥ १६ ॥
स्वगृही करावें धर्मदान ॥ तरि द्रव्य पाहिजे तयालागुन ॥ अथवा भगवंतीं होता अनन्य ॥ तरि गतायुषी प्राणी हा ॥ १७ ॥
ऐसियासी कवण उपाय ॥ प्राणिया कैसा तरणोपाय ॥ अमोल्य हा नरदेह ॥ केवीं पावे परलोकातें ॥ १८ ॥
अनंत पापाचिया राशी ॥ दरिद्रें घडती प्राणियासी । मग पावे रवरव नरकासी ॥ यमयातनेसी अपार ॥ १९ ॥
नानाप्रकारें यमयातना ॥ शास्त्रीं बोलिले प्रकार नाना ॥ ते जाचणी भोगिता जना ॥ उसंत जाणा नसेची ॥ २० ॥
ऐसिया प्राणियासी ॥ कैसेनि करावें परमार्थासी ॥ तरि कृपा करून आम्हांसी ॥ कांहीं उपाय सांगावें ॥ २१ ॥
ऐसें समस्तांचें प्रश्नाक्षर ॥ ऐकुनियां सविस्तर ॥ बोलता झाला उत्तर ॥ व्यासशिष्य सूत पै ॥ २२ ॥
श्रृणुध्वमृषयः सर्वे कथा पौराणिकीं शुभां ॥ लक्ष्मीमाधवसंवादं श्रृण्वतां पापनाशनं ॥ २ ॥
सूत वदे तेव्हां वदनमौळी ॥ ऐकाहो सर्व ऋषीमंडळी ॥ एकदा श्री माधव जवळी ॥ प्रार्थिती जाली कमळजा ॥ २३ ॥
तुम्हा ऐसाची प्रश्न ॥ लक्ष्मी करि आपण ॥ हे माधव जनार्दन ॥ ऐका वचन पै माझें ॥ २४ ॥
श्रीलक्ष्मी उवाच ॥ देवदेव जगन्नाथ भुक्तिमुक्तिप्रदायक ॥ कथयस्व प्रसादेन संशयोमे ह्रदिस्थितः ॥ ३ ॥
मुनीश्वराः प्रवदन्ति कृष्णद्वैपायनादयः ॥ अदत्तं नैवलभ्येत दत्तंचैवोपतिष्ठति ॥ ४ ॥
यथा वंध्या गृहस्यस्थ पतिवंशविनाशिनी ॥ तथा दानविहीनंतु जंतोर्जन्मनिरर्थकं ॥ ५ ॥
हे भगवान् देवदेवेश ॥ तुम्ही तो सर्व देवांचे ईश ॥ आणि प्राणिमात्रांचे पाळणाधीश ॥ सर्वत्रांचे स्वामीयां ॥२५॥
तरि कृपाळुत्वें करूनी ॥ निवेदावें मजलागुनी ॥ जे चराचर जीव प्राणी ॥ केवी तरती भवार्णवीं ॥ २६ ॥
जैसी पतिवीण रमणी ॥ न शोभे कदां दीन यामिनी ॥ तेवी अदत्त जालिया प्राणी ॥ न शोभे दानीं कदा तो ॥ २७ ॥
तैसे दानधर्माविण जे नर ॥ ते द्विपदाचे केवळ खर ॥ तरि अल्प वेंचुन पुण्य अपार ॥ कवण असे स्वामियां ॥ २८ ॥
कवण दान कवण तप ॥ हें कृपा करूनियां अल्प ॥ मज निवेदावें स्वल्पस्वल्प ॥ तरणोपाय जगातें ॥ २९ ॥
ऐसा प्रश्न समुद्रतरण्याचा ॥ आकर्णुनी बोलतसे वाचा ॥ स्वामी तो दीन जनाचा ॥ केशवराज सत्य पै ॥ ३० ॥
तथापि कथयंतीह दैवज्ञाः शास्रकोविदाः ॥ मलिम्लुचेतुसं प्राप्ते क्रियाः सर्वाः परित्यजेत् ॥ ६ ॥
युक्तायुक्तं यदा पूर्वाचार्येर्यथोदितं ॥ देवकार्यं पितृकार्य तीर्थयात्राव्रतादिकं ॥ ७ ॥
क्षौरंमौजीविवाहंच व्रतंकाम्योपवासिकं ॥ मलिम्लुचेसदात्याज्यं गृहस्थैश्च विशेषत: ॥ ८ ॥
ऐकेंहो क्षीराब्धितनये ॥ दुर्लभ तो नरदेह ॥ येथें सहजासहज घडती अपाय ॥ सायास नसतां अनायासें ॥ ३१ ॥
ते कवण म्हणसी तरि ऐकें ॥ युक्तायुक्त प्रकार देखें ॥ शास्त्रीं बोलिले अनेके ॥ ते अवश्यक घडतीकीं ॥ ३२ ॥
स्नानसंध्या देवतार्चन ॥ कुळधर्म वर्णाश्रम जाण ॥ पर्वकाळ न घडे दान ॥ मग तीर्थाभ्रमण कायसें ॥ ३३ ॥
शरीरीं भरतां व्याधी ॥ मग कैचे स्नान देवतार्चन विधी ॥ अथवा पर्वकाळ कुळधर्मसंधी ॥ द्रव्याविण सिद्धी केवि होय ॥ ३४ ॥
किंवा अकाळी घडे मौंजी लग्न ॥ द्रव्य नाहीं म्हणवून ॥ शास्त्रीं निर्धार केला जाण ॥ अष्ट वर्षांचा निर्धारें ॥ ३५ ॥
अष्ट वर्षी चौलोपनयन ॥ तैसेंच कन्येचें कन्यादान ॥ हे समयासीं न घडती जाण ॥ म्हणोनि अकाळ बोलिजे ॥ ३६ ॥
कां आलिया पितृदिवस ॥ कांता जालिया अस्पर्श ॥ म्हणोनि अकाळीं तो दिवस ॥ शास्त्राज्ञेनें ऐसें बोलती ॥ ३७ ॥
अथवा व्याधिग्रस्त जालें शरीर ॥ मग राहिला सहजची आचार ॥ तैसेंच प्राशन करणें लागे नीर ॥ अन्नही परिकर शय्येवरी ॥ ३८ ॥
इतुकिया दोषांच्या मळासी ॥ संचय होतांचि समरसी ॥ तयाते म्हणती मलमासी ॥ घटका पळ दिवस गणितां ॥ ३९ ॥
नक्षत्र आणि मासतिथी ॥ हे कवणें अर्थे उणे होती ॥ तरि ऐसिया दोषाचि होतां भरती ॥ मग ते पावती क्षयाते ॥ ४० ॥
म्हणोनी तिसरे वरुषीं जाण ॥ येक मास अधिक तेणें गुण ॥ मग ते होय म्हणोनि नामाभिधान ॥ मलमास जाण बोलिजे ॥ ४१ ॥
तरि ऐसिया दोषांचें क्षाळण ॥ होईल तेचीं ऐके साधन ॥ मल मासाचें जें अधिष्ठान ॥ तें स्वयें मीच जाण वल्लभे ॥ ४२ ॥
जेवी त्रिगुण निरसीलियावरी ॥ वस्तु उरे साक्षात्कारीं ॥ हें खूण जाणावी चतुरीं ॥ संत सेवा धरिजे ॥ ४३ ॥
तैसें तीन संवत्सर गेलियां ॥ उरे मास ज्योतिर्मया ॥ नाम धरिती जाणती तया॥ केशवराया म्हणोनी ॥४४॥
केला सर्व कर्माचा नाश ॥ उरला नाहीं लवलेश ॥ म्हणोनि बोलिजे केश ॥ दोषग्रासक जो मी ॥ ४५ ॥
तया मासाचें महिमान ॥ ऐकें होउनी सावधान ॥ मलमास प्राप्त झालिया जाण ॥ मांगल्य विधान लोपती ॥ ४६ ॥
न होती विवाह कार्य ॥ न होती उपनयन आचार्य ॥ तीर्थाटण पर्याय ॥ तोही न घडे जाण पै ॥ ४७ ॥
तरी ऐसियासी काय कीजे ॥ कवण पुण्यें दोषक्षाळीजे ॥ तरि ऐकें कमळजे ॥ जें सुगम भूमंडळी ॥ ४८ ॥
असंक्रांतो यदा मासः प्राप्यतेमानवैः प्रिये ॥ महोत्सवस्तदा कार्य आत्मनोहितकांक्षिभिः ॥ ९ ॥
संक्रांतीहीन जो मास ॥ म्हणोनियां मलमास ॥ येथें जया वाटे हव्यास ॥ परलोकीचा पै ॥ ४९ ॥
तयानें काय आचरावें ॥ स्त्री अथवा पुरुष भावें ॥ पुण्यक्रिया स्वभावें ॥ आचरण पै कीजे ॥ ५० ॥
ऐकूनी ऐसें उत्तर ॥ लक्ष्मी बोले प्रत्युत्तर ॥ कवण विधी कवण प्रकार ॥ कृपा करूनि सांगिजे ॥ ५१ ॥
लक्ष्मी उवाच ॥ यदि नाथत्वया प्रोक्तामहमेव प्रदायकः ॥ उद्यापनंच विधिवदितिहाससमन्वितं ॥ १० ॥
हे नाथ कृपाळुवा ॥ यथानुक्रमें निवेदावा ॥ उद्यापन विधी बरवा ॥ जें पूर्वी केशवा पुसिलें ॥ ५२ ॥
मग बोलों आदरिलें ॥ देवें परम हास्य केलें ॥ म्हणे अद्यापी नाहीं गेलें ॥ अज्ञान पै तुझें ॥ ५३ ॥
ब्राह्मणोस्य मुखमासीत् ॥ ऐसी तो श्रुती गर्जत ॥ ते ब्राह्मण मुख माझें निश्चित ॥ हें तूं जाणत अससी कीं ॥ ५४ ॥
तरी ते ब्राह्मण म्हणसी कैसे ॥ सांगतो तू तें जाण ऐसें ॥ वेदत्रयी ज्ञानप्रकाशे ॥ अनारिसें सर्वदां ॥ ५५ ॥
विद्याविनयसंपन्ने ब्राम्हणेगविहस्तिनी शुनिचैवश्वपाकेच पंडिताः समदर्शिनः ॥ ११ ॥
इहीं लक्षणीं जे मंडित ॥ स्नानसंध्याशीळ सदायुक्त ॥ विद्या असोनि अगर्वित ॥ ते प्रिय होत मजलागीं ॥ ५६ ॥
स्वगृहीं जें पचते अन्न ॥ अग्निहोत्र श्रौतस्मार्तजाण ॥ वेदांतरंगींचे ज्ञान ॥ तें प्रिय जाण मजलागीं ॥ ५७ ॥
वेदज्ञ आणि शास्त्रसंपन्न ॥ पंडित आणि विप्र जाण ॥ याज्ञीक अज्ञाईक जाण ॥ ते प्रिय मजलागीं ॥ ५८ ॥
इतुकें असूनि अगर्वित ॥ वोळंगता नाहीं किंचित ॥ समान दृष्टी सर्वातीत ॥ तो प्रिय निश्चित मजलागीं ॥ ५९ ॥
म्हणोनि माझें मुख हे निर्धार ॥ वेदेंचे केला असे साचार ॥ ऐकूनियां ऐसें उत्तर ॥ लक्ष्मी बोलती जाहली ॥ ६० ॥
ऐका विनंती स्वामिनाथा ॥ येवढी पदवी ब्राह्मणा देता ॥ तरी कां फिरती लोलंगता ॥ कवडीसाठी विदेशीं ॥ ६१ ॥
तरि ये विषयींचा संशयो ॥ निरसावा जी संदेहो ॥ तंव बोलेति ये तें माधवो ॥ ऐकें अभिप्रावे पैं याचा ॥ ६२ ॥
कृत त्रेत द्वापार आणि कली ॥ हे निर्माण जाले जिये काळीं ॥ सूर्यकर्णीं उद्भवे येकची वेळीं ॥ तया काळींचा वृत्तांत असे पै ॥ ६३ ॥
चारियुगें निर्माण होतां ॥ मूर्तिमंत उभी राहिलीं तत्वतां ॥ तै तेतीस कोटीसी विधाता ॥ तोही होता जवळीके ॥ ६४ ॥
ते वेळीं युगाचा युगधर्म ॥ चारी वर्णाचा वर्णाश्रम ॥ तयामाजी श्रेष्ठ ब्राह्मण धर्म ॥ तोची नेम अवधारी ॥ ६५ ॥
कृत युगामाझारी ॥ स्नानसंध्यादी कर्मे माध्यानवरी ॥ ब्राह्मणें संपादावी बरवी परी ॥ मग आश्रमा भीतरी पै यावें ॥ ६६ ॥
परी तयांची योगक्षेमचिंता ॥ रायानी करावी व्यवस्था ॥ न मागतां पुरविती पदार्था ॥ कार्य प्रसंगता संपादी ॥ ६७ ॥
ऐसा प्रथमयुगीं धर्म होता ॥ दुसरियाचा ऐक आतां ॥ त्रेता युग प्राप्त होतां ॥ धर्म कोणता अवधारीं ॥ ६८ ॥
एक याम परियंत वरी ॥ नित्य नेम सारावा भूसुरीं ॥ मग जाऊन राजद्वारीं ॥ जोडल्या करीं विनवावें ॥ ६९ ॥
तंव तया प्रभूनें जाणा ॥ पुरविजें ब्राह्मणाची वासना ॥ द्वितीय युगींचीही रचना ॥ कर्माचरण अंतरलें ॥ ७० ॥
आतां तिसरें द्वापार ॥ ऐकें तयाचा निर्धार ॥ यज्ञादी कर्मे करिती राजेश्वर ॥ तेथे जाती न पाचारितां ॥ ७१ ॥
धन आशेसाठीं बापुडीं ॥ हिंडताती देशोधडी ॥ तेथें स्वधर्मातें बापुडीं ॥ अंतरलीं अनायासें ॥ ७२ ॥
कैची संध्या कैचे स्नान ॥ अवघें द्रव्याचेंच ध्यान ॥ म्हणोन हिंडती रानोरान ॥ कर्मभोगें आपुलिया ॥ ७३ ॥
ऐसें चतुर्युगाचें विवरण ॥ तुज केले म्या कथन तरी ब्राम्हणांचा अन्याय कवण ॥ पाहे शोधुन अंतरी ॥ ७४ ॥
केला अवतार तो मीच जाण ॥ म्हणोन ब्राम्हणोस्यमुख म्हणोन ॥ या लागीं दोष न ठेवून ॥ निर्दोषी जाण भूसुर ॥ ७५ ॥
जैसें स्वर्गीं सुरवर ॥ तैसें पृथ्वीवरी भूसुर ॥ होतो माझाच अवतार ॥ म्हणोन अगोदर पूजावे ॥ ७६ ॥
म्हणोन जया वाटे पुनित व्हावे ॥ तेणें हे व्रत करावें बरवें ॥ देव ब्राम्हण पूजावे ॥ ऐक बरवें परी कैसी ॥ ७७ ॥
प्रात:काळीं उठोनियां ॥ नित्य नेमादिकाक्रिया ॥ सारूनियां स्नानविधी बरविया ॥ मूर्ती पूजाव्या देवतार्चनीं ॥ ७८ ॥
उपरी सपत्निक ब्राम्हणातें । पाचारिजे भावार्थे ॥ आसन देउनि तयातें ॥ पूजाविधानातें पैं कीजे ॥ ७९ ॥
अर्घ्यपाद्यादि पूजा बरवी ॥ चंदन सुगंधी पुष्पें आणावी ॥ तेणें विधी समर्पावी ॥ पूजा मजप्रीत्यर्थ ॥ ८० ॥
मग नाना प्रकारें मिष्टान्न ॥ अपूपलाडू पक्वान्न ॥ क्षीरखांड पायसान्न ॥ करावी निर्माण तयालागी ॥ ८१ ॥
नाना प्रकारें चित्रविचित्र ॥ शाखा निर्माव्या सुपवित्र ॥ कथिकवटकादी यंत्र ॥ दधी मिश्रित करावे ॥ ८२ ॥
अनेक प्रकारची रायतीं ॥ भावें करावी तयाप्रती ॥ दध्योदन भोजनांतीं ॥ तयाप्रति समर्पावे ॥ ८३ ॥
ऐसें षड्रस मिष्टान्न ॥ आकंठ घालावें भोजन ॥ येणें करितां मी जनार्दन ॥ संतुष्ट होय तयावरी ॥ ८४ ॥
अर्घ्यदद्यात्सपत्नीकः प्रह्रष्टेनांतरात्मना ॥ मंत्रेणानेन देवेशि ब्राह्मणैः सहमांस्मरन् ॥ १२ ॥
अर्चयित्वार्ध्यदानेन ब्राह्मणा पूजयेत्ततः ॥ सपत्नीकान् शुचीन् शांतन्मधुचूर्णैः सभोजनैः ॥ १३ ॥
स्मर्तव्यो द्विजरूपेण तत्पत्नीत्वामनुस्मरन् ॥ परिधाय यथा शक्त्या वस्त्रालंकारचंदनैः ॥ १४ ॥
भोजनें झालियावरी ॥ यथाशक्त्या वस्त्रें अळंकार बरी ॥ मदर्पण बरवियापरी ॥ तया करीं अर्पावें ॥ ८५ ॥
मग घृतपक्व पांच पक्वान्नें करून ॥ फल तांबूल दक्षिणा दान ॥ येणें करूनी वायनदान ॥ द्यावें जाण तयासी ॥ ८६ ॥
एला लवंगा जायफळ ॥ पत्रीसहित त्रयोदशगुणी तांबूल ॥ अर्पुनी घालीजे माळ ॥ गळां सुगंध पुष्पाची ॥ ८७ ॥
ऐसें पूजन करून बरवें ॥ तयांचे आशीर्वाद घ्यावे ॥ लक्ष्मीनारायण जाणूनि नमस्कारावे ॥ मग बोळवावे स्वआश्रमा ॥ ८८ ॥
ऐसें व्रत एक मासवरी ॥ करावे सहपरिवारीं ॥ आपण नक्त करावें अस्तमानावरी ॥ मग भोजनपरीसारावी ॥ ८९ ॥
ऐसें करितां व्रताचरण ॥ होय दोष मळाचें क्षाळण ॥ मग शुचिस्मंत होऊन ॥ पावे सदन माझें तो ॥ ९० ॥
ऐसा इतिहास बरवा जाण ॥ लक्ष्मीप्रती श्रीनारायण ॥ स्वमुखें श्रुत करी आपण ॥ तेंची कथन कथिलेसे ॥ ९१ ॥
प्राकृत भाषा बरवी ॥ तुम्हांतें अर्पिली आवघी ॥ संशय न धरा जीवी ॥ पुराणीं पाहावी प्रचीत ॥ ९२ ॥
ऐसा प्रथमोध्याय बरवा ॥ तुजप्रती पावो माधवा ॥ येथुनी कथाभाग अवघा ॥ अवधरावा पुढें पै ॥ ९३ ॥
करितां ऐसे व्रत ॥ ना दरिद्र ना वैधव्य अपमृत्य ॥ यदर्थी श्लोकाचा गुह्यार्थ ॥ स्वयें भगवंत बोलिलासे ॥ ९४ ॥
मलमासव्रतं नारीया करोति समुद्रजे ॥ न वैधव्यं न दारिद्र्यं पुत्रशोकः कदाचन ॥ १५ ॥
इतिश्री अधिक माहात्म्य ॥ पद्म पुराणींचें संमत ॥ मनोहरसुत विरचित ॥ प्रथमोऽध्याय गोड हा ॥ ९५ ॥
॥ इति प्रथमोध्यायः ॥