Android app on Google Play

 

बोलीभाषा-वैभव मराठीचे!

 माझ्या मराठीची बोलू कवतुके

परि अमृतातेही पैजा जिंके!


ज्ञानभाषा मराठी किती समृद्ध आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकताच नाही,पण याच मराठीचे वैभव असलेली बोलीभाषा याबद्दल आवर्जून लिहावे वाटले म्हणून हा छोटासा प्रयत्न!


काही लोक अतिशय संकुचित विचारांचे असतात. त्यांना असं वाटत की ते जे बोलतात तेच शुद्ध मराठी बाकी इतर बोलीभाषा म्हणजे,अशुद्ध अडाणी,मागास भाषा! आशा संकुचित विचारांच्या लोकांना काय बोलायचं!

विश्वाचा आकार केवढा तर ज्याच्या त्याच्या मेंदू एवढा! यांचे विचार हे त्यांच्या मेंदू एवढेच मर्यादित,संकुचित आहेत असंच म्हणावं लागेल.

मुळात भाषा ही कधीच शुद्ध अशुद्ध नसते! फक्त आपण एका विशिष्ट भाषेला प्रमाण मानून इतर भाषांशी तुलना करत असतो. भाषा ही संवाद साधण्यासाठी,आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी असते आणि जी व्यक्ती मराठी लिहू शकते, बोलू  शकते,शाळेत मराठी शिकते,जीची मातृभाषा मराठी आहे ती प्रत्येक व्यक्ती ही निश्चितच हे संकुचित विचार सरणीचे लोक जिला शुद्ध भाषा म्हणतात ती बोलू शकतात पण या अशा बोलण्यातून आपल्या खऱ्या भावना व्यक्त होत नसतात ते उगीचच ओढून ताणून बोलल्यासरखे वाटते. 'लय भारी हाय' मध्ये जी भावना आहे ती उगीचच ओढून ताणून बोलण्यात नसते!


मी मान्य करतो सुसूत्रता येण्यासाठी व इतर काही कारणास्तव औपचारिक तसेच कार्यलयीन कामकाज या ठिकाणी प्रमाण भाषेत बोलावे!

पण इतर ठिकाणी समाजात वावरताना उगीचच सर्वांनी तसेच बोलावे हा निव्वळ मूर्खपणा वाटतो.

सर्वच जण एकसारखे बोलू लागले तर मग ते विविधतेतलं सौंदर्य निघून जाईल. मग इतर बोलीभाषा कशा टिकणार भाषा कशा?


मला माझ्या बोलीभाषेचा खूप अभिमान वाटतो. अनेकवेळा आपण कुठे बाहेर गेलो तर आपल्या बोलण्यावरून आपलं गाव कोणतं हे सहज ओळखलं जातं, त्यातूनच मग आपल्या भागातील लोक भेटतात व एक वेगळीच आपुलकी निर्माण होत असते.


मी स्वतः जिथे जाईल तिथे माझ्या गावच्या ३२शिराळा (सांगली) बोलीभाषेत व्यक्त होत असतो आणि सध्या शिक्षणानिमित्त पनवेल रायगड जिल्ह्यात असल्यामुळे माझ्या बोलीभाषे सोबत आगरी बोलीभाषेत आवर्जून बोलायचा प्रयत्न करतो आगरी भाषेतील काही शब्द आपसूकच तोंडात येतात.

बोलीभाषा या खऱ्या अर्थाने भाषेच आणि तिथल्या संस्कृतीच दर्शन घडवत असतात.


आप्पासाहेब खोत यांची त्यांच्या स्वतःच्या शैलीत बोलीभाषेत कथाकथन केल्यामुळे एवढं मोठं यश मिळवलं आहे.

अण्णाभाऊ साठे यांनी प्रमाण भाषेत केलेल्या लिखाणबरोबर ग्रामीण बोलीभाषेत पण तितक्याच चांगल्या पद्धतीने ग्रामीण बोली भाषेत लिखाण केले आहे.

आज दादूस विनायक माळीने स्वतःच्या  आगरी बोलीभाषेत वेब सिरीज बनवून यु ट्युब वर धुमाकूळ घातला आहे.

भारत गणेशपुरे यांनी देखील आपल्या बोलीभाषेतून आपली बोलीभाषा महाराष्ट्रभर पोहचवली आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत.प्रा नितेश कराळे सर यांनी आपल्या विशिष्ट बोली भाषेत शिकवून यु ट्युब वर आपल्या बोली भाषेला ओळख निर्माण करून दिली आहे.


आपली बोलीभाषा ही आपली ताकद असते. मला माझ्या बोलीभाषेचा सार्थ अभिमान आहे कारण बोलीभाषा याच खऱ्या अर्थाने मराठीचे वैभव आहेत.

तसे एकूण बोलीभाषांची अचूक संख्या सांगता येणार नाही कारण भाषा ही दर कोसावर बदलत असते.

पण मराठीच्या ज्या विशिष्ट बोलीभाषा आहेत त्या जपण्यासाठी प्रत्येकाने  अभिमानाने आपल्या बोली भाषेत व्यक्त झालं पाहिजे.


ज्या लोकांना बोलीभाषेत बोलणे म्हणजे कमी पणाचे वाटते किंवा जे लोक इतरांना बोलीभाषेत बोलतात म्हणून कमी लेखतात अशा लोकांच्या डोळ्यात अंजन घालून सर्वांपर्यंत बोलीभाषेचे महत्व पोहचण्यासाठी जमेल तसा लेख लिहीण्याचा प्रयत्न!


कोल्हापुरी,सातारी,सोलापूरी,आगरी,मालवणी,नागपुरी, वऱ्हाडी,मराठवाडी...

अशा अनेक मराठीच्या बोलीभाषा आहेत.प्रत्येकाने आपल्या बोलीभाषेत व्यक्त व्हायला हवं.औपचारिक ठिकाणी ठीक आहे पण इतरत्र न लाजता आपल्या बोलीभाषेत व्यक्त व्हायला हवं आणि आपल्या बोली भाषेसोबत इतर बोली भाषांचा देखील सन्मान करायला हवा!

कारण बोलीभाषा याचं मराठीचं खर वैभवं आहेत!


आशिष अरुण कर्ले.

#मराठी_बोला_चळवळ

मराठी एकीकरण समिती