गुढीपाडव्याच्या गुढीचे स्वरूप
चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात. स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात.
गुढी उंच बांबूपासून काठी तयार केली जाते. काठी स्वच्छ धुवून, त्या काठीच्या वरच्या टोकाला तांबडे अथवा रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात. काठीला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर (सहसा तांब्या-पितळ्याच्या नाहीतर चांदीचे/कास्याचा) धातूचे भांडे/तांब्या/गडू/फुलपात्र बसवले जाते. गुढी लावायची ती जागा स्वच्छ करून धुवून-पुसून त्यावर रांगोळी काढतात. गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो. तयार केलेली गुढी दारात/उंच गच्चीवर/गॅलरीत लावतात. गुढीची काठी तिथे नीट बांधतात. काठीला गंध, फुले, अक्षता वाहतात. गुढीची पूजा करतात. निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दूध साखरेचा, पेढ्याचा वगैरे नैवेद्य दाखवतात. दुपारी गुढीला गोडा-धोडाचा नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी सूर्यास्ताचे वेळी पुन्हा हळद-कुंकू, फुले वाहून व अक्षता टाकून ही गुढी उतरवण्याची प्रथा आहे. ह्या दिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाचे अभिष्टचिंतनही केले जाते.