Get it on Google Play
Download on the App Store

काठीपूजा

काठीपूजन तसेच उत्सवी काठी ही मानवी इतिहासात विविध समुदायात केली गेलेली एक प्राचीनतम पूजा-परंपरा आहे. 'इव्होल्यूशन ऑफ गॉड' या ग्रंथातील ग्रँट ॲलेन यांच्या नोंदीनुसार सायबेरीयातील 'सामोयीड्स' ते दक्षिण आफ्रिकेतील 'दामारा' या जमातींमध्ये काठीपूजेची परंपरा होती. इस्रायलमधील अशेराह पोल (Asherah pole) या काठी पूजा परंपरा ज्यू धर्माच्या स्थापनेपूर्वीच्या काळात प्रचलित पूजन पद्धती होत्या. युरोपात नॉर्वेजियातील Mære चर्च उत्खननामध्ये काठीपूजेच्या परंपरेचे दाखले मिळालेले दिसतात, युरोपातील मेपोल हा काठी उत्सव ख्रिश्चनपूर्व काळापासून ख्रिश्चन धर्मीय विरोधाचा सामना करीत साजरा करताना दिसतात. पॅसिफिक क्षेत्रात माओरी मिथकातून 'व्हाकापोकोको आतुआ' नावाने शेती-पिकांचा देव रोंगोची पूजा होत आली आहे. कुक बेटांवरील आदिवासी 'आतुआ राकाऊ' नावाने काठीपूजा करतात. चीनच्या युनान प्रांतातील मिआओ आणि अनशूनमधील येलांग संस्कृती, व्हिएतनाम मधीले 'के न्यू', कोरियातील 'जाँगशाँग' आणि 'सोटडे',म्यानमार देशातील 'के होते बो' उत्सव ही जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या ठिकाणी साजऱ्या झालेल्या अथवा होत आलेल्या काठी उत्सवांची अथवा पूजांची उदाहरणे आहेत. अमेरिका खंडात देवक-स्तंभाच्या स्वरूपात प्राचीन काठ्यांचे वा स्तंभांचे जतन केले जाते.

भारतीय उपखंडात नेपाळमध्ये काठी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो, आसाममध्ये काही समुदाय वैशाख महिन्यात 'बास पूजा' साजरी करतात, त्रिपुरा आणि मणिपूर राज्यांत (Mera Wa Yungba) काठी उत्सव परंपरा दिसून येतात; तसेच बलुचिस्तानच्या हिंगलाज देवीस काठी सोबत यात्रेने जाण्याची प्रथा आहे. राजस्थानात गोगाजी मंदिर येथे व मध्यप्रदेशातील निमाड प्रांतात काठी मातेची पूजा आणि काठी नृत्याची परंपरा आहे. महाराष्ट्रात गुढीपाढव्याशिवाय जतरकाठी, काठीकवाडी, नंदीध्वज हे काठी-उत्सव साजरे केले जातात. डॉ. बिद्युत लता रे यांच्या मतानुसार ओरिसा राज्याच्या आदिवासींमध्ये खंबेश्वरी देवीची पूजा हा काठी पूजेचा प्रचलित प्रकार असून खंबेश्वरीची पूजा अर्वाचीन काळात हिंदू धर्मात उत्क्रांत झालेल्या मूर्तिपूजांपेक्षा प्राचीन असावी.