Android app on Google Play

 

जीवनकलेची साधना

 

खरा देव :- क्रमश :
जगाच्या अगदी आरंभापासून दोन ओघ निर्माण झाले आहेत. त्यातील पहिला ओघ सत्य (परब्रम्ह), अविनाशी, निराकार,निर्गुण, केवळ,अचल,साक्षीभूत पुरुष आणि दुसरा ओघ असत्य म्हणजे माया, महततत्व , महधोनी,गुणमयी, नाशवंत, प्रकृती होय .यातील पहिला ओघ जे सत्य (सत) तोच 'खरा देव' आहे. त्याच ख-या देवासबंधी आपण विचार करू व नंतर खोटा देव विचारात घेऊ.
                           ०१. तो खरा देव कोण ? कोठे राहतो ? तो कसा आहे ?
                            ०२. त्याचेकडे आम्ही कसे जावे ?
                            ०३. त्याची आम्ही ध्यान- धारणा, भक्ती कशी करावी ?
                            ०४. आणि जर आम्ही त्याचेकडे गेलो तर त्याची प्राप्ती होईल का नाही ?
हे प्रश्न आपल्या मनात उत्पन्न होतील . तेंव्हा आपण या सर्व प्रश्नांचा क्रमाने विचार करूया :-
                       ०१. आपल्या भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ असलेले अध्यात्म् ज्ञानाची शिकवण देणारे वेद चार आहेत. त्या चारही वेदांची देवाविषयी एकवाक्यता आहे. विश्वीं विश्वम्बर l बोले वेदांताचे  सार  ll     देव विश्वात ओतप्रोत भरलेला आहे. म्हणून, त्या विश्वव्यापी परमेश्वराला चारही वेदांनी 'विश्वंभर' हि संज्ञा दिलेली आहे. आता, शास्त्रे सहा आहेत व त्या सहाही शास्त्रांचा देवाविषयी एकाच सिद्धांत आहे. जगी जगदीश l  ऐसे शास्त्रे वादाती सावकाश ll  तो परमेश्वर जगाच्या सर्व दिशांत वसलेला आहे. आणि म्हणूनच सहा शास्त्रांनी सिद्ध केले, कि जगात 'जगदीश' वसलेला आहे. पुराणे आठरा आहेत व ती आठरा पुराणे परमेश्वराचे व्यापकत्वाबद्दल एकमुखाने बोलतात, व्यापिले हे नारायणे l  ऐशी गर्जती पुराणे ll    
     यावरून, परमेश्वराचे व्यापकत्वाबद्दल वेद, शास्त्रे,पुराणे  या सर्वांचे एकमत आहे. आता, साधुसंतांचे परमेश्वराबद्दल काय मत आहे, ते पाहू. संत म्हणतात, जनी जनार्दन l  ऐसे बोलती वचन  ll  तो परमेश्वर सर्व जनतेत तुडुंब भरलेला आहे. जनता हे जनार्दनाचे सगुण रूप आहे आणि म्हणूनच साधुसंतांनी त्या परमेश्वराला 'जनार्दन' म्हटले आहे. तेंव्हा, विश्वंभर, जगदीश, नारायण व जनार्दन हि सर्व नावे त्या एकाच परमेश्वराची आहेत, हे वरील सिद्धांतावरून सहज सिद्ध होते.
 आता तो, देव कोठे राहतो? तो कसा आहे ? याकडे  पुढील उता-यात पहा
जीवन कलेची साधना या ग्रंथातील उतारा 
सदगुरु समर्थ श्री हंबीर बाबा यांचे द्वारे लिखित