धार्मिक महत्त्व
या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजाही केली जाते. उपोषण, पूजन व जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र ,बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव-पितरांना समर्पून व आप्तेष्टांना देऊन स्वत: सेवन करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात. दुसऱ्या दिवशी प्रात:काळी बळीराजा-लक्ष्मीची पूजा करून व सर्वांना भोजन घालून पारणे करतात.
ब्रह्मपुराणात या व्रताची कृत्ये थोडी निराळी सांगितली आहेत. रस्ते झाडावेत. घरे सुशोभित करावीत. दिवसा उपवास करावा. गृहद्वाराजवळ अग्नी प्रज्वलित करून त्याची पूजा करावी. चंद्राची पूजा करून त्याला दूध व खिरीचा नैवेद्य दाखवावा. भार्येसह रुद्र, स्कंद, नंदीश्वर, ज्यांच्याकडे गायी असतील त्यांनी सुरभी, मेंढे बाळगणाऱ्यांनी वरुण, हत्ती बाळगणाऱ्यानी विनायक व घोडे बाळगणाऱ्यांनी रेवंत व निकुंभ या देवतांची पूजा करावी.
विविध मंदिरांमध्ये कोजागरी पौर्णिमा पूजा- अर्चा करून साजरी केली जाते. लक्ष्मीची उपासना केली जाते.