कोजागरी पौर्णिमा
कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा, ही आश्विन पौर्णिमेला एक हिंदू सण म्हणून साजरी करतात. ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे कोजागरी पौर्णिमा बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये असते. कृषी संस्कृतीत ह्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या पौर्णिमेला माणिकेथारी (मोती तयार करणारी) असेही संबोधिले जाते.
या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते अशी धारणा आहे. कोण जागे आहे याचा मतितार्थ आहे कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहे असे देवी विचारत येते.