विपश्यना प्रशिक्षण वर्गाचे स्वरूप
ज्या व्यक्तीला मन:पूर्वक साधना करण्याची इचछा आहे अशा कोणाही व्यक्तीसाठी हा वर्ग खुला आहे. अशी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असणे अपेक्षित असते. हा वर्ग दहा दिवस कालावधीचा असतो. यामध्ये साधक/साधिकेने दहा दिवस संपूर्ण मौन पाळणे अपेक्षित असते. स्त्री आणि पुरुष यांच्या निवास-भोजन आणि ध्यान कक्ष यांची योजना स्वतंत्र केलेली असते. भोजनात सात्त्विक आहार योजना केलेली असते. या दहा दिवसात अपेयपान, धूम्रपान, मांसाहार वर्ज्य असतो. आपल्या जवळील सर्व बहुमोल सामान आपण वर्गाच्या प्रारंभीच संबंधित केंद्राकडे दहा दिवसांसाठी सुपूर्द करायचे असते. ( आपले सर्व लक्ष हे केवळ ध्यान पद्धतीमध्ये असणे आवश्यक असते.)प्रत्येक वर्गात आचार्य मार्गदर्शन करतात. हे आचार्य ध्यानसत्रांच्या खेरीज नियुक्त वेळात साधकांचे शंका निरसन आणि साधनेतील अडचणी समजून घेणे, त्या सोडविणे यासाठी साहाय्य करतात.
वर्गातील ध्यानसत्रात गोयंका गुरुजी यांच्या आवाजातील ध्यानाच्या सूचना देत असलेल्या ध्वनिफिती लावल्या जातात, त्यात दिलेल्या सूचना ऐकून व समजून घेऊन साधकाने ध्यानपद्धतीचा सराव करायचा असतो.सुत पिटक या बौद्ध ग्रंथातील निवडक सूचनांचे पठण या वर्गात साधकांना ऐकविले जाते. यातील विचार हे साधकाच्या ध्यान पद्धती सरावाला पोषक असे असतात.
या प्रक्रियेत साधकाने स्वतः ही उपासनापद्धती आचरून तिचा अनुभव घ्यावा असे गोयंका गुरुजी सांगत असत.विपश्यना उपासना वर्गाच्या दहा दिवसांच्या कालावधीत दिली जाणारी श्री. गोयंका यांची व्याख्याने/प्रवचने ही या वर्गाचा महत्त्वाचा भाग आहेत. साधकाने घेतलेली अनुभूती आणि प्रवचनातून मार्गदर्शन असे या वर्गाचे स्वरूप असते.
ध्यान प्रक्रिया शिकताना पहिल्या साडेतीन दिवसात साधक केवळ मानसिक स्थैर्य आणि एकाग्रता मिळण्यासाठी सराव करतात. ही एकाग्रता साध्य करण्याचा प्रयत्न केल्यावर चौथ्या दिवशी प्रत्यक्ष विपश्यना ध्यान पद्धती शिकविली जाते व टप्प्याटप्प्याने तिची प्रगत तंत्रे शिकविली जातात व त्यांचा सराव करण्यासाठी साधकाला वेळ दिला जातो.