बक ब्रह्माचे गर्वहरण
एकदा भगवान बुद्ध उकट्ठ मधील सुभगवनामध्ये विहार करीत असताना बक नावाच्या ब्रह्माला दुष्ट दृष्टी उत्पन्न झाली, तो समजु लागला कि मी ज्या लोकात (ब्रह्मलोकात) राहतो आहे तो नित्य, ध्रुव आणि शाश्वत आहे, मी अमर आहे असे तो स्वतःला समजु लागला होता. तेव्हा भगवान बुद्धांनी बक ब्रह्माचे मन ओळखुन ते ब्रह्मलोकात गेले आणि बक ब्रह्माला म्हणाले,
हे ब्रह्मा, तु अज्ञानाच्या घोर अरण्यामध्ये विहार करतो आहेस. जेव्हा अनित्याला नित्य म्हणतोस, अध्रुवला ध्रुव, अशाश्वताला शाश्वत ; ब्रह्मलोकापासुन श्रेष्ठ शांती (निर्वाण) असुन सुद्धा तु म्हणतो आहेस कि यापेक्षा श्रेष्ठ शांती नाही.
बकब्रह्मा म्हणाला : हे श्रमण गौतमा, आम्ही (ब्रह्मा) आपल्या पुण्यकर्माने जगावर राज्य करत आहोत. ब्रह्मलोकात उत्पन्न होणे हीच दुःखापासुन मुक्ती आहे.
भगवान म्हणाला : हे ब्रह्मा तु ज्या आयुष्याला मोठे समजत आहेस ते आयुष्य सुद्धा थोडेच आहे, शेकडो, हजारो वर्षांच्या तुझ्या आयुष्याला मी जाणतो. मी अनंतदर्शी भगवान आहे. वेदनेच्या पलीकडे गेलो आहे.
हे ब्रह्मा.. मी तुझ्या गतीच्या प्रभावाला जाणतो, महान ऋद्धीबल असलेला तु महाशक्तीशाली आहेस... परंतु दुसऱ्या लोकसमुहातील असे लोक आहेत ज्यांना तु जाणत नाहीस, त्यांना तु पाहु शकत नाहीस, परंतु मी त्यांना पाहतो, मी त्यांना जाणतो.
तु आभस्सर नावाच्या लोकातुन येथे उत्पन्न झाला आहेस, तो खुप लांब प्रवास असल्याने तुला त्याची स्मृती नाही., परंतु मी त्याला जाणतो, मी त्याला पाहतो. यापुर्वीही तु सुभकिण्ह, वेहप्पाल, अभिभु नावाच्या लोकांमधुन प्रवास केला आहेस. परंतु तु त्याला जाणत नाहीस. परंतु मी जाणतो.
ब्रह्मा! पृथ्वी, जल, वायू, अग्नी आदींना त्यांच्या योग्य स्वरुपात जाणले, मी जगाच्या परम सत्याला, निर्वाणाला जाणले, याद्वारे ज्ञानामध्ये मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हे सर्व ऐकुन बक ब्रह्मा भगवान बुद्धांची चेष्टा करण्याचा प्रयत्न करु लागला परंतु तो त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकला नाही.
बकब्रह्मा म्हणाला : माझे पहिले शील आणि व्रत काय होते..?
भगवान म्हणाले,
• झोपेतुन उठल्याप्रमाणे मला आठवते कि तु पुष्कळ तहानलेल्यांची तहान भागवली आहेस.
• झोपेतुन उठल्याप्रमाणे मला आठवते कि तु गंगेच्या प्रवाहातुन वाहत जाणार्या माणसाला तु वाचविलेस.
• झोपेतुन उठल्याप्रमाणे मला आठवते कि तु गंगेच्या प्रवाहात नावेला पकडलेल्या मोठ्या सर्पापासुन तु सोडविलेस.
• झोपेतुन उठल्याप्रमाणे मला आठवते कि तु मी तुझा कप्प नावाचा शिष्य होतो, ज्याला तु बुद्धीमान समजलेस.
हे सर्व ऐकुन अचंबीत झालेला बकब्रह्मा म्हणाला, खरोखरच भगवान आपण माझ्या आयुष्याला जाणता, त्याचप्रमाणे इतर गोष्टींना सुद्धा जाणता. आपल्या दैदिप्यमान तेजाने संपुर्ण ब्रह्मलोक प्रकाशमान झाले आहे.
दुग्गाहदिठ्टिभुजगेन सुदठ्टहत्थं, ब्रम्ह विसुद्धि जुतिमिद्धि बकाभिधानं । ञाणागदेन विधिना जितवा मुनिन्दो, तं तेजसा भवतु ते जयमंगलानि
ज्या मुनींद्राने, भयंकर मिथ्या दृष्टिरुप सापाने दंश केलेल्या, विशुद्धज्योती आणि ॠद्धिशक्ति संपन्न बक नामक ब्रह्मज्ञान्याला ज्ञानरुपी औषध देऊन जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो...
एतापि बुद्ध जयमंगल अठ्ट गाथा, यो वाचको दिनदिने सरते मतन्दी हित्वान नेका विविधानि चुपद्दवानि, मोक्खं सुंखं अधिगमेय्य नरो सपञ्ञो
जो कोणी उपासक या सर्व गाथांच्या कथांमधुन योग्य तो बोध घेऊन आपल्या जीवनात त्याचे आचरण करेल, त्या पुण्याचरणाने खचितच निर्वाण प्राप्त होईल... तुम्हाला सुद्धा याचे सदाचरण करुन निर्वाणाचे सुख प्राप्त होवो हिच मंगल कामना....
सब्बे सत्ता सुखी होंन्तु , सब्बे होंन्तु च खेमिनो । सब्बे भद्रानिपस्स न्तु , माकत्र्चि दुक्खमागमा
सर्व प्राणी सुखी होवोत, सर्वांचे कल्याण होवो, सर्वांना हिताचा मार्ग सापडो, कोणालाही दुःख न होवो....