नालागीरी हत्तीवर विजय
नालागिरि गजवरं अतिमत्तभूतं,दावग्गिचक्कमसनीव सुदारूणन्तं। मेत्तम्बुसेक विधिना जितवा मुनिन्दो,
तं तेजसा भवुत ते जयमंगलानि...
ज्या मुनींद्राने, दावाग्नीचक्र आणि विजेप्रमाणे अत्यंत भयानक आणि मदोन्मत अशा नालागीरी हत्तीला आपल्या मैत्री अभिषेकाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो...
देवदत्त हा सिद्धार्थाचा चुलत भाऊ त्याच्यावर नेहमी जळत असे,
एकदा जेव्हा भगवान बुद्ध कपिलवस्तु मध्ये आले आणि शाक्यांना धम्मदेशना करु लागले, त्या देशनेने प्रभावित होऊन अनेक शाक्यांनी बुद्धाच्या संघात प्रवेश केला. त्यावेळेस देवदत्त ने सुद्धा भगवान बुद्धाच्या संघात प्रवेश केला. आणि फार थोड्या कालावधीतच त्याने असीम नैसर्गीक शक्ती मिळविल्या. तो आता ध्यान साधनेचा सराव करु लागला होता. पण तरी सुद्धा त्याच्या मनात बुद्धाच्या प्रती असलेला द्वेष कमी होत नव्हता.
एकदा तो राजा अजातशत्रुच्या जवळ गेला आणि त्याने आपल्या शक्तीने राजाला प्रभावित केले. त्यामुळे अजातशत्रु देवदत्ताचा शिष्य बनला होता.
इकडे संघात,, आपण संघनायक बनलो पाहिजे यासाठी देवदत्त बुद्धासमोर नेहमीच बढाया मारायचा.
एकदा त्याने संघात मला मानाचे स्थान नाही असा बुद्धावर आणि संघावर आरोप केला. त्यानंतर तो मगध राष्ट्रांत आपला मित्र अजातशत्रुकडे मदतीसाठी गेला. (अजातशत्रु हा बिंबीसाराचा मुलगा होता,, आणि बिंबीसार हा बुद्धाच्या प्रमुख अनुयायांपैकी एक. अजातशत्रुने बिंबीसाराची हत्या केली होती. ) त्यामुळे अजातशत्रुने देवदत्ताला बुद्धाच्या विरोधात मदत करण्याची हमी दिली.
सर्वप्रथम अजातशत्रुने धनुर्विद्येत अतिशय पारंगत अशा सोळा धनुर्धरांची नियुक्ती बुद्धाची हत्या करण्यासाठी केली होती. परंतु भगवान बुद्धाच्या प्रभावाने त्या धनुर्धरांचे ह्रदय परिवर्तन झाले.
या अपयशाने यापुढे देवदत्त स्वतः बुद्धाची हत्या करण्याचा प्रयत्न करु लागला. एकदा भगवान बुद्ध त्यांच्या संघासोबत एका पर्वतशिखरा खालुन जात असताना. त्या पर्वतशिखराहुन एक मोठा दगड भगवान बुद्धांच्या दिशेने फेकला. परंतु तो दगड भगवान बुद्धांच्या समोर पडला आणि त्या दगडाचा एक लहान तुकडा तथागतांच्या पायाला लागला आणि त्यांच्या पायाला जखम झाली. देवदत्ताचा हा प्रयत्न फसला परंतु तरीही त्याने पराभव स्वीकारला नव्हता.
त्यानंतर तो एका नालागीरी नावाच्या हत्तीजवळ गेला, त्याने त्या हत्तीला दारु, आणि अन्य नशा येणारे पदार्थ खायला दिले, त्यामुळे तो हत्ती आपली शुद्ध हरवुन बसला होता. नशेच्या प्रभावामुळे नालागीरी आता अत्यंत क्रुर व भयानक बनला होता. वाटेत भेटेल त्याला पायाने चिरडत समोर तो चालला होता, लोक त्याच्या भितीमुळे सैरावैरा पळु लागले होते, संपुर्ण नगरीत त्याची दहशत माजली होती तरीसुद्धा अशा भयानक परिस्थीत भगवान बुद्ध आपल्या संघासोबत त्याच दिशेने चालले होते. तेव्हा एका स्त्रीने आपल्या बाळाला भगवान बुद्धांच्या पायाखाली आणुन ठेवले, तो नालागीरी हत्ती त्या बाळाला लाथ मारणार एवढ्यातच भगवान बुद्धांनी त्या हत्तीला स्पर्श केला आणि काय तो हत्ती शांत झाला आणि गुडघ्यावर बसला. तो आता भगवान बुद्धांचा मित्र बनला होता, सर्व नगरवासी भगवान बुद्धांचा हा पराक्रम बघत होते. भगवान बुद्धांनी त्या हत्तीला काही कोणत्या जादुई शक्तीने प्रभावित केले नव्हते तर भगवान बुद्धांकडे एक अलौकिक शक्ती होती त्यांच्या चेहऱ्यावार एक वेगळ्याच प्रकारचे तेज होते, ज्याला बघुनच लोक भगवान बुद्धांकडे आकर्षित व्हायचे....
नालागिरि गजवरं अतिमत्तभूतं,दावग्गिचक्कमसनीव सुदारूणन्तं। मेत्तम्बुसेक विधिना जितवा मुनिन्दो,
तं तेजसा भवुत ते जयमंगलानि...
ज्या मुनींद्राने, दावाग्नीचक्र आणि विजेप्रमाणे अत्यंत भयानक आणि मदोन्मत अशा नालागीरी हत्तीला आपल्या मैत्री अभिषेकाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो...