श्लोक ११ ते २०
अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः ।
सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् ॥११॥
सर्व कर्में मज । करावीं अर्पण । वाटलें कठिण । हें हि तुज ॥२२५॥
तरी बहु सोपें । आणिक हि एक । सांगेन तें ऐक । पंडु - सुता ॥२२६॥
मनोबुद्धीचिया । ऐसें पाठींपोटीं । किंवा आदि अंतीं । कर्माचिया ॥२२७॥
मज गुंतवावें । घडे ना हें जरी । राहूं दे तें तरी । असे तैसें ॥२२८॥
राहूं दे बाजूस । पार्था माझें प्रेम । परी एक नेम । धरीं ऐसा ॥२२९॥
सर्व हि कर्मांचा । करीं फल - त्याग । उपाय हा चांग । सांगितला ॥२३०॥
वृक्ष किंवा वेली । टाकिती लोटून । आपुला संपूर्ण । फळ - भार ॥२३१॥
तैसीं झालीं कर्में । त्यजावीं समस्त । गोवूं नये चित्त । फलाशेंत ॥२३२॥
घडे तें तें कर्म । मातें आठवून । करावें अर्पण । हें हि नको ॥२३३॥
नको देऊं मज । नको घेऊं तूं हि । सर्व जाऊं देईं । शून्यामाजीं ! ॥२३४॥
खडकीं वर्षाव । पर्जन्याचा झाला । जैसा वृथा गेला । धनंजया ॥२३५॥
किंवा अग्निमाजीं । पेरिलें जें बीज । जाय तें सहज । जळोनियां ॥२३६॥
ना तरी देखावें । निद्रेमाजीं स्वप्न । तैसें वृथा मान । कर्मजात ॥२३७॥
जैसा अभिलाष । आपुल्या कन्येचा । धरी च ना साचा । जन्म - दाता ॥२३८॥
तैसा चि सकळ । कर्मांचिया ठायीं । निष्काच तूं होईं । धनुर्धरा ॥२३९॥
जैसी अग्नि - ज्वाळा । नभीं वायां जाई । क्रिया जिरूं देईं । तैसी शून्यीं ॥२४०॥
वाटे बहु सोपा । कर्म - फल - त्याग । परी योगीं योग । हा चि थोर ॥२४१॥
जैसीं वेळू - झाडें । विती एक वेळ । मागुतीं केवळ । वांझ होती ॥२४२॥
तैसें फल - त्यागें । कर्म सांडतां च । आगुतें तें साच । अंकुरे ना ॥२४३॥
ह्या चि देहीं होय । विदेहत्व - प्राप्ति । नको च मागुतीं । जन्म घेणें ॥२४४॥
जन्म - मरणाची । संपे येरझार । काय सांगूं फार । धनंजया ॥२४५॥
अभ्यासाच्या योगें । होय ज्ञान - प्राप्ति । ज्ञानें घ्यावी भेटी । ध्यानाची गा ॥२४६॥
मग जिये वेळीं । ध्यानासी च मिठी । देवोनि राहती । सर्व भाव ॥२४७॥
तिये वेळीं सारें । कर्मजात दूर । राहतें साचार । आपोआप ॥२४८॥
दुरावतां कर्म । होतो फल - त्याग । पूर्ण शान्ति - भोग । फल - त्यागें ॥२४९॥
म्हणोनियां शांति । लाभावया साच । क्रम देखें हाच । पंडु - सुता ॥२५०॥
ह्या परी अभ्यास । कराव प्रस्तुत । हें चि तुज उक्त । सर्वथैव ॥२५१॥
श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद्भयानं विशिष्यते ।
ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ॥१२॥
अभ्यासापरीस । ज्ञान हें गहन । ज्ञानाहून ध्यान । असे थोर ॥२५२॥
ध्यानाहून चांग । कर्म - फल - त्याग । त्यागाहून भोग । स्वानंदाचा ॥२५३॥
अनुक्रमें ऐसा । क्रमोनि हा पंथ । शांति - सदनांत । पातला जो ॥२५४॥
अद्वेष्टा सर्वभूताना मैत्रः करूण एव च ।
निर्ममो निरहंकारः समदुःखसुखः क्षमी ॥१३॥
धनंजया पाहीं । चैतन्याच्या ठायीं । आपपर नाहीं । भाव जैसा ॥२५५॥
तैसा कोणाचा हि । स्वभावें साचार । करी ना मत्सर । कदा काळीं ॥२५६॥
उत्तमासी । घ्यावें । हीना अव्हेरावें । हें तो नाहीं ठावें । धरित्रीसी ॥२५७॥
किंवा रंकालागीं । लोटीनियां दूर । रायाचें शरीर । चाळवावें ॥२५८॥
ऐसें म्हणे काय । कृपावंत प्राण । सर्व हि समान । तयालागीं ॥२५९॥
व्याघ्रालागीं विष । होवोनियां मारूं । आणि तृषा हरूं । गायत्रीची ॥२६०॥
ऐसा भेदभाव । करूं नेणे पाणी । तया सर्व प्राणी । सारिखे च ॥२६१॥
स्वकीयां प्रकाश । दुज्यांसी अंधार । नेणे हा प्रकार । दीप जैसा ॥२६२॥
तैसी एकपणें । सर्व भूतमात्रीं । असे जया मैंत्री । सर्वकाळ ॥२६३॥
म्हणे ना जो मी मी । माझें ऐसें । कृपेसी झालासे । जन्मभूमि ॥२६४॥
आणि क्षमाशील । पृथ्वीसारिखा च । जाणे ना कांहीं च । सुख - दुःख ॥२६५॥
जेणें संतोषासी । रहावया घर । दिलें मांडीवर । आपुलिया ॥२६६॥
संतुष्टः सततं योगी यतात्मा द्दढनिश्चयः ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मे भक्तः स मे प्रियः ॥१४॥
जैसा महार्णव । वर्षाकाळावीण । जळें परिपूर्ण । असे नित्य ॥२६७॥
तैसा स्वभावें जो । आत्मसंतोषांत । गढोनि रहात । सर्वकाळ ॥२६८॥
सर्वकाळ चित्त । धरी आवरोन । वाहोनियां आण । आपुली जो ॥२६९॥
जयाचिया योगें । निश्चयालागोन । आलें साचपण । धनंजया ॥२७०॥
जीव - परमात्मा । दोन्हीं एके ठायीं । शोभती । ह्रदयीं । जयाचिया ॥२७१॥
ऐसा नित्य योग - । संपन्न होऊन । अर्पी बुद्धि मन । माझ्या ठायीं ॥२७२॥
आणि अंतर्बाह्म । योगामाजीं भला । परिपूर्ण झाला । पारंगत ॥२७३॥
परी जया माझें । सगुण साकार । रूपडें साचार । आवडे गा ॥२७४॥
अर्जुना तो भक्त । तो चि योगी मुक्त । तो प्रिया मी कांत । ऐसी ओढ ! ॥१७५॥
नव्हे एवढें च । भक्त माझा प्राण । अपुरी च जाण । उपमा ही ॥२७६॥
परी प्रेमळांचें । करितां वर्णन । जातसें भुलोन । एकाएकीं ॥२७७॥
बोलविते मज । तुझी श्रद्धा पार्था । बोलोनि दावितां । येई ना जें ॥२७८॥
म्हणोनि ओघासी । उपमा जी आली । ती च येथें दिली । प्रेमासी ह्या ॥२७९॥
एर्हवीं हें प्रेम । निरुपम जाण । दावावें बोलोन । ऐसें नव्हे ॥२८०॥
असो हें किरीटी । दुणावते प्रीति । संवादितां गोष्टी । प्रेमळाच्या ॥२८१॥
त्यांतून हि श्रोता । भेटता प्रेमळ । मग तोलवेल । गोडी का ती ? ॥२८२॥
आधीं च तूं पार्था । भक्त आवडता । आणि तूं चि श्रोता । लाभलासी ॥२८३॥
त्या हि वरी गोष्ट । प्रसंगें जी आली । ती हि गोड भली । भक्ताचीच ॥२८४॥
सुखाचा हा योग । भला आला येथें । तरी बोलतों तें । ऐक आतां ॥२८५॥
बोलतां बोलतां । डोलूं लागे देव । दिव्य प्रेम - भाव । सांवरे ना ॥२८६॥
मग म्हणे तया । भक्ताचें लक्षण । घेईं समजोन । धनंजया ॥।२८७॥
जया भक्तालागीं । बैसावया जाण । घालितों आसन । ह्रदयाचें ॥२८८॥
यस्मान्नोद्विजते लोक लोकान्नोद्विजते च यः ।
हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ॥१५॥
जळचरां काय । वाटतसे भय । जरी क्षुब्ध होय । महार्णव ॥२८९॥
आणि सिंधउ तो हि । न मानितां त्रास । घेतसे तयांस । सामावोनि ॥२९०॥
तैसें पाहोनि हें । जग मदोन्मत्त । वाटे चि ना खंत । जयालागीं ॥२९१॥
आणि जगासी हि । जयाच्यापासोन । होत नाहीं शीण । लेशमात्र ॥२९२॥
काय सांगूं फार । जैसें अवयवां । शरीर पांडवा । कंटाळे ना ॥२९३॥
तैसें भूतजात । आपुलें मानींत । नाहीं कंटाळत । कोणीसी जो ॥२९४॥
विश्वरूप काया । जाहली म्हणोनि । प्रियाप्रिय दोन्ही । हारपलीं ॥२९५॥
नुरे द्वैतभाव । जयाचिया ठायीं । म्हणोनियां नाहीं । राग - लोभ ॥२९६॥
नाहीं जया भय । नाहीं जया खेद । ऐशा परी द्वन्द्व - । रहित जो ॥२९७॥
त्या हि वरी माझा । एकनिष्ठ भक्त । तरी तो अत्यंत । आवडे गा ॥२९८॥
कोठवरी सांगूं । प्रेम तें वर्णून । भक्त जीव - प्राण । जाण माझा ॥२९९॥
नित्य निरंतर । निजानंदें तृप्त । जो का मूर्तिमंत । परब्रह्म ॥३००॥
पूर्णावस्थारूप । वल्लभेचा कान्त । होवोनि निभ्रांत । राहिला जो ॥३०१॥
अनपेषः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः ।
सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः ॥१६॥
जयाच्या अस्तित्वें । सुखाचा उत्कर्ष । जया नाहीं पाश । कामनेचा ॥३०२॥
वाराणशी मोक्ष । देई निःसंदेह । परी तेथें देह । द्यावा लागे ॥३०३॥
दोषांतें गिळोन । टाकी हिमालया । परी तेथें भय । जीवितासी ॥३०४॥
तैसें न्यून नाहीं । संतांचिये ठायीं । शुचित्व तें पाहीं । आगळें च ॥३०५॥
शुद्ध गंगोदकें । पाप ताप जाय । परी तेथें मय । बुडायाचें ॥३०६॥
तैसा नव्हे भक्त । अर्जुना साचार । अपार गंभीर । असोनी हि ॥३०७॥
न बुडतां तेथें । न येतां मरण । लाभतें निर्वाण । रोकडें च ॥३०८॥
संतांचिया स्पर्शें । गंगेचेहि दोष । सर्वथा निःशेष । हारपती ॥३०९॥
धनंजया तया । संत - संगतीचें । सुचित्व तें वाचे । किती वानूं ? ॥३१०॥
असो निर्मलत्वें । तीर्थांसी आश्रय । ऐशा परी होय । भक्त जो का ॥३११॥
दाही दिशांपार । आपुले सकळ । जेणें मनो - मळ । घालविलें ॥३१२॥
तेजें परिपूर्ण । सूर्य - नारायण । तैसा जो पावन । अंतर्बाह्य ॥३१३॥
दिसे पायाळूतें । भूमींतील धन । तैसी देखे खूण । तत्त्वाची जो ॥३१४॥
व्यापक उदास । सर्वत्र आकाश । अलिप्त मानस । तैसें ज्याचें ॥३१५॥
व्याधाचिया फांसा - । पासोनि सुटोन । जैका का उडोन । जावा पक्षी ॥३१६॥
तैसा झाला मुक्त । भव - व्यथेंतून । भूषणें लेवोन । निरिच्छेचीं ॥३१७॥
महा - सुखामाजीं । नित्य परिपूर्ण । निमग्न होवोन । राहिला जो ॥३१८॥
जयालागीं नाहीं । दुःखाची टोंचणी । मृत जैसा कोणी । नेणे लाज ॥३१९॥
आणि अहंकार । नाहीं जया अंगीं । कर्मारंभालागीं । धनुर्धरा ॥३२०॥
जागच्याजागीं च । सर्पणावांचोन । जातसे विझोन । अग्नि जैसा ॥३२१॥
तैसी नित्य - शांति । जयाच्या वांटयास । स्वभावें मुक्तास । लाभते जी ॥३२२॥
ऐसा सोऽहं भावें । जो का परिपूर्ण । गेला उल्लंघून । द्वैतालागीं ॥३२३॥
तरी भक्ति - सुख । भोगावें म्हणोन । दो भागीं वांटोन । आपणातें ॥३२४॥
धरोनि अंतरीं । स्वयें सेवा - भाव । मानोनि मी देव । दुज्या भागा ॥३२५॥
न भजती तयां । आचरोनि दावी । भक्तीची बरवी । रीत जगीं ॥३२६॥
ऐसा योग - युक्त । भक्त जो का पूर्ण । तयाचें व्यसन । आम्हांलागीं ॥३२७॥
भेटे तैं च वाटे । आम्हां समाधान । असे निजध्यान । आमुचें तो ॥३२८॥
तयासाठीं आम्हां । सगुण साकार । घडे अवतार । घेणें येथें ॥३२९॥
तयाच्या वरून । प्रेम - भरें जाण । वाटे पंच - प्राण । ओंवाळावे ॥३३०॥
यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति ।
शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः ॥१७॥
आत्मलाभाऐसें । गोमटें आणिक । पार्था कांहीं एक । देखेना जो ॥३३१॥
म्हणोनियां भोग । लधला विशेष । तरी नाहीं हर्ष । जयालागीं ॥३३२॥
आपण चि विश्व । होतां स्वयमेव । गेला भेद - भाव । अनायासें ॥३३३॥
म्हणोनिया जया । पुरुषाच्या ठायीं । लेशमात्र नाहीं । द्वेष - भाव ॥३३४॥
चिदानंद रूप । आपुलें जें साच । नाहीं तया वेंच । कल्पांतीं हि ॥३३५॥
जाणोनि हें जग । नश्वर मायिक । गेलें त्याचा शोक । करी ना जो ॥३३६॥
जया पलीकडे । नाहीं च आणिक । ऐसें जें का एक । परब्रह्म ॥३३७॥
तें तो स्वयें होय । आपुल्या चि ठायीं । म्हणोनि जो कांहीं । आकांक्षी ना ॥३३८॥
नोळखे जो कांहीं । बरें कीं वाईट । नेणे दिन - रात । सूर्य जैसा ॥३३९॥
ऐसा जो अखंड । ज्ञानरूप झाला । त्या हि वरि भला । भक्त माझा ॥३४०॥
तरी तयाऐसें । प्रेमळ सोयरें । नाहीं च दुसरें । तुझी आण ॥३४१॥
समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः ।
श्रीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः ॥१८॥
तेविं धनंजया । जयाचिया ठायीं । जाणीव हि नाहीं । वैषम्याची ॥३४२॥
करो कोणी मैत्री । करो वा शत्रुत्व । दोहोंसी महत्त्व । सारिखें चि ॥३४३॥
लावित्यासी किंवा । तोडूं पाहे तया । एक चि दे छाया । वृक्ष जैसा ॥३४४॥
किंवा गाळित्यासी । कडून इक्षु - दंड । पाळित्यासी गोड । ऐसें नाहीं ॥३४५॥
तैसें शत्रु - मित्र । जयातें समान । मान - अपमान । सारिखे च ॥३४६॥
तीन हि ऋतूंत । सारिखें च व्योम । तैसा राहे सम । शीतोष्णीं जो ॥३४७॥
उत्तर - दक्षिण - । वारे जोरदार । तयांमध्यें स्थिर । मेरु जैसा ॥३४८॥
तैसा सुख - दुःखें । प्राप्त होतां येथ । राहे जो मध्यस्थ । उदासीन ॥३४९॥
असो हीन रंक । असो राजा थोर । चांदिणें मधुर । सर्वांसी च ॥३५०॥
तैसें म्हणे ना जो । उत्तम अधम । सर्वां भूतीं सम - । भाव ज्याचा ॥३५१॥
इच्छिती जयातें । पार्था तिन्ही लोक । सर्वां सेव्य एक । तोय जैसें ॥३५२॥
सर्व हि संबंध । सोडोनियां चांग । होवोनि निःसंग । अंतर्बाह्य ॥३५३॥
अखंड आपण । आपुल्या ठायीं च । राहे एकला च । स्वभावें जो ॥३५४॥
तुल्यनिन्दास्तुतिमौंनी संतुष्टो येनकेनचित् ।
अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ॥१९॥
होतां निंदा सुति । डंडळेना चित्त । असे जो अलिप्त । नभाऐसा ॥३५५॥
निंदा स्तुति दोन्ही । समान लेखोनि । हिंडे जनीं वनीं । प्राणाऐसा ॥३५६॥
लटिकें वा साच । न बोले कांहींच । मोडलें नाहीं च । मौन ज्याचें ॥३५७॥
पुरें म्हणे ना जो । घेतां उपभोग । नित्य नवा चांग । उन्मनीचा ॥३५८॥
सांगें धनंजया । पर्जन्यावांचोन । समुद्र आटोन । जाई काय ? ॥३५९॥
तैसा लाभालाभीं । नाहीं । हर्ष - खेद । मिळे तें तें गोड । वाटे जया ॥३६०॥
करी वायु जैसा । सर्वत्र संचार । न राहतां स्थिर । एके ठायीं ॥३६१॥
तैसा विश्वामाजीं । धरी ना कोठें च । एके ठायीं साच । आश्रय जो ॥३६२॥
विश्व हें चि तया । विश्रांतीचें स्थान । वायूसी गगन । असे जैसें ॥३६३॥
आघवें हें विश्व । आपुलें चि घर । ऐसी मति स्थिर । जयाची गा ॥३६४॥
धनंजया तुज । काय सांगूं फार । झाला चराचर । आपण चि ॥३६५॥
ह्या हि वरी आस्था । धरोनि जो चित्तीं । करी माझी भक्ति । आवडीनें ॥३६६॥
तया डोकीवरी । घेवोनि मी नाचें । एवढें भक्ताचें । प्रेम मज ॥३६७॥
उत्तमातें नम्र । करावें मस्तक । कायसें कौतुक । असे ह्यांत ॥३३८॥
परी तयाचिया । पादोदकातें हि । भावें मान देई । तिन्ही लोक ॥३६९॥
जी का श्रद्धावस्तु । तियेचा आदर । करावा साचार । कैशा रीती ॥३७०॥
कळावें हें पूर्ण । ऐसें इच्छा जरी । तरी गुरु करीं । शंकरासी ॥३७१॥
परी असो आतां । वानितां शिवातें । आत्म - स्तुति होते । म्हणोनियां ॥३७२॥
पुरे हें वर्णन । बोले नारायण । शिरीं वाहें जाण । भक्तासी मीं ॥३७३॥
कीं जो मोक्षरूप । चौथा पुरुषार्थ । घेवोनि हातांत । अपुलिया ॥३७४॥
पार्था भक्ति - पंथें । मग तो चि येथ । निघाला वांटीत । लोकांलागीं ॥३७५॥
ब्रह्म - कैवल्याचा । तो चि अधिकारी । सोडबांध करी । मोक्षाची तो ॥३७६॥
परी जळाऐसें । धरी नम्रपण । म्हणोनि वंदन । करूं तया ॥३७७॥
तयालागीं आम्ही । शिरीं वाहूं साच । वक्षस्थलीं टांच । धरूं त्याची ॥३७८॥
आणि वाचे त्याचें । करूं गुण - गान । कीर्तीचें भूषण । लेवूं कानीं ॥३७९॥
मज अचक्षूचे । धांवती लोचन । तयाचें वदन । पहावया ॥३८०॥
मज हातींचिया । लीला - पद्में जाण । करितों पूजन । तयाचें मीं ॥३८१॥
रूप चतुर्भुज । घेतलें सगुण । तया आलिंगन । द्यावयासी ॥३८२॥
मिळावें तयाच्या । संगतीचें सुख । म्हणोनियां देख । धनंजया ॥३८३॥
मज विदेहात । घ्यावा लागे देह । ऐसा निःसंदेह । आवडे तो ॥३८४॥
आवडे तो भक्त । आम्हांसी अत्यंत । नवल तें येथ । काय असे ॥३८५॥
परी जे भक्ताचें । ऐकती चरित्र । वर्णिती पवित्र । कीर्ति त्याची ॥३८६॥
ते हि आवडती । मज प्राणाहून । सुनिश्चयें जाण । पंडु - सुता ॥३८७॥
जो हा योगरूप । भक्ति - योग येथ । संपूर्ण साद्यंत । सांगितला ॥३८८॥
जेणें भक्तालागीं । मस्तकीं धरोन । प्रेमें करीं ध्यान । तयाचें मी ॥३८९॥
जिये भक्ति - योग - । स्थितीचें महत्त्व । एवढें अपूर्व । होय पार्था ॥३९०॥
ये तु धर्म्याम्रुतमिदं यथोक्तं पर्युपासते ।
श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ॥२०॥
इति श्रीमद्भगवद्नीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुअनसंवादे भक्तियोगो नाम
द्वादशोऽध्यायः ॥१२॥
ती ही धर्म - कथा । असे मनोरम । गोड धोरसम । अमृताच्या ॥३९१॥
ऐकोनि ही कानीं । जाणती जे कोणी । प्रचीत घेवोनि । अंतर्यामीं ॥३९२॥
तेविं श्रद्धेचिया । आदरें हा योग । विस्तारला चांग । ज्यांच्या ठायीं ॥३९३॥
चोखाळल्या क्षेत्रीं । पेरिलें जें बीज । अंकुरे सहज । जैसें पार्था ॥३९४॥
तैसी माझी भक्ति । सांगितल्या रीती विरूढली चित्तीं । जयाचिया ॥३९५॥
तो चि भक्त जगीं । तो चि योगी मोठा । अखंड उत्कंठा । त्याची मज ॥३९६॥
तो चि पुण्य - भूमि । तो चि पुण्य - राशि । आवडे जयासी । भक्ति - कथा ॥३९७॥
मानूं तया आम्ही । आपुलें दैवत । करूं अखंडित । ध्यान त्याचें ॥३९८॥
बरवें आणिक । नाहीं तयाविण । तयाचें व्यसन । आम्हालागीं ॥३९९॥
सर्वस्व निधान । आमुचें तो जाण । वाटे सामाधान । भेटीमाजीं ॥४००॥
भक्तांची जे कोणी । प्रेमें गाती कथा । परम देवता । आमुची ते ॥४०१॥
ऐसें सांगितलें । तेणें नारायणें । संजय तो म्हणे । ऐकें राजा ॥४०२॥
प्रभु कृष्णदेव । भक्तांचा आनंद । होय मूल - कंद । विश्वाचा जो ॥४०३॥
एकनिष्ठभावें । शरण जे आले । तयांलागीं भलें । सांभाळी जो ॥४०४॥
जया एकातें चि । रिघावें शरण । ऐसा दया - घन । संपूर्ण जो ॥४०५॥
लोकांचें लालन । ही च ज्याची लीला । निष्कलंक भला । निर्मळ जो ॥४०६॥
भक्तांचा सांभाळ । हें ज्याचें कौतुक । सुर - साहाय्यक । स्वभावें जो ॥४०७॥
ज्याची धर्म - कीर्ति । अखंड उज्वल । अगाध सरळ । दातृत्वें जो ॥४०८॥
अतुल सामर्थ्यें । सर्वथा प्रबळ । परी द्वारपाळ । बळीचा जो ॥४०९॥
निज - भक्तांवरी । करी बहु लोभ । स्वभावें सुलभ । प्रेमळां जो ॥४१०॥
जो का सत्य - सेतु । कला - निधिपूर्ण । जो का भक्तजन - । चक्रवर्ती ॥४११॥
तो चि वक्ता येथा । वैकुंठींचा नाथ । आणि श्रोता पार्थ । भाग्यवंत ॥४१२॥
संजय तो म्हणे । आतां श्रीगोपाळ । कैसें निरूपील । ऐकें राजा ॥४१३॥
रसाळ ती कथा । बोलूं मराठींत । ऐका श्रोते चित्त । देवोनियां ॥४१४॥
तुम्हां साधुसंतां । जावोनि शरण । सेवावे चरण । भक्ति - भावें ॥४१५॥
ज्ञानदेव म्हणे । सद्गुरु निवृत्ति । हें चि शिकविती । आम्हांलागीं ॥४१६॥
इतिश्री स्वामी स्वरूपानंदविरचित श्रीमत् अभंग - ज्ञानेश्वरी
द्वादशोऽध्यायः ।
हरये नमः । हरये नमः । हरये नमः ।