श्लोक १ ते १०
सद्गुरु माउली । होसी तूं उदार । तुझा जयजकार । असो नित्य ॥१॥
नित्य आनंदाचा । करिसी वर्षाव । शुद्ध स्वयमेव । प्रसिद्ध तूं ॥२॥
वेढोनि घेतलें । विषयांच्या व्याळें । तेणें ताटकळे । जीव जरी ॥३॥
तरी लाभतां च । तुझी कृपाद्दष्टि । हरोनियां जाती । विष -- बाधा ॥४॥
कृपा - रसाचिया । उसळोनि लाटा । तयाचा तो येतां । महापूर ॥५॥
कैसा भव - ताप । कोणातें पोळील । दुःख तें जाळील । कैसें कोणा ॥६॥
तुझी कृपा होतां । लाभतो अखंड । योगसुखानंद । भक्तांलागीं ॥७॥
भक्तां सोऽहं - सिद्धि । देवोनि उघड । पुरविसी लाड । तयांचे तूं ॥८॥
मोदें मूलाधारीं । कुंडलिनीचिया । मांडीवरी तयां । खेळविसी ॥९॥
मग झोंके देसी । प्रेमें घालोनियां । ह्रदयाकाशाचिया । पाळण्यांत ॥१०॥
मन - पवनाचीं । खेखणीं करोन । टाकिसी हरोन । जीव - भाव ॥११॥
आणि तयांलागीं । स्वरूपानंदाचीं । बाळ लेणीं तूं चि । लेवविसी ॥१२॥
तेविं सत्रावीचें । देसी स्तनपान । अनाहत - गान । गावोनियां ॥१३॥
समाधीचा बोध । करोनियां चांग । बुझावोनि मग । झोंपविसी ॥१४॥
ऐशापरी होसी । साधकासी माता । प्रभो कृपावंता । गुरुराया ॥१५॥
तुझ्या सुमंगल । चरणाचे ठायीं । रम्य पीक येई । साहित्याचें ॥१६॥
म्हणोनि मी राहें । सद्गुरु - माउली । तुझ्या छायेखालीं । निरंतर ॥१७॥
जयालागीं देते । कारुण्यें आश्रय । द्दष्टि कृपामय । माते तुझी ॥१८॥
सर्वविद्यारूप । सृष्टीचा सर्वथा । होय तो विधाता । एकाएकीं ॥१९॥
सर्व हि ऐश्वर्यें । संपन्न तुं माता । होसी कल्प - लता । भक्तांलागीं ॥२०॥
तरी मज आतां । देईं आज्ञापन । ग्रंथ - निरूपण । करावया ॥२१॥
नव हि रसांचे । भरोनि सागर । साहित्यालंकार । यथोचित ॥२२॥
भव्य भावार्थाचे । प्रचंड पर्वत । निपजवीं येथ । ग्रंथामाजीं ॥२३॥
साहित्य - सुवर्ण - । खाणी प्रकटोत । सुपीक भूमींत । मराठीच्या ॥२४॥
तेविं नित्यानित्य - । विवेकाच्या वेली । लाविं तूं माउली । ठायींठायीं ॥२५॥
संवाद - फळांचीं । निधानें च साचीं । ऐसीं प्रमेयांचीं । उपवनें ॥२६॥
करावीं तयार । तुवां निरंतर । विस्तीर्ण गंभीर । घनदाट ॥२७॥
वितंडवादाचे । आडमार्ग मोडीं । दरीखोरीं तोडीं । पाखांडाचीं ॥२८॥
नाना कुतर्कांचीं । श्वापदें तीं दुष्ट । अंवे टाकीं नष्ट । कोनियां ॥२९॥
श्रीहरीचे गुण । वर्णावया नित्य । देईं तूं सामर्थ्य । मजलागीं ॥३०॥
श्रवणाचें सुख । हें चि राज्य - पद । तेथें श्रोतृ - वृंद । वैसवीं तूं ॥३१॥
देश - भाषेच्या ह्या । पट्टणामाझारीं । सुकाळ तूं करीं । अध्यात्माचा ॥३२॥
आत्म - सुखाची च । जगें देवघेव । करावी सदैव । ऐसें होवो ॥३३॥
घालिसील जरी । तूं चि निरंतर । कृपेची पाखर । मजवरी ॥३४॥
तरी दयाळे हें । निर्मीन सकळ । न लागतां वेळ । निरूपणीं ॥३५॥
भाव - भक्ति - पूर्ण । नम्र विनवणी । ऐसी येतां कानीं । स्वभावें ती ॥३६॥
सद्गुरु - माउली । होवोनि प्रसन्न । कृपावलोकन । करोनियां ॥३७॥
म्हणे ज्ञानदेवा । नको बोलूं फार । गीतार्थ सत्वर । सांगें आतां ॥३८॥
श्रीगुरूची आज्ञा । हा महा - प्रसाद । लाभतां आनंद । झाला जीवा ॥३९॥
निरूपीन येथ । गीता - मथितार्थ । देनोनियां चित्त । ऐका आतां ॥४०॥
अर्जुन उवाच --
एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ।
ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगावित्तमाः ॥१॥
तरी वीरांमाजीं । सर्वश्रेष्ठ देखा । जय - ध्वज जो का । सोमवंशीं ॥४१॥
पंडुराजाचा तो । पुत्र धनंजय । मग बोले काय । कृष्णालागीं ॥४२॥
म्हणे प्रभो मज । होवोनि प्रसन्न । दाविलें आपण । विश्व - रूप ॥४३॥
परी तें अत्यंत । विराट अद्धुत । म्हणोनियां चित्त । भ्यालें माझें ॥४४॥
आणि सगुणाची । जीवासी संवय । म्हणोनि आश्रय । घेतला हा ॥४५॥
तंव विश्वरूपीं । बुडी दिल्यावीण । सगुणीं रंगोन । नको जाऊं ॥४६॥
ऐसें सांगोनियां । सगुणापासोन । निवारिलें मन । माझें देवें ॥४७॥
तरी एक चि तूं । सगुण - निर्गुण । ओळखिली खूण । निःसंदेह ॥४८॥
सगुण साकार । भक्तियोगें प्राप्त । निर्गुण अव्यक्त । योग - पंथें ॥४९॥
भक्ति आणि योग । दोन हि हे मार्ग । करविती चांग । तुझी प्राप्ति ॥५०॥
तुझ्या व्यक्ताव्यक्त । स्वरूपाच्या दारीं । रिघावें श्रीहरी । ह्या चि मार्गीं ॥५१॥
परी शत - भार । सुवर्णामधून । वेगळें काढून । वालभरी ॥५२॥
दोहोंचा हि कस । पाहतां साचार । पडे ना अंतर । तयांमाजीं ॥५३॥
तैसें तुझें रूप । अव्यक्त निर्गुण । साकार सगुण । सारिखें च ॥५४॥
दिव्य अमृताच्या । महार्णवीं साचें । जें का सामर्थ्याचें । थोरपण ॥५५॥
तें चि लाभे तैसें । घेतां एक चूळ । त्या चि लाटेंतील । अमृताच्या ॥५६॥
व्यक्ताव्यक्त दोन्ही । एकरूप साच । प्रत्यय ऐसा च । असे माझा ॥५७॥
परी योगेश्वरा । प्रभो जगजेठी । तुज ह्या चि साठीं । पुसतसें ॥५८॥
कीं जो तुवां देवा । मागें क्षणभर । केला अंगीकार । व्यापकाचा ॥५९॥
तें तुझें व्यापक । साच कीं कौतुक । कळावें हें एक । असे जैसें ॥६०॥
तरी ज्यांचीं कर्में । तुझ्या चि प्रीत्यर्थ । जयांलागीं श्रेष्ठ । तूं चि एक ॥६१॥
जयांनीं भक्तीसी । घातले विकोन । आपुले संपूर्ण । मनोधर्म ॥६२॥
ऐसें जे श्रीहरी । तुज सर्वां परी । बांधोनि अंतरीं । उपासिती ॥६३॥
आणि वस्तु जी का । ॐ कारा पैलाड । वर्णावया जड । वैखरीसी ॥६४॥
असे जी अतुल । अक्षर अव्यक्त । मर्यादारहित । अनिर्देश्य ॥६५॥
ती च ती आपण । जाणोनि जे कोणी । उपासिती ज्ञानी । सोऽहंभावें ॥६६॥
ऐसे निज - ज्ञानी । ना तरी जे कोणी । राहिले होवोनि । भक्त तुझे ॥६७॥
तयां दोहोंतून । कोणालागीं पूर्ण । साच योगज्ञान । झालें सांगा ॥६८॥
भक्त किरीटीचे । ऐकोनि हे बोल । तोषला गोपाळ । जगब्दंधु ॥६९॥
म्हणे काय कैसें । केव्हां विचारावें । भलें हे आघवें । जाणसी तूं ॥७०॥
श्रीभगवानुवाच ---
मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्त उपासते ।
श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ॥२॥
प्रवेशतां सूर्य । अस्ताचलाकांठीं । जाती तयापाठीं । रश्मी जैसे ॥७१॥
किंवा वर्षाकाळीं । चढूं वाढूं लागे । भरोनियां वेगें । नदी जैसी ॥७२॥
चढटी वाढती । तैसी श्रद्धा साची । माझिया भक्तांची । नित्यनवी ॥७३॥
झाली एकरूप । भागीरथी गंगा । सागराच्या अंगा । जडोनियां ॥७४॥
तरी मागील तो । ओघ अनिवार । राहे निरंतर । घोघावत ॥७५॥
तैसा भक्तांचिया । प्रेमा येई भर । जरी निरंतर । मद्रूप ते ॥७६॥
सर्वदा सकळ । इंद्रियांसहित । माझ्या ठायीं चित्त । ठेवोनियां ॥७७॥
उपासिती मातें । ऐसे रात्रंदिन । आत्म - समर्पण । करोनि जे ॥७८॥
तयां भक्तांलागीं । थोर योगयुक्त । मानितों निभ्रांत । धनंजया ॥७९॥
ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते ।
सर्वत्रगमचिन्त्यं च कृटस्थमचलं ध्रुवम् ॥३॥
संनियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ।
ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः ॥४॥
आणि दुजे ते हि । जे का योगी थोर । सोऽहंभावावर । आरूढोनि ॥८०॥
आकळिती ब्रह्म । अविनाशी पूर्ण । अनादि निर्गुण । निराकार ॥८१॥
मनाचें हि नख । शिवे चि ना जेथें । होय जें बुद्धीतें । अगोचर ॥८२॥
तेथें इंद्रियांचा । काय लागे पाडा । ऐसें जें का गूढ । ध्यानासी हि ॥८३॥
जें ना एके ठायीं । सांपडे कधीं हि । सामावलें नाहीं । नाम - रूपीं ॥८४॥
सर्वपणें नित्य । असे सर्वांठायीं । चिंतन हि होई । कष्टी जेथें ॥८५॥
होय ना उत्पन्न । पावे ना विनाश । आहे - नाहीं भाष । सरे जेथें ॥८६॥
म्हणोनि जें नाना । साधनीं साधे ना । चळे ना ढळे ना । संपे ना जें ॥८७॥
ऐसें सुनिर्मळ । पर - ब्रह्म भलें । ज्यांनीं आकळिलें । योग - बळें ॥८८॥
विषयांची सेना । टाकिली जाळोनि । पेटवोनि अग्नि । वैराग्याचा ॥८९॥
सर्वथा पोळलीं । इंद्रियें आपुलीं । ज्यांनीं आवरिलीं । धैर्य - बळें ॥९०॥
मग संयमाच्या । पाशें वळवून । ठेविलीं कोंडून । अंतरांत ॥९१॥
लावोनि आसन - । मुद्रा बळकट । गुद - द्वारीं नीट । धनंजया ॥९२॥
मूळ - बंधाचा तो । रचोनि बुरूज । झुंजावया सज्ज । झालें जे का ॥९३॥
ज्यांनीं आशा - पाश । टाकिले तोडून । कडे ढोंसळून । अधैर्याचे ॥९४॥
आणि नष्ट केला । सत्वर साचार । समूळ अंधार । निद्रारूप ॥९५॥
सप्त हि ते धातु । टाकिले जाळून । ज्यांनीं पेटवून । वज्राग्नीतें ॥९६॥
प्राणायामरूपी । यंत्राचें पूजन । केलें समर्पून । व्याधि - शीर्षें ॥९७॥
मूलाधार - चक्रीं । कुंडलिनी शक्ति - । ज्योत उभी होती । तेवती जी ॥९८॥
तिच्या प्रकाशांत । मस्तकापर्यंत । मार्ग आक्रमीत । निघाले जे ॥९९॥
नव - द्वारें पूर्ण । घेतलीं लावून । खीळ बसवून । संयमाची ॥१००॥
ब्रह्मरंध्र - द्वार । उघडोनि मग । खुला केला मार्ग । सुषुम्नेचा ॥१०१॥
प्राण - शक्तिरूपी । चामुंडेच्या पुढें । संकल्पाचें मेंढे । मारोनियां ॥१०२॥
मनोमहिषाचें । मुंडकें तोडोन । तें चि समर्पण । केलें तिज ॥१०३॥
इडा - पिंगलांची । करोनि मिळणी । सोडवोनि ध्वनि । अनाहत ॥१०४॥
मग समाधीचें । जें का चंद्रामृत । घेतलें त्वरित । जिंकोनि तें ॥१०५॥
जणूं तो कोरीव । दादर विराजे । मध्य - विवर जें । सुषुम्नेचें ॥१०६॥
तेणें मार्गें मग । चढोनियां वर । गांठिलें शिखर । ब्रह्मरंध्र ॥१०७॥
अर्धमात्रा मध्य - । संधीचा सोपान । तो हि ओलांडून । गहन जो ॥१०८॥
मूर्धन्य आकाश । मारोनि काखेन । पावले ऐक्यास । ब्रह्म - पदीम ॥१०९॥
सर्वत्र सारिखी । ठेवोनियां बुद्धि । जे का सोऽहं - सिद्धि । गिळावया ॥११०॥
निज - बळें घेती । करोनि स्वाधीन । निःसीम गहन । योग - दुर्ग ॥१११॥
करोनियां ऐसें । आत्मसमर्पण । होती जे का लीन । महा - शून्यीं ॥११२॥
ते हि योग - ज्ञानी । योग - बळें साच । पावती मातें च । धनंजया ॥११३॥
एर्हवीं अधिक । योग - बळें कांहीं । मिळे ऐसें नाहीं । योगियांसी ॥११४॥
परी तयांलागीं । सायास आगळे । अधिक तें मिळे । हें चि एक ॥११५॥
क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् ।
अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ॥५॥
प्राणिमात्राचें जें । परमैकहित । आधाररहित । निराकार ॥११६॥
तया सद्वस्तूचा । पावावया ठाव । बांधिती जे हांव । भक्तीविण ॥११७॥
पदें महेन्द्रदि । तयां नागविती । गांठोनि एकान्तीं । मार्गामाजीं ॥११८॥
ऋद्धि - सिद्धि - द्वन्द्वें । होवोनि प्रकट । आडविती वाट । योगियांची ॥११९॥
काम - क्रोधावेग । होती अनावर । तयांसी अपार । पीडा देती ॥१२०॥
झुंजवावें लागे । शून्यासवें अंग । दुष्कर हा योग । पंडु - सुता ॥१२१॥
भागवावी भूक । भुकेतें गिळून । द्यावें तृषा - पान । तृषेलागीं ॥१२२॥
किंवा हात वांवा । घालोनि संतत । बैसावें मापीत । वायूलागीं ॥१२३॥
जेथें जागेपण । ही च निद्रा होय । विहार इंद्रिर - । निरोधाचा ॥१२४॥
वृक्ष - वेलींसंगें । करावे संवाद । मानोनि सुह्रद । तयांलागीं ॥१२५॥
पांघरोनि ऊन । नेसोनियां शीत । रहावें घरांत । पर्जन्याच्या ॥१२६॥
जन्मोजन्मीं तो चि । प्राप्त व्हावा पति । म्हणोनियां सती । सती जाय ॥१२७॥
परी पतिविण । नित्य सती जावें । तैसें चि जाणावें । दुर्घट हें ! ॥१२८॥
किंवा जैसा कोणी । अर्पी निज - प्राण । कराया रक्षणा । स्व - कुळाचें ॥१२९॥
येथें तैसें कांहीं । जरी नसे काज । तरी नित्य झुंज । काळासंगें ॥१३०॥
ऐसें मृत्युहून । साधन हें तीक्ष्ण । धनंजया जाण । कष्टदायी ॥१३१॥
घोर दाहकारी । तप्त काळकूट । तयाचा का घोट । घेववेल ॥१३२॥
फाटल्यावांचून । राहील का तोंड । पर्वत प्रचंड । गिळूं जातां ॥१३३॥
म्हणोनि जे कोणी । योग - मार्गें जाती । तयां कष्ट होती । अनिवार ॥१३४॥
पाहें बोथर्यासी । लोखंडाचे चणे । भाग पडे खाणें । जिये वेळीं ॥१३५॥
तिये वेळीं तेणें । काय भरे पोट । नव्हे का प्राणान्त । तयाचा तो ? ॥१३६॥
काय बाहु - बळें । सिंधु तरवेल । पायीं चालवेल । अंतराळीं ॥१३७॥
रणधुमाळींत । शिरोनि साचार । शरीरातें वार । न लागतां ॥१३८॥
सूर्य - मंडळासी । जाईल भेदून । ऐसा असे कोण । बळवंत ॥१३९॥
ना तरी दुर्बळ । पांगळा अपंग । धांवेल का सांग । वायूसंगें ॥१४०॥
निराकार ब्रह्म - । स्वरूपाचे ठायीं । तैसी गति नाहीं । देहवंता ॥१४१॥
ऐसें असोनी हि । जरी धैर्य - बळें । गांठाया निघाले । महा - शून्य ॥१४२॥
तरी सर्वथा ते । पात्र होती क्लेशा । ऐकें गुडाकेशा । पंडु - सुता ॥१४३॥
म्हणोनि जे कोणी । जाती भक्ति - पंथें । नाहीं च तयांतें । ऐसे कष्ट ॥१४४॥
ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः ।
अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते ॥६॥
आपुल्या वांटयास । स्व - वर्णानुसार । कर्में जीं साचार । आलीं येथें ॥१४५॥
तीं तीं पुरेपूर । आचरती वीरा । कर्मेंद्रियद्वारा । आनंदानें ॥१४६॥
निषेधिलें शास्त्रीं । तें तें नाचरिती । कर्म तें करिती । विहित जें ॥१४७॥
परी मनोभावें । मातें समर्पून । टाकिती जाळून । कर्म - फळें ॥१४८॥
होतां माझ्याठायीं । कर्मांचा संन्यास । बाधे ना तयांस । कर्म - बंध ॥१४९॥
काया - वाचा - मनें । सर्व हि व्यापार । करिती साचार । माझ्यासाठीं ॥१५०॥
ऐसे माझ्या ठायीं । गढोनि जे गेले । उपासिती भले । निरंतर ॥१५१॥
आणि ध्यानमिषें । जयांचें ह्रदय । मातें घर होय । रहावया ॥१५२॥
ज्यांचें भक्ति - प्रेम । पार्था सर्वथैव । करी देवघेव । माझ्याशीं च ॥१५३॥
भोग आणि मोक्ष । बापुडे लेखून । तयां डावलून । दिलें ज्यांनीं ॥१५४॥
अनन्य होवोन । देह मन प्राण । समर्पिलीं पूर्ण । ऐसीं मज ॥१५५॥
तयांचें मी सर्व । चालवितों पाहीं । पडूं देत नाहीं । कांहीं न्यून ॥१५६॥
तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात ।
भवामि न चिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् ॥७॥
किंबहुना पार्था । जैसी बाळावरी । माता प्रेम करी । जीवेंभावें ॥१५७॥
तैसे माझे भक्त । कैसे हि असोत । मज ते अत्यंत । आवडती ॥१५८॥
करीं सर्व काळ । तयाचा सांभाळ । दूर कळिकाळ । घालवोनि ॥१५९॥
नाहीं तरी पार्था । माझिया भक्तांसी । चिंता ती कायसी । संसाराची ॥१६०॥
राजाचिया कांते - । लागीं धनंजया । काय मागावया । लागे भीक ॥१६१॥
तैसे भक्त माझें । प्रेम - पात्र साचें । लाजें ना तयांचें । करायासी ॥१६२॥
जन्ममृत्यूचिया । लाटांमाजीं पाहीं । गटंगळ्या खाई । जग सारें ॥१६३॥
देखोनि हे द्दश्य । चित्तामाजीं भला । विवार हा आला । पंडु - सुता ॥१६४॥
ऐसा भव - सिंधु । जरी क्षुब्ध होय । सांग कोणा भय । नुपजेल ॥१६५॥
तेथें भोळेभाळे । माझे भक्तजन । जातील भिवोन । ह्या चि लागीं ॥१६६॥
तयांचिया गांवा । आलों मी घांवोन । साकार सगुण । होवोनियां ॥१६७॥
सहस्त्र - मानांच्या । बनवोनि नौका । त्यांत भक्तां एकांत । बैसवोनि ॥१६८॥
भवार्णवांतून । करावया पार । मी तों कर्णधार । झालों पार्था ॥१६९॥
जे का कुटुंबादि । परिवारें युक्त । तयां । तरांडयांत । बैसविलें ॥१७०॥
आणि एकटे जे । तयां अनायासें । ध्यानाचिया कांसे । लाविलें मीं ॥१७१॥
कोणा प्रेम - पेटी । बांधोनियां पोटीं । आणिलें मीं तटीं । सायुज्याच्या ॥१७२॥
असो भक्त कोणी । चतुष्पाद प्राणी । तयाचा देखोनो । भक्तिभाव ॥१७३॥
वैकुंठाचें राज्य । पावावया भलें । सामर्थ्य मीं दिलें । तयालागीं ॥१७४॥
ऐसी भक्तांचिया । उद्धाराची चिंता । लागली सर्वथा । मजलागीं ॥१७५॥
आपुलिया छंदीं । गुंतविलें भक्तीं । मज चित्त - वृत्ति । समर्पोनि ॥१७६॥
म्हणोनियां पार्था । भक्ति - पंथें जावें । ध्यानीं हें ठेवावें । भक्तराजा ॥१७७॥
मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय ।
निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः ॥८॥
अखंडित माझ्या । स्वरूपाच्या ठायीं । होवोनियां राहीं । मिरासी तूं ॥१७८॥
मन आणि बुद्धि । प्रेमभावें दोन्ही । राहिलीं रिघोनि । मजमाजीं ॥१७९॥
तरी तुजलागीं । सुनिश्चयें पार्था । होईल सर्वथा । माझी प्राप्ति ॥१८०॥
मन बुद्धि दोन्ही । राहतां माझ्यांत । मी तूं ऐसें द्वैत । उरे कोठें ? ॥१८१॥
मालवतां दीप । जैसें तेज लोपे । प्रकाश हारपे । अस्तकाळीं ॥१८२॥
किंवा देहांतून । निघे जैसा प्राण । धांतवी मागून । इंद्रियें हि ॥१८३॥
तैसीं मनोबुद्धि । जातील हीं जेथें । संगें येई तेथें । अहंकार ॥१८४॥
म्हणोनियां माझ्या । स्वरूपाच्या ठायीं । ठेवोनियां देईं । मन बुद्धि ॥१८५॥
एवढें होतां च । धनंजया साच । सर्वव्यापी मी च । होसील तूं ॥१८६॥
बोलणें हें माझें । नाहीं अप्रमाण । वाहतसें आण । आपुली मी ॥१८७॥
अथ चित्तं समाधातुं न शक्रोषि मयि स्थिरम् ।
अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय ॥९॥
नातरी हें चित्त । मनबुद्धीसवें । पूर्णपणें द्यावें । माझ्या हातीं ॥१८८॥
तुज सर्वकाळ । घडे ना हें जरी । तरी ऐसें करीं । पंडु - सुता ॥१८९॥
क्षण एक तरी । देत जाईं चित्त । आठां प्रहरांत । थोडें थोडें ॥१९०॥
मग माझ्या ठायीं । राहतां जडून । सुखाचा जो क्षण । लाभे तेथें ॥१९१॥
त्या त्या क्षणीं पार्था । तेवढी अरुचि । उपजेल साची । विषयांत ॥१९२॥
संपोनियां वर्षा । शरत्काल रिगे । मग नदी लागे । ओहोटाया ॥१९३॥
तैसें वेगें चित्त । काढेल तेथून । प्रपंचीं गुंतून । राहिलें जें ॥१९४॥
किंवा शशिबिंब । पूर्णिमेपासून । दिसंदीस क्षीण । होय जैसें ॥१९५॥
मग अंवसेस । हारपे संपूर्ण । तैसें भोगांतून । निघोनियां ॥१९६॥
हळू हळू चित्त । रिघेल माझ्यांत । तरी तूं निभ्रांत । मी चि होसी ॥१९७॥
ह्यासी च अभ्यास - । योग ऐसें नांव । येणें योगें सर्व । साध्य होय ॥१९८॥
अभ्यासाचें बळ । मेळवोनि कोणी । अंतराळांतूनि । संचरती ॥१९९॥
व्याघ्रसर्पादिक । दुष्ट प्राणी कोणी । स्वाधीन करोनि । घेती येणें ॥२००॥
पायवाटे जाती । सागरावरोनि । पचविती कोणी । विष तें हि ॥२०१॥
कोणी शब्द - ब्रह्म । अभ्यासाच्या बळें । सर्वथा आणिलें । आटोक्यांत ॥२०२॥
अभ्यासाच्या बळें । मिळे ना जें साच । ऐसें तों नाहीं च । कांहीं एक ॥२०३॥
म्हणोनि तूं माझ्या । स्वरूपाच्या ठायीं । मिळोनियां जाईं । अभ्यासानें ॥२०४॥
अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्मपरमो भव ।
मदर्थमपि कर्माणि कुर्वन्सिद्धिमवाप्स्यसि ॥१०॥
अभ्यास हि ऐसा । करावयालागीं । जरी तुझ्या अंगीं । नाहीं बळ ॥२०५॥
तरी तुझा जैसा । नित्य व्यवहार । असूं दे साचार । तैसा चि तो ॥२०६॥
नको इंद्रियांचें । करूं निरोधन । विषय - सेवन । नको तोडूं ॥२०७॥
आपुल्या जातीचा । अभिमान तो हि । सोडावया कांहीं । नको येथ ॥२०८॥
विधि - निषेधाचें । करावें पालन । कुळ - धर्म पूर्ण । आत्व्ररावे ॥२०९॥
सर्व व्यवहार । करावया ऐसे । तुज दिधलीसे । मोकळीक ॥२१०॥
परी पार्था पाहें । मनें वाचा देहें । जैसा होत आहे । व्यापार जो ॥२११॥
तयाचा मी कर्ता । ऐसा अहंकार । अंतरीं साचार । नको ठेवूं ॥२१२॥
करणें आणिक । न क करणें तें हि । जाणे सर्व कांहीं । जगन्नाथ ॥२१३॥
जो का परमात्मा । जगत्सूत्रधार । विश्वाचे व्यापार । चालवितो ॥२१४॥
उणें पुरें कैसें । असो तुझें कर्म । ठेवीं मनोधर्म । सारिखा चि ॥२१५॥
नको मानूं त्याचा । चित्तीं हर्ष - शोक । जीवन - सार्थक । एक साधीं ॥२१६॥
माळियानें जळ । जया ठायीं नेलें । तया ठायीं गेलें । निवांत तें ॥२१७॥
तैसे तुझे व्हावे । सर्व हि व्यापार । जाणोनि ईश्वर । सूत्र - धारी ॥२१८॥
असो आडवाट । किंवा उजू मार्ग । रथासी का सांग । चिंता त्याची ॥२१९॥
म्हणोनि प्रवृत्ति - । निवृत्तीचा भार । नको माथ्यावर । बुद्धीचिया ॥२२०॥
नित्य निरंतर । तुझी चित्त - वृत्ति । राहूं दे किरीटी । माझ्या ठायीं ॥२२१॥
घडे तें तें कर्म । थोडें किंवा फार । नको हा विचार । मनीं आणूं ॥२२२॥
निवांत तें सर्व । मज समर्पून । ठेवीं अनुसंधान । माझ्या रूपीं ॥२२३॥
मग सर्वभावें । ऐसी होतां भक्ति । सायुज्याची प्राप्ति । अंतकालीं ॥२२४॥