Get it on Google Play
Download on the App Store

श्लोक ३१ ते ४०

सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः ।

सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते ॥३१॥

जैसा वस्त्रामाजीं । एक चि निभ्रांत । तंतु ओतप्रोत । भरलासे ॥७५९॥

तैसें माझें रुप । सर्वत्र संचलें । जेणें देखियेलें । ऐक्य -बोधें ॥७६०॥

किंवा नानाविध । होती अलंकार । सुवर्ण साचार । एक चि तें ॥७६१॥

ऐसा अद्वैताचा । अढळ पर्वत । अंतरीं स्थापित । केला जेणें ॥७६२॥

नातरी वृक्षाचीं । पानें असंख्यात । वृक्ष तो निश्चित । एकला चि ॥७६३॥

ऐसा ऐक्यबोध । प्रकाशे सर्वत्र । सरे जया रात्र । अज्ञानाची ॥७६४॥

स्वानुभवें पार्था । माझ्या योग्यतेस । आला जो पुरुष । ऐशा रीती ॥७६५॥

अडोनि राहील । कैसा उपाधींत । जरी तो दिसत । देहधारी ॥७६६॥

पार्था , माझें सर्व -। व्यापकत्व भलें । तयाचिया आलें । स्वानुभवा ॥७६७॥

म्हणोनिया तो हि । सर्वव्यापी पूर्ण । संबोधिल्यावीण। स्वभावें चि ॥७६८॥

देहधारी तरी । नव्हे तो देहाचा । तया कैसी वाचा । वर्णू शके ॥७६९॥

आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन ।

सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः ॥३२॥

म्हणोनि तें राहो । जो का निरंतर । देखे चराचर । आत्मरुप ॥७७०॥

शुभाशुभ द्वंद्व । नेणे सुख -दुःख । एक चि निःशंक । मानी दोन्ही ॥७७१॥

सम -विषम हे । धनंजया , भाव । आणिक हि सर्व । विविध जें ॥७७२॥

तें तें जो पुरुष । मानी सर्व थैव । जैसे अवयव । आपुले चि ॥७७३॥

जया त्रैलोक्य चि । असें मी आघवें । ऐसें चि स्वभावें । ठसावलें ॥७७४॥

तयासी हि असे । शरीर तें एक । म्हणे तया लोक । सुखी दुःखी ॥७७५॥

परी आमुचा तों । ऐसा अनुभव । पार्था सावयव । ब्रह्म चि तो ॥७७६॥

तरी स्वतांमाजीं । विश्व तें देखावें । आणि स्वयें व्हावें । विश्वरुप ॥७७७॥

धनंजया , ऐशा । एका साम्याची च । उपासना साच । करावी गा ॥७७८॥

ह्या चि साठीं आम्ही । प्रसंगानुसार । तुज वारंवार । सांगतसों ॥७७९॥

पार्था , समदृष्टी -। पलीकडे कांहीं । दुजी प्राप्ति नाहीं । जगामाजीं ॥७८०॥

अर्जुन उवाच ---

योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन ।

एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात्स्थितिं स्थिराम् ‍ ॥३३॥

चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद् ‍ दृढम् ‍ ।

तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ‍ ॥३४॥

तंव पार्थ म्हणे । देवा दयाघना । करोनि करुणा । आम्हांवरी ॥७८१॥

तुम्हीं साम्यतेचा । केला उपदेश । परी ह्या मनास । करुं काय ॥७८२॥

देखें तयाचा तों । चंचल स्वभाव । आमुचा टिकाव । कैंचा तेथें ॥७८३॥

कैसें केवढें हें । ऐसें पाहूं जातां । तरी तें सर्वथा । सांपडे ना ॥७८४॥

एर्‍हवी श्रीकृष्णा । पुरे ना तयास । वावरावयास । त्रैलोक्य हि ॥७८५॥

म्हणोनियां ऐसें । कैसें हें घडेल । समाधि साधेल । मर्कटातें ॥७८६॥

रहा म्हणों तरी । कैसा झंझावात । राहेल निवांत । क्षणभरी ॥७८७॥

केला जो निश्चय । तयातें टाळोन । बुद्धीलागीं मन । छळी जें का ॥७८८॥

आणि धैर्याचिया । हातावरी हात । मारोनियां जात । पळोनि जें ॥७८९॥

पाडीतसे भूल । जें का विवेकातें । तेविं संतोषातें । नादीं लावी ॥७९०॥

आणि एके ठायीं। बैसावें तरी हि । जें का दिशा दाही । हिंडावितें ॥७९१॥

येई उसळोनि । निरोधावें तरी । संयम चि करी । साह्य जया ॥७९२॥

ऐसें तें चंचळ । मन सर्व थैव । आपुला स्वभाव । सांडील का ? ॥७९३॥

म्हणोनिया मन । राहील निश्चळ । साम्य तें लाधेल । मग आम्हां ॥७९४॥

घडावें हें देवा । कैसें अघटित । शाशंकलें चित्त । ह्या चि लागीं ॥७९५॥

श्रीभगवानुवाच ---

असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् ‍ ।

अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च ग्रुह्यते ॥३५॥

तंव योगेश्वर । बोले पार्थाप्रति । मनाची ह्या स्थिति । तैसी च गा ॥७९६॥

स्वभावें चि मन । चंचल हें जाण । नव्हे अप्रमाण । बोल तुझा ॥७९७॥

परी वैराग्याच्या । अधिष्ठानें नीट । चोखाळावी वाट । अभ्यासाची ॥७९८॥

ऐसा कांहीं काळ । होतां चि अभ्यास । लाभेल तयास । सुस्थिरता ॥७९९॥

मनाचें कीं पार्था । असे एक भलें । तया आवडलें। जें जें कांहीं ॥८००॥

तेथें चि तें पाहे । सोकावोनि राहे । अनायासें लाह ए। तद्रूपता ॥८०१॥

म्हणोनि तयातें । कौतुकें साचार । दावीं वारंवार । आत्मसुख ॥८०२॥

असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः ।

वश्यात्मना तु यतता शक्योऽवाप्तुमुपायतः ॥३६॥

एर्‍हवीं विरक्ति । नाहीं जयांप्रति । न कधीं रिघती । अभ्यासीं जे ॥८०३॥

तयांसी हें मन । नावरे निभ्रांत । आमुचें हि मत । ऐसें चि गा ॥८०४॥

यमनियमांची । न चालती वाट । नाठविती गोष्ट । वैराग्याची ॥८०५॥

विषयांचे जळ । त्यांत सर्वकाळ । बुडोनि केवळ । राहिले जे ॥८०६॥

जन्मल्यापासोन । जयांचें का मन । योगाचें संधान । नेणे कदा ॥८०७॥

सांगें कैसें काय । तयांचें तें मन । एकाग्र होवोन । स्थिरावेल ॥८०८॥

म्हणोनियां मन । आवरलें जाय । ऐसा जो उपाय । आहे कांहीं ॥८०९॥

धनुर्धरा तोचि । आरंभोनि पाहें । निग्रह तो नोहे । मग कैसा ॥८१०॥

नाहीं तरी योग -। साधन जें होय । सर्व हि तें काय । अप्रमाण ॥८११॥

परी अभ्यासाची । गांठावया तड । आपणासी जड । ऐसें म्हण !॥८१२॥

पार्था , जरी होय । अंगीं योग -बळ । त्यापुढें चपळ । मन किती ॥८१३॥

महत्तत्त्वादिक । सकळ हें जाण । नव्हे का स्वाधीन । योग -बळें ॥८१४॥

तेव्हां तो अर्जुन । म्हण देवा भलें । तुम्हीं सांगितलें । सत्य चि तें ॥८१५॥

योग -बळासवें । देखा मनो -बळ । साच चि तोलेल । ऐसें नाहीं ॥८१६॥

तरी तो चि योग । कैसा केविं जाणों । गंधवार्तानेणों । ह्याची कांहीं ॥८१७॥

म्हणोनियां देवा । मन अनावर । ऐसें आजवर । म्हणों आम्हीं ॥८१८॥

तुझ्या कृपें आज । जन्मांत ह्या देख । योगाची ओळख । झाली आम्हां ॥८१९॥

अर्जुनउवाच ---

अयतिः श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः ।

अप्राप्य योगसंसिद्धि कां गतिं कृष्ण गच्छति ॥३७॥

कच्चिन्नोभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति ।

अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि ॥३८॥

एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्यशेषतः ।

त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते ॥३९॥

परी प्रभो एक । संशय आणिक । उपजला देख । स्वभावें चि ॥८२०॥

तुझियावांचोन । कराया तो दूर । समर्थ साचार । दुजा नाहीं ॥८२१॥

तरी सांगें देवा । श्रद्धाबळें कोणी । गांठायालागोनि । मोक्ष -पद ॥८२२॥

प्रवर्ताल येथ । नेणोनि साधन । निघे गांवाहून । इंद्रियांच्या ॥८२३॥

आत्मसिद्धिरुप । पुढिलिया गांवी । नांदणूक व्हावी । म्हणोनियां ॥८२४॥

आस्थोचिया वाटे । चालतां निःशंक । मावळला अर्क । आयुष्याचा ॥८२५॥

आत्म -सिद्धि तरी । नाहीं झाली प्राप्त । नाहीं येववत । मागुतें हि ॥८२६॥

सहजें अकाळ । अभ्र जें विरळ । वर्षे ना तें जळ । राहे हि ना ॥८२७॥

तैसीं तयालागीं । दोन्हीं अंतरलीं । दूर ती राहिली । मोक्ष -प्राप्ति ॥८२८॥

आणि अंतर्गत । श्रद्धेचें सामर्थ्य । तेणें झाला व्यर्थ । संसार हि ॥८२९॥

ऐसा दोर्होतें हि । जो का अंतरला । देखें मग्न झाला । श्रद्धेमाजीं ॥८३०॥

तयातें कोणती । गति लाभे अंतीं । तें चि मजप्रति । सांगें आतां ॥८३१॥

श्रीभगवानुवाच ---

पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते ।

न हि कल्याणकृत्कश्चिद्दुर्गतिं तात गच्छति ॥४०॥

मग तो श्रीकृष्ण । म्हणे पार्था पाहें । जया आस्था आहे । मोक्ष -सुखीं ॥८३२॥

तया मोक्षविण । सर्वथा आणिक । गति नाहीं देख । दुजी कोठें ॥८३३॥

परी एवढेंच । एक घडे साच । विसांवा मध्यें च । घ्यावा लागे ॥८३४॥

त्या हि विश्रांतींत । जी का सुखप्राप्ति । पार्था , लाभे ना ती । देवांसी हि ॥८३५॥

एर्‍हवीं तो जरी । चालता सत्वर । योगाभ्यासीं भर । देवोनियां ॥८३६॥

तरी सोऽहंसिद्धि । पावता तो साच । देहान्तापूर्वी च । पंडुसुता ॥८३७॥

परी नव्हे त्याचा । तेवढा तो वेग । म्हणोनियां चांग । विसावा चि ॥८३८॥

तयालागीं अंतीं। मोक्ष तो तैसाच । धनंजया , साच । ठेविलासे ॥८३९॥