श्लोक १५ ते २१
युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः ।
शान्तिं निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति ॥१५॥
ऐसें शक्तीचें तें । तेज होतां लीन । जाय हारपोन । देहाकार ॥५६५॥
मग लोकांचिया । दृष्टीलागीं देख । होय तो निःशंक । अगोचर ॥५६६॥
एर्हवीं शरीर । पूर्वीसारिखे च । परी गमे साच । वायूचें तें ॥५६७॥
सोपटें काढोन । कर्दळीचा गाभा । किंवा जैसा उभा । करावा तो ॥५६८॥
किंवा नभालागीं । व्हावे हातपाय । तैसें चि तें होय । शरीर गा ॥५६९॥
तयासी सुलभ । आकाशीं संचार । म्हणोनि ‘खेचरं ’ । नांव देती ॥५७०॥
पार्था ऐसें रुप । पावतां साचार । दिसे चमत्कार । लोकांलागीं ॥५७१॥
साधक तो जातां । निघोनियां वेगें । पाउलें जीं मागें । उमटती ॥५७२॥
सेवेसी सादर । पाउलागणिक । सिद्धि अणिमादिक । उभ्या तेथें ॥५७३॥
परी आपणासी । तेणें काज काय । पुढील ती सोय । ऐक आतां ॥५७४॥
पृथ्वी आप तेज । देहींचिया देहीं । ऐशापरी पाहीं । लुप्त होती ॥५७५॥
पृथ्वीलागीं जळ । टाकी विरवून । जळा जिरवून । टाकी तेज ॥५७६॥
धनंजया तया । तेजालागीं जाण । लोपवी पवन । हृदयांत ॥५७७॥
मग तो पवन । एकला आपण । राहतो धरोन । देहाकार ॥५७८॥
पुढें पार्था तो हि । मूर्धन्याकाशांत । मिळोनियां जात । संपूर्णत्वें ॥५७९॥
आतां कुंडलिनी । नाम हें लोपोनि । ‘मारुत ’ म्हणोनि । ओळखिती ॥५८०॥
परी शिवरुपीं । जाय ना मिळोन । राहे शक्तिपण । तोंवरी तें ॥५८१॥
मग जालंधर । बंध उल्लंघून । सर्वथा भेदून । काकीमुख ॥५८२॥
मूर्धन्याकाशाच्या । पहाडावरती । चढोनि राहाती । होय तेथें ॥५८३॥
ॐकाराच्या पाठीं । देवोनियां पाय । तत्काळ ती जाय । मग पुढें ॥५८४॥
सारोनि पायरी । पश्यन्तीची मागें । पार्था जाऊं लागे । वरिवरी ॥५८५॥
मग सर्वभावे । नद्या जैशा रीती । मिळोनियां जाती । सागरातें ॥५८६॥
अर्धमात्रेची हि । सीमा ओलांडीत । मूर्धन्याकाशांत । मिळे तैसी ॥५८७॥
पार्था ब्रह्मरंध्रीं । मग स्थिरावोनि । बाहू पसरोनि । सोऽहंभाव ॥५८८॥
परब्रह्मालागीं । देवोनियां मिठी । तद्रूप शेवटीं। होय तेथें ॥५८९॥
महा -भूतांची तों । उरे चि ना वार्ता । ऐसीं एक होतां । शिव -शक्ति ॥५९०॥
आकाशासकट । सामरस्यीं तेथें । आटोनियां जातें । सकळ हि ॥५९१॥
मेघाचिया द्वारा । सागरापासोनि । पार्था झालें पाणी । वेगळें जें ॥५९२॥
तें चि नदीरुप । घेवोनियां जैसें । सागरीं प्रवेशे । पुनरपि ॥५९३॥
धनुर्धरा तैसा । पिंडाचिया मिषें । शिव चि प्रवेशे । शिवामाजीं ॥५९४॥
आतां दुजें होतें । तें चि एक झालें । एक चि कीं ठेलें । स्वतःसिद्ध ॥५९५॥
ऐसी वाटाघाट । करावया जाण । पार्थ साक्षी कोण । उरे तेथें ॥५९६॥
मूर्धन्याकाशाचा । चिदाकाशीं लय । ऐसी जी का होय । स्थिति पार्था ॥५९७॥
ती च ब्रह्म -स्थिति । स्वानुभवें साच । नित्य भोगी तो च । सिद्ध जाण ॥५९८॥
संवादाच्या गांवीं । वसे ना ही मात । जी का शब्दातीत । स्वभावें चि ॥५९९॥
वैखरी जी वाहे । ऐसा अभिमान । कीं हा निवेदीन । अभिप्राय ॥६००॥
ती हि ब्रह्मस्थिती -। पासोनियां पाहें । कैसी दूर राहे । सर्वथैव ॥६०१॥
मध्यसंधीमाजीं । मकार मात्रेचा । रिघाव तो साचा । होई चि ना ॥६०२॥
आणि शून्यालागीं । भेटावया जाण । एकला तो प्राण । अवघडे ॥६०३॥
परी तो शून्यीं । मिळोनियां जातां । आली निःशब्दता । शब्दालागीं ॥६०४॥
मग शून्याची हि । होतसे आटणी । पार्था महा -शून्यीं । संपूर्णत्वें ॥६०५॥
महा -शून्याचिया । डोहामाजीं आतां । जेथें नाहीं वार्ता । शून्याची हि ॥६०६॥
तेथें बोलची ह्या । कोठोनियां ठाव । हें तों सर्वथैव । अनिर्वाच्य ॥६०७॥
म्हणोनियां कानीं । ऐकतां येईल । किंवा सांपडेल । बोलामाजीं ॥६०८॥
ब्रह्मस्थिति तैसी । नव्हे ती साचार । जाण हें त्रिवार । सत्य बापा ॥६०९॥
स्वानुभवें ऐसी । ब्रह्मस्थिति प्राप्त । जिये काळीं होत । दैवयोगें ॥६१०॥
तिये वेळीं मग । व्हावें तदाकार । ऐसें चि हें सारे । जाणावें गा ॥६११॥
जाणणें तें पुढें । उरी चि ना पार्था । ह्या परी पावतां । तद्रूपता ॥६१२॥
म्हणोनि हे राहो । देखें धनंजया । किती बोलूं वायां । तें चि आतां ॥६१३॥
जेथोनियां ऐसें । होवोनि कुंठित । माघारें फिरत । शब्दजात ॥६१४॥
शिरे ना वारा हि । विचाराचा जेथें । आयुष्य संपतें । संकल्पाचें ॥६१५॥
उन्मनावस्थेचें । सौंदर्य जें साचें । तेविं तुरीयेचें । तारुण्य जें ॥६१६॥
जें का अमर्याद । अनादि चोखाळ । विश्वाचें जें मूळ । परब्रह्म ॥६१७॥
तेविं योगरुप । वृक्षाचें जें फळ । चैतन्य केवळ । आनंदाचें ॥६१८॥
आकाराचा प्रांत । मोक्षाचा एकांत । जें का विरहित । आदिअंत ॥६१९॥
महाभूताचें हि । पार्था जें का बीज । जेथोनियां तेझ । सूर्यातें हि ॥६२०॥
ऐसें माझें निज -। स्वरुप सहज । तें चि चतुर्भुज । अंकुरलें ॥६२१॥
भक्त -वृंदावरी । नास्तिकांकडोन । झालें आक्रमण । देखोनियां ॥६२२॥
अर्जुना निर्गुण -। स्वरुपाची भली । देखें प्रकटली । शोभा येथें ॥६२३॥
पार्था , महासुख । ऐसें शब्दातीत । निश्चयें चि प्राप्त । केलें ज्यांनीं ॥६२४॥
स्वयें सुखरुप । होवोनि ते ठेले । कृतकृत्य झाले । येणें मार्गे ॥६२५॥
सांगितलें आम्हीं । ऐसें हें साधन । अनुष्ठिती जाण । शरीरी जे ॥६२६॥
योगाभ्यासें शुद्ध । होवोनि ते भले । माझिया पावले । योग्यतेसी ॥६२७॥
देखें देहाकार । हीच कोणी मूस । तींत ब्रह्मरस । ओतोनियां ॥६२८॥
पार्था जणूं काय । घडविली मूर्ति । ऐसे चि दिसती । शरीरें ते ॥६२९॥
स्वानुभूति ऐसी । हृदन्तरीं फांके । तरी सर्व झांके । विश्व चि हें ॥६३०॥
तंव पार्थ म्हणे । बोलतां हें साच । संदेह नाहींच । येथें कांहीं ॥६३१॥
सांगितलें देवा । तुम्हीं जें साधन । ब्रह्म -प्राप्ति -स्थान । तें चि होय ॥६३२॥
म्हणोनियां तेथें । ब्रह्मसाक्षात्कार । घडेल साचार । जीवालागीं ॥६३३॥
चालविती दृढ । ऐसा योगाभ्यास । निश्चयें तयांस । ब्रह्म -प्राप्ति ॥६३४॥
हें चि आताम मज । भलें कळों आलें । जैसें सांगितलें । तुम्हीं देवा ॥६३५॥
योगाची ही गोष्ट । ऐकतां चि चित्त । होतसे जागृत । ज्ञानाठायीं ॥६३६॥
तरी येतां मग । प्रचीत ती तैसी । होईल ना कैसी । तल्लीनता ॥६३७॥
म्हणोनियां तुम्हीं । बोलिलें जें कांहीं । अन्यथा तें नाहीं । निःसंदेह ॥६३८॥
परी ऐकें देवा । विनंति ती येथ । देवोनियां चित्त । क्षणभरी ॥६३९॥
आतां तुवां जो हा । सांगितला योग । तो चि आला चांग । मना माझ्या ॥६४०॥
परी माझ्या ठायीं । योग्यतेची वाण । तरी अनुष्ठान । घडे कैसें ॥६४१॥
स्वभावें जें कांहीं । माझ्या अंगीं बळ । तेणें चि केवळ । जरी साधे ॥६४२॥
तरी सुखें हा चि । अभ्यासीन योग । जेणें कार्यभाग । अनायासें ॥६४३॥
किंवा देवा तुम्हीं । बोलिलें साधन । वाटलें कठीण । आचराया ॥६४४॥
तरी तें फिरुन । दुजें विचारीन । योग्यतेवांचून । साधेल जें ॥६४५॥
ऐसा चि उद्देश । अंतरीं म्हणोन । जाहलें कारण । पुसावया ॥६४६॥
मग म्हणे देवा । आतां द्यावें चित्त । ऐकिलें का येथ । पुसतसें ॥६४७॥
निरुपिली तुम्हीं । योग -साधना ही । सांग कोणतें हि । साधवेल ? ॥६४८॥
योग्यतेवांचून । किंवा ही साधना । साधेल ना कोणा । ऐसें आहे ? ॥६४९॥
तंव बोलें तेथ । देव कृष्णराय । पुससी हें काय । धनुर्धरा ॥६५०॥
हा तों योग -पंथ । थोर मोक्षदायी । परी जें जें कांहीं । आणिक हि ॥६५१॥
सर्वसाधारण । तें तरी साधन । योग्यतेवांचून । सिद्ध होय ? ॥६५२॥
परी योग्यपण । प्राप्तीच्या आधीन । सर्वथैव जाण । धनंजया ॥६५३॥
होवोनियां योग्य । करावें जें काज । फळे तें सहज । आरंभीं च ॥६५४॥
योग्यता ती काय । ऐसी वस्तु आहे । सहजें जी लाहे । बाजारांत ॥६५५॥
आणि योग्यतेची । असे काय खाण । कीं तेथें जावोन । आणावी ती ॥६५६॥
क्षणैक विरक्त । जाहला जो जेथ । तेविं नियमित । देह -धर्मी ॥६५७॥
ऐसा व्यवस्थित । राहे व्यवहारीं । तो चि अधिकारी । नोहे काय ? ॥६५८॥
लावोनि हा कस । करितां विचार । तुज हि साचार । योग्यता ही ॥६५९॥
अर्जुनाची ऐसी । फेडिली आशंका । प्रसंगे चि देखा । योगेश्वरें ॥६६०॥
मग देव म्हणे । ऐसी ही व्यवस्था । तुजलागीं पार्था । सांगितली ॥६६१॥
सांडोनि नियम । वागे जो यथेष्ट । अपात्र तो येथ । स्वभावें चि ॥६६२॥
नात्यश्नतस्तु योगोऽस्तु न चैकान्तमनश्नतः ।
न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव अर्जुन ॥१६॥
जिह्रेचिया राहे । होवोनि अंकित । वाहे जो जीवित । निद्रेलागीं ॥६६३॥
तयालागीं येथें । नाहीं अधिकार । ऐसें चि साचार । बोलिलेंस ॥६६४॥
किंवा कारागारीं । दुराग्रहाचिया । ठेवी कोंडोनियां । क्षुधा -तृषा ॥६६५॥
तोडितो आहार । मारोनियां भूक । नांव नेघे देख । निद्रेचें जो ॥६६६॥
ऐसा बळकट । घेवोनियां हट्ट । सर्वथा मोकाट । नाचे जो का ॥६६७॥
न राहे तयाचा । देह हि स्वाधीन । योग तो कोठून । मग तेथें ॥६६८॥
म्हणोनियां अति । विषय -सेवन । तेथें नको मन । जाऊं देऊं ॥६६९॥
करावें सर्वथा । किंवा निरोधन । हें हि नको जाण । धनंजया ॥६७०॥
युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥१७॥
सेवावा आहार । परी परिमित । आणि क्रियाजात । तैसें चि तें ॥६७१॥
नये बोलूं फार । किंवा नको मौन । करावें भाषण । मोजकें चि ॥६७२॥
असावें नेमस्त । चालणें तें पाहीं । वेळीं निद्रेतें हि । मान द्यावा ॥६७३॥
जागणें तें तरी । व्हावें परिमित । येणें समधात । राहे देह ॥६७४॥
धनंजया ऐसें । युक्तीचिया हातें । सर्व इंद्रियांतें । देताम खाद्य ॥६७५॥
मग स्वभावतां । मन चि तें तेथ । करी वृद्धिंगत । संतोषातें ॥६७६॥
यदा विनियतं चित्तमात्मन्येवावत्ष्ठते ।
निस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा ॥१८॥
इंद्रियें तीं ऐसीं । होतां नियंत्रित । तंव अंतरांत । सुख वाढे ॥६७७॥
घडे तेथेम योग । स्वभावेम तयास । पडे ना सायास । साधनेचा ॥६७८॥
होतां भाग्योदय । उद्योगाचे मिषें । घरा येई जैसें । सर्वैश्चर्य ॥६७९॥
तैसा संयमी तो । पार्था जेव्हां होत । कौतुकें प्रवृत्त । योग्याभ्यासीं ॥६८०॥
स्वभावतां तेव्हां । आत्मसिद्धीची च । अनुभूति साच । येई तया ॥६८१॥
म्हणोनियां ऐसा । जो का भाग्यवंत । संयमें वर्तत । जगामाजीं ॥६८२॥
अर्जुना तो मोक्ष -। रुप सिहासनीं । विराजे निदानीं । निश्चयें चि ॥६८३॥
यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता ।
योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः ॥१९॥
योगाचिया अंगा । जडे जैं संयम । प्रयाग -संगम । ऐसा घडे ॥६८४॥
त्या चि पुण्यक्षेत्रीं । करोनि निवास । जयाचें मानस । स्थिरावलें ॥६८५॥
योगयुक्त ऐसें । तया अभिधान । आणिक हि जाण । प्रसंगें तूं ॥६८६॥
निर्वातींचा दीप । तेवतो निवांत । राहे स्वस्थचित्त । तैसा चि तो ॥६८७॥
आतां मनोगत । जाणोनियां तुझें । आम्ही सांगतों जें । तुजलागीं ॥६८८॥
ऐक तें कौन्तेया । देवोनियां चित्त । जेणें तुझें हित । होय अंतीं ॥६८९॥
व्हावी योग -प्राप्ति । ऐसी इच्छा मनीं । न होसी साधनीं । परी दक्ष ॥६९०॥
काय अभ्यासाचेम । तुज वाटे भय । अवघड तो होय । म्हणोनियां ॥६९१॥
तरी पार्था , वायां । नको होऊं कष्टी । ऐकोनियां गोष्टी । इंद्रियांच्या ॥६९२॥
इंद्रियें हीं दुष्ट । दाविती बागूल । सर्वथा तो फोल । ऐसें जाण ॥६९३॥
देखें आयुष्यातें । करी जें का स्थिर । सारोनियां दूर । मृत्यूलागीं ॥६९४॥
तया औषधातें । जिह्रा शत्रुवत् । स्वभावें लेखीत । नाहीं काय ॥६९५॥
तैसें आत्म -हित । करोनि जें देतें । तें तें पाटे ह्यांतें । दुःखप्रद ॥६९६॥
नाहीं तरी काय । योगाभ्यासासम । साधन सुगम । दुजें आहे ? ॥६९७॥
यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया ।
यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति ॥२०॥
सुखमात्यन्तिकं यत्तद्बुद्धिग्रह्यमतीन्द्रियम् ।
वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः ॥२१॥
म्हणोनियां दृढ । आसनादि भला । आम्हीं जो बोलिला । योगाभ्यास ॥६९८॥
तेणें इंद्रियांसी । लागला नियम । झालें तरी काम । स्वभावें चि ॥६९९॥
इंद्रिय -निग्रहें । होतां योगाभ्यास । चित्त चैतन्यास । भेटूं पाहे ॥७००॥
सोडोनि विषय । पाठिमोरें ठाके । आपण चि देखे । आपणासी ॥७०१॥
मग आत्मरुप । देखतांक्षणीं च । ओळखोनि ‘मी च । तत्त्व ’ म्हणे ॥७०२॥
स्वरुपाची ऐसी । होतां ओळखण । लाभतें संपूर्ण । सुख तया ॥७०३॥
स्वभावें चि मग । चित्त चैतन्यांत । मिळोनियां जात । सामरस्यें ॥७०४॥
जयाहूनि दुजें । आणिक तें नाहीं । इंद्रियां कधीं हि । नेणवे जें ॥७०५॥
ऐशा आत्मरुपीं । होवोनि तद्रूप । राहे आपोआप । आपण चि ॥७०६॥