Get it on Google Play
Download on the App Store

श्लोक ३१ ते ४२

N/A

यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् ‍ ।

नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरुसत्तम ॥३१॥

ऐसें स्वयंसिद्ध । शुद्ध निर्विशेष । जें का यज्ञीं शेष । राहे ज्ञान ॥२६२॥

तें चि ब्रह्मश्रेष्ठ । सेविती पवित्र । अहं ब्रह्म ’ मंत्र । जपोनियां ॥२६३॥

उरे जें यज्ञान्तीं । ऐसें ज्ञानामृत । सेवोनि तें तृप्त । जाहले जे ॥२६४॥

त्यांसी अमृतत्व । लाभलें म्हणोन । अनायासें जाण । ब्रह्मप्राप्ति ॥२६५॥

जयां जन्मोनियां । संयमाग्निसेवा । घडे ना पांडवा । कदाकाळीं ॥२६६॥

तेविं जे का योग -। याग न करिती । वरी ना विरक्ति । तयांलागीं ॥२६७॥

पार्था नाहीं नीट । जयांचे ऐहिक । काय पारत्रिक । सांगूं त्यांचें ॥२६८॥

एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे ।

कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥३२॥

असो नानापरी । याग हे अनेक । सांगितले देख । तुजलागीं ॥२६९॥

तयांचें वर्णन । वेदांमाजीं चांग । केलें असे साङ्‌ग । सविस्तर ॥२७०॥

परी विस्ताराशीं । आम्हां काय काज । जाण ते कर्म -ज । सकळ हि ॥२७१॥

जाणतां यज्ञाचें । रहस्य हें पार्था । पावे ना सर्वथा । कर्मबंध ॥२७२॥

श्रेयान्द्रव्यमयाद्यज्ज्ञानयज्ञः परंतप ।

सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ॥३३॥

नानाविध क्रिया । सांगितल्या ज्यांत । मूळ तें वेदांत । असे ज्यांचें ॥२७३॥

द्रव्य -यज्ञ ऐसें । तयांलागीं नांव । देती ते अपूर्व । स्वर्ग -सुख ॥२७४॥

परी सूर्यापुढें । नक्षत्रांचे तेज । लोपतें सहज । जैशा रीती ॥२७५॥

तैसे पार्था जाण । ज्ञानयज्ञाहून । सर्वथा ते गौण । द्रव्य -यज्ञ ॥२७६॥

परमात्मसुख -। निधान लाभावें । अखंड भोगावें । समाधान ॥२७७॥

म्हणोनियां योगी । जें का ज्ञानांजन । बैसले घालोन । नेत्रांमाजीं ॥२७८॥

धांवत्या कर्माचें । जें का प्राप्यस्थान । नैष्कर्म्याची खाण । दाखवी जें ॥२७९॥

आत्मप्राप्तीसाठीं । भुकेले जे होती । साधनें करिती । नानविध ॥२८०॥

तया साधनांची । सरे जेथें वाट । साधक संतुष्ट । होती जेथें ॥२८१॥

पांगुळली जेथें । कर्माची प्रवृत्ति । अंध झाली दृष्टि । तर्काची हि ॥२८२॥

जेणें इंद्रियासी । स्वभावें साचार । पडला विसर । विषयांचा ॥२८३॥

मनाचें हि जेथें । गेलें मनपण । बोलातें हि मौन । पडे जेथें ॥२८४॥

जयामाजीं ज्ञेय । प्रत्यक्ष तें भेटे । जेथें पांग फिटे । वैराग्याचा ॥२८५॥

विवेकाचा सोस । तुटोनियां जाय । आत्मप्राप्ति होय । अनायासें ॥२८६॥

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ।

उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥३४॥

बरवें तें ज्ञान । प्राप्त व्हावें ऐसी । उत्कंठा मानसीं । असे जरी ॥२८७॥

तरी सर्वभावें । भजावें संतांसी । माहेर ज्ञानासी । होती जे का ॥२८८॥

तेथें सेवा हा चि । दारवंठा जाण । करावा स्वाधीन । दास्यभावें ॥२८९॥

तन -मन -जीवें । चरणीं लागावें । दास्य तें करावें । नम्रपणें ॥२९०॥

विचारितां त्यांसी । मग अपेक्षित । तें चि कृपावंत । सांगतील ॥२९१॥

पार्था गुरुवाक्य । पडतां श्रवणीं । अखंड उन्मनी । आत्मबोधें ॥२९२॥

यज्ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्ण्डव ।

येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यान्मन्यथो मयि ॥३५॥

गुरुवाक्योदयें । चित्त मग होय । निःशंक निर्भय । ब्रह्माऐसें ॥२९३॥

तिये वेळीं पार्था । सर्व भूतजात । आपणांसहित । अखंडित ॥२९४॥

माझिया स्वरुपीं । देखसी तत्त्वतां । गुरुकृपें होतां । ज्ञानोदय ॥२९५॥

ज्ञानाचा प्रकाश । पडतां चि देख । मोहाचा काळोख । नष्ट होय ॥२९६॥

अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः ।

सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि ॥३६॥

पापाचें आगर । भ्रांतीचा सागर । होसी तूम डोंगर । व्यामोहाचा ॥२९७॥

तरी ज्ञानापुढें । तुच्छ तें सकळ । ऐसें ज्ञान -बळ । निर्मळ हें ॥२९८॥

श्रेष्ठ निराकार । आत्म -स्वरुपाचा । कवडसा साचा । विश्व -भ्रम ॥२९९॥

तो चि जेणें ज्ञानें । विरोनियां जाय । तेथें राहे काय । मनोमळ ॥३००॥

साशंकता येथें । सर्वथा वाईत । नाहीं जगीं श्रेष्ठ । ज्ञानाऐसें ॥३०१॥

यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात्कुरुतेऽर्जुन ।

ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा ॥३७॥

पार्था त्रिभुवन । पेटतां सकळ । गगनीं जी धूळ । उधळते ॥३०२॥

प्रळय -काळींच्या । वावटाळीपुढें । ती हि जेथें उडे । क्षणार्धांत ॥३०३॥

तेथें क्षणमात्र । बापुडा तो ढग । टिकेल का सांग । धनुर्धरा ॥३०४॥

किंवा पवनाच्या । क्षोभें भडकून । टाकितो जाळून । पाण्यातें हि ॥३०५॥

ऐसा प्रळयाग्नि । तृणें काष्ठें काय । दडपला जाय । लेशमात्र ॥३०६॥

न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।

तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति ॥३८॥

म्हणोनि असो हें । न घडे कल्पान्तीं । दिसे विसंगति । पाहतां चि ॥३०७॥

तरी तेथें ज्ञाना -। सारिखें पावन । दुजें नाहीं जाण । निःसंदेह ॥३०८॥

चैतन्यासमान । नाहीं च आणिक । तैसें ज्ञान देख । सर्वोत्तम ॥३०९॥

तेजीं भास्कराच्या । कसासी लागेल । जरी जळांतील । प्रतिबिंब ॥३१०॥

किंवा मुठीमाजीं । मावेल आकाश । जातां धरायास । तयालागीं ॥३११॥

ना तरी पृथ्वीचा । करावया तोल । आणिक भूगोल । जरी होय ॥३१२॥

तरी च सर्वथा । घडेल उपमा । पार्था सर्वोत्तमा । ज्ञानासी ह्या ॥३१३॥

नाना परी ऐसा । करितां विचार । आणि वारंवार । निर्धारितां ॥३१४॥

ज्ञानाचें पावित्र्य । ज्ञानीं च तें मात्र । अर्जुना अन्यत्र । नसे कोठें ॥३१५॥

अमृताची रुची । अमृतासमान । उपमावें ज्ञान । ज्ञानाशीं च ॥३१६॥

बोलोनि अधिक । आतां धनंजया । कां गा वेळ वायां । दवडावा ॥३१७॥

ऐकोनि हें वाक्य । मग म्हणे पार्थ । बोलणें यथार्थ । तुझें देवा ॥३१८॥

परी तें चि ज्ञान । आकळावें कैसें । पुसावें जों ऐसें । धनंजयें ॥३१९॥

तों चि जाणोनियां । त्याचें मनोगत । देव भगवंत । काय बोले ॥३२०॥

म्हणे मी सांगेन । ज्ञानाचें साधन । आतां अवधान । देई पार्था ॥३२१॥

श्रद्धावॉंल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ।

ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥३९॥

निजानंदी गोडी । लागली म्हणोन । विटे जो संपूर्ण । विषयांसी ॥३२२॥

जयाचिया ठायीं । इंद्रियांसी मान । नसे चि गा जाण । सर्वथैव ॥३२३॥

देई ना जो मनीं । वासनेसी थार । प्रकृति -व्यापार । नेघे माथां ॥३२४॥

स्वरुप -श्रद्धेचा । घेवोनि संभोग । होय जो का साङ्‍ग । सुखरुप ॥३२५॥

तया तें चि ज्ञान । येतें धुंडाळीत । पार्था होतें प्राप्त । निश्चयें चि ॥३२६॥

जया ज्ञानामाजीं । शांति अखंडित । राहे ओतप्रोत । भरोनियां ॥३२७॥

अंतरीं तें ज्ञान । होतां चि सुस्थिर । शांतीचा अंकुर । फुटे तेथें ॥३२८॥

आणि आत्मबोध -। विस्तार बहुत । होतसे प्रकट । धनुर्धरा ॥३२९॥

मग पाहे तेथें । तयालागीं देख । शान्ति -सुख एक । निर्धारितां ॥३३०॥

ज्ञानबीजाचा हा । वाढता विस्तार । सांगतां अपार । असो आतां ॥३३१॥

अज्ञश्वाश्रद्दधानश्व संशयात्मा विनश्यति ।

नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः ॥४०॥

स्वरुप -ज्ञानाची । नसे गोडी कांहीं । जयाचिया ठायीं । धनुर्धरा ॥३३२॥

काय म्हणूं तरी । तयाचें तें जिणें । त्याहून मरणें । तें हि भलें ॥३३३॥

असावें एखादें । जैसें ओस गेह । किंवा जैसा देह । प्राणाविण ॥३३४॥

तैसें ज्ञानहीन । तयाचें जीवन । शून्यवत् ‍ जाण । भ्रांतियुक्त ॥३३५॥

नसे तरी नसो । आत्मज्ञानप्राप्ति । परी आस्था चित्तीं । वसे जरी ॥३३६॥

तरी तेथें ज्ञान -। प्राप्तीचा ओलावा । संभवेल जीवा । कदाकाळीं ॥३३७॥

ज्ञान तें राहो च । परी त्याची आस्था । ती हि नसे पार्था । ज्याच्या चित्तीं ॥३३८॥

तो तरी निभ्रांत । सांपडला येथ । सर्वथा आगींत । संशयाच्या ॥३३९॥

अमृत हि परी । नावडे तें देख । ऐसें अरोचक । पडे जेव्हां ॥३४०॥

तेव्हां कळों येतें । सहजें चि जाण । रोकडें मरण । आलें ऐसें ॥३४१॥

तैसा भोगसुखीं । रंगोनियां जाय । धरी ना जो सोय । ज्ञानाची ह्या ॥३४२॥

ऐसा मदोन्मत्त । संशयें तो ग्रस्त । जाहला निभ्रांत । ऐसें मानीं ॥३४३॥

सांपडतां मग । ऐसा संशयांत । तयाचा निभ्रांत । नाश होय ॥३४४॥

इह -परलोकीं । नाहीं तया सुख । धनंजया देख । लेशमात्र ॥३४५॥

कळे ना शीतोष्ण । होतां सन्निपात । वन्हि -चंद्रिकेंत । भेद नाहीं ॥३४६॥

संशयें जो तैसा । ग्रासिला सर्वथा । नोळखे तो पार्था । हिताहित ॥३४७॥

चांगलें -वाईट । नोळखे कांहीं च । मिथ्या आणि साच । एक मानी ॥३४८॥

जैसी जन्मांधासी । दिनरात्रीं नाहीं । तैसें नेणे कांहीं । संशयात्मा ॥३४९॥

योगसंन्यस्तकर्माणं ज्ञानसांछिन्नसंशयम् ‍ ।
आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनंजय ॥४१॥

संशयापासोनि । म्हणोनि आणिक । नाहीं विनाशक । घोर पाप ॥३५०॥

ह्या चि लागीं तोडीं । घातक हा पाश । जिंकोनियां ह्यास । सर्वाआधीं ॥३५१॥

जेथें असे पार्था । ज्ञानाचा अभाव । तेथें ह्यासी ठाव । राहावया ॥३५२॥

अज्ञानाचा गाढ । पडतां अंधार । वाढे अनिवार । मानसीं हा ॥३५३॥

म्हणोनि श्रद्धेची । सांपडे ना वाट । पार्था घनदाट । अंधारीं त्या ॥३५४॥

हृदयासहित । ग्रासितां बुद्धीतें । संशयें कोंदाटे । लोकत्रय ॥३५५॥

तस्मादज्ञानसंभूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः ।

छित्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ॥४२॥

इति श्रीमद्भगवद्भीतासूपानिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसंन्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः ॥४॥

ऐसा बळजोर । घोर हा संशय । जिंकाया उपाय । तो चि एक ॥३५६॥

तीक्ष्ण ज्ञान -खड्‌ग । जरी हाता आलें । तरे कार्य झालें । स्वभावें चि ॥३५७॥

तीव्र ज्ञानखड्‌गें । तेणें हा संपूर्ण । नष्ट होतो जाण । धनंजया ॥३५८॥

संशय -निरास । होतां मनोमळ । सहज सकळ । नाश पावे ॥३५९॥

म्हणोनि संशय । जो हा अंतरींचा । निरास तयाचा । करोनियां ॥३६०॥

आतां धनुर्धरा । ऊठ तूं सत्वर । सर्वथा स्वीकार । धैर्यवृत्ति ॥३६१॥

सर्वज्ञांचा बाप । जो का ज्ञानदीप । होवोनि सकृप । बोले ऐसें ॥३६२॥

संजय तो म्हणे । धृतराष्ट्रप्रति । वृत्तांत्त हा चित्तीं । घेई राया ॥३६३॥

असो , श्रीकृष्णाचे । ऐकोनि हे बोल । पार्थ विचारील । प्रश्न भला ॥३६४॥

जो का पूर्वापर -। संबंध पाहोन । समय जाणोन । असे केला ॥३६५॥

तो चि कथाभाग । आतां सुसंगत । जाईल साद्यन्त । सांगितला ॥३६६॥

नाना भावार्थाचा । असे जो का कोष । रसाचा उत्कर्ष । सर्वा परी ॥३६७॥

टाकावे आठ हि । रस ओवाळून । ऐसी शोभा जाण । असे ज्याची ॥३६८॥

तेवि जगामाजीं । स्थान विश्रांतीचें । असे जो बुद्धीचें । सज्जनांच्या ॥३६९॥

अपूर्व तो शांत -। रस प्रकटेल । जेथे , ऐसे बोल । मराठी हे ॥३७०॥

ऐका सावधान । महार्णवाहून । होती जे गहन । अर्थपूर्ण ॥३७१॥

जरी सूर्यबिंब । बचकेएवढें । प्रकाशा थोकडें । लोकत्रय ॥३७२॥

देखा बोलाची ह्या । तैसी व्यापकता । येईल सर्वथा । प्रत्ययासी ॥३७३॥

किंवा जैसा जो जो । जी जी इच्छा धरी । ती ती पूर्ण करी । कल्पवृक्ष ॥३७४॥

तैसा चि हा बोल । जाणावा व्यापक । तरी द्यावें एक । अवधान ॥३७५॥

असो काय फार । आपणां सांगावें । सर्व हि स्वभावें । जाणतसां ॥३७६॥

करावें श्रवण । देवोनियां चित्त । हीच माझी येथ । विनवणी ॥३७७॥

सद्‍गुणी कुलीन । रुपवती नारी । आणि त्या हि वरी । पतिव्रता ॥३७८॥

तैसी सालंकृत । कवित्वरचना । शांतरसें जाणा । शोभतसे ॥३७९॥

आधींच साखर । आवडे बहुत । ती च औषधांत । जरी जोडे ॥३८०॥

तरी सेवूं नये । कां तें वारंवार । सर्वथा साचार । आवडीनें ॥३८१॥

देखा मलयाद्री -। वरोनि वहात । मंद सुगंधित । येतां वायु ॥३८२॥

जोडला तयासी । अमृताचा स्वाद । आणि मधु नाद। दैवयोगें ॥३८३॥

तरी सर्वागातें । स्पर्शे शांतवील । स्वादें तोषवील । जिह्रेलागीं ॥३८४॥

नादें कर्णौद्रिया -। कडोनि साचार । सुखें धन्योद्धार । काढवील ॥३८५॥

तैसें गीतार्थाचें । घडतां श्रवण । तृप्ति परिपूर्ण । कानालागीं ॥३८६॥

आणि अनायासें । संसाराचें दुःख । लोपेल निःशंक । आमोलाग्र ॥३८७॥

जरी मंत्रानें च । होय वैरी ठार । वायां का कटयार । बाळगावी ॥३८८॥

दूधसाखरेनें । जाय जरी रोग । सेवावा कां मग । कडूनिब ॥३८९॥

तैसें मनालागीं । रोधिल्यावांचोन । दुःख दिल्यावीण । इंद्रियांतें ॥३९०॥

येथें अनायासें । लाभतें निर्वाण । घडतां श्रवण । एकलें चि ॥३९१॥

म्हणोनि प्रसन्न । ठेवोनियां मन । ऐका सावधान । गीतार्थ हा ॥३९२॥

ऐसी विज्ञापना । करी श्रोतयांस । निवृत्तीचा दास । ज्ञानदेव ॥३९३॥

इति श्री स्वामी स्वरुपानंदविरचित श्रीमत् ‍ अभंग -ज्ञानेश्वरी चतुर्थोऽध्यायः ।

हरये नमः । हरये नमः । हरये नमः । श्रीकृष्णार्पणमस्तु ।