श्लोक ३१ ते ४३
ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः ।
श्रद्धवन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ॥३१॥
जे जे कोणी माझें । यथार्थ हें मत । मानिती अत्यंत । पूज्यभावें ॥३२३॥
ठेवोनियां श्रद्धा । मग पूर्णपणें । काया -वाचा -मनें । अनुष्ठिती ॥३२४॥
सकळ हि कर्मी । ते ते वावरोत । परी कर्मातीत । ओळख तूं ॥३२५॥
म्हणोनि स्वकर्म । करावें उचित । हें चि हें निश्चित । मत माझें ॥३२६॥
ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् ।
सर्वज्ञानविमूढांस्तान्विद्धि नष्टानचेतसः ॥३२॥
नातरी होवोनि । देहभावीं दृढ । पुरवोनि लाड । इंद्रियांचे ॥३२७॥
अर्जुना , हें माझें । मत अव्हेरोनि । सांडिती लेखोनि । सामान्यत्वें ॥३२८॥
हा तों अर्थवाद । ऐसी वाचाळता । करोनि तुच्छता । दाविती जे ॥३२९॥
मोह -मर्द्यें साच । होवोनि ते भ्रांत । झाले विर्षे व्याप्त । विषयांच्या ॥३३०॥
अज्ञानाच्या पंकीं । बुडोनि ते वायां । गेले धनंजया । निःसंदेह ॥३३१॥
प्रेताहातीं दिलें । रत्न वायां गेलें । व्यर्थ उजाडलें । जन्मांधातें ॥३३२॥
कावळ्यासी जैसा । चंद्रोदय देख । मूढासी विवेक । रुचे ना हा ॥३३३॥
ऐसे जे विन्मुख । झाले परमार्था । बोलूं नये पार्था । तयांसंगें ॥३३४॥
पतंगा प्रकाश । साहवे ना जैसा । विवेक ना तैसा । रुचे त्यांसी ॥३३५॥
म्हणोनि हें माझें । मत अव्हेरोन । मत्सरेंकरोन । निंदिती ते ॥३३६॥
पतंगें दीपासी । दिलें आलिंगन । अचूक मरण । तरी त्यासी ॥३३७॥
विषयांच्या भोगें । तैसें चि पतन । स्वरुपापासोन । जीवालागीं ॥३३८॥
सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि ।
प्रकृति यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति ॥३३॥
म्हणोनि ज्ञात्यानें । करुं नये पाहीं । लाद कौतुकें हि । इंद्रियांचे ॥३३९॥
सर्पासवें काय । खेळतां येईल । सिद्धीस जाईल । व्याघ्र -संग ॥३४०॥
सेविलें कौतुकें । जरी हालाहल । तरी तें जिरेल । कैसें सांग ॥३४१॥
सहजें खेळतां । जरी लागे आग । भडकतां मग । सांवरे ना ॥३४२॥
तैसा इंद्रियांसीं । लाविला जो लळा । परिणामीं भला । नाहीं नाहीं ॥३४३॥
पाहें अर्जुना , ही । पराधीन काया । भोगावे कां वायां । नाना भोग ॥३४४॥
सर्वथा सायास । करोनि आपण । जोडावें जें धन । सकळ हि ॥३४५॥
तेणें अहोरात्र । कां गा प्रतिपाळ । करावा केवळ । देहाचा ह्या ॥३४६॥
देह तंव असे । पंचभूतात्मक । पावे अंतीं देख । पंचत्वातें ॥३४७॥
मग तिये वेळीं । कोठें धांडोळावा । केला जो आघवा । खटाटोप ॥३४८॥
म्हणोनि केवळ । देहाचें पोषण । प्रत्यक्ष तो जाण आत्मघात ॥३४९॥
अर्जुना तो घात । टाळावया येथ । नये देऊं चित्त । देह -भोगीं ॥३५०॥
इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ ।
तयोर्न वशमागच्छेतौ ह्यस्य परिपन्थिनौ ॥३४॥
रुचे इंद्रियांसी । ऐसा चि विषय । भोगितां जो होय । तोष चित्ता ॥३५१॥
सावचोर जैसा । तोंवरी च स्वस्थ । ओलांडीना प्रांत । नगराचा ॥३५२॥
तैसा तो संतोष । वाटे क्षणभरी । परि घात करी । परिणामीं ॥३५३॥
सेवूं नये विष । लागे जरी गोड । अंतीं अवघड । प्राण जातां ॥३५४॥
देखें गळालागीं । लावितां आमिष । मासा भुले त्यास । जैशा रीती ॥३५५॥
तैसी इंद्रियांसी । विषय -लालसा । सुखाची दुराशा । दावे जीवा ॥३५६॥
ना कळे माशातें । झांकला तो गळ । करी जो केवळ । प्राण -घात ॥३५७॥
तैसी अभिलाषा । प्राण्यालागीं भूल । घालोनि पाडील । क्रोधाग्नींत ॥३५८॥
मृगालागीं जैसा । घेरितो पारधी । वधावया संधी । साधोनियां ॥३५९॥
भोगसुखाचीम हि । तैसी च ती स्थिति । म्हणोनि संगति । नको त्याची ॥३६०॥
पार्था काम -क्रोध । घातक हे दोन्ही । आसक्तीपासोनि । पडो तेथें ॥३६२॥
आणि पार्था एक । अंतरीं जिव्हाळा । असावा आगळा । स्वधर्माचा ॥३६३॥
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् ।
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ॥३५॥
आपुला स्वधर्म । जरी का कठिण । भलें अनुष्ठान । तयाचें चि ॥३६४॥
आणिकाचा धर्म । जरी वाटे चांग । सोडूं नये मार्ग । स्वधर्माचा ॥३६५॥
द्विज झाला दीन । तरी काय त्यानें । सेवावीं पक्कान्नें । शूद्राघरीं ॥३६६॥
अग्राह्य इच्छावें । इच्छिलें हि घ्यावें । केविं आचरावें । अनुचित ॥३६७॥
आणिकांचीं घरें । देखोनि सुंदर । आपुलें तणार । मोडावें का ? ॥३६८॥
आपुली अर्धागी । कुरुप जाहली । तरी तीच भली । भोग्य जैसी ॥३६९॥
स्वधर्म हा तैसा । असो अवघड । आणि वाटो जड । आचराया ॥३७०॥
तरी आचरावा । तो चि हें उचित । स्वधर्मे चि हित । पर -लोकीं ॥३७१॥
घालितां साखर । दूध लागे गोड । सर्वासी उघड । अनुभव ॥३७२॥
परी कृमि -दोषें । होतां व्याधिग्रस्त । तें चि विपरीत । कैसें घ्यावें ॥३७३॥
मग हांवभरें । घेतलें तें तरी । नव्हे हितकारी । परिणामीं ॥३७४॥
म्हणोनि आणिकां । जें जें का विहित । आणि अनुचित । आपणासी ॥३७५॥
तें तें सर्वथैव । नाचरावें येथ । पाहों जातां हित । हें चि योग्य ॥३७६॥
स्वधर्माचरणीं । जावो गेला प्राण । तरी हि कल्याण । दोन्ही लोकीं ॥३७७॥
बोलतां चि ऐसें । प्रभु चक्र -पाणी । करी विनवणी । भक्तराज ॥३७८॥
म्हणे देवा तुम्ही । जें हें सांगितलें । तें मीं परिसिलें । सर्व कांहीं ॥३७९॥
तरी आतां येथें । कांहीं अपेक्षित । पुसेन साद्यन्त । सांगा मज ॥३८०॥
अर्जुन उवाच ---
अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चर्ति पुरुषः ।
अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥३६॥
देवा , जाणते हि । कैसे होती भ्रष्ट । सोडोनियां वाट । चालती कां ? ॥३८१॥
जयां ज्ञात्यांलागीं । सर्व कांहीं ठावें । आकळे स्वभावें । ग्राह्याग्राह्य ॥३८२॥
भ्रष्टती कां ते हि । स्वधर्मपासोन । जाती कां भुलोन । परधर्मा ॥३८३॥
नये निवडितां । बीज आणि भूस । जैसें आंधळ्यास । सर्वथैव ॥३८४॥
डोळसालागीं हि । तैसें क्षणभरी । व्हावें कां हो तरी । सांगा मजा ॥३८५॥
करिती जे सर्व - । संग -परित्याग । ते चि घेती भोग । हांवभरें ॥३८६॥
होवोनि विरक्त । स्वीकारिती वन । ते हि परतोन । गांवा येती ॥३८७॥
आसक्तीपासोनि । लपोनि राहती । पाप चुकविती । सर्वस्वीं जे ॥३८८॥
गोंविले ते जाती । त्या चि पापाठायीं । इच्छा नसतां हि । बलात्कारें ॥३८९॥
जीवालागीं ज्याचा वाटे तिटकारा । तो चि पडे फेरा । विषयांचा ॥३९०॥
चुकवितां त्यांसी । शोधीत ते येती । जीवासी भिडती । ज्ञात्यांच्या हि ॥३९१॥
ज्ञात्यांसी हि कोण । पापामाजीं ओढी । बलात्कार प्रौढी । कोणाची ही ॥३९२॥
मज कृपावंत । होवोनियां देवें । सर्व हें सांगावें । पार्थ म्हणे ॥३९३॥
श्रीभगवानुवाच ---
काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्धवः ।
महाशनी महापाप्मा विध्द्येनमिह वैरिणम् ॥३७॥
तंव तो हृदय - । कमळ -आराम । काम जो निष्काम । योगियांच ॥३९४॥
म्हणे पुरुषोत्तम । ऐक तें सांगेन । भुलविती कोण । ज्ञात्यांसी हि ॥३९५॥
ते हे काम -क्रोध । पाहें धनंजया । जयां नाहीं दया । लेशमात्र ॥३९६॥
ह्यांसी मूर्तिमंत । मानिती कृतांत । निष्ठुर अत्यंत । घातक हे ॥३९७॥
ज्ञानरुप निधी - । वरील हे नाग । दरींतील वाघ । विषयांच्या ॥३९८॥
आक्रमितां चांग । भजनाचा मार्ग । रोधिती हे मांग । मारेकरी ॥३९९॥
देहरुपी दुर्ग । त्याचे हे दगड । हे चि गांवकोंड । इंद्रियांचें ॥४००॥
सर्व जगासी हे । टाकिती दडपून । मोहादिकरोन । साधनांनी ॥४०१॥
जाण हे आसुरी । संपत्ति संपूर्ण । रजोगुणांतून । उद्भवती ॥४०२॥
लालन -पालन । करोनियां भलें । ह्यांसी वाढविलें । अविद्येनें ॥४०३॥
तमोगुणालागीं । बहु प्रिय झाले । जरी हे जन्मले । रजांतून ॥४०४॥
तमोगुणें ह्यांसी । दिलें निजपद । संमोह -प्रमाद - । रुप जें का ॥४०५॥
पाहें जीविताचे । वैरी हे म्हणोन । ह्यांसी भला मान। यमलोकीं ॥४०६॥
आमिषाच्या घांसा - । लागीं ह्यांसी सारें विश्व हि न पुरे । ऐसी भूक ॥४०७॥
घोर संहारक । ह्यांचा हा व्यापार । चालवी अपार । आशा देख ॥४०८॥
जियेच्या मुठींत । चौदा हि भुवनें। सहज लीलेनें । सामावती ॥४०९॥
ऐसी शक्तिशाली । भ्रांति आवडती । बहीण धाकुटी । आशेची ती ॥४१०॥
खेळतां खेळतां । पाहें लोकत्रय । कौतुकें चि खाय । जी का भ्रांति ॥४११॥
तियेच्या दास्यत्वें । सामर्थ्यसंपन्न । होवोनियां जाण । जागे तृष्णा ॥४१२॥
असो ; मिळे ह्यांसी । मोहाघरीं मान । ऐसें महिमान । थोर ह्यांचे ॥४१३॥
कौतुकें जगासी । नाचवी चौफेर । ऐसा अहंकार । बळी जो का ॥४१४॥
तयाची तों चाले । देवाण -घेवाण । ह्यांच्यासंगें जाण । निरंतर ॥४१५॥
तेवीं चि सत्याचा । कोथळा काढून । दुष्कृत्यांचे तृण । भरी तेथें ॥४१६॥
ऐशापरी दावी । सत्याचा आभास । दंभ ऐसें ज्यास । बोलती गा ॥४१७॥
तया दंभालागीं । प्रसिद्धि आगळी । ह्यांनीं च ती दिली । जगामाजीं ॥४१८॥
पतिव्रता शांति । ह्यांनीं नागवून । ममता -मांगीण । शृंगारिली ॥४१९॥
मग तियेलागीं । हाताशीं धरोन । निर्मळ सज्जन । भ्रष्टविले ॥४२०॥
नष्ट केलें ह्यांनी । विवेकालागोन । काढिलें सोलून । वैराग्यातें ॥४२१॥
निग्रहाची मान । टाकिली मोडून । खांडिलें तें वन । संतोषाचें ॥४२२॥
टाकिला पाडोन । गड धैर्यरुप । उपटिलें रोप । आनंदाचें ॥४२३॥
ह्यांनी बोधांकुर । टाकिले खुटोन । सुखातें संपूर्ण । नष्ट केलें ॥४२४॥
तापत्रयरुप । विस्तवाचे झोत । बळें अंतरांत । ओतिले गा ॥४२५॥
देहासवें पाहें । होवोनि उत्पन्न । जीवासी जडोन । राहिले हे ॥४२६॥
परि शोधितां हि । नाहीं सांपडत । जेथें टेंकी हात । ब्रह्मा तो हि ॥४२७॥
चैतन्याशेजारीं । असे ह्यांचा वास । ज्ञानाच्या पंक्तीस । बैसती हे ॥४२८॥
म्हणोनि हे होतां । घातासी प्रवृत्त । नाहीं आटोपत । कोणातें हि ॥४२९॥
हे तों जळाविण । जीवा बुडविती । तेविं चि जाळिती । आगीविण ॥४३०॥
न बोलतां शब्द । राहती लपोन । घेती कवळोन । प्राणियासी ॥४३१॥
जाण शस्त्राविण । साधिती हे घात । तेविं बांधितात । दोराविण ॥४३२॥
जाणत्याची तरी । कापिती हे मान । प्रतिज्ञा करोन । धनुर्धरा ॥४३३॥
हे तों पंकाविण । कैसे रुतविती । आणि गुंतविती । फांसविण ॥४३४॥
राहती हे खोल । अंतरामाझारीं । म्हणोनियां भारी । कोणातें हि ॥४३५॥
धूमेनाऽऽव्रियते वह्रिर्यथाऽदर्शो मलेन च ।
यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम् ॥३८॥
सदा सर्वकाळ । चंदनाची मुळी । भुजंगे वेढिली । असे जैसी ॥४३६॥
किंवा जैसी नित्य । गर्भस्थालागोनि । असे गवसणी । वेष्टनासी ॥४३७॥
तेजाविण भानु । अग्नि धुराविण । नसे मळहीन । दर्पण हि ॥४३८॥
तैसें पार्था आम्ही । देखिलें ना ज्ञान । कामक्रोधाविण । एकलें चि ॥४३९॥
आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा ।
कामरुपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च ॥३९॥
किंवा बीजालागीं । कोंडयाचे वेष्टन । स्वभावतां जाण । असे जैसें ॥४४०॥
तैसें ज्ञान तरी । निर्मल अलिप्त । परी आच्छादित । काम -क्रोधें ॥४४१॥
म्हणोनि अगाध । होवोनि राहिलें । सर्वथा नाकळे । जीवासी तें ॥४४२॥
आधीं काम -क्रोध । जिंकोनियां मग । मेळवावें चांग । ज्ञान जरी ॥४४३॥
तरी सर्वथैव । पार्था , पराभूत । नाहीं च हे होत । राग -द्वेष ॥४४४॥
ह्यांसी च तें बळ । पडे उपयोगी । आणावें जें अंगीं । जिंकावया ॥४४५॥
इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते ।
एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् ॥४०॥
अग्निलागीं जैसें । साहाय्य सर्पण । तैसी स्थिति जाण । येथें होय ॥४४६॥
जिंकावया जे जे । योजावे उपाय । करिती साहाय्य । ह्यांसी च ते ॥४४७॥
ह्यांसी हटयोगी । आवरुं पहाती । तयांसी जिंकिती । परी हे चि ॥४४८॥
ऐशा हि संकटीं । एक चि साधन । भलें असे जाण । धनुर्धरा ॥४४९॥
तुज साधे तरी । सांगेन तें आतां । ऐक पंडु -सुता । सावधान ॥४५०॥
तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ ।
पाप्मानं प्रजहि ह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम् ॥४१॥
इंद्रियें चि मूळ । ह्यांचें वस्तीस्थान । जेथोनि निर्माण । होती कर्मे ॥४५१॥
तरी तीं सर्वथा । टाकीं निर्दाळून । अंतरीं ठेवोन । सोऽहं -भाव ॥४५२॥
इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः ।
मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः ॥४२॥
मग तें सुस्थिर । होवोनियां मन । तुटेल बंधन । बुद्धीचें हि ॥४५३॥
तेणें काम -क्रोधां । वैरीयांसी थारा । उरे चि ना वीरा । अंतरांत ॥४५४॥
एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमत्मना ।
जहि शत्रुं महाबाहो कामरुपं दुरासदम् ॥४३॥
इति श्रीमद्भगवद्बीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः ॥३॥
अंतरापासोन । फिटले निःशेष । तरी ह्यांचा नाश । निःसंदेह ॥४५५॥
सूर्याचे किरण । दूर होतां जाण । राहिलें कोठून । मृगजळ ॥४५६॥
तैसें अंतरंग । होतां चि निःसंग । निमाले ते साङ्ग । राग -द्वेष ॥४५७॥
जातां प्रीति -द्वेष । ब्रह्मींचे स्वराज्य । संपूर्ण सहज । हाता आलें ॥४५८॥
मग तो आपण । भोगी आत्म -सुख । अंतरीं च देख । निरंतर ॥४५९॥
ही च गुरुरवूण । घ्यावी ओळखून । संवाद करुन । मूकपणें ॥४६०॥
जीव -परमात्मा । एक होती जेथ । तेथें तूं सतत । स्थिर राहें ॥४६१॥
सकळ सिद्धांचा । राव तो श्रीकांत । ऐसें बोले तेथ । ऐकें राया ॥४६२॥
आतां पुन्हा एक । कथा पुरातन । देव जनार्दन । सांगेल तो ॥४६३॥
तेथें पंडु -सुत । आशंका घेवोन । कैसा भला प्रश्न । विचारील ॥४६४॥
ऐकोनि गंभीर । बोल ते रसाळ । सुखाचा सुकाळ । श्रोतयांसी ॥४६५॥
म्हणोनियां भली । येथ श्रोतेजनीं । जागृत करोनि । ज्ञानवृत्ति ॥४६६॥
भोगावा संवाद । श्रीहरी -पार्थाचा । म्हणे निवृत्तीचा । ज्ञानदेव ॥४६७॥
इति श्री स्वामी स्वरुपानंदविरचित्त श्रीमत् अभंग -ज्ञानेश्वरी तृतीयोऽध्यायः ।
हरये नमः । हरये नमः । हरये नमः । श्रीकृष्णार्पणमस्तु ।