श्लोक ११ ते २०
देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु वः ।
परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ ॥११॥
सेवितां स्वधर्म । देवता सकळ । तोष पावतील । स्वभावें चि ॥१६६॥
मग जें जें कांहीं । इच्छाल मानसीं । देतील तुम्हांसी । तें तें सर्व ॥१६७॥
निजधर्म -यज्ञें । उपासितां येथें । देव -देवतांते । सकळ हि ॥१६८॥
मग योग -क्षेम । तुमचा तीं पूर्ण । निश्चयेंकरोन । वाहतील ॥१६९॥
ऐशा परी तुम्ही । देवांतें भजाल । देव तोषतील । तुम्हांवरी ॥१७०॥
प्रेमाचे संबंध । ऐसे परस्पर । जेव्हां निरंतर । जुळतील ॥१७१॥
तेव्हां तुम्ही जें जें । करावें म्हणाल । सिद्ध तें होईल । स्वभावें चि ॥१७२॥
आणि जें जें कांही । मानसीं धराल । पूर्ण तें होईल । अनायासें ॥१७३॥
कराल ती आज्ञा । पाळली जाईल । तुम्हांसी लाभेल । वाचसिद्धि ॥१७४॥
महा -ऋद्धि त्या हि । जोडोनियां हात । राहतील तेथ । पुढें उभ्या ॥१७५॥
जैसी फळभारें । वसंताचे द्वारीं । नित्य सेवा करी । वन -शोभा ॥१७६॥
इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभावितः ।
तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङेक्त स्तेन एव सः ॥१२॥
सर्व सुखांसवें । भाग्य मूर्तिमंत । येईल शोधीत । तुम्हां तैसें ॥१७७॥
स्वधर्माचें ठायीं । राहोनि तत्पर । वर्ताल साचार । जरी येथें ॥१७८॥
तरी ऐसे सर्व । भोगोनियां भोग । व्हाल तुम्ही मग । पूर्णकाम ॥१७९॥
जो का सर्वैश्वर्यै । वागेल मदांध । भोगास्वादा लुब्ध । होवोनियां ॥१८०॥
देव -देवतांनी । यज्ञें संतोषून । संपत्ति संपूर्ण । दिली जी ही ॥१८१॥
त्या चि संपत्तीनें । सर्वेश्वरालागीं । भजेल ना जगीं । स्वधर्मे जो ॥१८२॥
न जो अग्निमुखीं । देईल हवन । देवता -पूजन । करील ना ॥१८३॥
आणि प्राप्त वेळीं । ब्राह्मणासी अन्न । देईल ना मान । अतिथीसी ॥१८४॥
ज्ञाति -बांधवांसी । न जो तोषवील । आणि उपेक्षील । गुरुभक्ति ॥१८५॥
स्वधर्माचरण । सांडोनि सकळ । होईल केवळ । भोगासक्त ॥१८६॥
जगीं मी च एक । संपन्न कीं मोठा । बाळगील ताठा । ऐसा जो का ॥१८७॥
तयालागीं पुढें । असे मोठें भय । जेणें जाय । मिळालें तें ॥१८८॥
आणि प्राप्त भोग । भोगावयातें हि । सर्वथा तो होई । असमर्थ ॥१८९॥
संपतां आयुष्य । मग शरीरांत । चेतना रहात । नाहीं जैसी ॥१९०॥
ना तरी नांदेना । लक्ष्मी जिया परी । करंटयाच्या घरीं । क्षणमात्र ॥१९१॥
तैसा स्वधर्माचा । जरी लोप होय । पावती विलय । सर्व सुखें ॥१९२॥
सोडितां स्वधर्म । स्वातंत्र्य हारपे । दीपासवें लोपे । तेज जैसें ॥१९३॥
ब्रह्मदेव म्हणे । ऐका प्रजाजन । स्वधर्म सोडोन । वर्तेल जो ॥१९४॥
तयाचें सर्वस्व । हरील तो काळ । दंडील केवळ । चोरासी त्या ॥१९५॥
मग सर्व पापें । वेढिती तयातें । रात्रीं स्मशानातें । भुतें जैसीं ॥१९६॥
त्रिलोकींचें दुःख । नानाविध दोष । दैत्य तें अशेष । राहे तेथें ॥१९७॥
ऐका प्राण -गण । तया उन्मत्ताची । ऐसी दशा साची । होय तेव्हां ॥१९८॥
मग आक्रंदोनि । मांडिला आकांत । तरी न हो मुक्त । कल्पान्तीं हि ॥१९९॥
म्हणोनियां करुं । नये स्वैराचार । स्वधर्म साचार । सोडोनियां ॥२००॥
चतुर्मुख ब्रह्मा । सृष्टयारंभीं जाणा । ऐसें प्रजाजना । उपदेशी ॥२०१॥
देखा जळचरां । जैसें जळाविण । ओढवें मरण । तत्काळ चि ॥२०२॥
स्वधर्मावांचोनि । तैसी दशा होय । म्हणोनि ही सोय । सोडूं नये ॥२०३॥
उचित स्वकर्मी । असावें तत्पर । हें चि वारंवार । सांगें तुम्हां ॥२०४॥
यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः ।
भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् ॥१३॥
विहिताचरणें । प्राप्त संपत्तीतें । वेंची जो का जेथें । निष्कामत्वें ॥२०५॥
गुरु गोत्र अग्नि । ह्यांची आराधाना । प्रसंगीं ब्राह्मणा । पूजितसे ॥२०६॥
फेडी पितृऋण । भावें करोनियां । श्राद्धदिक क्रिया । पर्वकाळीं ॥२०७॥
स्वधर्म -यज्ञानें । यज्ञेश्वराप्रति । उचित आहुति । देवोनियां ॥२०८॥
मग स्वभावतां । राहिलें जें शेष । त्यांत चि संतोष । मानोनियां ॥२०९॥
कुटुंबासहित । आपुलिया घरीं । सेवितां तें हरी । सर्व दोष ॥२१०॥
राहिलें यज्ञान्तीं । तें चि सेवी अन्न । होय तो म्हणोन । पाप -मुक्त ॥२११॥
जैसा महारोगी । सेवितां अमृत । होय रोग -मुक्त । आपोआप ॥२१२॥
किंवा ज्ञात्यालागीं । नसे भ्रांतिलेश । तैसा तो निर्दोष । शेष -भोगी ॥२१३॥
म्हणोनि स्वधर्मे । जें जें संपादावें । सर्व तें वेंचावें । स्वधर्मे चि ॥२१४॥
स्वधर्म -यज्ञान्तीं । उरेल जें मग । घ्यावा त्याचा भोग । संतोषानें ॥२१५॥
स्वधर्म सांडोनि । वर्तू नये पार्था । ऐसी आद्य कथा । कृष्ण सांगे ॥२१६॥
मानिती जे कोणी । देह चि आपण । विषय संपूर्ण । भोग्य वस्तु ॥२१७॥
ह्याहून आणिक । स्मरती ना कांहीं । भ्रांत झाले पाहीं । अहंकारें ॥२१८॥
जोडली संपत्ति । यज्ञ -सामुग्री ती । स्वयें भोगूं जाती । नेणोनि हें ॥२१९॥
रुचे इंद्रियांसी । ऐसा स्वयंपाक । चवदार देख । करोनियां ॥२२०॥
न करितां यज्ञ । जणूं पातकें च । भक्षिती ते साच । अन्नरुपें ॥२२१॥
असे जी का सर्व । आपुली संपत्ति । यज्ञसामुग्री ती । मानोनियां ॥२२२॥
निज -धर्मरुप । यज्ञ आचरोन । करावी अर्पण । ईश्वरासी ॥२२३॥
परी हें सांडोनि । स्वतांसाठीं मूर्ख । करविती पाक । नानाविध ॥२२४॥
जेणें यज्ञसिद्धि । परेशातें तोष । अन्न तें विशेष । मानावें हें ॥२२५॥
पार्था , म्हणावें ना । ह्यातें साधारण । अन्न हें तों जाण । ब्रह्मरुप ॥२२६॥
अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः ।
यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥१४॥
कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम् ।
तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञ प्रतिष्ठितम् ॥१५॥
सर्व विश्वातें ह्या । अन्न चि जीवन । अन्ने संवर्धन । प्राणियांचें ॥२२७॥
पर्जन्यापासोन । अन्नाची उत्पत्ति । यज्ञीं हो संभूति । पर्जन्याची ॥२२८॥
जाण कर्मोद्भव । यज्ञ तो केवळ । कर्मासी त्या मूळ । शब्दब्रह्म ॥२२९॥
अविनाशी एक । जें का परब्रह्म । तेथोनियां जन्म । शब्दब्रह्मा ॥२३०॥
ऐसें शब्दब्रह्मीं । धनंजया जाण । गोंविलें संपूर्ण । चराचर ॥२३१॥
म्हणोनियां यज्ञ । कर्माची जो मूर्ति । तेथें राहे श्रुति । निरंतर ॥२३२॥
एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः ।
अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति ॥१६॥
संक्षेपें ही ऐसी । मूळ परंपरा । सांगितली वीरा । यज्ञाची ह्या ॥२३३॥
समूळ उचित । स्वधर्म -यज्ञातें । आचरे ना येथें । उन्मत्त जो ॥२३४॥
करोनि कुकर्मे । इंद्रियें केवळ । लाडावोनि काळ । वायां वेंची ॥२३५॥
अर्जुना तो जाण । पातकांची रास । भार तो भूमीस । सर्वथैव ॥२३६॥
जन्मकर्म सारें । तयाचें निष्फळ । जैसें का अकाळ । अभ्र आलें ॥२३७॥
शेळियेसे गळां । स्तन जैसे वायां । तैसें धनंजयां । जिणें त्याचें ॥२३८॥
म्हणोनि स्वधर्म । सोडूं नये देख । भजावा हा एक । सर्वभावें ॥२३९॥
देहासवें आला । कर्तव्याचा ओघ । कां गा मग त्याग । स्वकर्माचा ॥२४०॥
लाहोनियां देह । प्राप्त कर्मी खंती । जे का बाळगिती । अज्ञानी ते ॥२४१॥
यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्व मानवः ।
आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते ॥१७॥
आत्मस्वरुपीं च । जो का रममाण । असे परिपूर्ण । अखंडित ॥२४२॥
देखें तो चि एक । कर्मे नव्हे लिप्त । वावरोनि येथ । देहधर्मी ॥२४३॥
कीं तो सर्वथैव । पावे समाधान होतां आत्मज्ञान । अंतर्यामीं ॥२४४॥
तरी कृतकृत्य । स्वभावें म्हणोन । कर्मसंगांतून । मुक्त झाला ॥२४५॥
नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्वन ।
न चास्य सर्वभूतेषु कश्विदर्थव्यपाश्रयः ॥१८॥
तृप्ति होतां पार्था । जैसा आपोआप । संपे खटाटोप । साधनांचा ॥२४६॥
तैसें आत्मानंदीं । होतां चि संतुष्ट । आटे खटपट । कर्माची ती ॥२४७॥
जोंवरीं अंतरीं । नाहीं आत्मज्ञान । कर्म हें साधन । तोंवरी च ॥२४८॥
तस्मादसक्तः सततं कार्य कर्म समाचर ।
असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥१९॥
म्हणोनियां सर्व । सोडोनि कामना । आवरोनि मना । आपुलिया ॥२४९॥
तुवां आचरावा । स्वधर्म उचित । सर्वभावें येथ । धनंजया ॥२५०॥
आपुलें स्वकर्म । निष्कामत्वें केलें । तत्त्वतां ते झाले । मुक्त येथें ॥२५१॥
कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः ।
लोकसंग्रहमेवापि संपश्यन्कर्तुमर्हसि ॥२०॥
न सोडितां कर्मे । देखें जनकादिक । जगीं मोक्ष -सुख । पावले गा ॥२५२॥
म्हणोनियां आस्था । असावी कर्मात । तेणें होय हित । आणिक हि ॥२५३॥
आपुल्या आचारें । लोकांसी वळण । लागोनियां जाण । प्रसंगें चि ॥२५४॥
मग पार्था त्यांची । टळेल ती हानि । होय जी निदानीं । कर्म -त्यागें ॥२५५॥
अगा आत्मज्ञानें । होवोनि कृतार्थ । पावले जे येथ । निष्कामत्व ॥२५६॥
तयांसी हि उरे । कर्तव्य उचित । लोकसंग्रहार्थ । धनंजया ॥२५७॥
डोळस तो जैसा । पुढें चाले नीट । दाखवीत वाट । आंधळ्यासी ॥२५८॥
तैसा निजधर्म । स्वयें आचरोन । नेणत्यांलागोन । दाखवावा ॥२५९॥
जाणत्यांनी ऐसें । करावें ना जरी । कळावेम तें तरी । कैसें मूढां ॥२६०॥
जे कां अज्ञ जन । तयांनीं हा मार्ग । कैसा बरें सांग । ओळखावा ॥२६१॥