Get it on Google Play
Download on the App Store

अभंग संग्रह

१.

केशवाचें ध्यान धरूनि अंतरीं । मृत्तिके माझारीं नाचतसे ॥ १ ॥

विठ्ठलाचें नाम स्मरे वेळोवेळ । नेत्रीं वाहे जळ सद्‍गदीत ॥ २ ॥

कुलालाचे वंशीं जन्मलें शरीर । तो गोरा कुंभार हरिभक्त ॥ ३ ॥

२.

वरती करा कर दोन्ही । पताकाचे अनुसंधानीं ॥ १ ॥

सर्व हस्त करिती वरी । गोरा लाजला अंतरीं ॥ २ ॥

नामा म्हणे गोरोबासी । वरती करावें हस्तासी ॥ ३ ॥

गोरा थोटा वरती करी । हस्त फुटले वरचेवरी ॥ ४ ॥

३.

निर्गुणाचा संग धरिला जो आवडी । तेणें केलें देशधडी आपणासी ॥ १ ॥

अनेकत्व नेलें अनेकत्व नेलें । एकलें सांडिलें निरंजनीं ॥ २ ॥

एकत्व पाहतां अवघेंचि लटिकें । जें पाहें तितुकें रूप तुझें ॥ ३ ॥

म्हणे गोरा कुंभार ऐका नामदेव । तुह्मा आह्मा नांव कैचे कोण ॥ ४ ॥

४.

अंतरीचें गुज बोलूं ऐसें कांहीं । वर्ण व्यक्त नाहीं शब्द शून्य ॥ १ ॥

जयजय झनकूट जयजय झनकूट । अनुहात जंगट नाद गर्जे ॥ २ ॥

परतल्या श्रुति म्हणती नेती । त्याही नादा अंतीं स्थिर राहे ॥ ३ ॥

म्हणे गोरा कुंभार सत्रावीचें नीर । सेवी निरंतर नामदेवा ॥ ४ ॥

५.

एकमेकांमाजी भाव एकविध । असे एक बोध भेदरहित ॥ १ ॥

तूं मज ओळखी तूं मज ओळखी । मी तुज देखत आत्मवस्तु ॥ २ ॥

आत्म वस्तु देहीं बोलता लाज वाटे । अखंडता बिघडे स्वरूपाची ॥ ३ ॥

म्हणे गोरा कुंभार अनुभवाचा ठेवा । प्रत्यक्ष नामदेवा भेटलासी ॥ ४ ॥

६.

सरितेचा ओघ सागरीं आटला । विदेही भेटला मनामन ॥ १ ॥

कवणाचे सांगातें पुसावया कवणातें । सांगतों ऐक तें तेथें कैचें ॥ २ ॥

नाहीं दिवस राती नाहीं कुळ याती । नाहीं माया भ्रांति अवघेची ॥ ३ ॥

म्हणे गोराकुंभार परियेसी नामदेवा सांपडला ठेवा विश्रांतीचा ॥ ४ ॥

७.

निर्गुणाचें भेटी आलों सगुणासंगें । तंव झालो प्रसंगीं गुणातीत ॥ १ ॥

मज रूप नाहीं नांव सांगू काई । झाला बाई बोलूं नये ॥ २ ॥

बोलतां आपली जिव्हा पैं खादली । खेचरी लागली पाहतां पाहतां ॥ ३ ॥

म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी । सुखासुखी मिठी पडली कैसी ॥ ४ ॥

८.

कैसें बोलणें कैसें चालणें । परब्रह्मीं राहणें अरे नामा ॥ १ ॥

जेवी त्याची खूण वाढितांचि जाणे । येरा लाजिरवाणें अरे नामा ॥ २ ॥

म्हणे गोरा कुंभार अनुभवित जाणे । आम्हांतें राशी राहाणें असे नामा ॥ ३ ॥

९.

मुकिया साखर चाखाया दिधली । बोलतं हे बोली बोलवेना ॥ १ ॥

तो काय शब्द खुंटला अनुवाद । आपुला आनंद आधाराया ॥ २ ॥

आनंदी आनंद गिळूनि राहणें । अखंडित होणें न होतिया ॥ ३ ॥

म्हणे गोरा कुंभार जीवन्मुक्त होणें । जग हें करणें शहाणें बापा ॥ ४ ॥

१०.

कवण स्तुति करूं कवणिया वाचे । ओघ संकल्पाचे गिळिलें चित्तें ॥ १ ॥

मन हें झालें मुकें मन हें झालें मुकें । अनुभवाचें हें सुखें हेलावलें ॥ २ ॥

दृष्टीचें पहाणें परतले मागुती । राहिली निवांत नेत्रपाती ॥ ३ ॥

म्हणे गोरा कुंभार मौन्य सुख घ्यावें । जीवें ओवाळावें नामयासी ॥ ४ ॥

११.

काया वाचा मन एकविध करी । एक देह धरी नित्य सुख ॥ १ ॥

अनेकत्व सांडीं अनेकत्व सांडीं । आहे तें ब्रह्मांडीं रूप तुझें ॥ २ ॥

निर्वासना बुद्धि असतां एकपणें । सहज भोगणें ऐक्य राज्य ॥ ३ ॥

म्हणे गोरा कुंभार नाहीं रूप रेख । तेंचि तुझें सुख नामदेवा ॥ ४ ॥

१२.

स्थूल होतें तें सुक्ष्म पैं झालें । मन हें बुडालें महासुखीं ॥ १ ॥

माझें रूप माझें विरालेसें डोळां । माझें ज्ञान सामाविलें माझें बुबुळां ॥ २ ॥

म्हणे गोरा कुंभार नवल झालें नाम्या । भेटी तुह्मां आह्मां उरली नाहीं ॥ ३ ॥

१३.

केशवाचे भेटी लागलें पिसें । विसरलें कैसें देहभान ॥ १ ॥

झाली झडपणी झाली झडपणी । संचरलें मनीं आधीं रूप ॥ २ ॥

न लिंपेची कर्मीं न लिंपेची धर्मी । न लिंपे गुणधर्मी पुण्यपापा ॥ ३ ॥

म्हणे गोरा कुंभार सहज जीवन्मुक्त । सुखरूप अद्वैत नामदेव ॥ ४ ॥

१४.

वंदावे कवणासी निंदावें कवणासी । लिंपावें गगनासी कवण लिंपी ॥ १ ॥

नाहीं जया रूप नाहीं जया ठाव । तेंचि व्यालें सर्व सांगतसे ॥ २ ॥

जीवनीं चंद्रबिंब विंबलें पैं साचें । परि नाहीं तें नितंबिलें जवळें जेवीं ॥ ३ ॥

म्हणे गोरा कुंभार नामया जीवलगा । आलिंगन देगा मायबापा ॥ ४ ॥

१५.

नामा ऐसें नाम तुझिया स्वरूपा । आवरण आरूपा कोण ठेवी ॥ १ ॥

तूं गुह्य चैतन्य नित्य वस्तु जाण । रहित कारण स्वयंप्रकाश ॥ २ ॥

याही शब्दामाजी वाचा न लागे । मार्ग पैं गा लागे निर्धारिता ॥ ३ ॥

म्हणे गोरा कुंभार आत्मया नामदेवा । चिद्रूप अवघा दिससी साच ॥ ४ ॥

१६.

कायसास बहु घालिसील माळ । तुज येणेविण काय काज ॥ १ ॥

एकपणें एक एकपणें एक । एकाचें अनेक विस्तारिलें ॥ २ ॥

एकत्व पाहतां शिणलें धरणीधर । न चुके येरझारा संसाराची ॥ ३ ॥

म्हणे गोरा कुंभार कोणी नाहीं दुजें । विश्वरूप तुझें नामदेवा ॥ ४ ॥

१७.

देवा तुझा मी कुंभार । नासीं पापाचें डोंगर ॥ १ ॥

ऐशा संतप्ते हो जाती । घडे साधूची संगती ॥ २ ॥

पूर्ण कृपा भगवंताची । गोरा कुंभार मागे हेंचि ॥ ३ ॥

१८.

श्रवणें नयन जिव्हा शुद्ध करी । हरीनामें सोहंकारी सर्व काम ॥ १ ॥

मग तुझा तूंचि दिवटा होसीगा सुभटा । मग जासील वैकुंठा हरिपाठें ॥ २ ॥

रामनामें गणिका तरली अधम । अजामिळ परम चांडाळ दोषी ॥ ३ ॥

म्हणे गोरा कुंभार विठ्ठल मंत्र सोपा । एक वेळा बापा उच्चारीरे ॥ ४ ॥

१९.

रोहिदासा शिवराईसाठी । दिली पुंडलिका भेटी ॥ १ ॥

पुंडलिका झाला अनुताप । धन्य सत्य गुरु माय बाप ॥ २ ॥

जन्मा येऊनियां काय केली करणी । व्यर्थ शिणविली जननी ॥ ३ ॥

नऊ महिने ओझें वागऊन । नाहीं गेला तिचा शीण ॥ ४ ॥

ऐसा झालो अपराधी । क्षमा करा कृपानिधी ॥ ५ ॥

ऐसा पुंडलिका भाव । उभा केला पंढरीराव ॥ ६ ॥

भक्त पुंडलिकासाठी । उभा भिंवरेच्या तटी ॥ ७ ॥

कटावरी ठेवूनी कर । उभा विटेवरी नीट ॥ ८ ॥

ऐसा भाव धीर म्हणे गोरा । तीर्था जा फजितखोरा ॥ ९ ॥

२०.

निर्गुण रूपडे सगुणाचे बुंथी । विठ्ठल निवृत्ति प्रवृत्ति दिसे ॥ १ ॥

एक पुंडलिक जाणे तेथील पंथ । तुझा आम्हां चित्त भाग्य योगें ॥ २ ॥

सभाग्य विरळे नामा पाठीं गेले । अभागी ते ठेले मौन्यजप ॥ ३ ॥

म्हणे गोरा कुंभार नामया भोगितां उरल्या उचिता सेवूं सुखें ॥ ४ ॥

संत गोराकुंभारांचे अभंग

अभंग संग्राहक
Chapters
अभंग संग्रह