Android app on Google Play

 

सुप्रिया दीक्षित यांना आदरांजली

 

कराडमधील सुप्रसिद्ध डॉक्टर व साहित्यिका सुप्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांच्या स्नुषा, सुप्रसिद्ध लेखक कै. डॉ. प्रकाश नारायण संत यांच्या पत्नी डॉ. सुप्रिया दीक्षित उर्फ डॉ. सुधा संत यांचे नुकतेच दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. डॉ. प्रकाश नारायण संत यांनी मराठी साहित्यात अत्यंत मोलाची भर घातली. लहान मुलांच्या भावविश्वावर आधारीत त्यांच्या वनवास, पंखा, संगीत शारदा, झुंबर या कादंब-या मराठी साहित्यातील मैलाच्या दगड ठरल्या. या अर्धआत्मचरित्रात्मक कादंब-यातला छोटा नायक लंपन हा खूपच लोकप्रिय झाला. या कादंब-या लेखनाच्या प्रक्रियेत डॉ. सुप्रिया दीक्षित यांचे योगदान खूप मोठे होते.
त्यांच्या निधनानंतर एका वाचकाने त्यांना वाहिलेली आदरांजली ! 

सुमी-लंपन
 

कित्ती कित्ती दिवस झाले रे. कित्ती तरी वर्षं. या वर्षांत कित्ती कित्ती आठवण यायची तुझी लंपन. मोजली तर सतरा हजार तीनशे तेवीस वेळा. किंवा मोजायलाच नको खरं.
एरवी काय काय सांगायचास मला…
सुमे, आज माझ्या डोक्यावर फुलपाखरू कसं येऊन बसलं... आज मी बासरी कशी वाजवली... आज मी शाळेतला एक खडू घरी हळूच कसा घेऊन आलो... आज मी चित्र कसं काढलं... आज आज्जी आजोबा कसे भांडत होते... आज आईने माझ्या डोक्यावरून हात फिरवल्यानंतर मला रडू कसं आलं... आज आमचे फाटकबुवा कसे जास्तच कुरकुरत होते... आज तुझे डोळे कित्ती छान दिसतायत...
आणि सांगता सांगता एक दिवस अचानक दुसऱ्याच गावाला निघून गेलास की रे लंपन. जाताना काही म्हणजे काही सांगितलं नाहीस मला. असं वागतं का कुणी. सारखी विचारायचे मी सगळ्यांना... लंपन गेलाय ते गाव कुठाय म्हणून. कुणी सांगायचंच नाही मला नीटसं. लांब असणार आपल्यापासून चांगलंच म्हणून समजूत करून घ्यायचे माझी मी. पण वाटायचं की कधी तरी येशील परतून तू आपल्या गावाला. पण आलाच नाहीस तू परत.
कित्ती आठवण यायची तुझी म्हणून काय सांगू....
शाळेत जाताना. तुझ्या घरी जाताना. फांदीवरची फुलं तोडताना. पुस्तक वाचताना. कविता म्हणताना. चित्र बघताना, काढताना. देवळाच्या वाटेवर. तळ्यावर गेलं की…
एकसारखीच आठवण यायची आणि घशात दुखायला लागायचं खूप. पण सांगता यायचं नाही रे कुणाला. तू दिलेलं मोराचं पीस समोर ठेवून कित्ती वेळ त्याकडे बघत राहायचे एकटीच. डोळ्यात केवढं पाणी यायचं माझ्या.
इथे होते सगळे घरात, शाळेत, बाहेर माझ्यासोबत. पण तू नव्हतास ना माझ्याबरोबर खेळायला.
मग मी ठरवलं. आता पुरे झालं. तुझं गाव शोधायचं, तुझा पत्ता शोधायचा आणि आपणच यायचं तुझ्या गावाला. तुझं गाव, तुझा पत्ता मिळाला मला. आपलं गाव सोडताना वाईट वाटलं खरं खूप. गाव, आपली शाळा, आपले सवंगडी... या सगळ्यांचा निरोप घ्यायला लागतोय. पण त्यापेक्षा तू मला पुन्हा भेटशील याचा आनंद खूप खूप आहे.

मी तुझ्या गावात आलेय लंपन.
आपला गाव आता एकच झालाय.

बघ, माझ्या डोळ्यातलं पाणी थांबलंय.
चल,
मिळून पुन्हा आपला खेळ मांडू
या गावात.

आता मात्र मला सोडून जायचं नाही कुठे. जाऊच शकणार नाहीस खरं.

आता आपल्या दोघांचा मुक्काम इथेच
कायमचा.

~राजीव काळे