Get it on Google Play
Download on the App Store

शबरीमला येथील श्री अय्यप्पा मंदिरातील महिलांच्या प्रवेशामागील सत्य आणि विपर्यास !

'कुठल्याही मंदिरात एखादी प्रथा निर्माण होण्यामागे काय इतिहास आहे, हे जाणून घेतले पाहिजे. शबरीमला मंदिराची निर्मिती करतांना त्यात एका वयोगटातील महिलांना प्रवेशबंदी का करण्यात आली, यामागील शास्त्र जाणून घ्यायला हवे. यावर पुरो(अधो)गामी लोक स्त्रियांवरील अन्यायाची भाषा करत आहेत. मुसलमान पंथीयही 'शबरीमलामध्ये स्त्रियांवर प्रवेशबंदी करून त्यांना न्यून दर्जाची वागणूक दिली जात आहे', अशा प्रकारे कांगावा करत आहेत. भारतात साधारणत: २५ लाख मंदिरे आहेत. ही सर्व मंदिरे सर्वांसाठी खुली आहेत. केवळ ४-५ मंदिरांमध्ये स्त्रियांच्या प्रवेशावर बंदी आहे. ४-५ मंदिरे अशीही आहेत, जेथे पुरुषांच्या प्रवेशावर बंदी आहे. येथे स्त्री-पुरुष असा भेदभाव नसून त्या देवतेची नि त्या मंदिराची तशी उपासनापद्धत आहे. ही उपासनापद्धत गेल्या सहस्रो वर्षांपासून चालू आहे. यामागे नेमके शास्त्र काय आहे, हे जाणून घ्यायला हवे.

केरळ राज्यामध्ये स्वामी अय्यप्पांची अनेक मंदिरे आहेत; परंतु त्यांपैकी कुठल्याही मंदिरात स्त्रियांना प्रवेशबंदी नाही. मग याच मंदिरात का ?, याचे कारण जाणून घ्यायला हवे.

१. हिंदूंच्या धर्मश्रद्धा पायदळी तुडवणारे नास्तिक !

शबरीमला येथे स्वामी अय्यप्पा यांचे ब्रह्मचारी रूप आहे. त्यामागे आख्यायिका आहे. जेव्हा स्वामी अय्यप्पा हे 'महिषी' नामक स्त्री असुराशी लढून तिचा नाश करतात, त्या वेळी 'महिषी'ला तिच्या पूर्वजन्मीच्या शापातून मुक्ती मिळून तिच्यातून एक सुंदर आणि दिव्य देवी प्रकट होते. ही देवी स्वामी अय्यप्पा यांना पती स्वरूपात स्वीकारू इच्छिते. तेव्हा मुळातच ब्रह्मचारी असलेले स्वामी अयप्पा तिला वचन देतात की, माझे भक्त माझी वाट पहात आहेत. जेव्हा माझे भक्त शबरीमला येथे येणे बंद करतील, तेव्हा मी विवाह करीन. या देवीचे मंदिर शबरीमलाच्या मुख्य मंदिराशेजारी आहे. तेथे 'मलिकापुराथमा' या नावाने देवीची पूजा होते. ही देवी अय्यप्पा मंदिराबाहेर गेली कित्येक युगे वाट पहात उभी आहे. ती अय्यप्पा मंदिरात प्रवेश करत नाही. तिच्या या प्रेमाचा मान म्हणून इतर स्त्रियाही या मंदिरात जात नाहीत. 'श्री अय्यप्पा स्वामी हेसुद्धा त्यांच्या भक्तांना वेळ देण्याकरता आणि त्यांच्या कल्याणाकरता सर्वस्वाचा त्याग करतात', अशी भाविकांची श्रद्धा आहे; परंतु ज्या लोकांची देवावर श्रद्धाच नाही, असे नास्तिक लोक 'स्त्रियांवर अन्याय होत आहे', अशी आरोळी ठोकत आहेत. ज्यांना देवतांचे अस्तित्वच मान्य करायचे नाही, त्यांचा देवावर आणि त्यामागील कथांवर विश्‍वास तरी कसा असेल ?

२. अभ्यास न करता परंपरा खंडित करणे वेदनादायी

सर्वोच्च न्यायालयात ही याचिका प्रविष्ट करणारे नौषाद अहमद खान मुसलमान पंथीय आहेत. यावरून हे लक्षात येते की, केवळ हिंदूंच्या प्रथा नष्ट करण्याचे हे षड्यंत्र आहे. आज देहली येथील जामा मशिदीत स्त्रियांना प्रवेश निषिद्ध आहे. असे असतांना खान त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात का जात नाहीत ? याचे कारण असे की, मुसलमान त्यांचा धर्म मानतात. त्यांना त्यांचे धार्मिक स्वातंत्र्य आहे ना ! याचा हिंदूंनी विचार करण्याची आवश्यकता आहे.

खरेतर शबरीमला मंदिराची उत्पत्ती, तेथील देवतांची उत्पत्ती, कार्य आणि उपासनापद्धती यांमागील शास्त्र, यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. शास्त्र समजून न घेता त्याविषयी सर्व स्तरांतून झडणार्‍या चर्चा म्हणजे वकिलीमधील एखाद्या तज्ञ व्यक्तीने हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासारखे होणार नाही का ? याच आधारावर कायद्याच्या आधारे महिलांच्या प्रवेशबंदीची परंपरा खंडित होणे, वेदनादायी आहे.

३. संपूर्ण विश्‍वाची उत्पत्ती करणार्‍या परमेश्‍वराला कुठल्या घटनेत बांधणार ?

भारतीय संविधानात प्रत्येक धर्माला त्याच्या रूढी आणि परंपरा यांचे जतन करण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे मंदिरातील नियमांचे जतन व्हायला हवे. जर तुम्ही देवाचे अस्तित्व मानणारे असाल, तर मग देवाला प्रत्येक धर्मामध्ये प्रथम स्थान दिले आहे. 'देव म्हणजे सर्व सृष्टीवर नियंत्रण असणारी एक सर्वोच्च शक्ती', असे मानले आहे. देवाला एक सामान्य व्यक्ती समजणे चुकीचे आहे. संपूर्ण विश्‍वाची उत्पत्ती करणार्‍या परमेश्‍वराला आपण कुठल्या घटनेत बांधू शकत नाही. एका सामान्य व्यक्तीलाही घटनेनुसार व्यक्तीस्वातंत्र्य असते. एखाद्या ब्रह्मचार्‍याने कोणाला भेटायचे, कोणाला नाही, हा त्याचा वैयक्तिक प्रश्‍न असतो. ते त्याचे स्वातंत्र्य असते. एखाद्या देवस्थानला हे स्वातंत्र्य का नाही असू शकत ? ते स्वातंत्र्य सर्वोच्च न्यायालयाने अबाधित राखणे आवश्यक आहे. नाहीतर व्यक्तीस्वातंत्र्यावरही अन्याय होईल.

४. सत्त्वगुणी अय्यप्पा स्वामींच्या मूर्तीचे दर्शन घेणे रजोगुणी प्रजननक्षमतेसाठी अहितकर

विशिष्ट वयोगटात स्त्रियांमध्ये प्रजनन क्षमता असते. अध्यात्मशास्त्रानुसार सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण प्रत्येकात असतात. प्रजननक्षमता ही रजोगुणाशी संबंधित आहे.

श्री अय्यप्पास्वामी यांची मूर्ती सत्त्वगुणाशी संबंधित आहे. त्यांचे ब्रह्मचारी रूप असल्यामुळे त्यातून प्रक्षेपित होणारी शक्ती ही प्रजननक्षमतेसाठी आवश्यक असलेल्या शक्तीच्या विरुद्ध आहे. त्यामुळे त्या वयोगटातील स्त्रियांनी मंदिरात जाणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अहितकर आहे.

५. सर्व धर्मियांसाठी खुले असलेले मंदिर !

येथे लक्षात घेण्यासारखा भाग म्हणजे श्री शबरीमला येथील मंदिर सर्व धर्मियांसाठी खुले आहे. येथे ब्राह्मणांपेक्षा शुद्र लोकांना अधिक मान दिला जातो. मुळात येथील परंपरा ही कोणावर अन्याय करण्याची नाहीच. आज ख्रिस्ती, मुसलमान या पंथांमध्येही एका जातीच्या लोकांना अन्य जातीच्या चर्च किंवा मशिदीमध्ये प्रवेश दिला जात नाही.

६. खरे विज्ञानवादी असाल, तर अभ्यास करा !

काही लोक स्वत:ला पुरोगामी आणि विज्ञानवादी समजून प्राचीन परंपरेला विरोध करत आहेत. अर्थात असे समजून ते स्वत:चा गैरसमज करून घेत आहेत. खरे वैज्ञानिक असते, तर त्यांनी तेथील सर्व गोष्टींचा अभ्यास केला असता. 'सात्त्विकता म्हणजे काय ?', 'तिचे प्रमाण काय ?', 'तेथील शक्ती' यांचा अभ्यास करण्यासाठी बरीच वैज्ञानिक उपकरणे सध्या उपलब्ध आहेत. त्याचा उपयोग करून या पुरोगामी म्हणवणार्‍यांनी अभ्यास करून बघावा.'

– श्री. सुमित सरोदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१०.२०१८)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

शबरीमला

सुहास
Chapters
शबरीमला शबरीमला निकाल: कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे शबरीमला येथील श्री अय्यप्पा मंदिरातील महिलांच्या प्रवेशामागील सत्य आणि विपर्यास ! असहकाराचे अस्त्र !