भाषण 6
मोहनदास करमचंद गांधी (ऑक्टोबर २, इ.स. १८६९ - जानेवारी ३०, इ.स. १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. महात्मा या संस्कृत भाषेतील शब्दाचा अर्थ आहे 'महान आत्मा'. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिता मानले जाते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये त्यांना प्रथम राष्ट्रपिता असे संबोधले. ते सत्याग्रहाचे जनक होते. त्यांची जयंती भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते.
असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकर्यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची सुत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, स्त्रीयांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली. १९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४०० कि.मी. लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले. १९४२ मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले. यासाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले.
गांधीजींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा यांचा पुरस्कार केला आणि स्वत:पण याच तत्त्वांनुसार जगले. स्वत: कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राहणी होती. त्यांनी जन्मभर शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा धार्मिक कारणांसाठी तसेच विरोधाचे साधन म्हणून दीर्घ उपवास केले.
गांधीजींचा जन्म ऑक्टोबर २, इ.स. १८६९ या दिवशी सद्ध्याच्या गुजरातमधील पोरबंदर शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई होते. करमचंद गांधी पोरबंदरमध्ये (जे तेव्हा काठिवाड प्रांतात होते) दिवाण होते. पुतळीबाई या त्यांच्या चौथ्या पत्नी होत्या. करमचंद हिंदु मोध समाजातील होते तर पुतळीबाई वैश्णव समाजातील. अत्यंत धार्मिक वातावरणातील बालपणाचा मोठा प्रभाव गांधीजींच्या पुढील आयुष्यावर दिसून येतो. विशेषत: अहिंसा, शाकाहार, सहिष्णुता, इतरांबद्दल करुणा या तत्त्वांचे बीज याच काळात रोवले गेले.
इ.स. १८८३ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा कस्तुरबा माखनजी यांच्या बरोबर बालविवाह झाला.पण त्या काळातील रिवाजानुसार कस्तुरबा बहुतांश काळ त्यांच्या वडिलांच्या घरीच होत्या.इ.स. १८८५ मध्ये जेव्हा गांधीजी १५ वर्षाचे होते तेव्हा त्यांना पहिले अपत्य झाले, पण ते खूप कमी काळ जगले. त्याच वर्षी आधी करमचंद गांधींचा स्वर्गवास झाला होता. पुढे गांधीजी आणि कस्तुरबा यांना अजून चार मुले झाली- इ.स. १८८८ मध्ये हरीलाल, इ.स. १८९२ मध्ये मणिलाल, इ.स. १८९७ मध्ये रामदास आणि इ.स. १९०० मध्ये देवदास.
त्यांच्या पोरबंदरमधील प्रार्थमिक तसेच राजकोटमधील माध्यमिक शिक्षणामध्ये ते एक साधारण विद्यार्थी होते. ते मॅट्रीकची परिक्षा भावनगरमधील सामलदास कॉलेजमधून थोड्या कष्टानेच पास झाले आणि तेथे असतांना, त्यांनी वकील व्हावे या त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेबद्दल ते नाखुश होते. शालेय शिक्षण संपवून वयाच्या एकोणिसाव्या वर्षी इ.स. १८८८ मध्ये ते इंग्लंडमध्ये लंडनला युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन मधून वकीलीचे शिक्षण घेण्यास गेले. इंग्लंडला जाण्याआधी त्यांनी आईला आपण मांस, बाई व बाटली (दारू) यापासून दूर राहू असे वचन दिले होते, त्याचे त्यांनी तिथे पालन केले. ते इंग्लंडमध्ये शाकाहारी संस्थेचे सदस्य बनले आणि लवकरच त्याच्या अध्यक्षपदी पोहोचले. इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर बनले आणि हिंदुस्थानात परत येऊन वकिली करू लागले.
ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी १९३० साली, गांधीजींची "अर्धनग्न फकीर" म्हणून कुचेष्टा केली होती. त्यांच्या शेवटच्या वर्षांमध्ये भारत पाकिस्तान फाळणीमुळे व्यथित झालेल्या गांधीजीनी हिंदू मुस्लीम दंगे थांबवण्यासाठी प्रयत्न केले.
२ ऑक्टोबर हा दिवस भारतात गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन' म्हणून पाळला जातो.
गांधींचे तत्त्वज्ञान निव्वळ पुस्तकी नव्हते तर ते उपयोगितावादात्मक (प्राप्त परिस्थितीत स्वतःच्या तत्त्वांचे आचरण करणारे) होते