भाषण 5
मोहनदास करमचंद गांधी (ऑक्टोबर २, इ.स. १८६९ - जानेवारी ३०, इ.स. १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. महात्मा या संस्कृत भाषेतील शब्दाचा अर्थ आहे 'महान आत्मा'. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिता मानले जाते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये त्यांना प्रथम गांधीजींची तत्त्वे
सत्य
गांधीजींनी आपले आयुष्य सत्याच्या शोधासाठी अर्पण केले होते. त्यांचे आत्मचरित्र माझे सत्याचे प्रयोग या नावाखाली प्रसिद्ध आहे. गांधीजींनी म्हटले आहे की, सर्वांत महत्त्वाची लढाई ही स्वतःच्या वाईट प्रवृत्ती, भय आणि असुरक्षितता यांच्यावर मात करणे ही होय. "परमेश्वर सत्य आहे." असे त्यांचे मत होते. पुढे त्यांनी ते, "सत्य (हेच) परमेश्वर आहे." असे बदलले.
अहिंसा
जरी अहिंसेचे तत्त्व गांधीजींनी स्वतः मांडले नसले तरी इतक्या मोठ्या राजकीय स्तरावर अहिंसेचा अवलंब करणारे ते प्रथमच व्यक्ती होते. हिंदू, बौद्ध, जैन, ज्यू धर्मात अनेक ठिकाणी अहिंसेच्या तत्त्वाचा उल्लेख आहे. "माझे सत्याचे प्रयोग" मध्ये गांधीजींनी त्यांचे अहिंसेचे तत्वज्ञान मांडले आहे. ते म्हणतात,
"जेव्हा मी निराश होतो,तेव्हा मी स्मरण करतो की, इतिहासात प्रत्येक वेळी सत्य आणि प्रेमाचाच विजय होत आला आहे. (इतिहासात) अनेक क्रूरकर्मे होऊन गेले आणि काही काळासाठी ते अजिंक्य पण वाटले, पण नेहमी शेवटी त्यांचा पराभवच झाला आहे-विचार करा, नेहमीच."
"विध्वंस हा सर्वंकषतावादाच्या नावाखाली केला गेला की, स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या नावाखाली-(त्यातील) मृतांसाठी, अनाथांसाठी आणि गृहहीनांसाठी काय फरक असणार?"
"डोळ्यासाठी डोळा सर्व जगाला अंधळे करून सोडेल."
"अशी अनेक ध्येयं आहेत ज्यासाठी मी जीव द्यायला तयार आहे. पण असे एकही ध्येय नाही ज्यासाठी मी कुणाचा जीव घेईन."
पण गांधीजींना माहित होते की, अहिंसेचे या पातळीपर्यंत पालन करण्यासाठी प्रचंड श्रद्धा आणि धैर्य आवश्यक आहे आणि प्रत्येकाजवळच ते असणे शक्य नाही. त्यामुळे ते सल्ला देत की प्रत्येकाने अहिंसेचे पालन करणे आवश्यक नाही, विशेषतः जर अहिंसा भित्रेपणाला झाकण्यासाठी वापरण्यात येत असेल तर.
स्वदेशी
शाकाहार
लहानपणी अनेकदा गांधीजींनी मांस भक्षण केले होते. ते मुख्यत्वेकरून त्यांच्या कुतुहलामुळे तसेच त्यांचा मित्र शेख मेहताब याच्या सांगण्यावरून होते. शाकाहाराची कल्पना हिंदू तसेच जैन प्रथांमध्ये खोलवर रुजली आहे. तसेच गांधीजींची जन्मभूमी गुजरातमध्ये बहुतांश हिंदू आणि सर्व जैन शाकाहारी होते आणि गांधीजींचे कुटुंबही याला अपवाद नव्हते. लंडनला शिकायला जाण्याआधी गांधीजींनी त्यांची आई पुतळीबाई आणि काका बेचारजी स्वामी यांना वचन दिले होते की ते मांस, बाई व बाटली (दारू) यांच्यापासून दूर राहतील. पुढे गांधीजी कडक शाकाहारी बनले. त्यांनी "मोराल बेसिस ऑफ व्हेजिटेरिअनिझम" हे पुस्तक लिहिले आहे तसेच शाकाहारावर अनेक लेखसुद्धा लिहिले आहेत. त्यातील काही लेख लंडन व्हेजिटेरिअन सोसायटीच्या "द व्हेजिटेरिअन" या प्रकाशनातून प्रसिद्ध झाले आहेत.
मृत्यू
३० जानेवारी १९४८ ला, दिल्लीच्या बिर्ला भवनच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असतांना गांधीजींची गोळी मारून हत्या करण्यात आली. त्यांचा मारेकरू नथुराम गोडसे हा एक पुरोगामी हिंदू होता व त्याचे संबंध जहालमतवादी हिंदू महासभेशी होते. त्याच्या मते पाकिस्तानला पैसे देऊन भारताला दुबळे पाडण्यासाठी गांधीजी जबाबदार होते.घोडसे आणि त्याचा सहकारी नारायण आपटे यांच्यावर खटला दाखल करून त्यांना दोषी ठरवण्यात आले. त्यांना १५ नोव्हेंबर १९४९ ला फाशी देण्यात आली. गांधीजींच्या राज घाट येथील समाधीवर 'हे राम' असे लिहिले आहे. हे त्यांचे शेवटचे शब्द होते असे अनेक जण मानतात, पण त्याची सत्यासत्यता वादग्रस्त आहे. गांधीजींच्या मृत्यूनंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी रेडियोवरून देशाला संबोधित केले:
"माझ्या मित्र आणि सहकार्यांनो, आपल्या आयुष्यातून प्रकाश निघून गेला आहे आणि सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे आणि मला कळत नाही आहे तुम्हाला काय आणि कसे सांगावे. आपले आवडते नेते-राष्ट्रपिता, ज्यांना आपण प्रेमाने 'बापू' म्हणत असू, आता आपल्यामध्ये नाही आहेत. कदाचित तसे म्हणणे चूकच ठरेल, पण आपण त्यांना आता बघू शकणार नाहीत, जसे आपण त्यांना इतके वर्ष बघत आलो आहोत. (संकटांमध्ये) त्यांचा सल्ला घ्यायला आपण आता धावत जाऊ शकणार नाही. त्यांच्या सानिध्यातील शांती आणि समाधान आपल्याला मिळणार नाही. हा एक प्रचंड धक्का आहे, केवळ माझ्यासाठीच नव्हे, तर या देशातील कोट्यावधी लोकांसाठीसुद्धा."