Get it on Google Play
Download on the App Store

पापाचा जनक

एका राजाने आपल्या दरबारात सभासदांना विचारले कि पापाचा जनक कोण असतो? पण उत्तर मिळाले नाही. राजाने आपल्या राजगुरुंकडे मान वळविली. ते परमज्ञानी होते. पण तत्काळ त्यानाही काही उत्तर सुचले नाही. राजाने त्यांना उत्तर देण्यासाठी एका आठवड्याचा काळ दिला. बऱ्याच चिंतन-मननानंतर राजगुरुना उत्तर मिळाले नाही. अशाप्रकारे सहा दिवस गेले. राजगुरू घाबरले त्यांनी भीतीपोटी राजधानी सोडली. चालत चालत एका गावात पोहोचले. तेथे एका घराच्या कट्ट्यावर विश्रांतीसाठी बसले. ते घर एका गणिकेचे (वैश्येचे) होते. राजगुरुंची हि दमलेली अवस्था पाहून तिने त्यांच्याशी चर्चा सुरु केली. राजगुरूने तिला आपली सर्व कथा ऐकवली. गणिका म्हणाली," तुमच्या प्रश्नांचे उत्तर माझ्याकडे आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला माझ्याकडे यावे लागेल. " हे ऐकताच राजगुरू म्हणाले, "तुझ्या सावलीतही पाप वाटते तेंव्हा तुझ्या घरी कसा येवू?" गणिका म्हणाली, " आपली इच्छा! परंतु ब्राह्मणाला दक्षिणा देणे हे मोठे पुण्याचे काम आहे आणि दारी आलेल्याला तर दक्षिणा दिल्याशिवाय मी जावू देणार नाही!" असे म्हणून तिने राजगुरुना सोन्याच्या दोन मोहोरा दिल्या. मोहोरा पाहून राजगुरू नरम झाले. तिच्या घरी आले, जेंव्हा तिने पाणी दिले तेंव्हा त्यांनी ते नाकारले पण तिने चार मोहोरा दिल्या तेंव्हा त्यांनी पाणीही पिले आणि अश्याच रीतीने जेवणही केले. तेंव्हा गणीकेने राजगुरुना सुनावले, "पापाचा जनक कोण असतो याचे उत्तर आता तुम्हाला मिळाले का?, तर पापाचा जनक आहे लोभ." राजगुरू निरुत्तर झाले पण त्यांना राजाच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.

तात्पर्य- कर्म आणि भाग्य यापेक्षा अधिक मिळवण्याची लालसा (लोभ) सदैव पापकर्म घडवीत असते.