Get it on Google Play
Download on the App Store

परिश्रम

एका गावात एक शेतकरी राहत होता. संसारात येणाऱ्या अडचणीमुळे तो खूपच त्रस्त झाला. अखेर एके दिवशी या सर्वाला कंटाळून त्याने आपले घर सोडले व साधूचा वेश धारण केला. साधूच्या वेशात तो सर्वत्र संचार करू लागला. त्याच्या या वेषाला पाहून लोक त्याला नमस्कार करीत. त्याला फळे, दुध, मिठाई, सुग्रास अन्न, दक्षिणा देत असत. तो जाईल तेथे त्याचा आदरसत्कार होत असे. देवाचे नामस्मरण आणि विरक्त संन्याशी वेश या एवढ्या भांडवलावर त्याचे जीवन अगदी मस्त चालले होते. साधू पण यात अगदी आनंदात होता. असाच एकदा एका तीर्थक्षेत्राच्या दिशेने वाटचाल करीत असताना या साधूला एक हिरवागार मळा दिसला. त्यात तरारलेल्या पिकांनी, वाऱ्यावर डोलणाऱ्या वेगवेगळ्या वेलींनी भरलेली शेते होती. त्या मळ्यामध्ये एक शेतकरी काम करीत असताना साधूने पाहिला. साधू त्याच्याजवळ गेला आणि त्याला म्हणाला," देवाने तुला या सुंदर शेताचे वरदान दिले आहे. त्याबद्दल तू देवाचे आभार मानले पाहिजेस." शेतकरी यावर हसून म्हणाला,'' साधुबुवा ! तुमचे म्हणणे खरे आहे. देवाचे आभार तर मानलेच पाहिजेत. देवाने मला इतके सुंदर, हिरवेगार शेत दिले आणि त्याबद्दल मी देवाचा ऋणी आहे. पण मी या शेतात काम करण्याच्या आधी फक्त देवाच्या हाती हि जमीन होती तेंव्हा तुम्ही ते पाहायला हवं होत."

तात्पर्य- यशस्वी होण्यासाठी अविरत परिश्रमांची गरज असते नाहीतर यशस्वी होता येत नाही.