Android app on Google Play

 

जनतेचा माणूस

एकदा लालबहादूर शास्त्रीजी नैनी येथे गेले होते. तेथे सरकारतर्फे एक औद्योगिक नगर वसविण्याचे प्रयत्न चालू होते. तेथील पूर्वीपासून चालू असलेल्या कारखान्यांचे निरिक्षण करुन टबे बनविणार्‍या कारखान्यालाही भेट देण्यासाठी ते तेथे गेले. त्या कारखान्याचे वैशिष्ट्य असं होतं की पॅकींगपर्यंतचे काम मशीनवर असे. शास्त्रीजींना पूर्ण कारखाना दाखवल्यानंतर वर असलेल्या मोठ्या गच्चीवर नेण्यात आले. तेथे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी मऊ आसनांच्या खुर्च्यांची सोय केली होती.

कामगारांना बसण्यासाठी खाली एक मोठी सतरंजी घालून ठेवली होती. त्यावर सर्व कामगार नेहमीप्रमाणे बसले होते. शास्त्रीजी तेथे पोहचताच सर्व उपस्थितांनी उभे राहून त्यांना अभिवादन केले व स्वागतासाठी सर्व पुढे आले.

सर्वजण नंतर खाली बसले व शास्त्रीजींना त्यांच्या आसनाकडे घेऊन जाण्यासाठी कारखान्याचे पदाधिकारी मागे वळले, तो काय ? त्यांच्यावर आश्चर्यचकित होण्याची वेळ आली. शास्त्रीजीनी चटकन काही कळायच्या आतच त्यांनी खुर्चीवर बसण्यास नकार दिला व गंभीरपणे म्हणाले, मी या जनतेचा माणूस आहे. माझी खरी जागा येथेच आहे. ती खुर्ची नाही !