Get it on Google Play
Download on the App Store

यशाचे गमक

महान शास्त्रज्ञ न्यूटन बागेत विचार करीत बसला होता. तितक्यात त्याला नोकराने हाक दिली. महाराज ! न्यूटन विचारात दंग होता. नोकराने पुन्हा साद घातली. महाराज ! आता न्यूटनची नजर नोकराकडे वळली तसा तो नोकर म्हणाला, महाराज ! बाहेर एक गृहस्थ आपणाला भेटण्यासाठी आलेत. ते आपणाला काही प्रश्न विचारु इच्छितात. खूप लांबून आलेत. न्यूटन म्हणाला, पाठव त्यांना इकडे. ते गृहस्थ आत आले.

न्यूटनला म्हणाले, क्षमा करा महाराज, मी अडाणी आहे. आपला लौकिक ऐकून आलोय. मला शहाणं व्हायचं आहे. मी काय करु ? न्यूटन म्हणाला, मित्रा, शहाणं होऊन तू काय करणार आहेस ? या प्रश्नावर तो गृहस्थ म्हणाला, मला तुमच्या यशाचं रहस्य जाणून घ्यायचं आहे. त्याचे उत्तर ऐकून न्यूटन म्हणाला, मित्रा ! एकच महामंत्र लक्षात ठेव. मन सैरभैर होऊ देऊ नकोस. तुला हवं ते ज्ञान मिळेल. पण त्यासाठी न चळणारं अवधान धारण करायला शिक. माझ्या यशाचं रहस्य हेच आहे. एकाग्र मनाला काहीही अशक्य नाही.