मंडळाच्या कार्याचे स्वरूप
इ.स. १९४७ सालानंतर मंडळाच्या कार्याची रुपरेषा साहजिकच बदलण्यात आली. आता मंडळाने राष्ट्रउभारणीच्या कार्यात हातभार लावण्याचे ठरविले. मंडळाच्या शिलकी निधीतून कस्तूरबा फंड, इ.स. १९४८ साली महात्मा गांधी मेमोरियल फंड, इ.स. १९५९ साली बिहार पूरग्रस्त निधीस आर्थिक मदत देऊन राष्ट्रीय कार्यात खारीचा वाटा उचलला. तसेच श्री पुढील देखाव्यात देखील बदल करून समाजापुढे राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून देणारे देखावे सादर करू लागले. इ.स. १९५८ साली मंडळाने पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रौप्य महोत्सव साजरा केला. त्यावेळी `गीता उपदेश' आणि `कालियामर्दन' हे दोन देखावे पाच-पाच दिवसांनी सादर केले. हे अविस्मरणीय देखावे अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत. रौप्य महोत्सवी वर्षाच्या गणेशोत्सवाच्या व्याख्यानमालेत मुंबई राज्याचे मंत्री नामदार म. ल. पाटील, ना. गणपतराव तपासे, ना. गोविंदराव आदिक, ना.मालोजी निंबाळकर, म्यु.कार्पोरेटर डॉ.नरवणे, नवाकाळचे सहसंपादक गोविंदराव महाशब्दे, प्रकाशचे वसंतराव काटे, कामगार सेवा सदनचे श्री. गोवर्धनदास मपारा, काकासाहेब तांबे यांची व्याख्याने झाली.