सदगुरुशरण
जो सदगुरुसी शरण जाये । तो काळाचाही काळ होये । काळ तयासी शरण जाये । ऐसें बोलताहे वेदांत ॥९८॥
नलगे योगयाग साधन । नलगे व्रत तीर्थ अनुष्ठान । नलगे वैराग्य तप दान । एक सदगुरुभजन करावें ॥९९॥
अनेक कर्में केलीं पाहे । तपें राज्य प्राप्त होये । राज्यांतीं नर्क होय । ऐसें बोलताहे वेदशास्त्र ॥१००॥
स्वर्गी काय सांगों सुख । पुण्य सरलियां लोटिती देख । मागुती पाहावया मृत्युलोक । स्वर्गनर्क भोगावया ॥१०१॥
नर्क ह्नणजे गर्भवास । गर्भी पचावें नवमास । नाना दुःखें होती जिवास । त्याहूनि विशेष दुःख काय ॥१०२॥
जेणें मृत्यूचें मूळ तुटे । जन्म मरणाचें खत फाटे । पापपुण्याची वाढी खुंटे । धरणें उठे काळाचें ॥३॥
ऐसा होवावया एक उपावो । भावें भजावा सदगुरुरावो । जन्ममरणा पुसी ठावो । स्वरुपीं जीव मेळवीं ॥४॥
येथून नाहीं जीव नेला । आणि स्वरुपीं मेळविला । देही असतां मुक्त केला । उगव दाविला जीवासी ॥५॥
जीव आपुला उगव पाहे । इंद्रियांसहित तल्लीन होय । तेथें काळ करील काय । जन्ममरण अपाय खुंटले ॥६॥
जैसे भूपतिचिया बाळें । अनिवार अन्याय केले । तें मातेपुढें जाऊनि बैसलें । मग काय चाले कोणाचें ॥७॥
तैसा जीव स्वरुपीची असे । नाना कर्मे केलीं बहुवसें । तो स्वरुपीं जालिया समरसें । तेथें काळासी रीघ कैचा ॥८॥
स्वरुप अखंडदंडायमान । सर्वां ठाई परिपूर्ण । तेथें जिवासी कैचें जीवपण । समरसोनि एक जालें ॥९॥
जैसें सागरीहुनी लवण । जळापासूनि निर्माण । सगुणत्वें जालें कठीण । ह्नणोनि भिन्न नघडे त्यासी ॥११०॥
तेंचि जळामाजीं घालितां । जळचि होय तत्त्वतां । तें परतोन येईल हाता । हें सर्वथा न घडेचि ॥११॥