मायेची करणी
मायेची करणी
जे माया त्रिभुवनें व्यापिलीं । निमिष्यमात्रें ब्रह्मांडे रचिली । सगुणत्वें विस्तारिली । सृष्टी केली स्वइच्छा ॥४५॥
तयेचा नेणती पारुं । ब्रह्मादी हरिहरु । उत्पत्ति स्थिति संहारु । हा व्यापारु मायेचा ॥४६॥
त्रिमूर्तींची जे सत्ता । जे मूळमायेची प्रतापता । शक्तीवीण कार्य कर्ता । हें सर्वथा न घडेचि ॥४७॥
अगाध मायेचें करणें । रचूनि नाना विंदानें । करुनि अवघेंचि विसर्जनें । अदृश्यपणें वर्तत ॥४८॥
जें स्वरुपीं इच्छा जाली । तैं हे माया नांव पावली । सकळ भूतांतें प्रसवली । सृष्टी निर्मिली पळमात्रें ॥४९॥
शिवा आणुनी जीवपण । तयासी लाविलें जन्ममरण । सुखदुःखादि भोग दारुण । करुनि आपण निराळी ॥५०॥
सदगुरुभक्तापुढें माया म्हणजे मृगजळ
ऐसी ये माया सबळ । एवढें रचिलें जगडवाळ । तें गुरुभक्तापुढें केवळ । मिथ्या मृगजळ होऊनि ठेली ॥५१॥
शिव विरंची नारायण । आणि साधूसंत योगीजन । हे स्वरुपी जाले निमग्न । यातें माया वदन दाऊं नशके ॥५२॥
जेथ अज्ञानाचा सुकाळ । तेथें मायेचा गोंधळ । जो ज्ञाता अनुभवी केवळ । तेथ विटाळ मायेचा ॥५३॥
जरी ह्नणाल मायेचा विटाळ । तरी कां देह धरिला स्थूळ । ऐसें ह्नणती ते केवळ । आज्ञानी समूळ जाणावे ॥५४॥
मायेचा सूत्रचालक नारायण
मायेसी नाहीं स्वतां चळण । इसी चाळिता आदिनारायण । मायापटळ आड लावून । भूतातें आपण चेष्टवी ॥५५॥
जैसा छायामंडपाभीतरी । एकला बैसोनि सूत्रधारी । वस्त्र लावूनि माझारी । प्रभा अंतरीं दीपाची ॥५६॥
नाना अचेतन पुतळियां । स्वइच्छा नाचवी तयां । हावभाव दाऊनियां । जन भुलवावया खेळतु ॥५७॥
एक एकातें मारवित । आपणचि शंखध्वनी करित । काय जालें ह्नणोनि पुसत । आणि हांसत आपणचि ॥५८॥
भंडभंडातें दावी । नाना पातकें करवी । गाईपाठी व्याघ्र लावी । आणि मारवी तयेतें ॥५९॥
अनंत पुतळीयांतें दावित । संहार स्वइच्छा करीत । अज्ञानातें साच दिसत । नसे मेले जीत ते ठाई ॥६०॥
दाखवी नाना सुखदुःखातें । हें होय कवण कवणातें । एकाविण दुजें नाहीं तेथें । पापपुण्या ठाव कैचा ॥६१॥
तैसा भगवंत लीलावतारी । चिदाकाशींच्या मंडपाभीतरीं । माया पट लाऊनी माझारीं । प्रभा अंतरीं स्वरुपाची ॥६२॥
नानायती नानावर्णं । नानाकर्में पापपुण्य । सुखदुःखादि भोग दारुण । करुनि आपण निराळा ॥६३॥
तो जैंसे जैसे चेष्टवित । तैसीं तैसीं भुतें नाचत । सर्वही करविता भगवंत । पापपुण्य हें कवणासी ॥६४॥
पापपुण्य बोलणें । जैसें शेतामाजीं बुजवणें । तेथें नसे साचपणें । वृथा भिणें वनचरीं ॥६५॥
तैसे ते अज्ञानी जन । तयांसी दिसे पाप पुण्य । जे जीवन्मुक्त सज्ञान । तयांसी त्रिभुवन मुक्त दिसे ॥६६॥
जो केवळ जाणता । तो मायेचा नेणता । साधु भगवंताच्या ये समता । ह्नणोनि बद्धता न घडे त्यासी ॥६७॥
त्यासी माया मिथ्या कळली पाही । तो देहीं असोनी विदेही । जन्ममरणाचें भय नाहीं । सच्चिदानंदडोहीं क्रीडतु ॥६८॥
जयासी नाहीं आत्मज्ञान । तयासी देहाचें बंधन । नाना दुःखें भोग दारुण । जन्ममरण भोगवी ॥६९॥
जे सदगुरुचे अंकित । तयांसी देह दुर्लभ बहुत । स्वरुपीं होऊनियां रत । सुखें भोगित स्वानंद ॥७०॥
जैसे द्रव्याचेनि गुणें । एकीं विष घेऊनी भक्षणें । एकीं उपभोग भोगणें । एक दानधर्म करिती ॥७१॥
तेथ द्रव्यासी नाहीं दूषणें । आपुलें संचित भोगणें । तैसें देहाचेनि गुणें । बद्धमुक्तपण भोगिजे ॥७२॥
जे नाना पातकें करित । त्यांसी देह काय करा ह्नणत ? कां जो श्रीहरीसी शरणागत । तयासी सांगत देह काई ॥७३॥
देह पाहतां अचेतन । देहासी कैचें दूषण । जो देहासी चेष्टवी जाण । सुखदुःख भोग त्यालागीं ॥७४॥
जैसी काष्ठाची पुतळी केली । सर्व इंद्रियें निर्मिली । परी चाळितेविण जाली । प्रेतरुप ॥७५॥
चाळिता वैसे अंतरीं । वोढी इंद्रियाची दोरी । मग प्रवर्ते व्यापारीं । सूत्रानुक्रमें ॥७६॥
तेथ सुखदुःख अवस्था । कैसी घडे पुतळ्यांच्या माथां । जो अंतरीं चेष्टविता । तोचि कर्ता सर्वही ॥७७॥
तैसे देह अचेतन । त्यातें चालवितें मन । सर्वइंद्रियें त्याचे आधीन । स्वामी जाण तयांचा ॥७८॥
पापपुण्याची कल्पना । संकल्पविकल्प उठती मना । विसरोनि आत्मज्ञाना । जन्ममरण भोगिती ॥७९॥