Android app on Google Play

 

प्रकरण २: गोष्टीमागील गोष्ट

 

आई-बाबांचा आशीर्वाद आणि मनोहरची भेट घेऊन अभिजीत निघून गेला. दांपत्याच्या चेहऱ्यावर मुलाच्या कर्तृत्वाबद्दल अभिमान होता, तर मनोहरच्या मनात अभिजीतचं वाक्य खोलवर रुतून बसलं होतं. अवघं लहानपण दोघांनी एकत्र घालवलं होतं, वयात दोघांची लग्न झाली असती तर आता दोघेही तरुण मुलांचे बाप झाले असते. पण का कुणास ठाऊक, दोघांच्याही मनात लग्न आणि प्रेमाविषयीची भावना आलीच नाही. मनोहरचे बाबा कमवत असले तरी ते पैसे घरखर्चासाठी खूपच कमी होते, असे असताना त्यांनी अभिजीतला घरी आणलं आणि मनोहरप्रमाणे त्याला देखील वागवलं, शिकवलं आणि मोठं केलं. आजवर अभिजीतविषयी कुणाच्याही मनात परकेपणाची भावना नव्हती. पण आज अभिजीतने म्हटलेलं वाक्य मनोहरसाठी परकेपणाचं होतं. त्याला या विषयावर स्वस्थ बसवेना. त्याने हा विषय आई-बाबांसोबत चर्चा करून सोडवायचे ठरवले.

"हम्म, बोल. काय म्हणायचंय?" बाबा विचारतात.

"अभिजीतविषयी बोलायचं होतं." मनोहर म्हणतो.

"अरे, तो इतक्या वेळ होता तेव्हा बोलायचं होतंस ना!" आई म्हणते.

"त्याच्यासमोर न बोलण्यासारखं आहे. खरं तर त्याने मला म्हटलेल्या एका वाक्याने मी जरासा विचलित झालो आहे. त्याविषयी बोलायचं आहे." मनोहर म्हणतो.

"बरं, बोल." बाबांनी विचारताच मनोहर संपूर्ण प्रसंग सांगतो. मनोहरप्रमाणे आई आणि बाबांच्या चेहऱ्यावरील रंग उडून जातो.

"तुम्हाला काय वाटतं, त्याने बोललेले शब्द बरोबर आहेत, की आपण कुठेतरी कमी पडलो आहोत?" मनोहर विचारतो.

बाबांकडे या प्रश्नावर उत्तर नसतं. अभिजीतचं हे वाक्य त्यांच्या मनात खोलवर रुतणारं होतं, कारण त्यांनीच तर अभिजीतला आणलं होतं. मनोहरच्या प्रश्नाचं उत्तर देताना ते पुन्हा भूतकाळात जातात.

तो काळ १९७१ चा होता. लोकसंख्या आताएवढी नव्हती, पण तेव्हाच्या मानाने खूप होती. आमच्या ऑफिसचे काही पेपर्स मंत्रालयात सादर करायचे होते. काम झालं तसा मी मंत्रालयातून निघालो. अचानक तिथे धावपळ सुरु झाली. मला काही समजायला मार्ग मोकळा नव्हता आणि कुणाला विचारायची हिम्मतसुद्धा नव्हती. माझ्यासोबतच एक जोडपं तिथे त्यांच्या मुलासह आलं होतं. त्यांच्यासोबत जेवढं औपचारिक बोलणं झालं, त्यानुसार ते अकोल्याहून आले असं कळलं होतं. धावपळीने ते सुद्धा पुरते गोंधळून गेले होते. पहिल्यांदाच ते मुंबईला आले असावेत. सोबत तीन वर्षाचं मूल घेऊन फिरताना त्यांची काय अवस्था होईल हे समजून मी त्यांना माझ्यासोबत यायला सांगितलं.

भारत आणि पाकिस्तानमध्ये कारगिल युद्ध सुरु होण्याचे संकेत येत होते. कुठून तरी एक बातमी उडत आली की, आपल्या सैन्याला कारगिलमध्ये गुंतवून पाकिस्तानची अर्धी तुकडी आज दिवसभरात मुंबईवर हल्ला करणार आहे. तुमच्या whatsaspp वर जशा दर मिनिटाला अफवा पसरतात, तशी तेव्हा ही एक अफवा पसरली होती. सगळेच खूप घाबरले होते, बातमी पडताळण्यासाठी कुणाकडेही वेळ नव्हता. अशा परिस्थितीत ते जोडपं पूर्णतः माझ्यावर अवलंबून होतं. त्यांच्याकडे बरंच सामान असल्याने मी त्यांच्या मुलाला कडेवर घेतलं आणि आम्ही रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघू लागलो. जो तो घराच्या दिशेने धावण्याचा प्रयत्न करत होता. मुंबईने तेव्हा पहिल्यांदाच माणुसकी सोडली होती. जो तो आपलाच विचार करत होता. मी स्वतःला कसा वाचवू शकेन हाच प्रत्येकाचा प्रयत्न होता. आम्ही पायी जात होतो, तेच थोड्या वेळाने पोलिसांची जिप्सी घोषणा करत फिरू लागली. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं, ‘मुंबईचे सर्व समुद्रकिनारे सुरक्षित असून कोणत्याही प्रकारे अतिरेकी समुद्रमार्गे घुसखोरी करू शकत नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका.’ पण कोणीतरी ‘उन्होंने पैसे खाये है. वो हमें मरवाने के लिए ऐसे कर रहे है. हमें यहा छोड कर खुद भाग रहे है.’ असं बोलू लागलं. नकारात्मक गोष्टी पसरायला किती वेळ लागतो?

मी त्या जोडप्याला समजावण्याचा प्रयत्न केला, आपण सुरक्षित आहोत, स्वतः पोलिसांनी घोषणा केली आहे. कोणत्याही प्रकारचा हल्ला होणार नाहीये. माझ्यासह मोजकेच लोक आता थांबले होते, पण अविश्वास दाखवून बरीच माणसं अजूनही रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात होते. त्या जोडप्याने देखील मला रेल्वे स्टेशनजवळ नेण्याची विनंती केली होती. जुलैचा महिना असल्याने पाऊस पुन्हा सुरु झाला होता. रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी असले याचा मला अंदाज होता. पण त्यांना समजावणार कोण? आम्ही रेल्वे स्थानकाजवळ पोहोचलो. प्रचंड मोठी गर्दी, मी शब्दांत देखील सांगू शकत नाही. आम्ही तिघे त्या तीन वर्षाच्या मुलासह तिथे पोहोचलो. त्यांनी गर्दीसह जाण्याचा हट्ट धरला. मी नाही म्हणू शकलो असतो. पण काही बोललो नाही, त्यांना गर्दीत जाऊ दिलं, सोबत मी सुद्धा गेलो. पुन्हा लांबून पोलिसांच्या जिप्सी येताना दिसल्या. कोणीतरी ओरडलं. पाकिस्तानने हल्ला केला. सर्वांची देशभक्ती, माणुसकी बाजूला राहिली आणि सुरु झाली चेंगराचेंगरी. माझ्या हातातील मुल घाबरून आकांडतांडव करून रडत असल्याने देवाच्या कृपेने मला सर्वांनी कसंतरी आडोशाला ढकललं. पण त्याचे आईवडील गर्दीत दिसेनासे झाले. पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी साधारण दोन तास लागले असावेत.

४० च्या आसपास लोक मृत्युमुखी पडले होते. मी त्या मुलाला शांत करत त्याच्या आईवडिलांना शोधू लागलो होतो. हृदय कठोर करून मी ओळख पटवून देण्यासाठी ठेवलेली शवं बघू लागलो. जे नको होतं, तेच घडलं होतं. मृतांमध्ये त्या मुलाचे आईवडील होते. मी पोलिसांना त्या मुलाबाबत आणि त्याच्या आईवडिलांबद्दल सांगू लागलो. पण कुणा निर्दायाने त्या मृतांजवळील सर्व समान, पैसे चोरले होते. त्यांच्या शरीरावर कपडे तेवढे शिल्लक होते. मला त्यांचं नावदेखील माहित नव्हतं. पोलिसांना देखील ओळख पटवता येत नव्हती. नंतर पावसाचा जोर वाढू लागला. पोलिसांना माझ्या आणि त्या तीन वर्षांच्या मुलापेक्षा मुंबईवर नियंत्रण मिळवणे महत्वाचे होते. त्यात भयभीत नागरिक आणि पाऊस हे त्यांच्यापुढील मोठे आव्हान होते.

त्या मुलाला मी घरी घेऊन आलो. तेव्हा तू पाच वर्षांचा होतास, पहिल्या इयत्तेत जाऊ लागला होतास. त्या मुलाची आणि तुझी पहिल्या भेटीतच मैत्री झाली होती. तुम्ही दोघे खेळत होते आणि मी तुझ्या आईला सर्व हकीकत सांगत होतो. काही दिवस सरल्यानंतर आम्ही त्या मुलाला पोलिसांकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी आम्हाला खूप सहकार्य केले, पण आईवडिलांची ओळख पटत नसल्याने त्या मुलाची ओळख पटत नव्हती. त्याच्या नातेवाईकांचा शोध घेणे देखील शक्य होते नव्हते. आम्ही मंत्रालयात देखील अकोल्यातील सर्व केसेस तपासल्या, पण हाती काही लागलं नाही. ते मूल अनाथ झालं होतं. माझ्या मित्रांनी ते मुल अनाथआश्रमात सोडायला सांगितलं होतं, पण घरी तुझ्या आईचा आणि तुझा त्याच्यावर जीव जडला होता. तो सुद्धा तुमच्यात मिसळला होता. माझ्या चुकीमुळे त्या मुलाचे आईबाबा आज या जगात नव्हते. मी त्यांना गर्दीत जाण्यापासून थांबवू शकलो असतो, पण ती परिस्थितीच वेगळी होती.

एनी वे, मी तुझ्या आईबरोबर चर्चा केली, आणि आम्ही दोघांनी ते मुल स्वतःचं म्हणून सांभाळण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामध्ये मला पोलिसांनी आणि मित्रांनी खूप मदत केली. त्या अनाथ मुलाला अभिजीत हे नाव मिळाले. कायदेशीर बाबी पूर्ण करून आम्ही त्याचे पालक झालो आणि तो अभिजीत लक्षमण फडके झाला.’ 

मिस्टर सिंगल फादर

अभिषेक ठमके
Chapters
प्रस्तावना
प्रकरण १: आम्रखंड
प्रकरण २: गोष्टीमागील गोष्ट