धरणातलं गाव भाग 6
कथा :धरणातलं गाव
लेखक ; तेजस भोसले
भाग ६
अस म्हणताच हौसा काकी च्या अंगाला कापरच भरलं. आणि ही बया आता काय सांगत्या न काय नाय असा विचार लगेचच हवसा काकी च्या मनात येऊन गेला. आणि हवसा काकी तिच्या तोंडकड लगेच भेदरल्या नजरेने आत्ति कडे पहात होती. पण आत्ति भी हट्टी बाय . लवक्र काय सांगत्या व्ही. मग आणखी एकदा लगेच हवसा काकी म्हणाली आव आत्ति बोला की लवकर. तवा कुठं हीन थोडं त्वांड उघडलं. आणि म्हणाली हे बग हवशे तू हायस एक तर लय भोळी , तुला कोण भी आणि कवा भी फसवत असत्य बग. त्यात तुला एकुलता एक ल्योक हाय. तेजी बायकू म्हंजी तुजी सून तू लेकी प्रमाण संबळणार आणि ती नेमकी तुज्या डोक्यावर मिऱ्या वाटणार. तवा मी सांगल तस कर , लय अंदाज दियाचा नाय, लय फूड फूड हालयच नाय , करील तिथं तिला लगेच इचारायच काय करतीस ग... आणि ते बी हळू नाय तंबीत इचारायच समजलं का, ? अस म्हणताच काकी न मान डुलवली,
आत्ति न आता चहाची बशी सरकवली आनि जाते ग म्हणत हात टेकत उठली. जाता जाता गप बसत्या वि . मी तिथंच होतोच की. तिज्या डोळ्याला कस काय खुपाव . मला लगेच बोलली की मुडद्या आज काय काम नायती व्ही. बसलायस बेस रिकाम टेकडा. आता म्हणलं आपल्या कड आल्या तर सांगावं
मी लगेचच म्हणलं आत्ते तुज्या गत मला कुठलं ग काम. पण तुज्या सारखीला सोडायच काम हायच की. मग आत्ति हसली आणि चल म्हणली. असच दिवस निघून गेलं आणि पावसाळा सुरू झाला . मिरीग निगायच्या आगोदर माणस रानाच्या मेहनतीला लागली. सगळी रानात रक्ताचं पाणी करून काम करू लागली. आव आमच्याकडं काट्या कुट्याची जमीन काळी कुळकुळीत पण एकदा पाऊस पडून गेला की लवकर काय घात यायची नाय. म्हणून माणस गडबड करत असत. कोण मांनस रानात जनावराकडून मेहनत करून घेत असे तर कोणी स्वताच पाठीला नांगर मारून स्वता राबत असे. तो पावसाळा नव्हताच तसा वळवाचा पाऊस पडायला सुरुवात झाली होती , आव दिवस भर पाऊस उगडायचा आणि दुपार उलटली की पावसानं जुपी केली च म्हणून समजायची.
बायकांची लय धाव पळ उडायची. कोणी शेनी गोळा करत अस, तर कोणी दगडावर वाळत घातलेली कापड. आणि मी ती गम्मत मोठ्या हवसन बगायचा. माझ्या बरोबरचा अजित उन्हाळ्याच्या सुट्टीला आला होता. आमच्या गावाकडं काय लय शीकायची सोय नव्हती. म्हणून पोर बाहेरच शिकायला असायची. गावात आम्ही तरणी पोर ठराविक च असायचो . आणि मग उन्हाळा लागला की सगळी परत यायची . मग आमचं लय खेळ चालायचं. इतकं मोठं होऊन भी इटी दांडू ला दिवस भर खेळायचो, पोहायला गेलो की जेवणाचं भान नसायचं, आजीत एक चांगला पैलवान होता. कोल्हापूरची खासबाग तालीम पट्ट्याने चांगलीच गाजवली होती. गावाकडं आला की आम्ही भी मातीत कुस्त्या खेळत असू. गावाकडच्या तालमीत आमचा जोर ,बैठका आणि सपाटयांच्या चांगल्याच पैजा लागत असे मग कोण कोणालाच कमी पडत नसे. आणि एकदा अंग गरम झालं की आमचा मातीत कस लागे. त्यो लय वेळ चाले . भूक लागे घरी आलो की थोडं खाऊन शिकारीच्या डावात आम्ही पोर चाललो. त्यो चांगला शिकून आता मास्तरकीच्या कोरसाला व्होता. आमच्या सगळ्या गावात त्योच पहिला मास्तर होणार अशी सगळी म्हणत असायची. त्यो भी प्रामाणिक पणानं कस्ट करीत असे . त्यो आला की कायम उन्हाळ्यात वेळ मिळल तवा अभ्यास करत असायचा. आमच्या इथं खिळ्याच्या माळाला एक भला मोठा आंबा होता त्या खाली बसून त्यो अभ्यास करत असे. तिथं लय लोकांची वर्दळ नसायची . आणि शांत भी असायचं. आज मी आणि त्यो संघटच बाहेर पडलो होतो . त्यो आज आमच्या दारावर्न निघाला होता. जरा नाराज च होता. गोरा गोरा पान पोरगा, कायम हसत मुख असणारा, केसांची रचना सरळ, भांग अगदी व्यावस्थित,
पैलवान असल्याने ढगाळीच पॅन्ट , आणि फिट टी शर्ट असायचाआणि जवा बगल तवा कुंकवाचा उभा नाम असे. उंची सहा फूट, शरीर धिप्पाड असणारा गडी आज गप चालला होता सकाळी जाणारा गडी आज 11 वाजले तरी काय घरात होता.त्यो जरा समोर येताच मीच त्याला म्हणलं कार अजित आज नाराज हायस. तर त्यो माझ्या गळ्यातच पडला, आणि म्हणला भावा आज काय जावं वाटणा. झालं परत कॉलेज सुरू होईल न मग हाय अस जीवन सुरू होईल. मग म्हणलं राहुदीकि अभ्यासाला र ।।। कुणी काय जबरदस्ती किल्या का. ? आर परीक्षा हाय नवका आस म्हणत आम्ही गप्पा मारत रानात आलो त्यो अभ्यासाला बसला दुपार झाली की मीच त्याच्या कडला जाऊन बसलो. तिथेच भाकरी सोडली आणि खाली. त्यानं भी आंनदांन खालली. अजून भी त्यो नाराज होता. आज आभाळ चांगलंच भरून आलं होतं. मी त्याला अंगुळीला चल म्हणलं होत . आज त्यो नाय म्हणाला. मी इथंच बस्तू तू जा. पण मला भी रानात काम हाय म्हणलं आणि मी निघालो. थोड्या वेळानं मी जाऊन म्हणलं अजित घरला चल आभाळ लैच आलंय लका. तर म्हणला जरा थांब एवढं वाचतो आणि जाऊ. मी पण बरच म्हंटल. लहान पना पासन आम्ही एकत्र वाढलो होतो. त्यो हुशार होता मी जरा ढच होतो. पण मला त्याच्या मागे पाठीच्या भावा प्रमाणे संभाळत आणला होता. कवा कापड नाय मिळाली तर त्यो त्याचा एकादा डिरेस आणून दि. जाताना मला थोडं पैसे देई. घासातला घास आम्ही वाटून खात असू. आंब , चिचा जांभळ आम्ही लय खाई. मला कधी त्यो परका वाटत नसे. त्यो मला तस म्हणला म्हणून मी जरा रानात थोडं काम करायला लागलो . पाक रानाच्या त्या टोकाला गेलो. आणि ह्या टोकाला त्यो राहिला. पावसानं सुरवात केली. मी जोरात आवाज दिला ये अजित आर पळ की पावसानं सुरवात किल्या. त्यानं हातानं आलो थांब अस म्हंटल. आर ये मी ओरडलो. पाऊस इकडे वाढला होता. इजांचा चांगलाच कडकडाट सुरू होता. सोसाट्याचा वारा जोरात सुटला होता. आमचं पत्र्याचा शेड गदादा हालायला लागलं होतं. जनावर वारा बगुण च हंबरायला लागली होती. आमचं बांदलयाल कुत्रं जोरात ओरडायला लागलं होतं. शेजारची 2 झाड पडली होती, मला आमच्या कुडातन सगळं दिसत होतं. मी त्याला खुणावत होतो कारण माझा आवाज जाणं काय शक्य नव्हते . त्यो कोस भर लांब होता . आणि आता पावसानं आम्ही एक मेकाला दिसत ही नव्हतो.
वीज चांगलीच भंडाकली होती.
आणि तीन एक बार भी टाकला होता.
आंमची जनावर पार गळापटून गेली होती आता वारा जोरातच चालू होता
क्रमशः