Android app on Google Play

 

माहेर कविता, गदिमा

 

समुद्राला मिळाल्यावर नदी परत पर्वताकडे जात नाही म्हणून नदीला माहेर नाही असे म्हणतात.

गदिमांनी ह्या कवितेत हा समज खोडून काढत जलचक्र किती सुंदर शब्दात सांगितलं आहे..

नदी सागरा मिळता
पुन्हा येईना बाहेर,
अशी शहाण्यांची म्हण
नाही नदीला माहेर

काय सांगू रे बाप्पानो
तुम्ही आंधळ्याचे चेले,
नदी माहेराला जाते
म्हणूनीच जग चाले

सारे जीवन नदीचे
घेतो पोटात सागर,
तरी तिला आठवतो
जन्म दिलेला डोंगर

डोंगराच्या मायेसाठी
रूप वाफेचे घेऊन,
नदी तरंगत जाते
पंख वाऱ्याचे लावून

पुन्हा होऊन लेकरू
नदी वाजविते वाळा,
पान्हा फुटतो डोंगरा
आणि येतो पावसाळा.

-- माहेर कविता,  गदिमा