व्यथा
जागं करी गाव सारं
कोंबड्याचं आरवणं,
भल्या पहाटंच होई
दारी सडा सारवणं..
माय शेणकूर काढी
बाप करी धारापाणी,
कानावर पाखरांची
पडतात गोड गाणी..
नाद घुंगूर माळांचा
कसा पांदीत घुमतो,
काळ्या आईच्या सेवेत
माझा बापूस रमतो..
दारी येता बहुरूपी
मिळं त्याला त्याचा पसा,
कसा जपुनी ठेविला
माझ्या मायनं हा वसा..
सणवार आनंदाचं
ताटामधी गोडधोड,
नात्यातल्या गोडव्याला
जपण्याची मनी ओढ..
नाही कुठंच उरलं
असं जगणं हे आता,
नाती झाल्यात परकी
कुणा सांगावी ही व्यथा..?
©हनुमंत येवले