खरा भक्त
एका गावाबाहेर एक शंकराचे देऊळ होते. ते स्वयंभू स्थान होते. काळीभोर शंकराची पिंडी होती. त्या गावाच्या राजाची देवावर फार भक्ती. त्याने त्या देवाला सोन्याचा मुखवटा केला होता. शिवरात्रीच्या उत्सवात, श्रावण सोमवारी तो मुखवटा चढविण्यात येई. हजारो लोक पाहायला येत.
राजा रोज देवाच्या पूजेला जात असे. "पाहि मां पाहि मां" म्हणत असे. राजाकडची ती पूजा. तिचा थाट किती वर्णावा! किती सांगावा? सुंदर सुगंधी फुलांच्या माळा असत. बेलाच्या त्रिदळांच्या पाट्या भरलेल्या असत. चंदनाचा सुवास सुटलेला असे. उदबत्यांचा घमघमाट असे. ओवाळायला कापूर असे. बाहेर चौघडा वाजत असे. अशा थाटाने पूजा होई.
त्या देवळाजवळ एक संन्यासी राहायला आला. तो फार कोणाशी बोलत नसे. देवा शंकराला प्रदक्षिणा घालीत असे. आसन मांडून जप करीत बसे. तो झाडाचा पाला फक्त खाई. जवळ झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी पिई. असा त्याचा कार्यक्रम असे.
एकदा एक परगावचा मनुष्य त्या गावी आला. देवा शंकराच्या दर्शनास गेला. संन्यासी शांतपणे बसला होता.
"महाराज, आपणाला एक प्रश्न विचारु का?" त्या माणसाने विचारिले.
"विचारा." संन्यासी म्हणाला.
"तुम्ही येथे पुष्कळ दिवस आहात. देवाच्या पूजेला, देवाच्या दर्शनाला रोज किती तरी लोक येतात. त्यांच्यातील देवाचा खरा भक्त कोण?"
"खरे सांगू का?"
"खरे सांगा. दुसऱ्याच्या रागाची संन्याशाला काय पर्वा?"
"खरे आहे. ऐका तर. तेथे रोज दोन प्रहरी एक गुराखी येतो. तो, देवा शंकराचा खरा भक्त."
"हो."
"त्याला वेदमंत्र येत नसतील. जपजाप्य करीत नसेल तो. पूजा तरी कशाने करणार? कोठून आणील गंध? कोठून आणील नीरांजन? येथे राजा रोज पूजेसाठी येतो. कशी घवघवित दिसते ती पूजा. किती माळा, किती कापूर. त्या राजापेक्षाही का तो गुराखी मोठा भक्त?
"हो; पुन्हा पुन्हा काय सांगू?"
"महाराज, तुमच्या म्हणण्यावर विश्वास बसत नाही."
"उद्या प्रचीती दाखवितो. राजा पूजा करील त्यावेळेस व गुराखी दुपारी येईल त्या वेळेस तुम्हीही येथे असा."
"अवश्य येईन."
तो मनुष्य निघून गेला. संन्यासी आपल्या कर्मात रमला. दुसरा दिवस उजाडला. तो मनुष्य आधीच देवळात येऊन बसला. काही वेळाने राजा आला. चौघडा वाजू लागला. सनया आलापू लागल्या. महापूजा सुरु झाली. माळा चढविण्यात आल्या. कापूर पेटवून राजा ओवाळू लागला. इतक्यात काय झाले? ते देऊळ एकदम हलू लागले. भूकंप होणार असे वाटले. राजा घाबरला. दगड डोक्यावर पडतात की काय असे त्याला वाटले. त्याच्या हातातील ती हलकारती खाली पडली. कोठले ओवाळणे, कोठली पूजा. राजा धूम पळत सुटला. राजाच्या बरोबरचे सारे पळत सुटले. ती पूजा तशीच अर्धवट तेथे पडून राहिली.
दुपारची वेळ झाली. तो गुराखी आला. त्याच्या गाई रानात चरत होत्या. तो देवाच्या दर्शनाला आला. तो गाभाऱ्यात शिरला. पिंडीला त्याने कडकडून मिठी मारली. नंतर त्याने आपल्या भाकरीचा नैवेद्य देवासमोर ठेवला. क्षणभर त्याने डोळे मिटले. आणि तेथेच ती कांदाभाकर खाऊ लागला. आईच्या जवळ बसून जेवू लागला. देव म्हणजे सर्वांची आई ना?
इतक्यात ते देऊळ हलू लागले. दगड डोक्यावर पडणार असे वाटले. हातातील भाकरी हलू लागली. भूकंप होणार असे वाटले. परंतु त्या गुराख्याने काय केले? तो पळाला का? त्याने धूम ठोकली का? नाही. त्याने एकदम शंकराच्या पिंडीला मिठी मारली. "देवा, सांभाळ." असे तो म्हणाला.
देऊळ हलायचे थांबले. गुराख्याला आनंद झाला. त्याने भाकरी पोटभर खाल्ली. देवाला नमस्कार करुन पुन्हा रानात गेला. गाईसाठी बासरी वाजवू लागला.
प्रचीती ज्याला हवी होती तो मनुष्य तेथे होता.
"पटले की नाही?" संन्याशाने विचारले.
"राजा पळून का गेला? गुराखी तेथेच का राहिला?"
"अरे, राजा ज्या पिंडीची पूजा करीत होता, ती पिंडी त्याला खरोखर देवाची वाटत होती का? देऊळ हलू लागताच तो पळाला. देव जवळ असता तो पळाला का? संकटात देवाशिवाय कोण तारणार? परंतु ही पिंडी रक्षण करील असे त्याला वाटले नाही. त्याने स्वतःच्या पायांवर अधिक विश्वास ठेवला. ती पिंडी म्हणजे केवळ दगड. हीच त्याची शेवटी भावना झाली. परंतु तो गुराखी? देऊळ हलू लागताच पळाला नाही. त्याने पिंडीलाच मिठी मारली. संकटात लहान मूल आईला बिलगते. तो गुराखी देवाला बिलगला. त्याला ती पिंडी म्हणजे दगड वाटला नाही. त्याला तेथे खरोखर देव दिसत होता. ती पिंडी परमेश्वराची, देवा महादेवाची आहे, असे त्याला खरोखर वाटत होते. त्याचा खरा भाव होता, त्याची खरी भक्ती होती. त्याच्या पूजेत फुले नसतील, कापूर नसेल, चंदन नसेल. परंतु सर्व सुगंधांहून थोर असा खऱ्या भक्तीचा सुगंध त्याच्या पूजेत होता. आता पटले ना?" संन्याशाने शेवटी विचारले.
"होय महाराज." असे म्हणून विचार करीत तो मनुष्य निघून गेला.