सोनसाखळी
एक होता गाव. त्या गावात एक गृहस्थ राहत होता. त्याला एक मुलगी होती. त्या मुलीचे नाव सोनसाखळी. सोनसाखळी लहान असतानाच तिची आई मेली. सोनसाखळीच्या बापाने दुसरे लग्न केले.
सोनसाखळी बापाची लाडकी होती. तो आपल्याजवळ तिला जेवायला घेई, आपल्या जवळ निजायला घेई, तिच्या जवळ कितीतरी खेळ, किती बाहुल्या, किती बुडकुली. बाप सोनसाखळीला नवीन नवीन परकर शिवी, छान छान झबली शिवी. तिच्यासाठी त्याने कितीतरी दागिने केले होते.
सोनसाखळीचा असा थाट होता. जेवायला बसताना रंगीत पाट, पाणी पिण्याला रुप्याची झारी. जेवताना सोनसाखळी बापाला म्हणे, "बाबा, मला भरवा. मी मोठी झाल्ये म्हणून काय झाले?" मग प्रेमाने बाप तिला घास देई.
सोनसाखळीचा बाप एकदा काशीस जावयास निघाला. ते जुने दिवस. सहा महिने जायला लागत, सहा महिने यायला लागत. बाप सोनसाखळीच्या सावत्र आईला म्हणाला, "हे बघ, मी दूर जात आहे. माझ्या सोनसाखळीस जप. आईवेगळी पोर. तिला बोलू नको, मारु नको. पोटच्या मुलीप्रमाणे तिचे सारे कर."
सावत्र आई म्हणाली, "हे मला सांगायला हवे? तुम्ही काळजी नका करु. सोनसाखळीचे सारे करीन. तिला गुरगुट्या भात जेवायला वाढीन, कुशीत निजायला घेईन. न्हाऊमाखू घालीन, वेणीफणी करीन. जा हो तुम्ही. सुखरुप परत या."
सोनसाखळीचा बाप गेला. सावत्र आईचा कारभार सुरु झाला. ती सोनसाखळीचा छळ करु लागली. लहान कोवळी सोनसाखळी. परंतु तिची सावत्र आई तिला पहाटे थंडीत उठवी. सोनसाखळी झाडलोट करी, भांडी घाशी. ती विहिरीवरुन पाणी आणत असे. तिला पोटभर खायला मिळेना. शिळेपाके तिला तिची सावत्र आई वाढत असे. रात्री पांघरायलाही नसे. सोनसाखळी रडे. परंतु रडली तर तिला मार बसत असे.
एक दिवशी तर तिच्या कोवळ्या हाताला सावत्र आईने डाग दिला. फुलासारखा हात, त्याच्यावर त्या दुष्ट आईने निखारा ठेवला. असे हाल सुरु झाले. सोनसाखळी बापाला घरी आल्यावर हे सारे सांगेल अशी भीती सावत्र आईस वाटत होती. म्हणून एके दिवशी रात्री तिने सोनसाखळीस ठार मारले. एका खळग्यात तिचे तुकडे पुरण्यात आले. त्या खळग्यावर सावत्र आईने डाळिंबाचे झाड लावले.
काशीहून बाप परत आला. त्याने मुलीसाठी नानाप्रकारची खेळणी आणली होती. लहानशी चुनडी आणली होती. परंतु सोनसाखळी सामोरी आली नाही. सावत्र आई एकदम डोळ्यांत पाणी आणून म्हणाली, "गेली हो आपली सोनसाखळी! तिला कमी पडू दिले नाही. देवाची इच्छा, तेथे कोणाचे काय चालणार?"
बाप दुःखी झाला. त्याला सारखी मुलीची आठवण येई. जेवताना, झोपताना डोळ्यांसमोर सोनसाखळी येई. तिची खेळणी तो जवळ घेऊन बसे व रडे. बाप आंघोळीसाठी त्या झाडाजवळ बसे. ते डाळिंबाचे झाड मोठे सुरेख वाढत होते. कशी कोवळी कोवळी तजेलदार पाने. काय असेल ते असो. बापाचे त्या झाडावर प्रेम बसले. तो त्या झाडाची पाने कुरवाळीत बसे.
त्या झाडाला फुले आली. परंतु सारी गळून एकच राहिले. त्या फुलाचे फळ झाले. फळ वाढू लागले. वाढता वाढता डाळिंब केवढे थोरले झाले! लोकांना आश्चर्य वाटले. लोक येत व बघून जात. बाप त्या डाळिंबाला दोन्ही हातांनी धरी व कुरवाळी.
शेवटी ते डाळिंब पिकले. बापाने तोडले व घरात आणले. गावातील मंडळी ओटीवर जमली. केवढे मोठे डाळींब. कलिंगडा एवढे होते. बापाने ते डाळिंब फोडण्यासाठी हातात घेतले. तो फोडणाच तोच आतून गोडसा आवाज आला, "हळूच चिरा, मी आहे हो आत." असा तो आवाज होता. सर्वांना आश्चर्य वाटले.
बापाने हलक्या हाताने डाळिंब फोडले. आतून सोनसाखळी बाहेर आली. बाहेर येताच एकदम मोठी झाली. तिने बापाला मिठी मारली. "बाबा, बाबा, पुन्हा मला सोडून नका हो जाऊ." ती म्हणाली. सोनसाखळीने सारी हकीगत सांगितली. बापाला राग आला. परंतु सावत्र आई म्हणाली, "मला क्षमा करा. पाप कधी लपत नाही, असत्य छपत नाही, मला कळले. मी नीट वागेन."
पुढे ती खरोखरच चांगल्या रीतीने वागू लागली. सोनसाखळी सुखी झाली.