Get it on Google Play
Download on the App Store

गीताकण - १

* * * || लेख क्र १ || * * *

कुरुक्षेत्रावर जेव्हा युद्ध करण्याचे अर्जुनाने नाकारले तेव्हा त्याला समजावताना आणि विविध वैदिक उपदेश करतांना म्हणजेच "भगवदगीता" सांगताना एका क्षणी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले,

"कर्म कर पण ते करतांना फलाची अपेक्षा ठेवू नको म्हणजे त्या फलाशी तू बांधला जाऊन तुला ते फळ भोगावे लागणार नाही! म्हणून फळाची अपेक्षा न करता युद्ध (करण्याचे कर्म) कर जे कोणत्याही क्षत्रियाचे कर्तव्य असते! कारण आपल्याला नेमून दिलेले कर्तव्य करावेच लागते. त्याशिवाय आपला आत्मा ज्या शरीरात सध्या वास करत आहे त्या शरीराचा उदर निर्वाह तू कसा करणार?"

अर्जुन म्हणाला,

"पण युद्धाच्या कर्माने मी बांधलो नाही का जाणार? कितीही केले तरी कर्म आले की त्याचे फळ आलेच! आणि या युध्दात माझे नातेवाईक आणि अन्य लाखो लोक माझे हातून मारले जाऊन मला पाप नाही का लागणार?"

श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले,

"हे सगळे लोक विविध अविनाशी आत्मे आहेत, जे शरीर धारण करून समोर उभे राहिले आहेत. त्यांची येथे फक्त शरीरे मरतील, आत्मे नाही.

पण आत्मे मुक्त होतील. त्याची शरीरे मारण्याचे तुला पाप तेव्हाच लागेल जेव्हा तू युद्ध करताना युद्धाच्या फळावर नजर ठेऊन असशील जे चूक असेल. फळावर नजर म्हणजे उदाहरणार्थ - जिंकलास तर सुख आणि अहंकार, तसेच जर तू स्वतःचा काहीतरी स्वार्थ किंवा फायदा बघशील आणि आणखी जास्त जग जिंकण्याची इच्छा धरशील आणि हरलास तर दुःख आणि निराशा तुला घेरतील असा (फळाचा) विचार करत युद्ध करू नकोस!!

त्याऐवजी निष्काम भावनेने कर्म (युद्ध) कर.

मनात युद्धाच्या कोणत्याच भावी परिणामांची चिंता न करता तटस्थ भावनेने युद्ध कर, म्हणजे त्याच्या फळाच्या परिणामांपासून तू मुक्त राहशील!"

अर्जुन म्हणाला,

"पण काहीही केलं तरी कर्माने आपण बांधले जातो म्हणून त्यापेक्षा मी सगळे कर्म करणे यापुढे थांबवून, हे जग त्यागून सन्यास घेतला तर ते युद्ध करण्यापेक्षा चांगले नाही का होणार?"

श्रीकृष्ण म्हणाले,

"अरे पार्थ, असे तुझ्यासारखे धर्माच्या बाजूने असणारे लोक जेव्हा असा कर्म आणि संसार त्यागण्याचा विचार करतात तेव्हा मग दुर्योधनासारखे अधर्मी लोक आपले दुष्कर्म करायला मोकाट सुटतात!

तुझा कर्म त्यागण्याचा विचार म्हणजे जिभेला स्वाद घेऊ द्यायचा नाही म्हणून जेवणच करणे बंद करणाऱ्या माणसासारखे आहे. असा जेवण बंद करणारा माणूस जितके दिवस जेवण बंद करेल तितके दिवस त्याला मनात त्या स्वादाची आठवण पुन्हा पुन्हा जास्त तीव्रतेने येत राहील!!

म्हणजे न जेवताही स्वादाची इच्छा त्याला कर्म फलात बांधते आहे.

त्यापेक्षा त्या माणसाने स्वादाची इच्छाच मनातून नाहीशी केली तर?

त्याचप्रमाणे कर्म हे फळ निर्माण करतात म्हणून कर्मच करणे बंद करून टाकण्यापेक्षा कर्माच्या परिणामांच्या इच्छा (सकारात्मक किंवा नकारात्मक भावी फळाच्या अपेक्षा) मनातून नष्ट करणे योग्य नाही का?

असे कर्म केल्याने त्याचे फळ निर्माण झाले तरी ते भोगण्यापासून तू मुक्त असशील, म्हणजे ते तुला भोगावे लागणार नाही! त्या कर्मफळाच्या पाप पुण्यापासून तू मुक्त राहशील!"

पण अर्जुनाने आणखी एक शंका उपस्थित केली,

"पण माधव, आपली संस्कृती दया आणि करुणा शिकवते. हे सगळे अधर्मी आत्मे अज्ञानात आहेत. ते अज्ञान असे की सर्व सृष्टी व्यापून उरलेल्या परमात्म्याचे आपण अंश आहोत हे त्याना ज्ञात नाही आणि अधर्म करून आपण परमात्म्याला विसरून त्याचेपासून दूर जात आहोत हे त्यांचे लक्षात सुद्धा येत नाही आहे! मग अशांना मारण्यापेक्षा त्याचे अज्ञान दूर करून त्याचेवर दया दाखवणे योग्य नाही का?"

यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले,

"या सगळ्यांनी तुझ्यासोबतच शिक्षण घेतले आहे, त्यांनाही तुझ्यासोबत हे वेदज्ञान मिळाले आहे (आत्मा परमात्मा याबद्दल). त्यामुळे असे समजू नकोस की ते अज्ञानात आहेत! त्यांना सगळे ठाऊक आहे! म्हणजे ज्ञानी असूनही मुद्दाम अधर्म करत राहणाऱ्यांना दंड देणे हीच एक प्रकारची त्यांना दाखवलेली दया आहे.

लक्षात ठेव - तीन गुणांच्या कमी अधिक मिश्रणाने व्यक्ती बनतो.

"तामसिक" म्हणजे कोणतेही ज्ञान मुद्दाम दुर्लक्षित करून अविचाराने कृत्य करत राहाणे जसे की दुर्योधन, दुःशासन वगैरे.

"सात्विक" म्हणजे हे सगळे वैदिक ज्ञान अंगिकारून त्याप्रमाणे धर्माच्या मार्गावर चालणारे लोक जसा तू, युधिष्ठिर वगैरे.

आणि कळत असून वळत नसणारे मधले लोकं म्हणजे "रजासिक" जसा की कर्ण!

यांचे सगळ्यांचे अज्ञान पुन्हा दूर करण्याची वेळ आता कधीच निघून गेली आहे.

आता युद्ध करून त्यांना दंड दिल्याशिवाय दुसरा मार्ग नाही हे मी स्वतः परमात्मा म्हणजे भगवंत तूला सांगतो आहे.

तेव्हा हे अर्जुना, युद्ध कर!"

(वरील संवाद स्टार प्लस वरील 2013 साली गाजलेल्या महाभारतातील गीतेच्या उपदेशावर आधारित आहे)

गीताकण

Nimish Navneet Sonar
Chapters
गीताकण - १ गीताकण - २ गीताकण - ३