Get it on Google Play
Download on the App Store

माणूस होशील का

ज्ञानपीठ विजेत्या लेखिका कै. महाश्वेता देवी यांची एक सुंदर कविता आणि कुणीतरी त्याचं केलेलं मराठीकरण ....


आलास..?

ये, दार उघडंच आहे ...आत ये

पण क्षणभर थांब....!!


दारातील पायपुसण्यावर 

अहंकार झटकून ये...!!


भिंतीला बिलगून वर चढलेल्या 

मधुमालतीच्या वेलावर

नाराजी सोडून ये...!!


तुळशीपाशी मनाचे सारे ताप सोडून ये...

बाहेरच्या खुंटीला सारे व्याप टांगून ये...!!


पायातल्या चपलांबरोबर 

मनातली नकारात्मकताही काढून ठेव ..!!


बाहेर खेळणाऱ्या मुलांकडून

थोडा खेळकरपणा मागून आण..

गुलाबाच्या कुंडीतलं थोडं हसू

चेहेऱ्याला लावून आण...!!


ये...

तुझी सारी दुःखं, सारे प्रश्न 

माझ्यावर सोपव...

तुझ्या दमल्या-भागल्या जीवाला

प्रेमाच्या चार गोड शब्दांचे विंझणवारे घालते...!!


ही बघ....

तुझ्यासाठीच ही संध्याकाळ अंथरली आहे मी..

सूर्य क्षितिजाला बांधलाय आणि 

आकाशी गुलालाची उधळण केलीयं...

अन


प्रेम आणि विश्वासाच्या मंदाग्नीवर

चहा उकळत ठेवलाय...

तो घोट घोट घे....


ऐक ना ...

इतकंही अवघड नाहीये रे जगणं ...!          फक्त...... तू माणूस बनून ये...