कळलच नाही वर्गातल्या मुली कुठं गेल्या.
कळलच नाही
वर्गातल्या मुली कुठं गेल्या....
संगी, मंगी, कपी, मंदी
हसायच्या फिंदी फिंदी
आणखीही बऱ्याच होत्या वर्गात
कळायचंच नाही
आम्ही वर्गात आहे कि स्वर्गात....
खेळायच्या बडबडायच्या,
बागडायच्या,नाचायच्या
म्हणलं तर खूप अल्लड होत्या
त्या फ्रॉक, पोलके,
चापून चोपून घातलेल्या वेण्यासकट
त्या डोळ्यासमोरून तरळून गेल्या ....
कळलचं नाही
वर्गातल्या मुली कुठं गेल्या.
आम्ही शेण पाणी आणायचो
त्या वर्ग सारवायच्या
शाळा सुटल्यावर
वर्गही त्याच अवरायाच्या
आम्ही वर्ग झाडायचो,
त्या बस्करं घालायच्या
आम्ही पटांगण झाडायचो,
त्या सडा मारायच्या...
त्या लंगडी लंगडी,
झिम्माड फुगडी घालायच्या,
सर्वांशीच मनमोकळं बोलायच्या..
अभ्यास मात्र मन लाऊन करायच्या
कवितेत तर खूप खूप रमायच्या
सातवी पर्यंत गावातल्या गावात
त्या आमच्या बरोबर शिकल्या ......
कळलच नाही
वर्गातल्या मुली कुठं गेल्या
सातवी नंतर घरात
असा काही नियम नव्हता
बाहेर गावी मुलींना
कोणीच पाठवत नव्हता
शाळा सुटली पाटी फुटली
मुली बसल्या घरात
आम्ही दिवटे चिरंजीव
शिकत राहिलो शहरात
अल्पवयातच त्या बोहल्यावर चढल्या ....
कळलच नाही
वर्गातल्या मुली कुठं गेल्या ...
मिसुरड फुटायचा आतच
आम्ही मामा झालो, काका झालो
त्या आई झाल्या,मावशी झाल्या
काकू झाल्या, सून झाल्या ,
नणंद झाल्या, भावजयी झाल्या
विहिरीवर पाण्याला गेल्या
रानात गेल्या, वनात गेल्या
काही स्टोव्हवर गेल्या,
काही शेगडीवर गेल्या,
काही परत आल्याच नाही
काही परतल्या
पण पार करपल्या
जळालेल्या भकारीसारख्या
व्यवस्थेच्या चारकात पिळल्या गेल्या ......
कळलच नाही
वर्गातल्या मुली कुठं गेल्या..
त्या सावित्री होत्या
त्यांना एकही फुले भेटला नाही
त्या जिजाऊ होत्या
पण एकही शहाजी भेटला नाही
त्या कस्तुरबा होत्या
एकही गांधी भेटला नाही
कुणी म्हणत
त्या परक्याचं धन झाल्या
कुणी म्हणत,
निर्माल्य होऊन जीवन गंगेत
वाहून गेल्या ....
मला वाटत
त्या नवीन प्रकारे सती गेल्या..
काही असो
त्या आता दिसेनाशा झाल्या .....
कळलच नाही
वर्गातल्या मुली कुठं गेल्या.....